Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश हातणीचो फणस

हातणीचो फणस

आमची काकी किंवा आई तर नेहमी म्हणायची की, भाजी खावची तर हातणीच्या फणसाची ! , ह्या फणसाला तोड नव्हती. अगदी लहान असताना फणस काढला की, त्याचा सफेद डिंक गळत राहायचा तेव्हा खाली उतरवलेल्या फणसाचे ते घायाळ रूप बघून हा बाळफणस आईपासून ताटातूट झाली म्हणून बहुतेक रडत असावा असेच वाटायचे. ह्या झाडाच्या वरती किती पक्षांच्या ढोली होत्या, त्यात पोपटाच्या तर खूपच !, एखादी सुतारपक्षाची ढोल देखील असायची, कवडे तर छाती पुढे करून ह्या झाडाच्या वास्तव्याला येत असत. सकाळी नदीवर गुरांना घेऊन जाण्यासाठी खाली उतरलो की ह्या पक्षांची किलबिल कानी यायची.

Related Story

- Advertisement -

सकाळच्या वेळी उठून न्हाणीघराकडे ब्रश करत गेलो की, तिकडून मुंबईची आजी किंवा आमच्या घरातून नंदाकाकी ‘रे वायच अशेच जावन हाताणीचे दोन फणस घेवन येवा’ की आमची स्वारी भाटयेतून वाट काढत मेरा ओलांडून पाटाच्या
पाण्याच्या वाटेने आम्ही हातणीकडे चालत जायचो. हातणीचा फणस तसा गावात प्रसिद्ध. हातण म्हणजे दोन फाळीच्या
मधली मोठी मेरा. ह्या मेरेच्या अगदी टोकाला असलेला फणस म्हणजे हातणीचा फणस. नदीच्या बारमाही वाहत्या पाण्याच्या साक्षीने हा फणस वाढलेला. अर्धी मूळ नदीच्या दिशेने आणि बाकीची उरलेली मूळ ही वाफ्यात दूरवर रुजलेली. घेरदार झाडाचा घेर चार कुण्ग्याच्या विस्ताराने पसरलेला. खाली खळखळणारे नदीचे पात्र आणि वर चिव्याच्या बेटांची सळसळ, ह्यात हा फणस मधोमध वसलेला.

ह्या फणसाला चहूबाजूंनी काट्याकुट्यांनी घेरलेले. बाजूला नारळी पोफळीची बाग तिच्या बाजूने केलेले काटेरी कुंपण या सगळ्यात हा फणस आपलं सौष्ठव राखून मोठ्या दिमाखात उभा आहे. ह्या फणसावार चढायचे तर त्याच्या खोडाचा घेर सहसा हातात सामावत नाही. त्यात आजूबाजूंच्या ओलीमुळे खोड थोडं निसरडं झालेलं. खोडाला ठिकठिकाणी खाचे पडलेले. त्या झाडावर चढता यावं म्हणून खोडाला खाचे पाडलेले. काळसर जांभूस खोड अनंत फांद्यांनी समृद्ध झालेलं.

- Advertisement -

खोडाच्या निसरड्या गुणामुळे ह्या खोडाच्या आधाराने झाडावर चढण्याचा प्रश्नच नव्हता, सरसकट कुणग्यात असलेली शिडी झाडाला टेकवून त्याच्या सहाय्याने वरच्या फांदीला पोचले की, काठीने फणस ढोमसून खाली पाडायचा. गावातल्या लोकांनी सर्रास हीच पद्धत वापरलेली गेली कित्येक वर्षे मी बघतो आहे. ह्या फणसाच्या खाली अनेक फणस पडलेले असायचे, बहुतेक खारींनी (चान्यांनी) उष्टावून टाकलेले. चानीने खालेल्ला फणस पटकन लक्षात येतो, एका विशिष्ट बाजूने फणस फोडून हात पोखरत गेलेला फणस असेल तर तो चानीने खाल्लेला पण वांडरांनी फणस खाल्ला तर तो ओरबाडलेला, अर्थात हे सर्व सांगणारा वसंत नाना आमच्या बरोबर सतत असायचा.

ह्या फणसाचे वैशिष्ठ्य म्हणजे ह्या झाडाच्या विस्तारामुळे एक संपूर्ण कुणगा पड ठेवावा लागे, इथे शेती करणे मुश्कील असायचे. पण याबद्दल कोणी तक्रार केली असे कधी घडले नाही. फारतर ह्या झाडाच्या दोन तीन फांद्या झाझावून तेवढी
प्रकाशाला मोकळीक करून द्यायची. ह्या झाडावर सगळ्यांचेच प्रेम.

- Advertisement -

आमची काकी किंवा आई तर नेहमी म्हणायची की, भाजी खावची तर हातणीच्या फणसाची ! , ह्या फणसाला तोड नव्हती. अगदी लहान असताना फणस काढला की, त्याचा सफेद डिंक गळत राहायचा तेव्हा खाली उतरवलेल्या फणसाचे ते घायाळ रूप बघून हा बाळफणस आईपासून ताटातूट झाली म्हणून बहुतेक रडत असावा असेच वाटायचे. ह्या

झाडाच्या वरती किती पक्षांच्या ढोली होत्या, त्यात पोपटाच्या तर खूपच !, एखादी सुतारपक्षाची ढोल देखील असायची, कवडे तर छाती पुढे करून ह्या झाडाच्या वास्तव्याला येत असत. सकाळी नदीवर गुरांना घेऊन जाण्यासाठी खाली उतरलो की ह्या पक्षांची किलबिल कानी यायची. ह्या झाडाच्या खाली सुक्या पानांचा हा पतेरा गोळा झालेला असायचा, कोणाला हा पतेरा साफ करायला सांगितला तर रानातला झाड ता त्याचो पतेरो काय गोळा करुचो असता, त्यामुळे ह्या झाडाच्या मुळाशी पाय ठेवताना सावध असायला हवे.

ह्या झाडाची उपयुक्तता तर मल्टीपर्पज म्हणूनच गणली जावी. खाली थंडगार सावली पसरलेली बघून भाटीयेत काम करताना सोबत आणलेली भाकरी सगळे ह्या झाडाच्या सावलीतच बसून खायचे. गावात कोणी मुद्दाम वनभोजन करीत नाहीत. भुईमुग, कुळीद काढतेवेळी किंवा मिरगाच्या पावसात जोत बांधतांना सात-आठ कुटुंब ह्या झाडाच्या आधाराने खाली आश्रयाला यायची. सोबत आणलेल्या भाकरीने पोट भरलं नाही की, कोणी त्यातला गडी झाडावरचा फणस खाली उतरवायचा आणि जमलेले सगळे तो रसाळ फणस पंधरा मिनिटांच्या आत संपवून ह्या फणसाची शेडं बारीक करून कुणाची ढोर येऊन खातील म्हणून कुण्ग्याच्या कोपर्‍यात ढीग करून ठेवायची. खाली कुणग्यात वावरत असणारी माणसं असून नसून वर फणस पिकलो सो वाटता …. म्हणत रहायची. कारण ह्या झाडाच्या आजूबाजूला नुसत फिरकल तरी फणसाचा गोडूस वास नाकात भरून उरायचा.

लहानपणी ह्या फणसाच्या पानांचे कितीतरी बैल आम्ही बनवले असतील, आमच्या वाड्यात किंवा वाडीतल्या बिर्‍हाडात जेवढे म्हणून बैल असतील तेवढ्या रंगाचे बैल बनवले जायचे, कधी त्या रंगाची पान नाही मिळाली तर खालच्या पानाच्या भागाला विशिष्ट कोरून त्याला शिंगांचा आकार देऊन त्या बैलाची प्रतिकृती बनवायचा घाट आम्ही घातला आहे. कुणग्यात खरोखर जोत बांधलं जाई आणि हातणीवार आमच्या फणसाच्या पानांचे बैल करून त्याचे जोत बांधले जाई, एकावेळी वास्तव आणि प्रतिकृतीचा खेळ आमनेसामने व्हायचा. ह्या फणसाच्या वासाने आजूबाजूचा परिसर परिमळून जायचा. ह्या फणसाचा, नांगरलेल्या मातीचा बाजूच्या हिरव्यागार चीवारीच्या बेटातून येणारा वास असा तिघांचा त्रिवेणीसंगम येथे अनुभवयाला मिळायचा.

ह्या फणसाचे बरके गरे खाताना तोंडात टाकला की, तो थेट आत जायचा, त्याची मधुरता चाखीन तर कसला अवकाश !, तो गरा पोटात गेला देखील. पण एकदा का हा गरा घशात अडकला कि माणूस अस्मासुस झालाच समजा. ह्या गर्‍याची किर्तीच अशी. त्या खाली उतरवलेल्या फणसाची लांबी फारतर फुटभर, पण आत मधाळ गरे. ते गरे खाऊन तोंडं चिकट व्हायची. तोंडाच्या बाजूला लागलेला तो फणसाचा रस थोड्यावेळाने सुकायचा. एकदा तो सुकला की, तोंडं काळी व्हायची, तो अवतार बघून आई म्हणायची, रे गरे खातास तर तोंडा तरी धुवून येवचास, त्या मस्तीला सुमार नसायचा. ह्या फणसाच्या झाडाला खाली अंगठ्याएवढे फणस लागलेले असायचे. त्या फणस फळांचा वापर बहुतेक एकमेकांच्या अंगावर मारायला करत असू.

मऊ गुळगुळीत आवरण असलेले ती बाळफणस अंगाला वेदना होईल एवढे लागायचे. आजूबाजूला नवीन घरांची बांधकामे सुरू झाली तेव्हा परसवातील झाडं तोडली. अनेक आंब्या-फणसाच्या झाडांवर कुर्‍हाडी पडल्या त्यात अनेक फणस, बिटक्या नामशेष झाल्या. किती बरं आहे ना हातणीचा फणस घरापासून दूर रानात आहे, तो रानात आहे म्हणून दिसामासांनी आपले सौष्ठव सांभाळून आहे, ह्या हातणीच्या फणसाला हल्ली खोडाच्या बाजूने नवीन फांद्या फुटल्या आहेत. हल्ली ती एक फांदी चालताना अगदी डोळ्यासमोर येते, आजूबाजूला बघत इकडे दुर्लक्ष केलं कि माणूस ह्या फांदीला आपटला म्हणून समजा. पूर्वी पण अशी ही फांदी आडवी यायची तेव्हा तेव्हा ह्या कुणग्यात ज्यांचा वावर होता ते ही फांदी छाटून टाकतात.

हल्ली ह्या कुनग्यातला वावर कमी झाला, त्यामुळे फांदीने पसरायला सुरू केलं. पोरांचा वावर तर हल्ली इथे कमीच नाही तर नाहीसा झाला, त्यामुळे तसं बघितलं तर शेतीचे चार महिने सोडले तर ही जागा निर्मनुष्य, त्यामुळे ही जागादशक्रियेसाठी किती योग्य ! , आजूबाजूला पाणी आहे, बसायला सावली आहे अजून काय हवं? . हातणीच्या ह्या फणसाला ह्या सगळ्या गोष्टींची आता सवय झाली आहे. ह्या फणसाच्या नजरेला आता शेती करून तयार झालेले पोपटी मळे दिसत नाहीत. हल्ली कावळे, चान्यांनी ह्या झाडाचा आश्रय सोडला आहे. तरी झाड मात्र आपले पाय घट्ट रोवून उभे आहे, एखाद्या समाधीपुरुषासारखे. अगदी निश्चलपणे ह्या बारमाही वाहणार्‍या नदीच्या आणि समोरच्या माईनच्या डोंगराच्या साक्षीने !

त्या पाण्याची झुळझुळ कानात साठवून उभ्या असलेल्या हातणीला ह्या फणसामुळे महत्व आहे की, ह्या फणसाला आपला भक्कम आधार देत उभं केल्याचा अभिमान ह्या हातणीला आहे हे सांगता येत नाही, पण ह्यापैकी दोघांना तेवढेच महत्व कारण हा फणस म्हटला की, हातण ही डोळ्यासमोर येतेच. आणि हातण डोळ्यासमोर आली की, त्या हातनीवर बसून तोंड रंगवून गरे खाणारा मी आठवणारचं !

- Advertisement -