-योगेश पटवर्धन
एक जानेवारीला एखादा संकल्प सोडणे हा शिष्ट संमत रिवाज आहे. संकल्प करायचा नसतो, तो सोडायचा असतो. त्याचे नावच तसे आहे. त्यातील सगळ्यात लोकप्रिय आहे तो ट्रॅकवर चालायला जायचे हा. डॉक्टर सगळ्या आजारांचे कुळ हे वाढलेले वजन आहे म्हणत सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळ्या गोळ्या, सिरप (विकत) घ्यायला लाऊन रोज चार किलोमीटर फिरत जा… असा सल्ला देतात. माझ्या ओळखीचे एकही डॉक्टर मला ट्रॅकवर कधी दिसले नाहीत. मात्र घरापासून पाव किलोमीटर अंतरावर असलेल्या क्लिनिकमध्ये ते गाडी घेऊन येतात. प्रत्येक वॉर्डात चालण्याचे पेव्हर अथवा मातीचा ट्रॅक तयार आहेत.
सकाळ संध्याकाळ दोन तास सोडले तर ते इतरवेळी निर्मनुष्य असतात. भटकी कुत्री, भणंग, घरात अडचण ठरणारे ज्येष्ठ, कॉलेज अथवा क्लास चुकवून आलेली मुलं आणि मुली अथवा झोपेचा उतारा आवश्यक असणारे देशप्रेमी यांचा तिथे दिवसा पहारा असतो. त्यावेळी गस्तीवरचे पोलीससुध्दा एखादे सावज शोधायला तिथे राऊंड घेतात. कायद्याच्या भाषेत त्यांना टवाळखोर असा भारदस्त शब्द आहे. दंड विधान अमुक तमुक अन्वये त्यास दंड आकारून आणि समज देऊन सोडून देण्याची तरतूद आहे. दंड भरण्याइतके पैसे नसल्यास यथाशक्ती काहीतरी भरावे लागते, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू.
तिथे चालायला सुरुवात करायची म्हणजे बरीच तयारी करावी लागते. ऋतूप्रमाणे बदलणारी टोपी, काळा अथवा निळा ट्रॅक सूट, पॉवर किंवा पुमाचे पांढरे जोडे, जॉकीचे सॉक्स, पावले मोजणारे मनगटी घड्याळ, नाडीचे ठोके ऐकणारे यंत्र, टर्किश नॅपकिन, पाण्याची ब्रँडेड बाटली, कमरेच्या पट्ट्यात अडकवायचे वॉलेट, मोबाईलचे हेडफोन हे सगळे असल्यास प्रकृती ठीक राहते असे म्हणतात.
काही जण लोकल ट्रेन गाठण्याच्या आविर्भावात धावतात, काही चारशे मीटर स्पर्धेत येण्याच्या तयारीने पळतात, काही श्वान मागे लागल्यासारखे, तर काही चोर, चोर म्हणत पकडायला धावावे तसे,. …काही पळून जाण्याच्या सावध तयारीने, काही प्रसाद वाटप संपण्याच्या आत मुसंडी मारावी असे. काही तोळामासा प्रकृतीचे मिल्खा सिंग यांना गुरुस्थानी ठेऊन बादली भर घाम गाळून लक्ष वेधक कामगिरी करत असतात. ट्रॅक सूट घामाने भिजला की त्यांचे चित्त शांत होते. काही श्वानासारखे तोंड उघडे ठेऊन धूळ खेचत धावत असतात.
कफ सिरप निर्माते त्यांना मनोमन धन्यवाद देतात.वर्षांच्या सुरुवातीला संकल्प करण्याची प्रथा आहे. यापैकी एक सकाळी चालण्याची असते. दहा जानेवारीनंतर ट्रॅक ओस पडतील. ट्रॅक सूट भाजी बाजारात जाण्यास उपयोगी पडतील आणि बूट ट्रॅकवरच्या माती सकट दारापाशी असलेल्या रॅकमध्ये विसावतील. कुणी विचारलेच तर, सकाळी जाणारे सांगतील, आता मी संध्याकाळी जातो, संध्याकाळवाले म्हणतील, मी ट्रॅक बदललाय. होना, नवीन वर्षात जरा चेंज…. तरुण सांगतील, अरे मी आता जिम जॉईन केलीय. डॉक्टर म्हणे, डस्टची अॅलर्जी आहे तुम्हाला… स्त्रिया सांगतील, मी आता झुंबा सुरू करतेय. फ्रेश वाटतं ग. असेच काही किंवा बाही.
काही ज्येष्ठ मुलाच्या लग्नातला सफारी आणि रबरी चपला घालून बागेत किंवा विनामूल्य प्रवेश असलेल्या प्रदर्शन आणि विक्री असलेल्या हँडी क्राफ्ट प्रदर्शनात उगाच भटकायला गेल्यासारखे, मागे हात बांधून रेंगाळत असतात. कुणी ओळखीचे भेटल्यास पेन्शन, सातवा वेतन आयोग, सर्व रोग निदान शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, चारी धाम यात्रा, नर्मदा परिक्रमा, आधार कार्ड गहाळ झाल्यास काय करावे, ज्येष्ठ नागरिक प्रवास भाडे सवलत कार्ड, नातवाचे परदेश दौरे, खुब्याचे ऑपरेशन, ओळखीच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळवून देण्याचे आश्वासन, जेनरिक औषधे, मतदार यादीत नाव कुठे शोधावे, कर्ण यंत्रे, कुठले भाऊसाहेब केव्हा निवृत्त होणार याचे अंदाज, कुणी कुठे मलई खाल्ली याचे जुने किस्से, कुणाचा दशक्रिया विधी कुठे आणि केव्हा याची चौकशी, असे काही बोलत बसतात. म्हणजे चालणे सोडून बसतात. घरी जाताना शक्तिवर्धक तृण रस पान घडविणारा प्रायोजक मिळाल्यास उत्तम.
चाळीस वर्षांपूर्वी असे काही ट्रॅक नव्हते. बरेच लोक अनवाणी पायांनी, लेंगा सदरा घालून, हातात कापडी पिशवी घेऊन राम प्रहरी देव दर्शनाच्या ओढीनं बाहेर पडत. एखादे लांबचे मंदिर गाठत. तिथे अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालून दोन मिनिट पायरीवर बसून परत जाताना पिशवीत ताजी फुले, भाजी किंवा दूध घेऊन घरी येत. फक्कड चहा घेऊन दैनंदिन कामाला भिडत. काही कारणाने ते हुकले तर मनोमन खजील होत. मात्र त्याचे फाजील स्तोम त्यांनी माजवले नाही.
साखर जाळणे, उच्च रक्तदाब यासाठी वेगळी धावाधाव न करता सहस्त्र चंद्रदर्शन घेऊन झाले की चार सहा जुनाट पोथ्या, किसान विकास पत्रांच्या जीवापाड जपलेल्या पावत्या, उसवले म्हणून हातशिलाई केलेले जुनाट लेंगे, चार सहा गांधी टोप्या, स्टीलच्या दांड्याची संपूर्ण नांव रंगवून घेतलेली, अनेक पावसाळे झेललेली १८ काड्यांची प्रशस्त छत्री ही स्थावर आणि जंगम मालमत्ता मागे सोडून इहलोकीची यात्रा संपवित. बाराव्याला खुर्चीवर शाल अंथरून चंदनाचा हार घातलेला फोटो मात्र हसरा असायला हवा, इतकीच त्यांची कुलदीपकाकडून माफक अपेक्षा असायची.
दहा जानेवारीनंतर ट्रॅक ओस पडतील. ट्रॅक सूट भाजी बाजारात जाण्यास उपयोगी पडतील आणि बूट ट्रॅकवरच्या माती सकट दारापाशी असलेल्या रॅकमध्ये विसावतील. कुणी विचारलेच तर, सकाळी जाणारे सांगतील, आता मी संध्याकाळी जातो, संध्याकाळवाले म्हणतील, मी ट्रॅक बदललाय. होना, नवीन वर्षात जरा चेंज…. तरुण सांगतील, अरे मी आता जिम जॉईन केलीय. डॉक्टर म्हणे, डस्टची अॅलर्जी आहे तुम्हाला… स्त्रिया सांगतील, मी आता झुंबा सुरू करतेय. फ्रेश वाटतं ग. असेच काही किंवा बाही.