घरफिचर्ससारांशमातीत झिरपणारा रानपाऊस

मातीत झिरपणारा रानपाऊस

Subscribe

जिव्या सोमा मशे यांच्या वारली चित्रातील पाऊस आभाळातून सरसकट एका धारेत जमिनीवर कोसळतो. हा पाऊस मध्येच थेंबातून तुटत नाही, ही धार एकसलग असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. आभाळातल्या पाऊस देवाने शेतकर्‍यासाठी पाठवलेली थेट भेट किंवा रान हिरवळीचा संदेश त्यात असू शकतो. सोमा मशे यांच्या चित्रातला पाऊस माती आणि शेतीत मिसळलेला असतो. या पावसात पाखरं, रान, झाडं, माणसं आणि ढगांपलिकडे उगवणारा सूर्य असं बरंच काही असतं. जिव्या सोमा मशेंच्या चित्रातला पाऊस खर्‍या अर्थाने माणसांना निसर्गाशी जोडणारा असतो.

चित्रकलेचे जग म्हणजे रंगांची दुनिया, इथं निसर्ग, निर्जिव वस्तू, सजीव आणि मानवी भावभावनांचे रंग कॅनव्हासवर कलाकाराच्या मनातल्या कुंचल्याने उतरवले जातात. जे मनात असतं, जसं असतं तस्सच कागदावर उतरवणं ज्यांना शक्य होतं, त्या कलाकारांची कला मनाला थेट भिडते. यात मनाच्या कृत्रिम रंगांची गरज नसते. ज्या भावना जशा असतात तशाच उतरतात इथं रंगसंगतीपेक्षा निकोप, निर्भेळ जसं आहे तसं निसर्गातील समाजजीवन माध्यमावर उतरतं, जिव्या सोमा म्हशे यांच्या चित्रकलाकृतीत प्राचीन अशा ग्रामीण कृषी जीवनाचे हेच परंपरेचे रंग, जसे आहेत तसेच प्रामाणिकपणे उतरतात…त्यात ग्रामीण जगण्यातली सहजता, निर्भेळता, निसर्गनियमानुसार असते.

जिव्या मशे यांची केवळ आदिवासी वारली चित्रकार एवढीच संकुचित ओळख नाही. आधुनिक चित्रकलेच्या साधनांच्या आक्रमणातून मुक्त अशी ग्रामीण, प्राचीन कृषी जीवन चितारणारी पारंपरिक चित्रकला जशी आहे तशी, मूळ स्वरुपात जोपासण्याचे मोठे काम जिव्या मशेंनी केले. शेतीचा शोध लागल्यापासून गावखेड्यांत वसलेले ग्रामीण जीवनाचा अद्भुत शोध मशे यांच्या चित्रातून त्यामुळेच घेता येतो. शेती ही मानवी जीवनाची सर्वात जुनी संस्कृती, कष्टानं कमावलेलं, हिरव्या गार पिकाची कापणी झाल्यावर शेतकर्‍याच्या घरात आणि मनात धान्य, आनंदाचं कोठार भरतं. त्यावेळी शेतकरी उत्सव साजरा करतो. या आनंद उत्सवाचे चित्रण मशे यांच्या चित्रातून समोर येते. माती आणि निसर्गात रमलेले शेतकरी जीवन, परंपरागत पद्धतीची लग्नकार्ये, घरगुती सण उत्सव सोहळे, सुगी, शेतातली कामे, शेती अवजारं, गुरंढोरं असं सगळंच ग्रामीण शेतीजीवन मशे यांच्या चित्रांतून आहे तसं समोर येतं. ही प्राचीन शेतीसंस्कृती कलेच्या माध्यमातून जपणारे मशे त्यामुळेच इतर चित्रकारांपेक्षा वेगळे आणि वैशिष्ठ्यपूर्ण ठरतात आणि त्यांची चित्रे माणसाच्या मूळ संस्कृती आणि जगण्याशी एकजीव होतात. प्राचीन शेती परंपरेतील महिला, पुरुष, लहान मुले त्यांचा पेहराव हा मशे यांच्या वारली चित्रकलेचा धागा थेट सिंधु संस्कृतीपर्यंत आपल्याला नेतो.

- Advertisement -

आधुनिक काळात कुंचल्यातून चित्रे साकारली गेली. बदलत्या काळानुसार कलेच्या माध्यमातही बदल होत गेले आहेत. संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या काळाचा मोठा परिणाम चित्रकलेवरही होत आहे. मात्र, जागतिकीकरणाच्या वेगात मानवी जगण्याची मूळ गरज असलेले मानसिक समाधान मशे यांच्या चित्रांतून जाणवते. वारली चित्रकलेला साधन माध्यमाची तितकीशी गरज पडली नाही. काडी आणि खडूचा रंग किंवा चुना आणि गेरू याचाच वापर करून वारली चित्रे, कागदावर, भिंतीवर, लाकडावर, कपड्यावर चितारली जातात, त्यामुळेच त्याचा पोत उठावदार असतो, निसर्गाच्या जवळ जाणारा असतो, मशे यांनी हीच मूळ कला आयुष्यभर जोपासली. वारली कलेचे हे अवकाश नव्या पिढीला खुले करण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा आहे. वारलीतील चित्रे पाहताक्षणी लक्ष वेधून घेतात. त्यामुळे त्याचे काही अंशी पुढे व्यावसायीकरण झाले. कपडे, चामड्याच्या वस्तू, घरातील इंटिरिअर, सभादालन अशा सर्वच ठिकाणी वारली चित्रांना जागा मिळू लागली, त्यामागे मशे यांचे योगदान मोठे आहे. कला जगतात एवढं मोठं काम करूनही मशे काही अंशी उपेक्षितच राहिले. महाराष्ट्र राज्य स्थापनेला 50 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर चित्रकला पद्मश्री पुरस्कार चित्रकला जगतातील जिव्या सोमा मशे यांना प्रदान करण्यात आला.

मशे यांची वारली चित्रकलेतील हातोटी, आणि मूळ चित्रशैली, त्याची वारली चित्रकलेतीविषयीच्या जगण्यातून आलेली सहज तळमळ या क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय काम मोठे आहे. मशेंची अनेक चित्रे, आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजली गेली आहेत. अगदी देशविदेशात, पॅरिस अन्य ठिकाणच्या कलादालनातील भिंतींवर मशे यांच्या वारली चित्रांनी आपली हक्काची जागा बनवली आहे.

- Advertisement -

जिव्या मशे यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पालघरमध्ये येणार होते. त्यावेळी पालघरमध्ये तात्पुरते हेलिपॅड बनवायला घेतले. जिव्या मशेंचा मोठा सन्मान होणार ही बातमी तोपर्यंत कला आणि माध्यमक्षेत्रांत समजली होती. जिव्या मशेंना सरकारने त्यांच्या वारली कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव म्हणून काही जमीन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारी कारभारानुसार हे आश्वासन हवेतच विरले होते. जिव्या सोमा मशेंनी ही खंत घेऊन जगाचा निरोप घेतला. पण त्यांनी कधी कुणापुढेही, सरकारदरबारी त्याबाबत मागणी केली नाही, सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवले नाहीत.

मशे यांनी याविषयी सरकारच्या प्रतिनिधींना एक पत्र लिहिले आणि त्यात म्हटले की, ज्या सरकारने मला दिलेल्या आश्वासनानुसार जमीन प्रदान केली नाही, त्या सरकारच्या प्रमुखाकडून मी माझा सत्कार कसा स्वीकारू.., जिव्याच्या या पत्राने मोठी खळबळ उडाली. कलाक्षेत्राबाबत उदासीन असलेली ढिम्म सरकारी यंत्रणा जागी झाली, वेगाने सूत्रे फिरली आणि पक्षश्रेष्ठींसमोर म्हणजेच पंतप्रधानांसमोर आपल्या ढिसाळ कारभाराचे पितळ उघडे पडू नये म्हणून काही तासांच्या आतच जिव्याला मिळणार्‍या जमिनीची कागदपत्रे त्याच्या हातात दिली गेली. या कामात स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले होते. जिव्याच्या चित्रांचे मूल्य आता वाढले होते. त्याची आदिवासी चित्रकार ही ओळख आणि कृषी संस्कृती चितारणारा भाष्यकार अशी होऊ लागली होती. झाडे वारून शेती करणे ही मानवाची प्राचीन संस्कृती म्हणून वारली हे नावही त्याच्या चित्रांना न्याय देणारेच आहे.

शेती संस्कृतीमध्ये बैल, विहीर, सर्प, उंदीर, शेतीत काम करणारी माणसं आणि महिला, पक्षी, झाडंझुडपं, पाणी अशी शेतकीचं विश्वच कवेत घेणारी जिव्याची चित्रे आहेत. निसर्गाशी जुळवून घेणारे मूळ मानवी जगणे हेच जिव्याच्या चित्रांचे सार, म्हणूनच त्याची चित्रे माणसाळलेली आहेत. माणसांचे पोट जपणारी शेती, माणसाला आनंद देणारे उत्सव, निसर्गाचे माणसाशी असलेले नाते, असे जिव्याच्या चित्रांचे भावविश्व आहे. म्हणूनच जिव्या मशे हे केवळ आदिवासी किंवा वारली चित्रकार नाहीत. माणसाच्या मूळ जगण्याचा शोध घेणारा, निसर्गाशी मानवाचं असलेलं नातं समोर आणणारा जिव्या हा मानवी परंपरागत चित्रकलेचा भाष्यकार आहे. त्यांनी निसर्ग चितारला, पाऊस रेखाटला, मशे खर्‍या अर्थाने निसर्ग जगला आणि निसर्ग नियमानुसारच निखळ अशा निसर्गात विलीन झाला, शेतातल्या मातीत झिरपणार्‍या पावसासारखा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -