घरफिचर्ससारांशचॅरिटेबल संस्था : निधी उभारणीची आव्हाने आणि मार्ग

चॅरिटेबल संस्था : निधी उभारणीची आव्हाने आणि मार्ग

Subscribe

संस्था सुरू केल्यानंतर ती ज्या उद्देशांसाठी सुरू केली आहे त्यावर कार्य करणे आवश्यक आहे. अनेक संस्था सुरू केल्या गेल्या आहेत, त्या संस्थापकांचा वैयक्तिक फायद्यासाठी. त्यातून समाजातील गरजूंची खरोखरच सेवा केली जात आहे का हे बघणे गरजचे आहे. संस्थेचा उद्देश कुठलाही असूद्यात त्याचे परिणाम कुणाला फायदेशीर होत आहेत, यावर तुमची संस्थेची निधी उभारणी ठरत असते. मजबूत कार्यक्रम परिणाम लोकांना दिसले की, निधी उभारणी नेहेमी सुकर होते. आजकालच्या सोशल मीडियाद्वारे तुम्ही करत असलेले सेवाकार्य लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.

भारतात अनेक चॅरिटेबल/ सेवाभावी संस्था आहेत. त्यांच्या कार्यासाठी नेहमीच निधी, देणगी, फंडाची गरज असते, कारण अशा संस्थांना आता सरकार फार कमी मदत (ग्रांट स्वरूपात ) करते. मग हे निधी उभारणीचे काम कसे करायचे त्यात सात्यत्य कसे ठेवायचे हे बघणे संस्था चालकांसाठी फार महत्वाचे आहे. अनेक लोकांची काहीतरी चॅरिटेबल (सेवा) काम करण्याची खूप इच्छा असते म्हणून ते फार उत्साहाने एखादी संस्था स्थापन करतात. आपण फार मोठी देशसेवा, गरीब व वंचित लोकांसाठी काम करणार आहोत, त्यामुळे संस्था काढली की, देणगीदार लगेचच आपल्याला मोठ्या देणगी, निधी, मदत करतील ही भाबडी अशा संस्था स्थापन करतेवेळी प्रत्येकाला असते, परंतु नंतर हे सर्व कसे मृगजळ निघते हे जेव्हा प्रत्यक्ष संस्थेचे कार्य सुरू होते तेव्हा समजते. म्हणून सेवाभावी संस्थांसाठी त्यांच्या सेवाकार्याला निधी, देणगी उभारणे हे फार महत्वाचे असते .

यशस्वी निधी उभारणीसाठी त्रिसूत्री आवश्यक आहे – मजबूत कार्यक्रम परिणाम, संस्थात्मक क्षमता आणि अनुकूल वातावरण ही त्रिसूत्री संस्थेच्या निधी उभारणीसाठी आवश्यक आहे. त्यातील एकाएकाची सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे.

- Advertisement -

१. मजबूत कार्यक्रम परिणाम : संस्था सुरू केल्यानंतर ती ज्या उद्देशांसाठी सुरू केली आहे त्यावर कार्य करणे आवश्यक आहे. अनेक संस्था सुरू केल्या गेल्या आहेत, त्या संस्थापकांचा वैयक्तिक फायद्यासाठी. त्यातून समाजातील गरजूंची खरोखरच सेवा केली जात आहे का हे बघणे गरजचे आहे. संस्थेचा उद्देश कुठलाही असूद्यात त्याचे परिणाम कुणाला फायदेशीर होत आहेत, यावर तुमची संस्थेची निधी उभारणी ठरत असते. मजबूत कार्यक्रम परिणाम लोकांना दिसले की, निधी उभारणी नेहेमी सुकर होते. आजकालच्या सोशल मीडियाद्वारे तुम्ही करत असलेले सेवाकार्य लोकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे. अनेक कंपन्यांच्या सीएसआर पॉलिसीमध्ये ही महत्वाची अट असते की, संबंधित संस्था ही कमीत कमी तीन वर्ष कार्यरत असावी तरच त्या संस्थेच्या सीएसआर प्रकल्प अर्जावर कंपन्या विचार करतात. यासाठी सुरवातीचे काही दिवस संस्था चालकांनी स्वतःचे काही पैसे टाकणे जरुरी आहे. आज महाराष्ट्रातील ७५ टक्के नोंदणीकृत संस्था फक्त नोंदणी केल्या गेल्या आहेत, त्यात पुढे काहीही कार्य केलेले दिसत नाही .

२. संस्थात्मक क्षमता : अनेक संस्था स्थापन केल्या जातात व त्या संस्थेमधील संस्थाचालक बघितले तर हे एका घरातील असतात किंवा जवळचे नातेवाईक तरी असतील. त्यातील बरेच लोक हे फक्त नावासाठी असतात व फक्त एक दोन लोक संस्था चालवतात. संस्था चालकांचे योग्य संघटन असणे जरुरी आहे. संस्था नवीन असल्यामुळे लगेच प्रशिक्षित सेवक वर्ग नेमणे शक्य नसते त्यासाठी संस्था चालकांमध्ये फक्त नामधारी संस्थाचालक नसावे. संस्थेच्या उद्देशप्राप्तीसाठी आवड असणारे, वेळ, पैसे खर्च करणारे कामधारी संस्थाचालक असणे फार गरजेचे आहे. जशी एखादी व्यापारी संस्था असते त्यातील सर्व भागीदार जीव तोडून काम करतात तशी संघटना सेवाभावी संस्थेत असणे गरजेचं आहे.

- Advertisement -

३. अनुकूल वातवरण : कुठलीही संस्था असो मग ती व्यापारी असो किंवा सेवाभावी असो त्यात सहभागी होणार्‍या प्रत्येक घटकाला काही तरी आर्थिक लाभ होणार नसेल तर ती संस्था फार काही वाढण्याची शक्यता नसते. सेवाभावी संस्था स्थापन केल्यानंतर त्यातील तीन महत्वाचे सहभागी घटक असतात. एक संस्था चालक, दोन संस्थेतील नोकरवर्ग आणि तीन ज्या लाभार्थी घटकांसाठी संस्था स्थापन केली आहे त्या व्यक्ती. ह्या तीनही व्यक्तींच्या काही अपेक्षा असतात. अर्थातच आर्थिक अपेक्षा ही नंबर वन असणार. वरील तिन्ही घटकांसाठी अनुकूल वातावरण संस्थेमध्ये असणे गरजेचे आहे. सोशिओ इकॉनॉमिक ही संज्ञा आता जोर धरत आहे. याचा अर्थ सोशल काम पण करा, पण काही तरी आर्थिक फायदा हा हवाच. असे फार कमी संस्थाचालक आहे की, जे स्वतःचा वेळ, पैसा खर्च करून सामाजिक काम करतील. संस्थेच्या नोकरांची सुद्धा तीच परिस्थिती आहे आणि लाभार्थी किंवा गरजुंना तर आपल्याला काही न घेता द्यायचे आहे. कारण संस्थाच त्यांच्या सेवेसाठी स्थापन करण्यात आली आहे. ह्या सर्व घटकांना अनुकूल वातावरण सेवाभावी संस्थेत तयार करणे गरजेचे आहे व येथे योग्य आर्थिक नियोजन व संस्थेचा आर्थिक प्लॅन, रोडमॅप तयार करणे गरजेचे आहे. प्रत्येक संस्थेने या घटकांमधील स्वतःची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेण्यासाठी आणि त्यावर पुनर्विचार करण्यात वेळ घालवला पाहिजे.

सेवाभावी संस्थेसाठी निधी उभारण्यासमोरील आव्हाने व त्यावरील उपाय :

गरज आणि दाता जुळवणी : आधुनिक काळातील डेटिंगप्रमाणेच, मध्यम आकाराचा एनजीओ नेता नेहमी सर्वोत्तम दाता जुळवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ही दाता जुळवणी जरा अवघड प्रकिया आहे. दाता हा कशासाठी देणगी देण्यास उत्सुक आहे व त्यासाठी कुठली सेवाभावी संस्था योग्य किंवा त्या क्षेत्रात काम करणारी आहे ही जुळवणी करणे हे मोठे आव्हान आहे. अनेकदा संस्थाचालक हे हवेत गोळीबार करत असतात नक्की कोणता दाता आपल्या सेवाकार्यासाठी देणगीदार असू शकतो हे ओळखणे फार महत्वाचे आहे. यावरील उपाय म्हणजे सोशल मीडियाचा योग्य वापर करणे. देणगीदारांची शोध घेणे त्यांचा कार्याची आवड समजावून घेणे त्यांच्या सतत संपर्कात राहणे हे उपाय आहेत.

माहितीची विषमता: कंपनी सीएसआर हा एक महत्वाचा उत्पन्नाचा मार्ग सेवाभावी संस्थांसाठी उपलब्ध आहे, परंतु तो मिळवायचा कसा, कुठली कंपनी कुठल्या सेवाभावी क्षेत्रात काम करते ह्या माहितीची विषमता खूप आहे. सेवाभावी संस्थांसाठी कंपनी सीएसआर मिळवून देण्यासाठी अनेक एजंट काम करत आहे, त्यांचा उद्देश फक्त आगाऊ रक्कम गोळा करणे हाच असतो. त्यांना कंपनी सीएसआर कसा मिळवायचा याची माहिती सुद्धा नसते. ह्या सीएसआर निधी मिळविण्यासाठी सुसूत्रता आणण्यासाठी कंपनी कार्य मंत्रालययाने (मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स) ने आता सीएसआर मिळविण्यासाठी ट्रस्टसाठी सीएसआर -१ नोंदणी अनिवार्य केली आहे व ज्या कंपन्यांना सीएसआर खर्च करणे अनिवार्य आहे, त्यांना सीएसआर -२ नोंदणी करणे अनिवार्य आहे. ह्या दोन्ही नोंदणी केल्यानंतर ट्रस्ट व कंपनी ला एकमेकांसाठी मदत करण्यासाठी, प्रोजेक्ट आणि सीएसआरबद्दल माहिती मिळण्यासाठी कंपनी कार्य मंत्रालयाने csrexchange.gov.in ही वेबसाईट सुरू केली आहे. ह्या वेबसाईटवर ट्रस्ट आणि कंपनी दोन्ही रजिस्टर करू शकतात जेणेकरून एकमेकांची माहिती ह्या वेबसाईटवर बघता येईल. हे एक मोठे पाऊल सरकारने उचलले आहे. यामुळे ट्रस्ट काय काम करते कुठल्या क्षेत्रात काम करते तसेच कंपनी कुठल्या कारणासाठी सीएसआर देण्यास उत्सुक आहे हेसुद्धा याद्वारे ट्रस्टला कळू शकेल, परंतु ह्यासाठी ट्रस्टला सीएसआर १ व कंपनीला सीएसआर -२ नोंदणी आवश्यक आहे.

नियामक आव्हाने : सेवाभावी संस्थांना अनेक कायदेशीर नोंदणी घेणे आणि त्याची वार्षिक पूर्तता करणे बंधनकारक आहे. जर संस्थांना कंपनीकडून सीएसआर हवा असेल तर आयकर १२ ए , ८० जि नोंदणी , सीएसआर -१ नोंदणी , जर भारताबाहेरील देणगी हवी असेल तर एफसीआरए – नोंदणी आवश्यक आहे. ह्या सर्व नोंदणी घेतल्या की, प्रत्येक कायद्यामध्ये वेगवेगळे नियम त्याची पूर्तता करणे, दर वर्षी वार्षिक किंवा तिमाही विवरण पत्र दाखल करणे ह्या कायदेशीर गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. हे सर्व मोट्या सेवाभावी संस्थांना शक्य आहे कारण त्यांना आर्थिक उत्पन्न जास्त असते परंतु छोट्या सेवाभावी संस्थांना हे सर्व करण्यासाठी उत्पन्न नसताना सुद्धा खर्च करावा लागतो . परंतु ट्रस्ट चे योग्य प्रकारे काम चालावे यासाठी हे नियमन आवश्यकसुद्धा आहे नाही तर अनेक गैरप्रकार होऊ शकतात.

निधी उभारणे म्हणजे ८० टक्के प्रयत्न आणि २० टक्के नशीब
संस्था कुठलीही असो व्यापारी किंवा सेवाभावी तिला वाढवायचे असेल तर प्रयत्न हे आलेच. ‘दे रे हरी खाटल्यावरी’ असे कधी होत नसते. तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागतात. त्या प्रयत्नाचे महत्व हे ८० टक्के आहे आणि तुम्ही सेवा कार्य करत आहेत म्हणून नशीबसुद्धा तुम्हाला २० टक्के साथ देणारच. यासाठी सर्वात महत्वाचे निधी उभारणीचे ध्येय्य ठरविणे त्याचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार करणे त्या प्लॅनप्रमाणे निधी संकल होत आहे की, नाही याचा आढावा घेणे. ह्या सर्व गोष्टी त्या सेवाभावी संस्थेच्या ट्रस्टी किंवा कार्यकारी मंडळाला गांभीर्याने, प्रयत्नपूर्वक करणे गरजेचे आहे.

तुमचा डोनर बेस वैविध्यपूर्ण करा: तुमची सर्व अंडी एका टोपलीत कधीही ठेवू नका किंवा टोपल्यासुद्धा वेगवेगळ्या ठेवा. एक म्हणजे तुमच्या संस्थेच्या वार्षिक बजेटमध्ये योगदान देणार्‍या देणगीदारांची संख्या आणि दुसरे म्हणजे या देणगीदारांचे स्वरूप. देणगीदारांची संख्या मोठी ठेवा. जरी हे देणगीदारांच्या व्यवस्थापनामध्ये आव्हान ठरत असले तरी, जोखीम कमी करण्याच्या दृष्टीने त्याचे फायदे त्याच्या खर्चापेक्षा खूप जास्त आहेत.

दुसरे म्हणजे तुमचे देणगीदार वैविध्यपूर्ण व पसरलेले आहेत याची खात्री करणे. म्हणजेच कुठल्याही एका देणगीदारावर विसंबून न राहणे. त्याचे वर्गीकरण करणे जसे की, कॉर्पोरेट्स, फाउंडेशन, भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय निधी, व्यक्तीगत देणगीदार, आवर्ती आणि एक-वेळचे देणगीदार, एक वर्ष आणि अनेक वर्षांचे देणगीदार यांचे योग्य मिश्रण – दीर्घ कालावधीसाठी स्थिरता सुनिश्चित करण्यात मदत करते.

देणगीदारांच्या संबंधामध्ये गुंतवणूक :
संस्थापकाचा वेळ देणगीदारांचे नातेसंबंध जोपासण्यात गुंतवणे जे निधीउभारणीच्या पलीकडे समजले जाते ते सेवाभावी संस्थेसाठी एक उत्तेजक शक्ती असू शकते. ५ वर्षांपूर्वी तुमच्या संस्थेला पाठिंबा देणार्‍या देणगीदारासोबत तुम्ही शेवटच्या वेळी कधी कॉल केला होता किंवा कॉफी घेतली होती? ही कदाचित तुमच्या संस्थेची सर्वात जास्त गरज आहे असे वाटणार नाही, परंतु ती तिच्या भविष्यातील गुंतवणूक आहे. मजबूत देणगीदार संबंधांमध्ये गुंतवणूक करा. देणगीदारांना तुम्ही करत असलेल्या सेवा कार्याची माहिती वेळच्यावेळी देत राहा, हल्ली सोशल मीडियामुळे ह्या गोष्टी फार सोप्या झाल्या आहे. तुमच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी देणगीदारांना बोलवा त्यांचा सन्मान करा.

सेवाभावी संस्था काढणे खूप सोपे असते, परंतु चालवणे फार आवघड आहे. सिंधुताई सपकाळ नेहमी त्यांच्या भाषणात सांगायच्या ‘राशन लाने के लिये भाषण देना पडता है बेटा, पुरस्कार खाना नही देते, हजारो पुरस्कार है मेरे पास लेकिन मेरे बच्चे जो है उनके लिये वो राशन नही देते.’ सिंधुताई अगदी त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमातून केलेल्या सेवाकार्यासाठी मदतीचे आवाहन करत असत, कारण गरजूंचे सेवाकार्य हे सतत तेवत असणार्‍या दिव्यासारखे असते तो विझू द्यायचा नसतो व त्यासाठी सेवाभावी संस्थांसाठी सतत निधी येत राहणे गरजेचे असते व त्यासाठी योग्य नियोजन गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -