Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश विसरू म्हणता विसरता येत नाही

विसरू म्हणता विसरता येत नाही

जॉनी मेरा नाम आणि मेरा नाम जोकर हे दोन चित्रपट पाहताना आजही कंटाळा येत नाही. अगदी ताजे, टवटवीत. आणि मग एकदम दणका बसतो, मन सुन्न होतं. हे अरे, त्यांचे नायक, दिग्दर्शक, संगीतकार आणि इतरही अनेक जण काळाच्या उदरात गडप झाले आहेत. अगदी नव्या पिढीतही ते प्रिय आहेत. कारण बाकी काही नाही, तरी त्यांनी ती गाणी ऐकलेली, पाहिलेली असतात. त्यांनाही विसरता येत नाहीत ती. आणि मग कधी ते चित्रपट पाहण्याची संधी आली की ते काहीही करून ती साधण्याचा प्रयत्न करतात. हे दोन चित्रपट अणि त्यांची गाणी विसरू म्हणता विसरता येत नाहीत.

Related Story

- Advertisement -

बघता बघता पन्नास वर्षं उलटली की! खरंच वाटत नाही. खरंच मनात येतं, जाने कहाँ गये वो दिन. कहता है जोकर सारा जमाना, तीतर के दो आगे तीतर इ. गाणी पन्नास वर्षं झाली? तरी ती विसरली गेली नाहीयेत, त्यांची गोडी आजही तितकीच कायम आहे. तीच बाब ओ ऽ मेरे राजा, पलभर के लिए कोई हमें प्यार करले.. झूटा ही सही..बाबुल प्यारे ..ही गाणी आणि गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, हे भजन यांची. तीही तितकीच जुनी. जुनी म्हणायचं, पण तसं पटणं अवघडच. तरीही जाणवतं, खरंच की! आपणच तर इतकी वर्षं ऐकतोय का.

ते चित्रपट पाहताना आजही कंटाळा येत नाही. अगदी ताजे, टवटवीत. आणि मग एकदम दणका बसतो, मन सुन्न होतं. अरे, त्यांचे नायक, दिग्दर्शक, संगीतकार आणि इतरही अनेक जण काळाच्या उदरात गडप झाले आहेत. कोणते आहेत ते चित्रपट. ‘जॉनी मेरा नाम’ आणि ‘मेरा नाम जोकर’ हे ते चित्रपट. तसं गाण्यांवरून बर्‍याच जणांनी ओळखलंही असेल, अगदी नव्या पिढीनंही. कारण बाकी काही नाही, तरी त्यांनी ती गाणी ऐकलेली, पाहिलेली असतात. त्यांनाही विसरता येत नाहीत ती. आणि मग कधी ते चित्रपट पाहण्याची संधी आली की ते काहीही करून ती साधण्याचा प्रयत्न करतात.

- Advertisement -

राज कपूरच्या जोकरचा बराच गाजावाजा झाला होता, त्याने जणू आपले सर्वस्वच त्यासाठी पणाला लावलं होतं. तब्बल सहा वर्षं त्याचं काम चाललं होतं, त्यामुळं त्याची हवाही बरीच होती. तो लवकरच चित्रपटागृहांत लागणार होता. पण … अचानक राजला धक्का बसला. गुलशन रायचा जॉनी मेरा नाम हा चित्रपट 11 नोव्हेंबर 1970 लाच प्रदर्शित झाला. त्याच्यातही मोठी स्टार कास्ट होती आणि देव, हेमा मालिनी, प्राण, प्रेमनाथ इ. आणि दिग्दर्शक विजय आनंद अर्थात गोल्डी ही त्याची जमेची बाजू होती. मूळचा वितरक असलेला राय निर्माता बनल्यावर त्याचा आधीचा चित्रपट अयशस्वी झाला होता, त्यामुळं त्यानं गोल्डीला मला हिट चित्रपटच हवा आहे. असं बजावलं होतं आणि गोल्डीनं ते मान्य केलं होतं. आर. के. नारायण यांची काहीशीच वेगळी कथा, संगीत कल्याणजी-आनंदजी यांचं आणि देव आनंद आणि हेमा मालिनी ही अप्रतिम जमलेली जोडी या अपूर्व मिश्रणानं चित्रपट पहिल्यापासूनच हिट झाला.

पण त्यानंतर 10 डिसेंबरला प्रदर्शित झालेला राज कपूरचा मेरा नाम जोकर मात्र बॉक्स ऑफिसवर फसला. राजला मोठाच धक्का बसला. भारतातल्या प्रदीर्घ चित्रपटांतील एक असा हा बोलपट होता साडेचार तासांचा आणि दोन मध्यंतरांचा. राजचा संगमही दोन मध्यंतरांचाच, पण तो सुपरहिट होता. जॉनी अगोदर आल्यामुळंच जोकर पडला अशी राजची पक्की समजूत होती. नावातील साधर्म्यामुळं लोक जॉनीकडं खेचले गेले असं त्याचं म्हणणं. पण ते काही खरं नव्हतं. जोकर चांगला होता, हे नंतर सिद्ध झालं आणि त्याची गणना क्लासिक्समध्ये झाली. पाच फिल्मफेअर आणि तीन राष्ट्रीय पारितोषिकंही मिळवली. जॉनीचं यश तर वादातीतच होतं. त्याच्यामुळं गुलशन रायचं बस्तान बसलं. नंतर त्यानं काही चांगले चित्रपटही बनवले. जोकरमधून झालेला तोटा भरून काढण्यासाठी राजनं बॉबीची निर्मिती केवळ लोकांचं पुरेपूर मनोरंजन व्हावं म्हणून केली आणि त्यात तो पुरेपूर यशस्वी झाला.

- Advertisement -

लहानपणीच दोन भावांची ताटातूट आणि काही काळ त्यांच्यातलं वैर आणि शेवटी सत्य कळल्यामुळे त्यांची एकजूट आणि खलनायकाचं पारिपत्य असा फॉर्म्युला म्हणावा असा जॉनीचा ढाचा होता. पण गोल्डीचा सुवर्णस्पर्श त्याला झाला. (कथा आर. के. नारायण यांची) पटकथा त्यानंच लिहिली होती. (तिसरी मंझिल आणि ज्वेल थीफ पाठोपाठ त्याने हा तिसरा रहस्यपट केला होता.) या सार्‍याला कल्याणजी-आनंदजी यांच्या सुरेल संगीताची जोड मिळाली. हा चित्रपट प्रेमनाथच्या यशस्वी पुनरागमनाचा ठरला. त्याच्या कामाचा ठसाही लोकांच्या मनावर उमटला. जॉनीनं हेमा मालिनीलाही सर्वोच्च पदावर नेलं. पन्नाशीला आलेला देव आनंद चुकूनही तसा वाटला नाही. एव्हर ग्रीन-सदातरुण हे बिरूद त्यानं सार्थ ठरवलं, त्याचप्रमाणं त्याच्याबरोबरीच्याच प्राणनंही आपल्या नेहमीच्या थाटात भूमिका करताना वय जाणवून दिलं नव्हतं.

गाण्यांच्या अप्रतिम चित्रणासाठी अगदी नौ दो ग्यारहपासूनच ठाऊक झालेला गोल्डी आपल्या ख्यातीला जागला आणि दुसरं म्हणजे चित्रीकरण सुरू होण्याआधीचं त्याचं काम इतकं पक्कं असायचं की त्यामुळं कमीतकमी फिल्मचा वापर करून तो चित्रपट पुरा करत असे. त्यामुळं निर्मात्यांना त्याचं आकर्षण वाटू लागलं. प्रेमकथेला भावंडांमधील वैर आणि त्याबरोबरच एकाच्या मुलांपैकी एकाला पळवून नेऊन खलनायकाचा विश्वासू बनवलं जाणं आणि वडील मुलीच्या ताटातुटीची जोड यामुळं प्रेक्षक सतत गुंतून राहत. ओ मेरे राजा, हे प्रियकराची विनवणी करणारं, खिडकी गीत म्हणून अविस्मयणीय झालेलं पलभर के लिए कोई हमें प्यार करले झूटाही सही, ही प्रेमिकांची अफलातून गाणी आणि गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हे भजन तसंच बाबुल प्यारे सारखं गाणं, ही तर विसरता येऊ नये अशी गाणी.

प्रेम, कुतूहल, रहस्य आणि भरीस भर म्हणून आय. एस. जोहरची तिहेरी भूमिका (पहेला राम, दुजा राम आणि तिजा राम), आणि पद्मा खन्नाचं त्यावेळी वादग्रस्त ठरलेलं, स्ट्रिपटीजच्या अंगानं जाणारं, हुस्न के लाखो रंग हे गाणं, असं सारं त्यात होतं. भरपूर पिटाई होत असतानाही जॉनी मेरा नाम नही, असं वारंवार सांगत मार त्यामुळंच मार खाणारा, तो क्या आपने हमको खुपिया पुलीस ऑफिसर समझा है, अशी पृच्छा करणारा जॉनी, तुम्हारी गलती ये है की तुम एक अच्छे इन्सान हो और मेरी कोई गलती तुम्हारे ध्यान नही आयी क्योंकी वो तुझमें नही थी, असे प्रेमनाथच्या तोंडचे अप्रतिम संवाद. हे सारं आजही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळंच केवळ मनोरंजक असं म्हणून जॉनीला सुमार ठरवून मोडीत काढता येणार नाही. नंतरच्या अनेक दिग्दर्शकांचा तर तो जणू काही आदर्शच बनला होता आणि आहे. यशस्वी चित्रपटासाठी हा आदर्श फॉर्म्युला समजला जातो.

मेरा नाम जोकर तर (आता) क्लासिक म्हणूनच ओळखला जातो. कारणं काहीही असोत, सुरुवातीला मात्र तो प्रेक्षकांना रुचला नव्हता. मुळात नायक जोकर हेच अनेकांच्या समजुतीबाहेरचं आणि त्यामुळं पचनी पडणारं नव्हतं. कारण जोकरला कुणीच गंभीरपणं घेत नाही, तसंच या जोकरचंही झालं. पण जोकरलाही भाव भावना असतात, त्या दुखावल्याही जातात, तरीही तो सारं दुःख गिळून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कसा उभा राहातो ते राज कपूरनं अगदी हृदयस्पर्शी केलं आहे. प्रेमामध्ये वारंवार अपयशच दिसल्यानंतरही आपला हसरा मुखवटा कायम ठेवण्याचं काम किती अवघड असतं, हे प्रेक्षकांना दाखवण्याचा त्याचा प्रयत्न होता. सुरुवातीला ते लोकांना अवघड वाटलं पण नंतर मात्र त्याची ताकद उमगली.

या चित्रपटाचे तीन भाग आहेत. पहिल्यात राजू (ऋषी कपूर) किशोरवयीन मुलगा आहे आणि त्याचं आपल्या शिक्षिकेवर, मेरीवर (सिमी) अजाणतं प्रेम (काफ लव्ह) आहे. तिच्या प्रेमळ वागण्यानं तर त्याची त्याबाबत खातरीच पटली आहे. त्यातच सहलीच्या वेळी तिला स्नान करताना पाहताना दिसलेल्या तिच्या अर्धवस्त्रातील सौंदर्यानं त्याला वेडावून टाकलं आहे. त्यामुळं तिचे लग्न ठरल्यापासून तो अस्वस्थ आहे. तरीही तिनं समजूत काढल्यानंतर तो बेस्ट मॅन म्हणून जबाबदारी पार पाडतो आणि लग्नानंतर तिचा नवरा डेव्हिड (मनोजकुमार) त्यानं त्या शिक्षिकेला भेट दिलेला जोकरच्या रूपातला बाहुला त्याला परत देतो.

दुसरा भाग सर्कसचा आहे. राजूला जोकर बनायचं आहे असं तो आईला सांगतो, पण ती विरोध करते. कारण त्याचा पिताही जोकरच होता आणि ट्रॅपीझवर काम करताना मरण पावला होता, म्हणून तिला मुलानं तो धोका पत्करायला नको आहे. तरीही कमाईसाठी आईच्या इच्छेविरुद्धच राजू जोकर बनला आहे. त्यातच त्याला ट्रॅपीझवर पाहून आईला अगोदरची दुर्घटना आठवते आणि ती मरण पावते. आणि त्यानंतरही राजू रडत-हसत लोकांचं रंजन करतच असतो, सर्कसचे प्रेक्षक मात्र हसत असतात, तेव्हा प्रेक्षकांच्या हृदयात कालवाकालव होते. इथंही रशियन ट्रॅपीझ कलाकार कस्निया हिच्या प्रेमात पडूनही पुन्हा वियोगच त्याच्या नशिबी येतो. मॅनेजर (धर्मेन्द्र) त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत असतानाच दास्विदानिया म्हणून ते प्रेमिक निरोप घेतात. पुन्हा त्याचा तो बाहुला ती त्याला परत देते.

तिसरा भाग काहीसा रुळलेल्या वाटेनं जाणारा. सुरुवातीलाच राजूनं त्याचा जोकरच्या रूपातला समुद्रात टाकलेला बाहुला एक कुत्रा त्याला आणून देतो. तो मीनूचा असतो. मिनू (पद्मिनी) मुलगा म्हणून त्याला तेव्हा भेटते. तो बाहुला मिनूला भेट देतो. नंतर एका प्रसंगात ती मुलगी म्हणजेच मीना असल्याचं स्पष्ट होतं. प्रेम जमतं. ते गाण्याचे, कव्वालीचे कार्यक्रम करतात. खूपच यशस्वी होतात. तेव्हाच ती एका चित्रपट निर्मात्याच्या नजरेला पडते. पाहता पाहता चित्रपटांत स्टार बनते. राजू सारं काही बघत असतो. यावेळीही तो निर्माता मीनाला घेऊन जाताना पुन्हा तो बाहुला राजूलाच परत देतो. हे सारं राजू सांगत आहे. सर्कसमध्येच आपल्या या कार्यक्रमासाठी त्यानं आपल्या तीनही प्रेयसींना बोलावलं आहे. जीना यहाँ मरना यहाँ या गाण्याबरोबरच चित्रपट संपतो. पण राजू सांगतो, की चित्रपट संपलेला नाही, कारण त्या तिघींच्या शेजारीच तीन रिकाम्या खुर्च्या आहेत.

राजला खरं तर चित्रपटाचा दुसरा भाग वैजयंतीमाला, हेमा मालिनी अशा आघाडीच्या नायिकांना घेऊन करायचा होता. पण जोकरच्या स्वप्नभंगानंतर त्याचं ते स्वप्न अपुरंच राहिलं. दुःखात सुख एवढंच होतं की रशियामध्ये 1972 मध्ये हे तीन भाग तीन वेगळे चित्रपट म्हणून दाखवण्यात आले आणि त्यांनी भरघोस कमाई केली. त्याबरोबरच जोकरला चांगली आंतरराष्ट्रीय ख्याती मिळाली आणि अर्थातच त्यानंतर भारतातही त्यानं खूप कमाई केली.

असे हे दोन अविस्मरणीय चित्रपट. हिंदी चित्रपटसृष्टीच्या आणि सिनेसंगीताच्याही सुवर्ण युगातले!

- Advertisement -