घरफिचर्ससारांशनाटकाचा अवघड घाट!

नाटकाचा अवघड घाट!

Subscribe

जाणतेपणाने नाटक करायला सुरूवात करून आता उणीपुरी चोवीस वर्षे झाली आहेत. या चोवीस वर्षांच्या प्रवासात पथनाट्य, एकांकिका, दीर्घांक, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा सगळ्या प्रवाहातल्या नाटकांशी परिचय झाला. परिचय या अर्थी म्हणतो की, नाटकाची बाराखडी शिकता आणि गिरवता गिरवता चोवीस वर्षे निघून गेली. आजही ‘जीवन त्यांना कळले हो’च्या धर्तीवर ‘नाटक आम्हा कळले हो’ असं म्हणण्याचं धारिष्ठ्य आणि उद्दामपणा मी करणार नाही.

लहान असताना घोडपदेवच्या ज्या चाळीत मी राहत होतो, तिथे एक बालसंस्कार वर्ग घेतला जात असे. चाळीच्या वार्षिक उपक्रमांपैकी एका वर्षीच्या सत्यनारायणाच्या पूजेत त्या वर्गातल्या मुलांनी एक नाटुकलं सादर करायचं ठरवलं. विषय होता अंधश्रद्धा. ‘आबा भगताचा दरबार’ असंच काहीसं नाटुकलीचं नाव होतं. आता मला ते तितकंसं आठवत नाही. त्या नाटुकल्यात मी एका धूर्त साधूचं सोंग घेतलं होतं आणि ते वठवण्यासाठी टीव्हीवरच्या त्या वेळच्या प्रसिद्ध मालिकेतील, महाभारतातील शकुनी मामाच्या लकबींची सही सही नक्कल केली होती. सबंध चाळीत मी शकुनी मामा म्हणून प्रसिद्ध झालो होतो. पुढे शाळा शिकत असताना गॅदरिंगमध्ये सलग दोन वर्षे भाग घेतला होता.

एका वर्षी शिक्षकांच्या तगाद्याने दिवाकरांच्या नाट्यछटांमधलं ‘बोलावणं आल्याशिवाय नाही’ सादर केलं होतं. ते चांगलं झालं असा अभिप्राय शाळेतल्या शिक्षक आणि मित्रांकडून मिळाल्यानंतर, दुसर्‍या वर्षी म्हणजे आठवी की नववीला असताना ‘आपेश मरणाहून वोखटे’ हे स्वगत सादर केलं होतं. या स्वगताची तालीम माझ्या आईने माझ्याकडून करून घेतल्याचंही आठवतंय. शाळा संपेपर्यंत रंगमंचावर वावरण्याचा हा माझा अल्प अनुभव होता. या अनुभवाच्या शिदोरीवर पुढे मागे आपण कधीतरी जाणतेपणाने रंगमंचावर पाऊल ठेवू, या इच्छेचं बीज रोवलं गेलं असावं.

- Advertisement -

शाळा संपली. बारावीपर्यंतचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालं आणि त्या सुप्त इच्छेने उचल खाल्ली. त्याचा परिणाम म्हणून आपला छंद जोपासायला जिथे संधी मिळेल, असा प्लॅटफॉर्म शोधत असताना समवयस्क मुलांच्या एका नाट्यसंस्थेच्या संपर्कात आलो. तिचं नाव होतं, ‘संवेदना परिवार, मुंबई’. माझ्या नाटकाविषयीच्या समजुतींना जे वळण लागायचं होतं, माझ्या धारणा पक्क्या होण्याचा जो सुरुवातीचा काळ होता, तो या संस्थेतच मी व्यतीत केला. पण तो अल्पकाळही अक्षरश: झपाटलेला होता. तिथे काम करत असताना अवांतर वाचनाची जी आवड वडिलांमार्फत आधी निर्माण झाली होती, तिला दिशा देण्याचं काम झालं. नाटक केंद्रस्थानी ठेवून वाचन होत गेलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरूवातीलाच स्पर्धेसाठी नाटक नाही करायचं, हा विचार पेरला गेला.

स्पर्धेत नाटक केल्याने अभिव्यक्तीवर येणार्‍या मर्यादा आणि बंधनांची जाणीव करून देण्यात आली. हा विचार काळाच्या ओघात पुसट झाला आणि स्पर्धेचं महत्व कळू लागलं, तो नंतरचा भाग. पण सुरूवातीच्या काळात स्पर्धेच्या संभाव्य दुष्परिणामांची जाणीव झाली, हे खरं. संस्थेच्या धोरणाप्रमाणे स्पर्धेपासून लांब राहायचं, तर मग करायचं काय, हा प्रश्न होताच. अर्थात, त्याचा पर्याय संस्थेच्या धुरीणांकडे होता. आपण स्पर्धेसाठी वणवण न करता नाटकात नाव कमावलेल्या दिग्गजांनी येऊन आपल्यासाठी नाटक करावं, हा तो पर्याय ! याचाच परिणाम म्हणजे, सौरभ शुक्ला आणि निर्मल पांडेंसारख्या लोकांनी येऊन संस्थेसाठी नाटक करणं, नसीरसारख्याने आमच्यासारख्या अगदीच ‘रॉ मटेरिअल’ असलेल्या मुलांसाठी वर्कशॉप घेणं, हे सगळे उपक्रम ओघाने आले.

- Advertisement -

या उपक्रमांसोबत सौरभ म्हणा, निर्मल म्हणा वा नसीर….ही सगळी मंडळी आपापला नाट्यविषयक दृष्टिकोन घेऊन आली आणि त्याचं ‘एक्स्पोजर’ आम्हाला मिळालं. चार बाकडे एकत्र बांधून त्यालाच स्टेज समजत आयुष्यभर नाटक केलेल्या सौरभ शुक्लांनी उपलब्ध साधनांमध्ये केलं जातं ते नाटक हा संस्कार दिला. निर्मल पांडेंची नाटकाकडे पाहण्याची दृष्टीच अत्यंत सात्विक होती. ‘भय और करूणा के द्वारा आत्मा का शुद्धिकरण’चा उच्चार वारंवार ते आमच्या तालमीत करत असत. रंगकर्मी असण्याआधी आपण माणूस म्हणून किती ‘प्युअर’ आहोत, यांवर त्यांचा आग्रह असे. स्टेजवर तुम्ही किती चांगला अभिनय करता, हे दुय्यम. नाटक सुरू असताना तुम्ही विंगेत कसं वागता, यांवर तुमचं रंगकर्मीपण जोखणारे निर्मल नाटकाच्या माध्यमातून माणूसपणाची ‘ग्रेस’ शोधण्याची दीक्षा देऊन गेले. प्रयोग संपल्यानंतर तुमच्या वेशभूषेतल्या कपड्यांची घडी तुम्ही कशी घालता, तुमची प्रॉपर्टी प्रयोगानंतर कशी हाताळता, यावर तुमचा ‘कलावंत’ होण्याचा प्रवास ठरत असतो, असं मनात ठसवून गेले. नसीरने घेतलेल्या दोन दिवसांच्याच पण अतिशय बौद्धिक दमछाक करणार्‍या कार्यशाळेने तर अभिनयातले ‘बेसिक्स’च पुन्हा घासून पुसून पाहायला भाग पाडलं.

एकातून एक कामांची साखळी तयार होते, त्याप्रमाणे ‘संवेदना परिवार’च्याच माध्यमातून बी. व्ही. कारंथांच्या रंगकर्माचा परिचय झाला. कारंथांचं नाटक म्हणजे लोकसंगीताच्या आधारे संगीताची आपली स्वतंत्र विधा मांडणारं नाटक आहे. ‘गाओ तो ऐसे की लगे बोल रहे हो और बोलो तो ऐसे की लगे गा रहे हो’ या ब्रीद वाक्याला अनुसरून चाललेल्या त्यांच्या रंगकर्माचा परिचय थेट दक्षिणेत बी. जयश्रींपर्यंत घेऊन गेला. नाटकाशी संलग्न असलेल्या सगळ्या पूरक कलांना स्पर्शून घेत एक नट, एक दिग्दर्शक आणि एक संस्थाचालक म्हणून सारख्याच समर्थपणे लोकांसमोर येणं म्हणजे काय, याचा धडा बी. जयश्रींच्या गुब्बी थिएटरमध्ये शिकायला मिळाला.

काळाच्या ओघात संस्थेचा वरदहस्त दूर झाला आणि आता स्वत:ला स्वतंत्रपणे जोखून पाहण्यासाठी म्हणून दुबेजींच्या नाटकाची वाट धरली. दुबेजींच्या नाटकातून काय घेतलं हे सांगण्याची माझी प्राज्ञा नाही. पण त्यांनी त्यांच्या सहवासात ज्या निर्ममपणे वागवलं, त्यातून या नाट्यसंसारात आपण नेमके कुठे उभे आहोत, याचं भान दिलं.

जाणतेपणाने नाटक करायला सुरूवात करून आता उणीपुरी चोवीस वर्षे झाली आहेत. या चोवीस वर्षांच्या प्रवासात पथनाट्य, एकांकिका, दीर्घांक, प्रायोगिक आणि व्यावसायिक अशा सगळ्या प्रवाहातल्या नाटकांशी परिचय झाला. परिचय या अर्थी म्हणतो की, नाटकाची बाराखडी शिकता आणि गिरवता गिरवता चोवीस वर्षे निघून गेली. आजही ‘जीवन त्यांना कळले हो’च्या धर्तीवर ‘नाटक आम्हा कळले हो’ असं म्हणण्याचं धारिष्ठ्य आणि उद्दामपणा मी करणार नाही.

कुठल्याही कलाकाराचा पर्यायाने माणसाचा प्रवास हा पूर्वसुरींच्या आणि दिग्गजांच्या प्रभावाने युक्त असतो. मीही त्याला अपवाद नाही. पण चोवीस वर्षांच्या प्रवासानंतर आपलं म्हणून जे काही हाती लागलं, त्याचा थोडक्यात उच्चार करतो. मी 1997 पासून कलेच्या क्षेत्रात काम करतोय. तेव्हापासून आजतागायत जे काही काम केलं, त्यातून माझी अशी धारणा तयार झालीय की, कला आणि माझं रोजचं जगणं फार काळ समांतर नाही राहू शकत. ते एका क्षणानंतर एकरूप झालं पाहिजे. त्यात काही द्वैत नसावं. मला वाटतं की, कला माझ्यात झिरपली पाहिजे. तर तिचं झिरपलेलं रूप माझ्या रोजच्या जगण्या वागण्यातही दिसेल. मी माझ्या रोजच्या व्यवहारात ते दिसेल याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.

मग ते एखाद्याला पाण्याचा ग्लास देण्यासारखं साधं काम का असेना. ते माझ्यात कुठवर झिरपलंय हे माझं मीच नाही सांगू शकत. ते त्रयस्थ व्यक्ती म्हणून तुम्ही ठरवायचं. मी अथक प्रयत्न करतच राहणार. एकदा का ही कला मला उमगली की मग, ज्याला मी माझी प्रत्यक्ष कलाकृती म्हणून सादर करणार असतो, त्यात शुद्धता आणि सत्व आपोआपच येणार असते. मला त्यासाठी वेगळे प्रयत्न नाही करावे लागणार. हा माझा कलाविचार आहे. कला याही पल्याड दशांगुळाने उरतेच. आपण सतत तिचा शोध घ्यायचा असतो. अविरत. त्यातूनच आपण समृद्ध होत असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -