घरफिचर्ससारांशजत्रेचे दिवस

जत्रेचे दिवस

Subscribe

जत्रा म्हणजे एक वार्षिक सोहळा असतो. गावातले बारा-पाचाचे मानकरी एकत्र जमून वार्षिक सोहळा आखतात, यात ठरवण्यासारखे काही नसते. ज्याच्याकडे गावाची भिक्षुकी आहे तो भटजी न बोलावता देवळात येतो आणि देवाच्या पूजेला सुरुवात करतो, ही परंपरा कोणी आखली हे माहीत नाही पण जेंव्हा पूर्वी ‘गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली तेव्हा बारा बलुतेदार ही कल्पना पुढे आली असावी. यात शेतकर्‍याला केंद्रस्थानी ठेवून इतर घटक पुढे आलेले दिसून येतात.

कार्तिक सुरू झाला की तळकोकणात उलगाउलग सुरू होते. भात कापून झाल्यामुळे शेतमळे तसे रिकामे झालेले असतात. हळूहळू पहाटे थंडी पडायला सुरुवात होते. ती थंडीची लाट एवढी पसरते की तीन तीन पांघरूणं घेऊनदेखील थंडीची हिव कमी होत नाही. सकाळचं धुकं डोंगरावरुन उतरत खाली येतं आणि गावात पसरत जातं आणि मग वेध लागतात ते गावातल्या जत्रेचे. वर्षानुवर्षे ठरलेल्या तिथीला गावची जत्रा भरते. तळकोकणातल्या जत्रा या इतरत्र होणार्‍या जत्रेपेक्षा वेगळ्या. त्यांचं वेगळेपण हे तिथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे अधोरेखित केले जाते. जत्रेचा सरळसरळ धार्मिकतेशी थेट संदर्भ जोडला जातो. ते धार्मिक दाखले गावपरत्वे बदलत जातात. काही ठिकाणी जत्रा या पारंपरिक तिथीच्या दिवशी पार पडल्या जातात तर काही ठिकाणी कौलप्रसाद घेऊन वेगवेगळ्या वार्षिकाने साजर्‍या केल्या जातात.

प्रत्येक गावात एक मानकरी कुटुंब असतं. गावातील धार्मिक विधी करण्याचा मान परंपरागत त्यांच्याकडे असतो. कार्तिकातल्या त्या दातखिळी बसवणार्‍या थंडीत जत्रेची चाहूल मनाला नवीन उभारी देते. उजाड पडलेल्या शेतातून कवडे कोकलून कोकलून इकडून तिकडे फिरत असतात. सकाळी अंथरुणातून उठून चुलीकडे धग घेत बसता बसता मध्येच चुलीवरचं आधण उतरवून चहाचा पेला समोर येतो, त्याचबरोबर नुकतेच तयार झालेले पोहे बशीत बसतात, ते पोहे चहात टाकून खाल्यावर थंडी पळून जाते. अशा या कुंद वातावरणात पलीकडून ढोल-ताशे वाजत रहातात. हे ढोल देवळात वार्षिक सुरू झालं याची नांदी असते.

- Advertisement -

जत्रा म्हणजे एक वार्षिक सोहळा असतो. गावातले बारा-पाचाचे मानकरी एकत्र जमून वार्षिक सोहळा आखतात, यात ठरवण्यासारखे काही नसते. ज्याच्याकडे गावाची भिक्षुकी आहे तो भटजी न बोलावता देवळात येतो आणि देवाच्या पूजेला सुरुवात करतो, ही परंपरा कोणी आखली हे माहीत नाही पण जेंव्हा पूर्वी ‘गाव’ ही संकल्पना अस्तित्वात आली तेव्हा बारा बलुतेदार ही कल्पना पुढे आली असावी. यात शेतकर्‍याला केंद्रस्थानी ठेवून इतर घटक पुढे आलेले दिसून येतात.

गावची जत्रा हा शब्द ऐकला की अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतात. याचा एक भाग म्हणजे ‘गवळदा’. शेतकर्‍यांना आपली गुर- ढोरे प्राणापेक्षा प्रिय असतात, ही गुरं ज्याठिकाणी चरावयास जातात त्याठिकाणी त्यांचे रक्षण व्हावे म्हणून त्या रानात ठराविक ठिकाणी एक देव कल्पून त्याची एका ठराविक दिवशी पूजा केली जाते. त्याठिकाणाला गवळदेवाचे स्थान म्हणतात. याठिकाणी वाडीतील मंडळी एकत्र जमून दुपारी जेवणं तयार करतात आणि गवळदेवाचा प्रसाद म्हणून ते जेवण भक्षण करतात. जेवण झाल्यानंतर लहानमुलांच्या तोंडाला हिंस्त्र पशुसारख्या मिश्या काढून गाई आणि वाघाचा खेळ खेळतात.

- Advertisement -

ज्यादिवशी जत्रा असते त्यादिवशी गावातल्या मानकरी कुटुंबातील घरात लोक संध्याकाळी जमतात. जत्रेचे ढोल घुमू लागतात तसे पारंपरिक वेष धारण केलेला मानकरी घुमू लागतो त्याच्याबरोबर इतर अवसर घुमू लागतात. पूर्वी जोपर्यंत ‘भावीन’ ही प्रथा अस्तित्वात होती तोपर्यंत पुढे मानकरी, त्याबरोबर अवसर आणि त्यांच्यामागे भविनी आणि मागे सगळा गावं एकत्र देवळाकडे वाजतगाजत निघायचा. गेल्या काही वर्षात ‘भावीन’ ही प्रथा कोकणात पूर्ण बंद झाली त्यामुळे मानकरी आणि त्याबरोबर अवसर ही मंडळी देवळात गावाला घेऊन जातात. देवळात कौलप्रसाद होऊन धार्मिक कामे होईपर्यंत रात्र होऊन जाते. देवळाच्या बाजूला अनेक दुकानं थाटलेली असतात.

जत्रेच्या खरेदीचे मनोरथ अनेक दिवस गावकर्‍यांच्या मनात असतात. शेतीच्या अवजारांपासून ते मुलांना अभ्यासाला लागणार्‍या वह्या पुस्तकांपर्यंत अनेक गोष्टी येथे असतात. पूर्वी शेतकरी हा काही वरचेवर तालुक्याला जाऊन हव्या असलेल्या गोष्टी आणत नसे. मुख्य खरेदी जत्रेत करत असे. त्यामुळे जत्रेच्या खरेदीची एक वेगळीच मजा असे. देवळाच्या कानाकोपर्‍यातून लहानमुलांनी खरेदी केलेल्या पिपाण्याचे सूर त्या गर्दीत मिसळायचे. या जत्रेच्या निमित्ताने अख्खा गाव एकत्र येतो. गावात या चैतन्याचे वारे वाहू लागतात. देवळात गुरव गावकर्‍यांनी देवाला वाहिलेले नारळ कडाकडं फोडत असतात आणि रखवालीची गार्‍हाणी आपल्या पहाडी सुरात देवापुढे मांडत असतात. टिपेच्या आवाजात गुरवाने गार्‍हाणे मांडले की गावकरी खूश होतो. यानिमित्ताने माहेरवाशीणी माहेरी येऊन ओटी भरतात.

देवळात असे धार्मिक वातावरण असताना बाहेर लोकांचे थवे कुठल्यातरी भज्यांच्या दुकानासमोर उभे असतात. वडापाव ही संकल्पना येण्याअगोदर कोकणी माणसाला जत्रेतल्या भजीने भुरळ घातली आहे. गरम गरम भजी आणि गुळाच्या चहाची चव रेंगाळत ठेवत गावकरी पुन्हा एकदा देवळात येतो ते ‘दशावतारी नाटक’ बघायला. कोकणी माणूस दशावतारी नाटकाचा शौकीन. रात्रभर डोळ्याची पापणी न हलवता नाटक बघणारा कोकणी माणूस विरळाच! शंभर सव्वाशे चॅनेल यायच्या आधी ही नाटकं बघणे हेच कोकणी माणसाच्या मनोरंजनाचे साधन होते. या नाटकासाठी प्रसंगी दहा बारा मैलाचा प्रवास करणारा कोकणी माणूस म्हणजे एक लोककलेचा अस्सल शौकीन नमुना होता. जत्रेच्या संध्याकाळी नाटक करणारी मंडळी देवळाच्या आजूबाजूला नेमलेल्या ठिकाणी आली की गावातली पोरं त्या नटांना मेकअप करताना बघायला गर्दी करत. पंचवीस वोल्टच्या बल्बच्या प्रकाशात ती मंडळी रंगताना बघण्यात खूप मजा यायची. त्या संकासुराचे आणि इतर मुखवटे बघायला आमच्यासारखी मुलं त्याठिकाणी गर्दी करत.

मध्यरात्री देव देवळात आले की वार्षिक पूर्ण करण्यासाठी अंगात देवाचं वारं आली की इतर मानकरी ‘बाबा जाग्यार ये , रे असो कुदाव नुको, दिलेला फळ मान्य कर आणि राय रयत सुखी ठेव, अशी आळवणी करतो.

एकाचवेळी अनेक प्रकारच्या प्रसंगांना पहायचं ठिकाण म्हणजे जत्रा. एकावेळी देवळात धार्मिक विधी तर त्याचवेळी कुठल्यातरी देवळजवळच्या राईत कोणी तरी पत्त्यांचा पट मांडलेला असतो. जिथे पट मांडलेला असतो तिथे आजूबाजुच्या पाच धा गावातले पट उडवणारे नामांकित खेळीये इकडे जमा होतात. रात्रभर जत्रेशी तिळमात्रदेखील संबंध न ठेवता हे खेळीये त्या राईत रात्रभर पट मारत असतात. जत्रेची ही एक खासियत आहे. हे पट मारणारे खेळीये बहुतेक गळ्यात रुमाल बांधून पट लावत असतात. एका रात्रीत हजारो कमावणारे आणि उडवणारे नमुने इथे हमखास पहायला मिळतात.

पहाटे पहाटे दशावतारी नाटक संपतं. देवळातच आतल्या बाजूला मानकरी निजलेले असतात ते आता ताजेतवाने होऊन जत्रेच्या उत्तरार्धाची तयारी करतात. उत्तरार्धात पुन्हा मानकरी उठून ताट डोक्यावर घेतात. काही गावात गावचा नाभिक मानकर्‍याचे केस कापतो. पारंपरिक पोशाख वर डोक्याचे केस कापलेला मानकरी सव्वा किलो पिठाचा गोळा त्यावर पणती ठेऊन भरलेले ताट डोक्यावर घेऊन मंदिराला पाच फेर्‍या मारतो. तो सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो. जणू त्यावेळी स्वर्गलोकीचा आनंद भूलोकी उतरतो.

हल्ली काही गावच्या जत्रा लोकमान्य झाल्यात. जत्रा लोकमान्य होत असताना त्याचं पारंपरिक महत्व अबाधित राहतं का ? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. गावची जत्रा ही त्या गावची विशेष ओळख असते. पण आपण जत्रा करतो त्यात नाटक ठेवतो हा केवळ परंपरेचा भाग आहे की समाजमनाचा आरसा आहे हेदेखील एकदा तपासायला हवं. समाजाभिमुख सोहळे हे अखिल समाजकारण ढवळून टाकतात, त्यातून सामाजिक बांधीलकी निर्माण होते. जत्रेच्या माध्यमातून हे साध्य होतं का? समाजकारण हे साध्य असेल तर जत्रा हे त्याचे साधन आहे हे विसरता कामा नये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -