घरफिचर्ससारांशहाडाचा शिक्षक

हाडाचा शिक्षक

Subscribe

नवयुग, महाराणा प्रताप, विश्वशांती, शिवाजी, महर्षी दयानंद आणि नव्वदीच्या दशकात महाराष्ट्रातले इतर पहिल्या आठ अव्वल संघात असणारे दादा महिला कबड्डी टीम आपल्या आधीच्या लौकिकाचा झेंडा घेऊन मैदानात होत्या. पण, त्या दरम्यान नवीन मोठी गुणवत्ता काही दिसत नव्हती आणि याचा हळूहळू महाराष्ट्राच्या दादा कामगिरीवर परिणाम होत होता… दुसरीकडे रेल्वे, पश्चिम बंगाल, कर्नाटक यांची दादागिरी सुरू होती. कबड्डी महर्षी बुवा साळवी यांना ही खंत बोचत होती… पण, खेळाडू घडवणारे द्रोणाचार्य आकाशातून पडत नसतात. खेळाडूरूपी हिर्‍यांची किंमत ओळखणारे प्रशिक्षक जन्माला यावे लागतात. महान खेळाडू सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांना कधी जे जमले नाही आणि सेहवाग, गांगुली यांनी कधी त्या वाटेवरून जाण्याचा प्रयत्न केला नाही… अशी अनवट वाट शोधत राहुल द्रविड जेव्हा गुरुजी होतो तेव्हाच भारतीय क्रिकेट संघाची दुसरी सक्षम फळी उभी राहते.

विराट कोहलीची टीम इंडिया आज जगात का मोठी आहे त्याचे कारण या संघाच्या मागे भारताची दुसरी ताकदीची ‘बी’ टीम घेऊन द्रविड उभा आहे. नुसता तो उभा नाही तर ‘ए’ टीम गडबडते, विख्यात खेळाडू शारीरिक आणि मानसिकरित्या आपला फॉर्म गमावून बसतात तेव्हा द्रविड मागे दत्त म्हणून उभा असतो… राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ही कोसळू पाहणारी मोठी उंच झाडे पुन्हा नव्याने उभी करतो. खेळाडू नुसते जन्माला येऊन चालत नाही. त्याला योग्य वेळी ओळखून सचिन तेंडुलकर घडवणे हे मोठे काम रमाकांत आचेरकर करतात तेव्हा ते द्रोणाचार्य असतात… असेच एक अनेक अर्जुन घडवणारे हाडाचे कबड्डी प्रशिक्षक म्हणजे बापू खरमाळे. मंगळवारी १५ जून रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, पण आज त्यांनी भारतीय कबड्डीसाठी आपल्या अमूल्य अशा कामगिरीचा ठेवा देऊन गेले आहेत.

- Advertisement -

भारती विधाते, मनीषा गावंड, स्नेहल साळुंखे, मेघाली कोरगावकर या शिवछत्रपती खेळाडू त्यांच्याकडे घडल्या. मुख्य म्हणजे नयना पालांडे, सुजाता साळुंखे, संगीता घाडीगांवकर, सुनीता जाधव, लता केरे, तृप्ती कोचरेकर, श्रद्धा काळे आणि क्षितिजा हिरवे अशा दमदार राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू त्यांच्यामुळेच उदयाला आल्या. आज या सर्व खेळाडू बँका, रेल्वे, महाराष्ट्र शासन या ठिकाणी मानाच्या नोकर्‍या मिळवून आहेत, त्यांच्या जीवनाची आर्थिक घडी बसली त्याचे कारण म्हणजे खरमाळे सर आहेत. आपल्या स्वतःच्या मुलींप्रमाणे या मुलींना घडवताना सरांनी प्रसंगी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवले, पण एक दोन नव्हे चार दशके आपल्या डॉ. शिरोडकर क्लबची एक वीट ढळू दिली नाही. काळाच्या ओघात संघ राहतात, टिकतात, संपतात; पण आपल्या नंतर सुद्धा संघ टिकला पाहिजे यासाठी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत खरमाळे धडपड करत होते. आपल्या उमेदीच्या काळात सरांनी फक्त राष्ट्रीय खेळाडू घडवणे हेच लक्ष्य ठेवले. प्रसंगी आपल्या कुटुंबाकडे त्यांना लक्ष देता आले नाही. सणवार, कुटुंब सोहळे तर दूर राहिले.

कबड्डी हा श्वास घेत ते जगले. त्यांचे घर कबड्डीमय झाले. या काळात त्यांच्या शालेय शिक्षक पत्नीने घराची जबाबदारी सांभाळली. सरांना पूर्ण वेळ त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात मनापासून काम करू दिले. प्रसंगी त्या गमतीने म्हणत सुद्धा कबड्डी माझी सवत आहे. पण, सरांच्या आड कधी त्या आल्या नाहीत. घेतला वसा त्यांना टाकू दिला नाही. आज सरांची दोन्ही मुले उच्च शिक्षित असून मुलगा स्वप्निल खरमाळे डॉक्टरेट करून प्राध्यापक आहेत. सरांना कधी तरी गंमतीने आम्ही सांगायचो, ‘राष्ट्रीय खेळाडूंची फॅक्टरी तुमच्याकडे आहे, पण तुमची मुले कधी मैदानाकडे वळली नाहीत, का’. ते लगेच म्हणायचे, ‘सर, घोड्याला पाण्यावर नेता येते. पाणी त्याने प्यायचे असते आणि एखादा मोठा खेळाडू घडणार की नाही, हे लगेच समजते. त्यासाठी मागे लागायची गरज नसते. हिरा हा चमकदारच असतो. त्याला पैलू पाडून घडवणे हे आमचे काम. मुलगा नाही, माझी मुलगी मैदानावर यायची पण तिच्यात मला स्पार्क कधी दिसला नाही. तिच्यावर माझे बारीक लक्ष होते. पण पुढे जाण्याचा तिचा निर्णय होता. तो तिने घेतला नाही’.

- Advertisement -

हाच सरांचा मोठेपणा होता. त्यांच्यात आपले तुपले काही नव्हते. म्हणून चार दशके मुलींचा संघ ते उभे करू शकले. मला वाटते एक वेळ शंभर पुरुषांचा संघ बांधून ठेवता येतो. पण, दहा वीस महिलांचा संघ सतत एकत्र जोडून ठेवणे हे अतिशय जिकरीचे काम आहे. मुलींच्या शारीरिक, मानसिक, कौटुंबिक अशा अनेक अडचणी असतात. यावर मात करून सक्षमपणे उभे राहणे, सर्वच मुलींना जमत नाही. सांघिकरित्या तर हे काम खूप अवघड असते. अशा वेळी प्रशिक्षक किती खंबीरपणे मुलींच्या मागे उभा राहतो यावर खूप काही अवलंबून असते. अर्जुन पुरस्कार विजेत्या माया आक्रेसह एकापेक्षा एक दादा राष्ट्रीय खेळाडूंची टीम घडवणारे नवयुगकार प्रशिक्षक भाई काळुष्टे म्हणून मोठे होते. कोल्हापूरच्या ताराराणीचे रमेश भेंडीगिरी, चेंबूर क्रीडा केंद्रचे सुहास कदम म्हणून मोठे आहेत. महिलांचा एक संघ नुसता उभा नाही तर सतत पुढे न्यायचा हे अतिशय जिकरीचे काम असते. महाराणा प्रताप, शिवाजी, राजमाता, सुवर्णयुग, रचना, महर्षी दयानंद, विश्वशांती, महात्मा गांधी, शिवशक्ती असे सारे संघ काल आणि आज उभे होते, उद्या राहतील याचे सारे श्रेय त्यांच्या प्रशिक्षकांना जाते.

शिरोडकर हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक असलेले खरमाळे यांनी नोकरीवर रुजू झाल्यावर कबड्डी, खो खो आणि लंगडी या खेळांवर लक्ष केंद्रित केले. खरेतर आज राज्यातच नव्हे तर सार्‍या देशात शाळेतील क्रीडा शिक्षक हे शारीरिक शिक्षण म्हणजे पीटीपुरते मर्यादित दिसतात. त्यांच्यापुढे एक मोठे खेळांचे जग असून त्यामधून काही तरी मोठे काम उभे राहू शकते, यावर त्यांचा किंवा त्यांच्या शाळेचा विश्वास नसतो. फक्त एक तासभर मैदानात जाऊन हात-पाय मागे पुढे केले, खाली वर केले की पीटी शिक्षकांचे काम संपले. ही तर कारकून छाप नोकरी झाली. यात ना शाळेला काही फायदा, ना मुलांना. मला वाटते हा आपल्या शिक्षण विभागाच्या एकूण रचनेचा आणि सरकारी निष्प्रभ नियमांचा भाग आहे. पीटी शिक्षक हे मुळात खेळाडू तयार करणारे असावेत आणि तशीच त्यांची योग्यता असेल तर त्यांची शाळेत निवड करायला हवी. म्हणूनच आज आपल्या राज्यात नव्हे तर देशात शालेय पातळीवर खेळाडू घडत नाही याचे कारण मूळ रचनेत आहे. शाळेसाठी निवडला जाणारा शिक्षक हा एनआयएस ही किमान राष्ट्रीय पातळीवरची प्रशिक्षकपदाची डिग्री घेतलेली असावा.

त्याने अवकाश मोठे होते. एका खेळावर लक्ष केंद्रित करून खेळाडू घडवता येतात. बापूंनी मात्र क्रीडा शिक्षकाची नोकरी कधीच कारकून छाप केली नाही. स्वतःला झोकून देत ते उभे राहिले. त्यांच्या या धडपडीची शिरोडकर हायस्कूलच्या कमिटीला नीट जाण होती. ही कमिटी कायम सरांच्या मागे उभी राहिली. सतत प्रोत्साहन देत राहिली. मराठी शाळांमध्ये काल आणि आज खेळ आणि खेळाडू का उभे राहिले नाहीत याचे कारण कारकून छाप क्रीडा शिक्षकांमध्ये तसे आहे, तसेच ते खेळांचे महत्व नसलेल्या शाळा कमिटीत सुद्धा आहे. कॉन्व्हेंट शाळा खेळ, कोच आणि मैदान यांना महत्व देऊन खेळ वाढवत असताना मराठी शाळांना खेळाचे आणि मैदानाचे महत्व कधी वाटले नाही. आपल्या मराठी शाळांच्या या निस्तेज कारभारामुळे मुलांची नैसर्गिक ताकद मारली जाते. शाळकरी वयात खेळायचे, बागडायचे, मानसिक आणि शारीरिकरित्या सक्षम होण्याचे असतात. या दरम्यान या मुलांमधून मोठा खेळाडू घडत नसला तरी एक चांगला माणूस म्हणून तयार होण्याचे संस्कार आपण मारून टाकत आहोत. याचा सरकार, शाळा आणि शिक्षक या सर्वांनी विचार करायला हवा… तो बापूंनी केला म्हणून ते मोठे होते.

परळ, लालबाग आणि गिरणगाव भागात कबड्डीचा सुरुवातीपासून जोर होता. जनमानसाचे या खेळावर खूप प्रेम होते. लोकाश्रय असलेल्या या खेळाला आपल्या शाळेच्या माध्यमातून मोठे करायचे, या ध्यासातून सरांनी डॉ. शिरोडकर क्लबची स्थापना केली. शिरोडकर हायस्कूलमधून कबड्डीचे प्राथमिक धडे शिकलेल्या मुली पुढे याच क्लबमधून नावारूपाला याव्यात याचा हाती वसा घेतला. रंजना बेळणेकर, वसंत वालझडे या शिक्षकांनी यासाठी त्यांना मोलाची मदत केली. सब ज्युनियर, ज्युनियर आणि सिनियर अशा तीन संघात त्यांनी आपल्या कबड्डी टीमची विभागणी केली. सिनियर खेळाडू तयार करतअसताना शालेय मुलींच्या कामगिरीवर आधी त्यांचे नीट लक्ष असायचे. अतिशय शांत स्वभावाचे असलेल्या सरांकडे प्रचंड संयम सुद्धा होता. यामुळे चार दशकात अनेक बरे वाईट प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले. राष्ट्रीय पातळीवर तयार झालेल्या खेळाडू अचानक निघून जाणे असे कटू अनुभव त्यांना सोसावे लागले. पण ते कधीच गडबडून गेले नाहीत. दुसर्‍या विषयी राग लोभ नाही की त्रागा, चिडचिड नाही. मुख्य म्हणजे राजकारण आसपास आपण करू द्यायचे नाही आणि खेळाडूंना करू द्यायचे नाही.

प्रसंगी कडक शिस्त, पण मैदानावर रागावून झाल्यावर खेळाडूला बाजूला घेऊन वडिलांच्या नात्याने मायेने समजावून सांगण्यात सुद्धा सर तयार असत…एक वेळ खेळाडू त्यांच्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात कमी पडल्या तरी चालतील, पण शिस्त मोडता कामा नये. खेळाडू येतील जातील क्लब टिकला पाहिजे आणि तो शिस्तीतून घडेल, यावर सरांचा कायम विश्वास होता. शिरोडकरला स्वतःचे मैदान नसताना हायस्कूलच्या सिमेंट लादीच्या मैदानावर सरांनी एवढा मोठा राष्ट्रीय संघ उभारला हे त्यांचे आणखी मोठे वैशिष्ठ्य म्हणायला हवे. उगाच रडत बसणे हे त्यांना मान्य नव्हते. पावसाळ्याचे चार महिने फिटनेस आणि इनडोअर सराव आणि उरलेले आठ महिने सामने आणि सराव असा कार्यक्रम चार दशके त्यांनी न थकता चालवला. हा जगन्नाथाचा रथ होता, तो त्यांनी पुढे चालवत नेला… प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचा अभ्यास करण्यात माहीर असणारे बापू राज्यातील आणि देशातील तगड्या संघांना आव्हान देऊ शकले ते आपल्या बारीक निरीक्षणातून.

आपल्या कुठल्या खेळाडूला कुठे उभे करायचे आणि समोरच्या खेळाडूंची काय ताकद आहे याचा पुरता अंदाज त्यांना होता. १९९० च्या दशकात एकाच वेळी आठ राष्ट्रीय खेळाडू त्यांच्या संघात असत आणि मागे सात खेळाडू या राष्ट्रीय खेळाडूंची जागा घेण्यासाठी सज्ज असत. मैदानावरचा संघ चालत नाही म्हटल्यावर राखीव खेळाडूंची फळी तयार असे. १९९०-९१ ला मी भिवंडीला कबड्डी स्पर्धेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलो होतो. बुवा साळवी यांनी आमच्या वरिष्ठांच्या मागे लागून मला या स्पर्धेला नेले होते. या स्पर्धेत मला बापूंची ताकद दिसली. भारती विधाते, मनीषा गावंड, सुनीता जाधव, संगीता घाडीगांवकर, लता केरे या दादा खेळाडूंच्या साथीने त्यांनी तुप्ती कोचरेकर या युवा, छोट्या खेळाडूला मुद्दामहून संधी दिली. मला आश्चर्य वाटले. सर म्हणाले, ‘गंमत बघा. या मुलीत भीती नावाची गोष्ट नाही. समोरच्या संघाला ही नाचवत नेणार आणि तिला पकडण्याचा प्रयत्न केला तर ती दोन एक खेळाडूंना बाद करणार हे नक्की’. आणि तसेच झाले.

या आणि अशा अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये बातमीदारी करताना मला शिरोडकर आणि बापूंची ताकद दिसत होती. हा संघ आपल्या घरच्या लोकांसारखा मला सतत वाटत आला आणि बापू घरची जाणती व्यक्ती. भेटल्यावर आस्थेने विचारपूस करणारी. मोठेपणाची कधी बाधा न झालेली. पेपरमध्ये नाव, फोटो छापून आले किंवा नाही, याचा त्यांना कधी फार विचार केला नाही. शिरोडकर आणि खेळाडू या पलीकडे त्यांच्या जगी फार काही मोठे नव्हते. पूर्ण वेळ आणि तनामनाने खेळाला वाहून घेतलेला हा माणूस होता. त्यांच्या या मोठेपणाची दखल घेत कबड्डीमहर्षी बुवा साळवी यांनी त्यांना महाराष्ट्र महिला संघाच्या प्रशिक्षकपदाची अनेकवेळा जबाबदारी दिली. महाराष्ट्र शासनाने बापूंच्या या कार्याची दखल घेत २००१-०२ साली त्यांना अतिशय मानाचा ‘दादोजी कोंडदेव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

आज या जगात बापू नाहीत, पण त्यांचे मोठे काम पुढे नेण्याचे काम सुजाता साळुंखे- काळगावकर करत आहे. बापूंनी मोठ्या विश्वासाने तिच्याकडे हा संघ दिला आहे. पूर्वीसारखा आज या अस्सल लाल मातीच्या खेळाकडे मुलींचा ओढा कमी झाला असला तरी सुजाता आहे त्या परिस्थितीत आणि शिरोडकर हायस्कूलच्या मदतीने सरांचे काम पुढे नेत आहे. हे काम अतिशय कठीण आहे. मुलींना पालक खेळांपेक्षा अभ्यासाकडे अधिक लक्ष द्या, असे सांगतात तेव्हा झोकून देत फक्त खेळ करणार्‍या मुलींची संख्या कमी होत असल्याचे दुःख आहेच. पण, तरीसुद्धा क्षितिजा हिरवे, मेघा कदम, कशिश पाटील, धनश्री पोटले, साक्षी बावडेकर, स्मृती पाटील या खेळाडूंना घेऊन सुजाताचा हा पुढचा प्रवास सुरू आहे. तिला यासाठी तिचे काका आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्ल आणि राज्य कुस्ती संघटक मोठी मदत करत आहेत. सुजाताची बहीण आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहल साळुंखे आणि सुनीता जाधव सोबत मदतीला असतील. कारण आव्हानांचे शिवधनुष्य पेलणे सोपे काम नाही. मुळात हे एकट्या दुकट्याचे काम नाही. सुजाताच्या या धडपडीला शिरोडकरच्या इतर सर्वच आजी माजी राष्ट्रीय खेळाडूंची साथ मिळाल्यास पुन्हा एकदा शिरोडकर संघ नव्याने भरारी घेऊ शकेल आणि तीच खरमाळे सरांना खरी श्रद्धांजली ठरेल…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -