घरफिचर्ससारांशकलेची कलेवरे

कलेची कलेवरे

Subscribe

1965 मध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर पाचच वर्षांनी दृष्यकलेसंदर्भात कार्य करण्यासाठी खास कला संचालनालयाची स्थापना झाली. कलेसाठी असे काही सरकारी पातळीवर घडवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य. प्रा. बाबूराव सडवेलकर यांनी 11 वर्षे (1975 ते 1986) कलासंचालक म्हणून तिथे काम पाहिले. महाराष्ट्रात किंवा मुंबईत कला परंपरा दाखवणारे एकही सुसज्ज कलासंग्रहालय नाही याची त्यांना कमालीची खंत होती. म्हणूनच त्यांच्या कार्यकाळात पुढे कधीतरी म्युझियम होईल या आशेने त्यांनी महाराष्ट्र शासनाकडून प्रयत्नपूर्वक निधी मिळवून अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलावंतांच्या दुर्मीळ कलाकृती मिळवल्या. 1986मध्ये ते निवृत्त झाल्यावर ते काम थंडावले. कलासंग्रह दुर्लक्षित होत गेला आणि अल्पावधीतच तो भयावह अवस्थेत पोहचला.

– योगेश पटवर्धन

प्रा. बाबूराव सडवेलकर यांनी चित्रकार धुरंधर, एस. एल. हळदणकर, गजानन हळदणकर, ए. एक्स. त्रिंदाद, व्हि. ए. माळी, गोंधळेकर, वारली चित्रकला तसेच काही शिल्पाकृती अशा म्हणजे जवळपास 300 दुर्मीळ कलाकृती जमवून ठेवल्या होत्या. 1970च्या आसपास मुंबईत प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात नाट्य विश्वाशी संबंधित व्यक्तींची पाच पोर्ट्रेट होती. मामा वरेरकर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी, अण्णासाहेब किर्लोस्कर आणि आद्य नाटककार विष्णुदास भावे. ती चितारणारे होते आचरेकर, गोपाळ देऊसकर, सातवळेकर आणि शंकर पळशीकर. जेजेतील कलाशिक्षक आवर्जून त्या काळातील विद्यार्थ्यांना ती चित्रं पाहायला नेत असत, इतकी ती अप्रतिम होती. म्हणजे त्या व्यक्ती थोर होत्या आणि त्यांची चित्र साकारणारे चित्रकारसुद्धा त्याच तोलामोलाचे होते.

- Advertisement -

2003मध्ये ती वास्तू नव्या दिमाखात उभी राहिली. तिचे नामकरण पु. ल. देशपांडे कला अ‍ॅकॅडमी असे झाले. आतमध्ये शिल्पकार करमरकर यांनी घडवलेल्या जुन्या वास्तूतील रवींद्रनाथ टागोरांचा पुतळाही पुन्हा विराजमान झाला, मात्र ती उत्तम पाच चित्रं पुन्हा दिसलीच नाहीत. त्याच परिसरात चित्रकार देऊसकार यांचे दुशंत शकुंतला हे भव्य भित्तीचित्र होते, ते वाचवणे गरजेचे आणि शक्य आहे. परदेशात असे काही तंत्रज्ञान कसे विकसित झाले आहे यासंबंधीचा एक लेख चित्रकलेचे जाणकार आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांनी एका दैनिकात लिहिला होता. त्याची दखल घेत तेव्हाचे सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर यांनी एक बैठक घेऊन हे सारे काही जतन केले जाईल आणि नव्या इमारतीत ती पाहायला मिळतील असे भरीव आश्वासनदेखील दिले होते, मात्र दुर्दैवाने तसे काही घडले नाही.

चित्रकार सुहास बहुलकर यांनी अनेकदा त्याबद्दल विचारणा केली तेव्हा ती आहेत, लवकरच ती लावण्यात येतील, असे मोघम उत्तर त्यांना मिळत राहिले. बर्‍याच वर्षांनी मुंबईच्याच चोर बाजारातील जुन्या वस्तू, चित्रं यांचा एक परिचित दलाल असगर अली यांच्याकडे ते विष्णुदास भावे यांचे, चित्रकार शंकर पळशीकर यांनी केलेले पोर्ट्रेट सुदैवानं मिळालं. ते त्यांनी जवळपास सहा लाख रुपये मोजून घेतलं, पण बाकीच्या चित्रांचा काहीही तपास लागला नाही. एक चित्रकार म्हणून बहुलकर यांना जे जे शक्य होते ते सारे काही केले. त्या अडगळीच्या खोलीत धुळीने माखलेल्या, काचा फुटलेल्या, खिळखिळ्या झालेल्या वाळवी लागलेल्या फ्रेम ठीकठाक करवून घेतल्या. त्यांना प्लास्टिकची अवरणे घातली. त्याची यादी तयार केली. फोटो काढून घेतले. रवींद्र नाट्यमंदिरातील मात्र काही राहिले नाही, ते एक चित्र वगळता. त्यांचे फोटो काढून फ्लेक्स तयार करणे सहज शक्य होते, मात्र तेवढी आस्था कुणी दाखवली नाही. शहरात सारे काही शक्य असताना हे घडू नये हेच दुर्दैवी.

- Advertisement -

26 जानेवारी, 15 ऑगस्ट या दिवशी अनेक नवीन प्रकल्प, बगीचे, उड्डाणपूल, वाहतूक बेटे, स्मारके, पुतळे उत्साहात लोकार्पण केली जातात. काही दिवस चर्चा होते, फोटो छापले जातात. नंतर वर्षभरात त्याचे रूप पालटू लागते. त्याच्या परिसरातील अपूर्ण कामे कधीही पूर्ण होत नाहीत. शोभेच्या टाईल्स निसटू लागतात. बसायचे बाक जीवघेणे झोपाळे होतात. शोभेचे दिवे, वायरिंग, स्विच बोर्ड लोंबकळू लागतात. सीलिंग फॅन घरघरू लागतात. टॉयलेट कुठे आहे हे वासावरून दुरून समजू लागते. त्यामुळे त्याचा वापर टाळून भिंतींचे कोपरे जवळ केले जातात. अनेक कोपरे झाडू खराटे, पाट्या, रिकाम्या बादल्या, बाटल्या यांनी भरलेल्या असतात. पुतळे नाकातोंडात धूळ जाऊन केविलवाणे दिसू लागतात. त्या परिसराची मालकी किंवा जबाबदारी नक्की कोणाची हेच ठरलेलं नसल्याने लवकरच ते सारे बेवारशी वाटू लागते. सत्तापालट झाल्यास ते अधिक दुर्लक्षित होते. मग नवीन प्रस्ताव, नवीन निविदा, निधी कमी पडू देणार नाही या घोषणा, त्याला कोणाचे नाव द्यावे यावरून वाद, आंदोलने, मोर्चे, उद्घाटनासाठी कोणाचे हात जास्त पवित्र, तारखांचे वाद, व्यासपीठावर कोणाच्या शेजारी कुणी बसावे याचे ठोकताळे ठरतात.

एखादे कलारसिक प्रशासक आपल्या अधिकारात याची दखल घेतात. बाकीचे सारे हे आपले अपत्य नाही यात धन्यता मानत नवे प्रस्ताव पुढे आणतात. जिथे जिथे मुक्त प्रवेश आहे, अशी सारी सार्वजनिक ठिकाणे बकाल आणि गचाळ अवस्थेत आहेत. एखादे मंदिर, देवस्थान त्याला अपवाद असणे म्हणजे शिस्त आली असे म्हणता येणार नाही. देवाच्या धाकाने ती पाळली जाणे यात फारसे हित नाही. ते बघूनसुद्धा इतर ठिकाणी आपण तसे वागत नाही. एखाद्या महापालिकेने, ग्रामपंचायतीने कुठल्याही नवीन इमारतीची, रस्त्यांची, बागेची घोषणा न करता आहेत त्या इमारतींचे, रस्त्यांचे रूप पालटून दाखवावे. हे होणार नाही. कारण त्यात कोणाचेही हित नाही. मुंबईची परिस्थिती समोर आली, बाकी ठिकाणेही यापेक्षा वेगळी नाहीत. जुनी उत्तम चित्रं आपण सांभाळू शकलो नाहीत हे वास्तव विचित्र आहे. ते बदलावे यासाठी हे लिहिलं. नवीन मंदिरं देव सांभाळतील, बाकीच्यांचे काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -