घरफिचर्ससारांशउद्योजकांसाठी उपयुक्त जोहॅरी विंडो

उद्योजकांसाठी उपयुक्त जोहॅरी विंडो

Subscribe

‘जोहॅरी विंडो’ हे ससुंवाद साधण्याचे एक उत्तम नमुना साधन आहे. तरी त्यात संवादातील अस्पष्टता, असंदिग्धता, व्याकरणातील चुका, शब्दांची अयोग्य निवड, विचारातील गोंधळ, चुकीचे तर्क अशा गोष्टींचाही विचार व्हायला हवा. शब्दांबरोबरच ‘देहबोली’चाही विचार व्हायला हवा. मनुष्य संबंध ही काही गणितासारखी शास्त्रीय गोष्ट नाही. त्यात अनेक नाजूक आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा समावेश असतो, परंतु ‘जोहॅरी विंडो’सारख्या तंत्राचे ज्ञान असल्यास आपण प्रभावी संवाद आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करू शकतो.

उद्योजक आणि व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी अनेक नवीन ग्राहक जोडावे लागतात आणि त्यासाठी नेहमी नवीन लोकांशी संवाद साधावा लागतो. उद्योग-व्यवसायात दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात, त्या म्हणजे ग्राहक म्हणजे दुसरी व्यक्ती आणि दुसरे म्हणजे त्या व्यक्तीने आपले उत्पादन किंवा सेवा पैसे देऊन विकत घेणे आणि यासाठी कायम करावा लागतो तो संवाद. विशेषकरून नवीन ग्राहक जोडताना आपल्याला त्याबद्दल फारशी काही माहिती नसते आणि आजच्या इंटरनेट मार्केटिंगच्या जमान्यात खरा ग्राहक कोण आणि फसवा ग्राहक कोण हे ओळखणे फार अवघड झाले आहे.

हे तंत्र अमेरिकेतील मानसतज्ज्ञ जोसेफे लुफ्त आणि हॅरी इन्ग्रम यांनी प्रथम तयार केले आणि त्यांच्या दोघांच्याही पहिल्या नावातील जो आणि हॅरी यांचा वापर करून या तंत्राला ‘जोहॅरी विंडो’ असे नाव दिले. हे तंत्र प्रभावी ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या वापराने माणसातील अंतभूर्त कौशल्ये सुधारतात. त्याच्या वागण्यात आणि भावनांमध्ये स्पष्टता येते. सहकारी वृत्ती वाढते. व्यक्तिगत आणि गटातटातील संबंध सुधारतात. त्याच्या वापराने माणसाच्या भावना, अनुभव, मतं, दृष्टिकोन कौशल्य, उद्देश, हेतू आणि प्रेरणा, व्यक्ती-व्यक्तीतील आणि गटागटातील गुंतागुंतीचे संबंध यांचे चार प्रकारे यथार्थ दर्शन घेता येते.

- Advertisement -

या तंत्रात माहिती, भावना, प्रेरणा इत्यादी गोष्टी व्यक्तीला किंवा संबंधात येणार्‍या माणसांना ही माहिती ज्ञात आहे किंवा ज्ञात नाही या पद्धतीत विभागून समजावून घेता येते. हे तंत्र खिडकीच्या चार तावदानांसारखे काढण्याची, दाखविण्याची पद्धत आहे. म्हणून याला विंडो किंवा चौकट असे म्हटले जाते. परस्पर संबंधातली माहिती देवाण-घेवाण या प्रक्रियेमुळे या चौकोनांच्या क्षेत्रफळात, व्याप्तीत फरक पडतो म्हणजे या चौकोनांचा (खालीलप्रमाणे) आकार मोठा किंवा लहान होऊ शकतो.

१) पहिला चौकोन (open)
हा चौकोन खुले क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या चौकोनात असणारी माहिती दोन्हीही संबंधित व्यक्तींना किंवा गटाला ज्ञात

- Advertisement -

असते, माहिती असते.
२) दुसरा चौकोन (blind)
हा चौकोन आंधळे क्षेत्र म्हणून ओळखता येईल. या चौकोनात अशी माहिती असते की ती स्वत:ला ज्ञात नसते; परंतु ती इतरांना ज्ञात असते आणि इतर माणसेच ठरवू शकतात की यातील कोणती माहिती त्यांनी आपल्याला घ्यायची, कशी द्यायची इत्यादी.

३) तिसरा चौकोन (hidden)
हा चौकोन आखलेले क्षेत्र म्हणून ओळखता येईल. या चौकोनात असणारी माहिती इतरांना ज्ञात नसते आणि हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते की कोणती माहिती आपण इतरांना सांगायची, खुली करायची.

४) चौथा चौकोन (unknown)
हा चौकोन अज्ञात क्षेत्र म्हणून ओळखता येईल. या चौकोनात अशी माहिती असते की ती स्वत:ला किंवा इतरांनाही माहिती नसते. स्वत:चे किंवा इतरांचे वागणे किंवा प्रेरणा कोणाच्याच लक्षात येत नाही. याचे कारण कदाचित दोघांनीही यावर विचार केलेला नसतो. सर्वांचेच एकत्रित अज्ञान असते. यात विश्वातल्या, जीवनातल्या अनेक अज्ञात गोष्टींचा समावेश होतो. आता या चौकोनांबद्दल थोडी अधिक माहिती घेऊया.

पहिला चौकोन
खुले क्षेत्र : हा चौकोन अशा गोष्टींचे प्रतीनिधित्व करतो, की ज्या गोष्टी माझ्या मला तर ज्ञात आहेतच आणि माझ्याबद्दलच्या या गोष्टी इतरांना तुम्हालाही ज्ञात आहेत. उदाहरणार्थ मला माझे नाव माहिती आहे; तसेच ते तुम्हालाही माहिती आहे. आपला जेव्हा प्रथम परिचय होतो, तेव्हा माझ्याबद्दलची फारच जुजबी माहिती इतरांना असते. जसजसा आपला परिचय होईल, तसतशी आपल्याला माझ्याबदल अधिक माहिती होईल म्हणजे सुरुवातीला या चौकोनाचे क्षेत्र अगदी लहान होते ते आता वाढत जाते. प्रत्यक्ष माहितीबरोबर भावना, हेतू, वर्तणूक, आशा, आकांशा, गरजा आणि अपेक्षा या सर्व गोष्टींचा त्यात समावेश होतो. म्हणजेच मी कोण आहे याबद्दलची सर्व माहिती. मी जेव्हा नवीन माणसाला पहिल्यांदाच भेटतो तेव्हा या पहिल्या चौकोनाची व्याप्ती फारच थोडी असते. कारण आपल्याला माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी फारसा अवधीच मिळालेल्या नसतो. परस्परांचा परिचय जसा वाढतो, तशी ही संधी उभयतांना मिळते. त्यानंतर या खिडकीच्या मर्यादा खालच्या किंवा उजव्या बाजूला वाढतात आणि ज्ञातक्षेत्र मोठे होत जाते.

दुसरा चौकोन
आंधळे क्षेत्र : या चौकोनात आपल्याबद्दलच्या अशा गोष्टी इतरांना माहिती असतात की त्याबद्दल आपण मात्र अनभिज्ञ असतो. त्या आपल्याला माहिती नसतात. जसे की मी आपल्यापुढे भाषण देत आहे. माझ्या पाठीवर मोठा शाईचा डाग पडला आहे हे आपल्याला दिसत आहे, परंतु मला मात्र त्याची कल्पनाही नसते. अथवा मी आपल्याबरोबर काही पदार्थ खातो आहे आणि तो माझ्या तोंडाला लागलेला आहे. या आणि अशा काही गोष्टी माझ्या आंधळ्या क्षेत्रात येतात. कारण इतर त्या बघू शकतात, पण मला त्या दिसत नाहीत, ज्ञात नसतात. आता आपण जर माझ्या पाठीवर डाग आहे, ही माहिती दिलीत तर माझे खुले क्षेत्र वाढेल, मोठे होईल आणि आंधळे क्षेत्र कमी होईल.

ही साधी गोष्ट होती; पण अशा काही गुंतागुंतीच्या गोष्टीही असू शकतील. कदाचित आपल्या संभाषणात आपला दृष्टीसंपर्क होत नाही. आपण हे मला सांगणार नाही. कारण आपल्याला मला दुखवायचे नसते; परंतु भाषणात मी प्रमाणिक नाही, असा निष्कर्ष आपण काढता. मग दुखवायचे कसे, असा प्रश्न उभा राहतो की मी ही माहिती कशी काढावी. कारण या माहितीअभावी आपला माझ्यावरील विश्वास धोक्यात येऊ शकतो. मी माझ्याबद्दलची अशी माहिती आपल्याकडून कशी घेणार हाच खरा प्रश्न आहे. कौशल्याने ही माहिती मी काढूही शकेन.

तिसरा चौकोन
आखलेले क्षेत्र : या चौकोनात अशा गोष्टी येतात की आपल्या काही गोष्टी स्वत:ला ज्ञात असतात; पण इतरांना ज्ञात नसतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला मला कोणते पुस्तक आवडते हे सांगितलेले नाही ही माहिती माझ्या आखलेल्या चौकोनात आहे. मी जेव्हा मला साने गुरुजी यांचे ‘शामची आई’ हे पुस्तक आवडते असे सांगतो, तेव्हा आपोआपच माझे झाकलेल्या चौकोनाचे क्षेत्र कमी होते आणि ज्ञात क्षेत्राचा चौकोन मोठा होतो. आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी आपण इतरांपुढे मांडलेल्या नाहीत. आपले संबंध जसे वाढत जातील आणि परस्पर विश्वास निर्माण होईल त्यानंतर खुल्या मनाने अशी माहिती इतरांपुढे ठेवली जाईल. आपल्यात जवळीक निर्माण होईल. या प्रकियेला स्वत:बद्दलची माहिती स्वतःच प्रकट करणे असे म्हणता येईल.

चौथा चौकोन
अज्ञात क्षेत्र : या चौकोनात अशा गोष्टी असतात की त्यांचे आपल्यालाही ज्ञान नसते, माहिती नसते आणि इतरांनाही त्याचा गंध नसतो. उदा. मला एखादे स्वप्न पडते त्याचा अर्थ काय हे मला उमगत नसते; पण जेव्हा मी ते कोणाला तरी सांगतो आणि दोघेही त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काही नवीनच संदर्भ मिळतो. नवीन माहितीवर प्रकाश पडतो व तो असा असतो की चर्चेपूर्वी दोघांनाही ज्ञात नसतो. माहितीच्या या अनोख्या देण्या-घेण्यामुळे अनेक नवीन गोष्टी उजेडात येतात आणि त्यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. खुले क्षेत्र विकास पावते. त्यामुळे प्रगतीचा सोपान खुला होतो आणि आपण आपले व्यक्तिमत्त्व, मन खुले करतो.

इतर लोकही आपल्याबद्दलची त्यांची मते व्यक्त करतात; पण या सर्व प्रक्रिया खूप सावधपणे आणि हुशारीने करावयाला हव्यात. कारण यात माणसाचे वागणे, हेतू, भावभावना, प्रेरणा, स्वार्थ यांचा समावेश येतो. यातून आपल्या स्वतःच्या आणि आपल्याजवळच्या व्यक्तींची अपूर्णता, अकार्यक्षमता, दुर्बलता, अपात्रता, नापसंती, दोष परावलंबी या भावना व्यक्त होत असतात आणि त्याच्या तीव्र प्रतिक्रियाही उद्भवू शकतात. अर्थात निसर्गाने आपल्या प्रत्येकाजवळ या गोष्टी नाकारणे, त्याकडे दुर्लक्ष करणे अथवा त्यास आपले स्वत:चे स्पष्टीकरण देणे, असे संरक्षक कवचही दिले आहे. तेव्हा या सर्वांचा काळजीपूर्वक वापर व्हायला हवा.

‘जोहॅरी विंडो’ हे ससुंवाद साधण्याचे एक उत्तम नमुना साधन आहे. तरी त्यात संवादातील अस्पष्टता, असंदिग्धता, व्याकरणातील चुका, शब्दांची अयोग्य निवड, विचारातील गोंधळ, चुकीचे तर्क अशा गोष्टींचाही विचार व्हायला हवा. शब्दांबरोबरच ‘देहबोली’चाही विचार व्हायला हवा. मनुष्य संबंध ही काही गणितासारखी शास्त्रीय गोष्ट नाही. त्यात अनेक नाजूक आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियांचा समावेश असतो, परंतु ‘जोहॅरी विंडो’सारख्या तंत्राचे ज्ञान असल्यास आपण प्रभावी संवाद आणि अर्थपूर्ण संबंध निर्माण करू शकतो.

‘जोहॅरी-विंडो’मागील महत्त्वाच्या संकल्पना
१) व्यक्तिश आपण आपल्याबद्दलची खरी माहिती देऊन आपल्यात आणि परस्परांत संबंध निर्माण करू शकतो.
२) इतर संबंधित व्यक्तींबद्दल असे ज्ञान मिळवून आपण आपला संपर्क व्यवहार जास्त अर्थपूर्ण करू शकतो.
३) ‘जोहॅरी विंडो’ ही संकल्पना आपल्या कार्यगटात आणि संबंधित व्यक्तींना स्वत:बद्दलची माहिती हळूवारपणे सांगून इतरांकडूनदेखील त्यावर प्रतिक्रिया घेण्याचे महत्त्व पटवून देऊन आपल्या परस्पर व्यवहारात अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करू शकते. त्यामुळे आपापसातील प्रश्न सुटून एक टीमगट म्हणून आपण उत्तम परिणाम मिळवू शकू.

स्वत:बद्दलची माहिती खुली करताना घाई करू नका. कारण निरुपद्रवी माहिती खुली केल्यामुळे विश्वास निर्माण होतो, परंतु काही माहिती अशी असू शकते की त्यामुळे लोकांचा आदर दूर होऊन आपण कमकुवत ठराल. याबाबत घाई करू नका. आपण कोणती आणि कशी माहिती देतो याची काळजी घ्या. काही समाजात अशी माहिती खुल्या मनाने स्वीकारली जात नाही. अशा ठिकाणी आपण गुन्हेगार ठराल आणि आपली पत घालवून बसाल. संवेदनशील राहा आणि हळूहळू सुरुवात करा. थोडक्यात माहितीची देवाण-घेवाण करताना सजगता आणि समानता ठेवायला हवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -