लटिका वाचा वाचाळ तो ॥

ज्या क्रांतिवीरांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. जवळपास दीडशे वर्षे फक्त स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याचसाठी लाखो लोकांनी त्याग आणि संघर्ष केला. त्या सगळ्यांना आदरांजली म्हणून या वर्षीपासून आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या महामानवांचे कार्य लोकांसमोर आणि आजच्या तरुणाई समोर आणण्याचे काम केले जात असताना, कुणीतरी यावं आणि या सगळ्या गोष्टींना भीक समजावी यापेक्षा वाईट ते काय...!

असं म्हणतात की आपल्याकडे पुरेसे ज्ञान नसेल तर आपण त्या विषयावर न बोललेलेच बरे. कारण आपण केलेले विधान हे इतरांच्या भावना दुखावू शकतं. आणि त्यातही जर आपल्या बोलण्यात कुठलाच संदर्भ नसेल, त्यात सत्यता नसेल तर आपलीच फजिती होत असते. अगदी तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे…

तो शब्द सत्य जो मानी
छळी दुर्जन आणिकांसी ॥1।
एक तो गुण तो केला दोंठायीं
ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा
भाविक शब्द बोले वाणीचा
लटिका वाचा वाचाळ तो ॥

म्हणजेच जो सत्य मानतो तो सज्जन असतो, आणि जो दुसर्‍याना छळतो तो दुर्जन असतो. इथे एक गुण हा दोन ठिकाणी वाटला गेला आहे. ज्याचा जसा स्वभाव असेल तसा तो त्याचं हित वा अहिताकडे वळतो. भाविक म्हणजेच सज्जन माणूस फार थोडं बोलतो, पण जो खोटारडा असतो तो मात्र वाचाळ असतो. ज्याच्या हातून परोपकार घडतो तो भला माणूस असतो. मात्र नाठाळाला कोणाची दया येत नाही. जो जाणीवंत असतो तो आपली पायरी जाणतो, जो अधम असतो तो लाकडाच्या खुंट्यासारखा असतो. नेमकं या माणसाने हिताचं रुपांतर अहितात कसं केलं? हे कोड आहे. नक्कीच याला वेड लागलं असावं. असा या अभंगाचा मतितार्थ.

भारतातील सध्याची परिस्थिती तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे पाहायला मिळते. पाठीमागच्या आठवड्यात भारतातील काही सर्वोच्च पुरस्कारांची घोषणा झाली. समाजकारण, राजकारण, शिक्षण, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, पर्यावरण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील अतुल्य योगदान देणार्‍या महनीय व्यक्तींना पद्मश्री, पद्मविभूषण, असे पुरस्कार मिळाले. योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळाले त्यांचं स्वागत भारतीयांनी मोठ्या आनंदानं केलं. सोबतच ज्यांना अपेक्षा नव्हती अशांना पुरस्कार दिला. त्यांना नेटकर्‍यानी ट्रोल केलं.

पुरस्कार मिळाल्यानंतर बॉलीवुडची अभिनेत्री कंगना राणावत हिने एक विधान केले की, भारताला खरे स्वातंत्र्य हे 2014 ला मिळाले. यापूर्वी मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होती. यावर सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून तिच्यावर टीका झाली. अपेक्षा होती तिने माफी मागावी. पण तसे झाले नाही. तिने दुसर्‍याच दिवशी आणखी एक विधान केले की, 1947 यावर्षी अशी कोणती लढाई झाली की, ज्यामुळे स्वातंत्र्य मिळाले. ते मला सांगा मी माझा पुरस्कार परत करते. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर आजपर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून काम करणारे विक्रम गोखले यांनी कंगनाच्या बोलण्याला संमती दर्शवली. आता हे खरंच मोठे अभिनेते आहेत का हा प्रश्न निर्माण होतो…? भारतात अलीकडच्या काळात नको ते बोलत सुटण्याची परंपरा समोर येत आहे. यामुळे सामाजिक वातावरण कलुषित होत आहे. हे या वाचाळवीरांना लक्षात येत नाही. इथे एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे असा की, यांना एवढं बळ आणि ताकद कुठून मिळते. जे अशी कलुषित विधानं करतात. एखाद्या व्यक्तीची इथपर्यंत मजल जाऊ शकते हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे.

ज्या क्रांतिवीरांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. जवळपास दीडशे वर्षे फक्त स्वातंत्र्य मिळालं पाहिजे याचसाठी लाखो लोकांनी त्याग आणि संघर्ष केला. त्या सगळ्यांना आदरांजली म्हणून या वर्षीपासून आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या महामानवांचे कार्य लोकांसमोर आणि आजच्या तरुणाई समोर आणण्याचे काम केले जात असताना, कुणीतरी यावं आणि या सगळ्या गोष्टींना भीक समजावी यापेक्षा वाईट ते काय…! भारतीय नागरिक म्हणून आपण आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार वापरला पाहिजे. पण कर्तव्य म्हणून आपला वारसा, आपली संस्कृती, आणि देशहितासाठी आपण काही केले पाहिजे हे लक्षात राहू नये, एवढे दळभद्री आपण कसे झालो आहोत…? बरं या सगळ्या गोष्टींसाठी आपले योगदान तरी काय..? एखादा गल्लाभरू चित्रपट पडद्यावर प्रदर्शित करणे एवढेच आपले योगदान असेल तर ती व्यावसायिकता फक्त स्वहितासाठीच आहे.

सत्तेचे जसे वारे आहे तसेच वागणे आणि बोलणे सुरू ठेवले तर एक दिवस आपल्याच निर्लज्जपणाची आपल्याला लाज वाटेल. बरं यात आणखी एक मेख आहे ती म्हणजे माध्यमांनी नको तितकी दिलेली प्रसिध्दी…हा तर आपल्यासाठी एक चिंतेचा विषय होऊन बसला आहे. कोणी थोडे जरी काही केले तर विनाकारण त्या व्यक्तीला चर्चेसाठी बोलवून प्राईम टाईम चर्चा होते. जसे काही आपल्या अवतीभवतीच्या इतर समस्या संपल्या आहेत. या चर्चेमध्ये येणारे कोण असतात तर त्यांचे पाठीराखे किंवा थोड्याफार अंतराने विरोधक. आणि नंतर यांच्यापैकी कोणी जर काही बेताल वक्तव्य केलं तर त्यावर आणखी विशेष चर्चा रंगवली जाते. एकूणच काय तर त्याला राजकारणाचा मुलामा चढवून ज्याचा-त्याचा गड शाबूत ठेवण्याची तयारी केली जाते.

एक गोष्ट आपण लक्षात घेत नाही की, आपण अशा एका देशात राहत आहोत जिथे लोकशाही आहे. व्यक्तीस्वातंत्र्य दिले आहे. पण व्यक्तीस्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार नव्हे. नेमके आम्ही हेच विसरलो आहोत की, आपल्या भावना व्यक्त करत असताना इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत. जेणेकरून सामाजिक सलोखा टिकून राहील. प्रगतीच्या वाटेने चालत असताना देशाला आपली गरज आहे, याची भावना इथल्या युवकांच्या मनात निर्माण झाली तर जगाचं नेतृत्व करणार्‍या भारताकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जाईल. पण सध्या परिस्थिती फक्त राजकारणाच्या पलीकडे जात नाही. धर्म, जात, पंथ, संस्कृती, भाषा, प्रदेश या गोष्टींना प्राधान्य देऊन सामाजिक अशांतता पसरवणार्‍या या लोकांना खाद्य कोण पुरवत आहे. हे सर्वांना माहीत असूनसुद्धा मूग गिळून गप्प राहण्याची भावना अधोगतिकडे घेऊन जाऊ शकते. आणि समाजात दुही पसरवू शकते. हे थांबले पाहिजे यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

प्रत्येक जण ज्याच्या-त्याच्या पक्षाचा झेंडा घेऊन, प्रसिद्धीप्रमुख असल्यासारखा मिरवत असेल. तर त्यांनीच विचार करायला हवा राजकारणाच्या पलीकडेसुद्धा एक समाज असा आहे, ज्यांना शांतता हवी आहे. जिथे आपल्याला समाजशीलता टिकवून ठेवायची आहे. मी करेन तेच सत्य ही वृत्ती बाजूला ठेवून. सामाजिक एकता जपली तर माणूस म्हणून आपल्याकडे तत्वनिष्ठता असेल. जी देशाच्या विकासासाठी कधीही पूरक असेल. प्रामुख्याने आपण हाच विचार करायला हवा की, येणार्‍या पिढीच्या हातात सुजलाम सुफलाम भारताचे उज्जवल भविष्य द्यायचे आहे. त्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल आपल्या भारतीय संविधानाच्याद्वारे पूर्ण होऊ शकते. गरज आहे युवकांनी समोर येऊन यासाठी आपली वेगळी वाट निवडण्याची…

आपण पाहिले की,अश्मयुगात माणूस छोट्या छोट्या शोधापासून आपली प्रगती करत गेला. प्राचीन कालखंड असेल, मध्ययुगीन असेल या प्रत्येक कालखंडात नवनवीन शोधांच्याद्वारे विकासाचा टप्पा त्याने पार केला. पण माणूस म्हणून जगत असताना माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचा टप्पा शंभर टक्के पार केला आहे का..? याचे उत्तरही आता शोधणे गरजेचे आहे. अन्यथा कंदमुळे खाणारा अश्मयुगीन माणूस बरा होता असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येईल.