घरफिचर्ससारांशअंतरीची रिक्त ओंजळ !

अंतरीची रिक्त ओंजळ !

Subscribe

निसर्गाच्या सहवासात भावभावनांचाही कल्लोळ अविरत उमटत असतो बरं. निसर्गाच्या लहरींप्रमाणे मनाहृदयातील नाजूक तरल भावलहरीनांही भरतेपण येते. अनेक वाटांबेटांवर अनेकांची भेट होते. मैत्री होते,कधी गाढ मैत्री जमते. अन नैसर्गिक स्त्री-पुरुष आकर्षणात मनाहृदयाच्या तारा जुळल्याच तर प्रेमही संभवते. त्यात सहजपण असते, जे कुणी नाकारू शकत नाही. आपण कोणाच्या तरी प्रेमात पडावे आणि कुणी आपल्या प्रेमात पडावे, असे विशिष्ट वयात बहुतेकांना वाटून जाते. या वाटण्याला अर्थ असतो. प्रेमामुळे विधायक गोष्टी उत्कटतेने व तत्परतेने पार करण्याची क्षमता वाढणार असेल, तर प्रेमाचे अवमूल्यन होऊच नये.

कुणी कुणास आवडणं ही प्रकृतीशी संबंधित बाब असते. स्त्री पुरुषांना, तरुणतरुणींना परस्परांविषयी अनामिक आकर्षण वाटणं हे तर नैसर्गिक होय. फारतर ते सौम्य किंवा तीव्र असू शकते. ते कधीकधी इतके सूक्ष्म तरल असते की कुणालाच बोध घडत नाही. पण जेव्हा जाणीव होते, तेव्हा मनाच्या मूलभूत शक्तीवर हुरहूर, हर्ष भाव निर्माण होतात. काही वैशिष्ठ्यांवर भाळून आकर्षित होणे, कुणी खास वाटणे आणि ती व्यक्ती आपलीच व्हावी असे वाटणे हेसुद्धा स्वाभाविक घडते.

विशिष्ट गुणसंपदा कुणाकडे असणे आणि त्याचा कुणास हेवा अन त्याबद्दल प्रेम वाटणे या शुद्ध भावनाच होत. त्या व्यक्त होण्यापर्यंतची मनातली हुरहूर, हृदयातील घालमेल ज्याचे तो जाणे. त्या दरम्यानवाटेवरील अधल्यामधल्या भावपूर्ण नजरेची अबोल भाषा फक्त व्यक्त होत असते. तोही एक काळ हवाहवासा अन त्यातून उत्स्फूर्त उत्साह वाढवणारा असतो. यास तिसरा म्हणाल तर फक्त निसर्ग साक्षी असतो. एवढं सगळं कथन करतोय, म्हणजे या आल्हाददायक क्षण पर्वाचा वाटेकरी होण्याचं भाग्य लाभलंय मला. ‘भाग्य’ या अर्थाने की, अरेरे, हे पर्व आपल्याकडून निसटून गेल्याचे शल्य आयुष्यात राहिले नाही.

- Advertisement -

गिर्यारोहण साहसी क्षेत्रात जबाबदारीच्या भूमिकेत असताना या विषयाकडे तितकंसं जाणीवपूर्वक लक्ष नाही गेले. बहुतेकदा निसर्ग-शिस्तीच्या दडपणाखाली इतरांशी कठोर वागणेच झाले. कुणास रुचेल न पटेल इतका कटुपणाही घ्यावा लागत असे. त्यामुळे माझ्याबद्दल आदर असे, पण त्याहून या खडूस तापट युवकाशी फार जवळीक नको,असेच वाटत असावे. शिबिरांमध्येही गाढ दोस्ती व्हायची ती शालेय मुलांशीच. त्या बाल निरागस मुलांशी मिसळताना न जगता आलेले बालपण सुखवायचे. तेवढे पवित्र वात्सल्य ‘वयात आलोय’ हे समजणार्‍या युवापाशी नसते,अशी माझी आजही समज आहे. त्यामुळे शिबीरा-मोहिमे पुरताचे सभासद मित्र यापलीकडे तशी कुणाशी मैत्री होणे असंभव होते. तर खास मैत्री अन त्यापुढील प्रेम वगैरे वगैरे जरा दूरच राहिले.

‘ना कोणते पाश ना कुठे गुंतागुंत’, हा एकतर्फी मार्ग माझ्याकरता भल्याचा होता,ज्यामुळे चाकोरी पल्याडच्या मोहिमांना गवसणी घालताना ‘स्व’त्वाची ओळख समजून घेता-देता आली. नवनावीन्यपूर्वक मोहिमांची आस आणि त्याच्या यशस्वीतेकरिता जीवतोड प्रयत्न असायचे. अंतिम टप्प्यात सहकार्‍यांचे सहकार्य असायचे.

- Advertisement -

पण कधीतरी वाटायचं, कुणीतरी असावयास हवं. आपलं मानून हातभार लावणारं, हवं नको यात विशेष लक्ष देणारं. पण हेसुद्धा वाटण्या इतपतच मन थांबे, कारण वाटेवर तसंही कुणी अचानक कसे सापडेल? डोळ्यास भावणार्‍या सौंदर्यापेक्षा मना-हृदयातील नितांत निर्मळ सौंदर्याची ओढ जरूर असायची. कोणत्या तरी एक दुसर्‍या मोहिमेत ‘ते’ क्लिक झाल्यासारखे वाटले खरे. पण हा ‘पण’ असावा,असा काही फरक माझा मलाच वाटत होता असल्याने काही खरं नव्हतं.

त्याकाळी अशा काही मोहिमा असत की, त्या थरारक अनुभवानंतर मोहिमेतील सहभागी सदस्य आवर्जून आपले अनुभव-अभिप्राय कळवत. त्यात त्यांच्या त्या अविस्मरणीय अनुभव क्षणांचे रसभरीत वर्णन करताना कुठेतरी त्याचे श्रेय मला देऊन मैत्रीचं अतूट नातं राहील याची ग्वाही असे. अशाच पत्रांत 1993 मध्ये एक अनपेक्षित पत्रं अभिप्राय म्हणून आलं आणि तिथून पुढे ‘ति’चा मैत्री प्रवास सुरू झाला. जी मैत्री नेहमीहून वेगळी. हवीहवीशी वाटणारी,प्रतीक्षा करावयास लावणारी,संवादसुख देणारी होती.

वरवर मैत्री वाटली तरी हृदयात वेगळ्या संवेदना घडायच्या. ते जाणवू लागले, तरी व्यक्त होण्यास दडपण असायचे. कारण, न जाणो अशा काही एकतर्फी अपेक्षेत ही मैत्री तुटायास नको. मैत्रीतून अधिकार येऊ लागतो. रुसवा फुगवा, सुख दुःखाच्या क्षणी समज सांत्वन केले जाऊ लागते. मोकळ्या आसमंतात फिरणे होते. पूर्व आठवणी अनुभव क्षणांची मुद्दाम आठवण काढून जास्तीत जास्त सहवासाचे कारण मिळते. केव्हा कळत-नकळत होणार्‍या नाजूकशा स्पर्श सुखानेही रोमांचित व्हायचेहे सारेकाही घडत होते. मैत्रीतून प्रेमात होत असलेले रूपांतर हा प्रेम-जीवनाच्या काळातील सर्वोच्च काळ असावा.

प्रेम करायचे पण ते अप्रकटपणे, अधिकार वाटतो पण मिळालेला नसतो, प्रवास सुरू असतो पण पोहोचायचे स्थान निश्चित नसते,वेळ नसताही मुद्दाम त्यासाठीच काढला जातो, शाश्वत नसताही मनाहृदयाची शतप्रतिशत पूर्ण गुंतवणूक होत असते. निसर्ग-पर्वत शिखराच्या संगतीत माझ्या या प्रेमात भावभावनांची समरसता-समरुपता होती. कोणते गणित नव्हते ना जमाखर्च. होती केवळ शुद्ध भावभक्ती. उत्साह, आनंद, प्रसन्नता, संवाद, कर्तव्यदक्षता या जीवनमूल्यांच्या संवर्धनास साह्यभूत ठरणारे प्रेम मी अनुभवत होतो. माझं प्रेम ‘ति’च्यावरील भक्ती होती. माझ्याकरता ‘ती’चं प्रेम सगुण,सचेतन,भावगम्य विषय होता. होय हे सारं सर्वकाही माझ्याही शिदोरीत जमा आहे बरं.

कुणी कुणास कसे केव्हा कुठे भेटायचे,जे आपल्या हाती नसते ते प्रारब्ध मानावे. तरीही मैत्री कुणाशी होऊ शकते हे जसे कळते तसेच प्रेम कुणावर बसू वा टिकू शकते, याचाही विचारी मनाने अगदी याच वेळी अंदाज घ्यावयास हवा. पण वास्तवात तसे होत नसावे. म्हणून, म्हटलं जातं, प्रेम हे ‘आंधळे’ असते.

सफल प्रेम हे हळूहळू पक्व होत जाणार्‍या फळासारखे असते. साल तीच गाभाही तोच. रुची रंगात फरक पडतो, मात्र व्यक्तित्वाची अंगे अभंग राहून अधिक सुंदर व अर्थपूर्ण होतात हेच खरे प्रेम. अशाच प्रेमाला उद्देशून म्हटले गेलेय, ‘क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव घडो मरणांचा’. पण, प्रेमातील सुख अनुभवताना किंवा अनुभवल्यानंतर अढळ आनंदाचा परिमळ जिथे मागे उरत नाही,जे प्रेम एक प्रकारच्या मनःशांतीत विराम पावत नाही. त्या प्रेमाचा स्तर खालच्या इयत्तेचा मानावा. अशाला उंची प्राप्त न होता त्याकडे अवनत होणारा मनोव्यापार म्हणूनच पाहावे लागेल.

वैयक्तिक ‘फाजील महत्वाकांक्षेमुळे’ अस्वस्थतेची वादळे निर्माण झाली की समजावे, कुठेतरी काहीतरी चुकतेय. हे प्रेम नव्हेच आपण समजतो तोच भावअर्थ समोरची व्यक्ती समजत मानत असेल असे नसते. ते विचारण्याचा फार अट्टाहास न करता आपलं आपण समजून घ्यावं. प्रेम सफल होता होता कोमेजून जात असल्याचे कळते. उत्कट क्षणातून प्राप्त स्फूर्ती फक्त पार्थिवाच्या परिघात प्रसरण पावणारी असेल,तर ते प्रेम नव्हेच नव्हे.

आपणच मुक्तपणे विहार करावयास दिलेल्या प्रोत्साहनाने जेव्हा पंख फुटतात. डोळ्यावर पटल येते आहे ते दिसेनासे होऊन नको ते हवे असे भासते. पैसा श्रीमंती भौतिक सुखाची आसक्ती वाढते, तेव्हा प्रेमाचे गणित साफ चुकले समजायचे.

‘ति’ला स्फूर्ती शक्ती बळ पुरवणारे आपले प्रेम जेव्हा व्यावहारिक मूल्यावर तपासले जाते,तेव्हा ते आपल्या जीवनात भोवरे निर्माण करून क्षय करणारे निश्चित समजावे. पुढे उथळ अट्टाहास करूच नये. ‘फळाची अपेक्षा करूच नये’ अशी मनाची समज घालण्याइतपत येऊन,मी या धड्यातून यातनामय अवस्थेतून बाहेर पडलो. म्हणून तर यावर स्वानुभवातून लिहू शकतोय. हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावर निसर्गमित्र मिलिंद बर्वेच्या नावाची पाटी आहे. ‘प्रेमभंग’ झाल्याने त्याने कोकणकड्यावरून स्वतःस झोकून दिले होते.

खरंय,अशावेळी जगणे असह्य होते. उरातले सलणारे व्रण मरणासन्न भासतात. प्रेमाची सात्विक भावसमाधी जेव्हा भंगते, परस्परांशी समरस पावणार्‍या दोन जीवांनी अनुभवलेले ते अद्वैत जेव्हा उद्ध्वस्त होते, तेव्हा तेच प्रेम विषार ठरते. प्रेमभंगासारखी जीवघेणी व्याधी आत्महत्या करावयास प्रवृत्त करते. जगातील सर्वच गोष्टी पूर्णत्वास पोचू द्यावयाच्या नाहीत, असा नियतीचाही निश्चय असावा. सूर्याने तापदायक ठरावे, चंद्राने क्षयी राहावे, प्राणवायूने प्रदूषित व्हावं, हे जसे अपूर्णत्वाचे आविष्कार, तसेच प्रेमाच्या बाबतीतही असावे. काळ बदललाय. माणसांनी भ्यावे असे अनेक विषय पूर्वी होते. त्या भयावर मातही करता येत होती. पण आता माणसांना भीती उरलीय ती फक्त माणसांची. ज्ञान-सूर्याची किरणे जशी पसरू लागली तशी काळोखातली भुते, अंधश्रद्धेत दडलेली पितरेही पळालीत. पण जिवंत माणसंच माणुसकीचा घात करू लागलीयत.

मी सावरलो कसाबसा. बेलाग कातळकड्यांना उघड भिडणारा मी या प्रकरणात मात्र खरंच बिथरलो. दुःखाचे कढ आईच्या मायेत केव्हा सह्याद्रीच्या कुशीत विसावून क्षमवण्याचा प्रयत्न करू लागलो. ‘प्रेम’ असफल ठरू शकते, ही शक्यतेच्या कोटीतली एक संभाव्य घटना असू शकते अशी माझ्याच मनाची मी समज काढत होतो. अशावेळी तो ‘भावभ्रम’ मानून आत्मसन्मानाची भावना वाढवली तर या प्रेमभंग कडेलोटापासून स्वतःला सावरणे शक्य आहे. तरीही तुटलेले मन सावरण्या आवरण्यास अवधी लागला. प्रेमभंगामुळे आत्महत्या का करतात, तो दाहही समजला. तरीही, मानवी जीवनाचे अवमूल्यन करणारी घातकी इच्छा मनात येऊ न द्यावी. माझं स्वच्छ मत झालंय केव्हाही स्वतःला विसरून एकाच एका व्यक्तीत सर्वस्व केव्हा शोधू नये. प्रेमाचे रूपांतर पाशात होऊ देऊ नये. एकाच व्यक्तीच्या चिंतनात मग्न होऊन तिच्या सहवासात धुंद होऊन जग विसरणे म्हणजे विकारवशता होय. जीवन एक करार असतो, तो मोडायचा नसतो. खचायच्या काळातही समोरच्या क्षणाला उत्कटतेने सन्मुख झालो की, नियतीकडून सन्मानित झाल्याशिवाय राहत नाही.

आपल्या मर्यादा गुणदोषांसह स्वतःला जाणून स्वरूपाचा स्वीकार करणं आणि असलेल्या क्षमतांचे परिणत रूप जाणून त्याच्या संवर्धनाचा निश्चय करणं हा आणि हाच एकमेव पर्याय आपल्या हाती असतो. अन्य कुणीही यावेळेस आपला नसतो,अन सोबतही नसतो. प्रत्येक व्यक्तीभोवती एक अवकाश असते,ज्यात ती मुक्तपणे विहार करते. या अवकाशाला आता तडे पडू लागलेयत. समाजात असे धुके दाटत राहिले तर विशुद्ध माणूसपण आढळणार कसे? व्यक्तीत्वाचे भावविश्व तेजस्वी ठेवण्याची क्षमता ज्या प्रेमात असेल तेच खरे प्रेम. तेच दिव्य असेल. तेच दैवी असेल. ऐर्‍यागैर्‍याचे काम नव्हे ते.

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -