Homeफिचर्ससारांशIslands of Bombay : मुंबईची बेटं दिली होती भाड्याने!

Islands of Bombay : मुंबईची बेटं दिली होती भाड्याने!

Subscribe

पोर्तुगीजांनी मुंबईची सर्व बेटं त्यांच्याच लोकांना भाडेपट्टीने दिली होती आणि ज्यांना ती दिली ती मंडळी तिथं महसूल गोळा करत, काही स्वत: शेती करत. पोर्तुगीजांनी मुख्य मुंबई बेट मेस्त्रे दिआगोला 1431 पर्दाओस (सुमारे 537 रुपये) ना दिलं होतं. अन्य व्यक्तीला माहीम दिलं होतं 751 रुपयांना. माहीम कस्टम हाऊस दिलं गेलं 791 रुपयांना. संपूर्ण माझगावची किंमत होती फक्त 178 रुपये. परळ, वडाळा, सायन आणि वरळी यांची किंमत होती प्रत्येकी 154 रुपये. वाळकेश्वर, चेंबूर, देवनार आणि एलिफंटा ही बेटंही अशीच भाडेपट्टीने दिली गेली. आज भाडेपट्टीच्या या किमती पाहून हसू येईल, पण त्यावेळी ही रक्कम निश्चितच खूप मोठी असणार.

-संजीव साबडे

प्रत्येक शहराला स्वत:चा इतिहास असतो, भूगोल असतो आणि ते त्या शहराचं वैशिष्ठ्य असतं. वर्तमानकाळातील लोकांनाही त्याचा अभिमान असतो आणि काही गोष्टींविषयी रागही असतोच. राग असो वा प्रेम, इतिहास बदलत नाही आणि कागदोपत्री तो बदलण्याला अर्थ नसतो. शहराच्या इतिहासात त्याचा भूगोलही येतो. तो मात्र अनेकदा बदलत गेलेला असतो. इतिहासाविषयी जसं प्रेम असतं, तसंच वर्तमानकाळाविषयीही आत्मीयता असते. त्या आत्मीयतेमुळेच आपण त्रास, हाल अपेष्टा सोसून तिथं राहत असतो. तुमचं तुमच्या शहरावर मनापासून प्रेम असेल तर शहरातील जुन्या नव्या गोष्टी माहीत असायला हव्यात.

- Advertisement -

त्या गोष्टी म्हणजे नगरकथा. या कथा नगराचा इतिहास व भूगोल आणि वर्तमानातील आहेत. पण त्या अभ्यासातील इतिहास वा भूगोल नव्हेत. त्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अंबेजोगाई, ठाणे किंवा बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद या किंवा अशा कोणत्याही शहराच्या असतील. काही वेळा इतिहास जुना असेल आणि काही वेळा तो अलीकडचाही असेल. शहरात घडत असलेल्या एखाद्या घटनेचीही ती दखल असू शकेल. याला कथा म्हटलं असलं तरी त्या काल्पनिक मात्र नाहीत. त्या आवडल्या वा नाही आवडल्या किंवा त्यांची वेगळी माहिती तुमच्याकडे असेल तर अवश्य कळवा.

सुरुवात अर्थातच मुंबईपासून. ब्रिटिश वा पोर्तुगीज येण्याआधी मुंबई कशी होती, याची फारशी माहिती उपलब्ध नाही. मुळात तेव्हा ती मुंबई होती का, हाच प्रश्न आहे. याचं कारण ब्रिटिशांनी समुद्रातली सात बेटं एकत्र करून म्हणजेच बेटांच्या मध्ये असलेल्या सर्व खाड्या बुजवून हे शहर उभारलं. त्याआधी इथं पोर्तुगीज होते. त्यांच्याकडे ही सात बेटं होती. ती एकत्र करून एकसंध मुंबईवर सत्ता गाजवावी, असं त्यांना बहुदा वाटलं नसावं. ते आत आले माहीममार्गे.

- Advertisement -

आधीच त्यांनी वसई आणि आताच्या उपनगरांचा भाग असलेलं साष्टी बेटही जिंकलं होतं. या पोर्तुगीजांनी माहीमला सेंट मायकेल चर्च, वांद्य्राला माऊंट मेरी चर्च, सेंट अँड्रु चर्च आणि अंधेरीच्या सध्याच्या एमआयडीसी भागात एक चर्च उभारलं. वसईच्या नंदाखाल इथंही चर्च आहे. शिवाय दादरचं पोर्तुगीज चर्च, भायखळ्याचं ग्लोरिया चर्च वगैरे. शिवाय वांद्रे व मढ बेटावर किल्ले बांधले. त्यांचं राज्य असताना त्यांनी काही नागरी सोयी-सुविधा केल्याचं दिसत नाही. ते केलं ब्रिटिशांनी.

माहीम व माऊंट मेरीचं चर्च आजही खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत, पण अंधेरीला बांधलेलं सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च शिल्लक नाही. तिथं फक्त भिंतीच्या रूपाने काही अवशेष शिल्लक आहेत. दरवर्षी मे महिन्याच्या रविवारी ख्रिश्चन लोक तिथं प्रार्थनेला जमतात. त्या काळात या भागाचा उल्लेख कोंडीटा (कोंडीविटा) असा होता. कधी या ठिकाणी वा अन्य दोन्ही तिन्ही चर्च पाहायला गेलात तर तेव्हाचे काही उल्लेख सापडतात का, हे अवश्य पाहा. पोर्तुगीजांनी किल्ले स्वत:च्या संरक्षणासाठी आणि हल्लेखोरांशी लढणं सोपं व्हावं यासाठी बांधले होते आणि चर्च बांधली होती आपला धर्म व संस्कृती टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी.

पूर्वी प्रत्येक जेता असं करत असे. आपल्या शहर वा देशापासून दूर गेलेल्या लोकांना नेहमीच आपली संस्कृती व धर्म यांची प्रकर्षाने गरज भासते. त्यातूनच ही चर्च बांधली. त्यांनी केलेली सर्व बांधकामं फक्त उपनगरांत वा वसई भागात किंवा गोवा, दीव, दमणमध्ये होती. या पोर्तुगीज मंडळींनी इथले काही कोळी व भंडारी वगैरे सुमारे १० हजार लोकांना तेव्हा धर्मांतराद्वारे ख्रिस्ती करून घेतलं. स्थानिक लोकांचा आपल्याला विरोध कमी व्हावा आणि स्थानिकांशी विवाह करता येणं शक्य व्हावं हा त्याचा उद्देश. त्यावेळी धर्मांतराद्वारे ख्रिस्ती झालेल्या किनारपट्टीतील लोकांना आज ईस्ट इंडियन्स म्हटलं जातं.

पोर्तुगीज डॉक्टर गार्सिया द ओर्ते यांनी दक्षिण मुंबईत एक बंगला बांधला होता. मनोर किंवा मॅनोर हाऊस हे त्याचं नाव. आज जिथं नौदल गोदी आहे, तिथं तो बंगला होता. म्हणजे एशियाटिक सोसायटीच्या मागील बाजूस. तिथं आता जाण्यावर निर्बंध आहेत. ब्रिटिशांनी जेव्हा दक्षिण मुंबईच्या काही भागाच्या रक्षणासाठी किल्ला बांधला, तेव्हा त्यात हा बंगला समाविष्ट करण्यात आला. तो किल्ला म्हणजे फोर्ट. तो आता दिसत नाही, पण त्याच्या भिंतीचे काही अवशेष पाहायला मिळतात. पोर्तुगीजांनी सात बेटांची मुंबई ब्रिटिशांना 1636 साली दिली. पण माहीम, वांद्रे, वेसावे, मढ आणि बोरिवलीला लागून असलेले धारावी बेट व वसईचे सत्ताधीश पोर्तुगीजच होते.

पोर्तुगीजांनी मुंबईची सर्व बेटं त्यांच्याच लोकांना भाडेपट्टीने दिली होती आणि ज्यांना ती दिली ती मंडळी तिथं महसूल गोळा करत, काही स्वत: शेती करत. पोर्तुगीजांनी मुख्य मुंबई बेट मेस्त्रे दिआगोला 1431 पर्दाओस (सुमारे 537 रुपये) ना दिलं होतं. अन्य व्यक्तीला माहीम दिलं होतं 751 रुपयांना. माहीम कस्टम हाऊस दिलं गेलं 791 रुपयांना. संपूर्ण माझगावची किंमत होती फक्त 178 रुपये. परळ, वडाळा, सायन आणि वरळी यांची किंमत होती प्रत्येकी 154 रुपये. वाळकेश्वर, चेंबूर, देवनार आणि एलिफंटा ही बेटंही अशीच भाडेपट्टीने दिली गेली.

आज भाडेपट्टीच्या या किमती पाहून हसू येईल, पण त्यावेळी ही रक्कम निश्चितच खूप मोठी असणार. इथं रुपयांचा उल्लेख असला तरी पर्दाओस हे तेव्हाचं चलन होतं. या बेटांमधून पोर्तुगीजांना त्यावेळी तितकाच महसूल अपेक्षित होता, याचं कारणं तेव्हाची व्यावसायिक, शेती व उद्योग यांची आर्थिक स्थिती. आज या सर्व रकमा एकत्र केल्या तरी एका व्यक्तीचा महिन्याचा पगार होणार नाही. अर्थात पुढे त्यातील मुख्य सात म्हणजे पुढे मुंबईचा भाग बनलेली बेटं गार्सिआ द ओर्ते याला भाडेपट्टीने देण्यात आली. ही व्यक्ती पोर्तुगीज असली तरी ख्रिश्चन मात्र नव्हती.

पोर्तुगीजांच्या काळात व्यापार, स्वत:चं रक्षण, धर्मप्रसार आणि त्यासाठी चर्च याखेरीज मुंबईत फारसं काही झालं नाही. काही काळ ब्रिटिश व पोर्तुगीज दोघं इथं होते. वसईत आणि आसपासच्या सर्व भागात पोर्तुगीजांचा पराभव चिमाजी अप्पाने केल्याचं सर्वज्ञात आहे. त्या मोहिमेत त्यांना ब्रिटिशांची साथ होती, असं म्हणतात. तसे काही उल्लेखही सापडतात, पण एकूणच पोर्तुगीज राज्याने मुंबईला काहीच दिले नाही आणि बरेचसे जे होते ते हिरावून घेतले. ब्रिटिशांनी सत्तेसाठी रेल्वे, टपाल खाते, अनेक इमारती दिल्या. तसं पोर्तुगीज राजवटीबद्दल म्हणता येत नाही.

माऊंट मेरी
वांद्रे किल्ला
बॉम्बे कॅसल म्हणजे फोर्टचा भाग
माहीम किल्ल्याचे अवशेष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -