सावध, ऐकू पुढल्या हाका!

एक देश, एक समाज म्हणून आपली वाटचाल कुठल्या दिशेने चालली आहे? आपल्यापेक्षा वेगळ्या समुदायाच्या, वेगळ्या विचारसरणीच्या लोकांना त्रास झाला, नव्हे त्यांचा मृत्यूही झाला, तरी आनंदीत होत आपण नेमकं काय गमावत चाललो आहोत? समोरच्या समुदायाचा उल्लेख हिणकस शब्दांनी करताना आपण आपल्या पुढल्या पिढीच्या मनात कोणती विषवल्ली पेरत आहोत? हे असे कोणतेही प्रश्न न पडणार्‍या जगात विवेकाचा आवाज थोडासा उंच लागलाच पाहिजे...

परवाची गोष्ट… एक मित्र काही कामासाठी घरी आला होता. बालमित्र! त्यामुळे साहजिकच गप्पा रंगल्या. दिवाळीचे किल्ले, गणपतीत दीड-दीड तास रंगणार्‍या आरत्या, धुळवडीची मजा, असे गप्पांचे ट्रॅक सटासट बदलत होते. निघताना तो मला काहीशा अभिमानानेच सांगत होता, ‘अरे, माझा पाच वर्षांचा मुलगा… केवढी समज आहे त्याला! परवा आम्ही अंडी घ्यायला गेलो. तो दुकानदार मुस्लीम आहे. तर माझा मुलगा त्याला बिनधास्त म्हणाला, ‘क्या बे मुल्ले!’ अरे तो बरंच काही ऐकत असतो ना व्हीडिओवर वगैरे. पण बघ, आपली पोरं पण जागी होताहेत आता.’

त्याच्या तोंडावर मी कसंनुसं हसलो. कसाबसा त्याला निरोप दिला. खरं तर त्याच्या त्या शब्दांनी मी समूळ हादरलो होतो. एक पाच वर्षांचा मुलगा त्याच्यापेक्षा किमान 30 वर्षांनी मोठ्या असलेल्या माणसाला त्याच्या धर्मावरून काहीसं बोलला. विशेष म्हणजे त्या मुलाच्या बापाला याबद्दल त्याचा अभिमान वाटत होता आणि तसाच अभिमान मलाही वाटावा, अशी माझ्या मित्राची इच्छा होती.

या प्रसंगाने माझ्या मनात निर्माण झालेलं विचारांचं वादळ अजूनही शमलेलं नाही. उलट गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या एकापेक्षा एक सरस प्रकारांमुळे ते अजूनच भडकलंय. आपल्या इतिहासातल्या ज्या ज्या म्हणून गोष्टींवर आतापर्यंत अभ्यासांती विश्वास होता, त्या सगळ्या गोष्टी सध्या मोडीत निघत आहेत. इतिहासाचं पुनर्लेखन आणि लेखनही जेते करतात, असं आतापर्यंत फक्त वाचलं होतं. पण इथे ते प्रत्यक्षात बघायला मिळत आहे. आतापर्यंतचा इतिहास 100 टक्के बरोबर आहे, असा दावा हाडाचा इतिहासकारही करणार नाही. पण इतिहास लिहिताना अनेक ऐतिहासिक साधनांचे संदर्भ घेतलेले असतात. जिथे एकाच घटनेबद्दल दोन भिन्न दृष्टिकोन आढळतात, तिथे आणखी साधनांची चाचपणी केली जाते. पण आज चाललेल्या इतिहासाच्या पुनर्लेखनात कोणतेही ठोस पुरावे अद्याप तरी कोणालाही देता आलेले नाहीत.

इतिहास विसरणारी पिढी भविष्यदेखील पुसून टाकत असते, हे अगदी खरं आहे. पण फक्त आणि फक्त इतिहासातच रमणारी आणि त्या इतिहासातील वादांच्या कबरी खणून आज त्यावर वाद घालणारी पिढी भविष्य तर धोक्यात टाकतेच, पण वर्तमानही नासवून टाकते. आज नेमकी तिच अवस्था सभोवताली दिसत आहे.

तोंडाला रंग फासून लेखकाने दिलेली वाक्य दिग्दर्शकाने दिलेल्या सूचनांप्रमाणे कॅमेर्‍यासमोर बोलणारी कोण कुठली नटी थेट भारताच्या स्वातंत्र्यलढ्याबाबत आणि त्या लढ्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत टिपण्णी करते. सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची पदाधिकारी पूर्ण स्वातंत्र्य मिळालं नसून हे 99 वर्षांच्या भाडेकरारावर मिळालेलं स्वातंत्र्यं आहे, असे तारे तोडते. मराठीतला एक ख्यातनाम वयोवृद्ध नट त्या विधानाला पुष्टी देतो. दुर्दैवाची बाब म्हणजे या तीनही महाभागांना पाठिंबा देणारा, त्यांनी मांडलेल्या विचारांशी सहमत असलेला एक मोठा वर्ग त्यात आवाज मिसळतो. हे सगळंच अनाकलनीय आहे. नव्हे, संतापजनक आहे.

वास्तविक त्या वर्गाचंही बरोबर आहे. त्यांच्या दृष्टीने आपण 2014 मध्येच स्वतंत्र झालो. कारण त्याआधी त्यांना त्यांचे हे विचार उघडपणे बोलून दाखवता येत नव्हते. बोलले, तरी ते खपवून घेणारी यंत्रणा नव्हती. स्वातंत्र्यलढ्यात या वर्गाचं योगदानही अत्यंत नगण्य होतं. त्यामुळे या वर्गातील अनेकांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपापल्या घरांवर काळे झेंडे लावले होते. त्यामुळे ज्यासाठी आपण झटलोच नाही, ती गोष्ट मिळाल्यानंतर त्याची किंमत कळणार तरी कशी?

कंगनाने स्वातंत्र्याबाबत आपलं मत व्यक्त केल्यानंतर माझ्या एका मित्राने फेसबुकवर पु. ल. देशपांडे यांच्या ‘अंतु बर्वा’मधल्या काही ओळी टाकल्या होत्या. ‘साहेब गेला तो कंटाळून. लुटण्यासारखं काही उरलंच नाही’ वगैरे उल्लेख असलेल्या. त्या ओळी टाकताना त्याने त्याच्या खास शैलीत लिहिलंही होतं, ‘कै नै. सहज सापडलं.’ पण माझ्या याच मित्राला पुलंनी ‘खिल्ली’मध्ये लिहिलेला ‘एका गांधी टोपीचा प्रवास’ का आठवला नाही? 1947 रोजी देशाला भीक मिळाली, असं म्हणणार्‍यांना पुलंनी चांगलीच चपराक लगावली आहे. पुलंनी लिहिलं होतं की, गांधींनी प्रत्येकाला स्वराज्याचा कार्यक्रम दिला होता. आधी कधीच उतरल्या नव्हत्या एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला स्वातंत्र्यलढ्यात उतरल्या. लहान मुलांना प्रभातफेरी, सुतकताईचा कार्यक्रम दिला. त्यांच्या या कार्याची थट्टा करणारेही त्या वेळी आसपास वावरत होते. ‘चर आणि खा’ छाप विनोदापलीकडे त्यांची गाडी कधी जात नसे. बरं या लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात कुठे बाँब वगैरे टाकण्याचं कार्य केलं, तर तसंही नाही.

कंगनाच्या विधानाला पाठिंबा दिला तो मराठीतले नावाजलेले नट विक्रम गोखले यांनी! त्यांनी जमलेल्या पत्रकारांना अत्यंत आक्रमकपणे काही प्रश्नही विचारले. वास्तविक पत्रकारांनी त्यांना तिथल्या तिथे उत्तरं देऊन गप्प करण्याची आवश्यकता होती. इंधनाचे दर कसे ठरतात, हे आम्हाला माहीत आहे. पण 2014 पूर्वी ते सध्या सत्तेत असलेल्या पक्षाला माहीत नव्हतं का, एवढा साधा प्रतिप्रश्न करणं एकाही पत्रकाराला न सुचावं, हेच कोडं आहे.

एका मोठ्या वर्गाच्या मनातली ही खदखद एवढ्या मोठ्या आणि जनमानसावर प्रभाव टाकू शकणार्‍या दोन कलाकारांकडून बाहेर पडली. वास्तविक अशा वेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं मोल असलेल्या, स्वातंत्र्याचं मूल्य माहीत असलेल्या प्रत्येकाने त्यांच्या या वक्तव्याचा प्रतिवाद करायला हवा होता. स्वतंत्र भारताच्या पंतप्रधानांनी तर तो करायला हवाच होता. काही जण म्हणतील की, एका य:कश्चित अभिनेत्रीच्या वक्तव्यावर पंतप्रधानांनी का व्यक्त व्हावं? याचं कारण त्या अभिनेत्रीला सध्याच्या सरकारच्या काळाताच पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि तिने थेट भारताच्या स्वातंत्र्यावर भाष्य केलं आहे.

याच दरम्यान, त्रिपुरात घडलेल्या किंवा न घडलेल्या एका घटनेवरून महाराष्ट्रात दंगल भडकली. नांदेड, मालेगाव, अमरावती अशा तीन-चार शहरांमध्ये तणाव निर्माण झाला. वास्तविक अशा वेळी दंग्याचं राजकारण न करता परिस्थिती नियंत्रणात आणणं आवश्यक होतं. पण राज्यात सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांनी दंग्यात तेल ओतण्याचंच काम केलं. पूर्वी भारत-पाकिस्तान मॅचमध्ये पाकिस्तान हरला की, फटाके फुटायचे. पण परवा ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला नमवलं आणि त्याचेही फटाके फुटले. कशासाठी? दुसर्‍याचं वाईट झाल्यावर होणार्‍या आनंदाला आसुरी आनंद म्हणतात. आपलं चांगलं झालं नाहीच, पण दुसर्‍याचं वाईट झालं हे महत्वाचं, ही कोणती संस्कृती म्हणायची?

अशातच वीर दास नावाच्या एका स्टँड अप कॉमेडियनने ‘दोन भारत’ अशा आशयाची एक कविता अमेरिकेतल्या केनेडी सेंटरमध्ये सादर केली आणि गहजब उडाला. खरं तर ही कविता तमाम भारतीयांना आरसा दाखवणारी आहे. पण दांभिकता हा ज्या समाजाचा स्थायीभाव आहे, तिथे हे असले आरसे दाखवणार्‍यांना दांभिकपणे राष्ट्रद्रोही म्हणून हिणवलं जातं. तुमच्या विरोधात असलेला आवाजही ऐकण्याची तयारी ठेवून, त्या विरोधी मताचा आदर करून तुम्ही तुमचं मत मांडता, तेव्हा तुम्ही प्रगल्भ होता. वीर दासने त्या कवितेतून वास्तव दाखवलं. नेमकी हीच गोष्ट बहुतांश लोकांना आवडली नाही आणि त्यांना हा आपल्या देशाचा अपमान वाटला.

ही ‘ते आणि आम्ही’ अशी दरी मोठी व्हायलाच पाहिजे का? मध्ययुगीन काळात आक्रमक असलेल्या आणि परकीय असलेल्या मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदूंवर अन्याय केले, त्याचा बदला आजच्या काळात हिंदुंनी घेतलाच पाहिजे का? मग या न्यायाने ज्या तथाकथित उच्चवर्णीय लोकांनी तथाकथित खालच्या जातीच्या लोकांना एवढी हजार वर्षं दाबून ठेवलं, अन्याय्य वागणूक दिली त्या उच्चवर्णीय लोकांच्या घरांवर तर वरवंटे फिरवायला हवे.

बरं, हे असं काही लिहिल्यावर समोरच्या लोकांचा युक्तिवाद असतो, ‘तुला ‘त्यांच्याकडे’ काय चालतं माहीत नाही. तिथे तर लहान मुलांना मदरशात काय काय शिकवलं जातं! त्यांना बोल हे सगळं…’ या प्रतिक्रियेवर हसावं की रडावं हेच मला कळत नाही. अशी प्रतिक्रिया देणार्‍या मंडळींच्या घरात जळमटं लागलेली असतील, तर ती बहुधा ‘शेजार्‍यांच्या घरात जास्त जळमटं आहेत’, असं म्हणत असावीत. इतिहासातील अन्यायाचा बागुलबुवा उभा करून वर्तमान आणि पुढल्या पिढीचं भविष्यही नासवणार्‍या या महाभागांना चांगलं काही दिसतच नाही का? या लोकांना हे कळत नाही की, त्यांच्या मुलांच्या वाटेवर ते विद्वेषाचे काटे पेरत आहेत. त्या काट्यांनी फुलं नाही, तर रक्तबंबाळ करणार्‍या जखमाच मिळतील. अगदी महाभारतही याला अपवाद नाही. महाभारतातील युद्धानंतर फक्त विनाशच उरला. हाती काहीच लागलं नाही. ना पांडवांच्या ना कौरवांच्या! मग कसली धर्माची लढाई आणि काय?

गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या गीतांजली या नोबेल पारितोषिक विजेत्या काव्यसंग्रहात ‘Heaven of Freedom’ किंवा ‘स्वातंत्र्याचा स्वर्ग’ अशी कविता लिहिली होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतात स्वातंत्र्याची पहाट झाली. आज एवढ्या वर्षांनी भारतीय लोकशाहीने जपलेल्या सगळ्याच श्रद्धांना सुरूंग लावला जात असताना टागोरांना अभिप्रेत असलेल्या ‘स्वातंत्र्याच्या स्वर्गा’च्या जरा तरी जवळ आपण पोहोचलो नाही, हा एक समाज म्हणून आपला पराभव आहे.