नुपूरने माफी मागावी, पण काळ सोकावतोय !

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा या बेडर आणि बेधडक, निडर महिला म्हणून ओखळल्या जातात. त्यातून त्या अनेकवेळा वादही ओढवून घेतात, पण यावेळी त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी विधान करत जगभरातील मुस्लीम राष्ट्रांचा रोष ओढवून घेतला आहे. नुपूर यांच्या मागे मोदी व अमित शहा नेहमीच खंबीरपणे उभे राहिले होते, पण धर्माच्या या युद्धात त्या एकट्या पडल्या आहेत. यापुढे त्यांना बोलताना भान राखावेच लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्या आता केव्हा जाहीर माफी मागणार आणि काय बोलणार याकडे देशाचेच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे. नुपूरने माफी मागावी, पण भारतात तालिबानी काळ सोकावतोय, हे धोकादायक आहे.

मोहम्मद पैगंबर यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्‍या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने चार दिवसांपूर्वी राजस्थानमधील उदयपूर येथे कन्हैया लाल या टेलरची गळा चिरुन हत्या करण्यात आली. या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून गुन्हेगारांना फासावर लटकवण्याची मागणी होत आहे. एकीकडे हा गोंधळ सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने देशात निर्माण झालेल्या या परिस्थितीसाठी नुपूर शर्माच जबाबदार असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर नुपूर यांनी संपूर्ण देशाची जाहीर माफी मागावी असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखत देशात शांतता नांदावी यापोटी नुपूर आज ना उद्या देशवासियांची माफीही मागतील यात शंका नाही. पण नुपूर आणि कन्हैया लाल यांच्यानिमित्ताने विरोधात बोलणार्‍यांचे तलवारीने गळे चिरणार्‍या समोर आलेल्या तालिबानी मानसिकतेचं काय?

ही अराजक मानसिकता देशात अचानक कशी आणि कुठे रुजायला लागली आहे ? कन्हैया हत्याकांडाचा व्हिडीओ करत त्यात आम्हीच हे कृत्य करत असल्याच्या कबुलीबरोबरच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणार्‍या या गुन्हेगारांच्या पाठीशी कोण आहे? कोणाच्या पाठबळावर ते याच देशात राहून थेट भारताच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देत आहेत हे पाहणंही आता गरजेच झालं आहे. नुपूर यांनी एका चॅनेलच्या चर्चासत्र कार्यक्रमात मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर देशातच नाही तर जगातील जवळजवळ सगळ्याच इस्लामिक राष्ट्रांनी याचा निषेध केला. काहींनी नुपूरला जेलमध्ये टाकण्याची मागणी केली.

तर कट्टरपंथीय दहशतवादी संघटनांनी तिला ठार मारण्याचा फतवा काढला. पैगंबरांचा अवमान केल्याने नुपूर यांना भारतातूनच नाही तर सौदी अरबियापासून पाकिस्तान, बांग्लादेश या देशांमधून बलात्कारापासून ठार मारण्यापर्यंत धमक्याही देण्यात येत आहेत. नुपूर या भाजपच्या प्रवक्त्या होत्या. यामुळे सहाजिकच हिंदुत्वाच्या मुद्यावर चालणार्‍या या पक्षाच्या व्यक्तीने जर दुसर्‍या धर्मावर किंवा संबंधित धर्माच्या व्यक्तीवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं तर वणवा हा पेटणारच. यामुळे पक्षाचे प्रतिनिधित्व करणार्‍या व्यक्तींनी नेहमी भान ठेवूनच बोलणे गरजेचे असते. नाहीतर त्याचे परिणाम पक्षाला तर भोगावेच लागतात, पण नुपूर यांच्या प्रकरणात त्यांच्या वक्तव्याचे परिणाम देशालाच भोगावे लागले. सौदी अरब बरोबरच इराण, इराक अशा अनेक इस्लामिक राष्ट्रांनी नाराज होत भारताशी व्यापारी संबंधच जवळजवळ तोडले.

भाजपला हे आंतरराष्ट्रीयस्तरावर परवडणारे नसल्याने त्यांनी नुपूर शर्मा यांना पक्षातून निलंबित तर केलेच शिवाय असे वादग्रस्त विधान करणार्‍या नेत्यांची यादीच तयार करत त्यांना समज दिली. यादरम्यान देशात नुपूर शर्मा प्रकरणावरून आक्रमक झालेल्या मुस्लीम संघटनांनी रस्त्यावर उतरुन निषेध मोर्चे काढले. तर काही जणांनी नुपूर यांचे समर्थन केले. त्यावरून देशात दोन गट पडले. धार्मिक द्वेष भडकावणारे विधान केल्याप्रकरणी देशात वेगवेगळ्या ठिकाणी नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हे दाखल झाले. पण तरीही नुपूर आपण मुस्लीम धर्मातील माहितीचा आधार घेतच ते वक्तव्य केल्याचे वारंवार सांगत होत्या. पण तरीही परिस्थिती निवळली नाही. यामुळे अखेर त्यांनी संबंधित समाजाची माफी मागितली. यामुळे हे प्रकरण आता संपल्याचे सगळ्यांना वाटले. झाले गेले विसरून पुढे जायच्या तयारीत सगळा देश असतानाच उदयपूर येथे नुपूर यांचे समर्थन करणार्‍या कन्हैया लालची त्याच्याच दुकानात घुसून हत्या करण्यात आली. तीदेखील सगळ्यांसमोर. पण कोणीही त्याच्या मदतीला धावले नाही.

कन्हैया लालच्या हत्याकांडाचे धागेदोरे आता थेट पाकिस्तानशी जुळल्याचे समोर आले आहे. कारण ज्या मोहम्मद रियाज अत्तारी आणि गौस मोहम्मद यांनी कन्हैय्याची हत्या केली त्यातील मोहम्मद रियाज अत्तारी हा अनेक वर्ष पाकिस्तानमध्ये कराचीत होता. तेथे तो दावत ए. इस्लामी या दहशतवादी संघटनेसाठी काम करत होता. ही संघटना इस्लामिक स्टेटची रिमोट स्लीपर सेलच्या धर्तीवर काम करते. दरम्यान कराचीनंतर रियाजने तेथून सौदी अरबमध्येही ईसिससाठी काम केल्याचे समोर येत आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो उदयपूरला राहत असून असेच स्लीपर सेल तयार करण्यात त्याचा हात आहे. यामुळे कन्हैयालाल हत्याकांड प्रकरण हे सामान्य रागातून घडले नसून दहशतवादी पद्धतीने योजनाबद्ध रितीने ते करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.

पण हे सगळं जरी असलं तरी देशात तालिबानी मानसिकतेची पाळंमुळं खोलवर रुजू लागली आहेत. हेदेखील कन्हैया लाल हत्याकांडाने स्पष्ट केले आहे. यामुळे सीमेवरील शत्रुत्वासोबतच आता आपल्याच घरात लपलेल्या या तालिबानी मानसिकतेबरोबर देशाला नव्याने लढण्यास तयार व्हावे लागणार आहे. दुसरीकडे लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा आपण कितीही मारत असलो तरी यापुढे काय बोलायचे किती बोलायचे याचे मापदंड ठरवावे लागणार आहेत. कारण भारतात धार्मिक द्वेषातून घडणार्‍या प्रत्येक घटनांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र पडसाद उमटत असतात. अपवाद तो धर्म कोणता याचा. कारण जगभरात इस्लामिक देशांची संख्या ही इतर धर्मावर आधारित राष्ट्रांच्या तुलनेत कैकपटीने अधिक आहे. हा समाज जगाच्या कानाकोपर्‍यात पसरलेला आहे. त्यात ही सर्वच राष्ट्र जगाला तेल, इंधनाचा पुरवठा करणारी, रोजगार उपलब्ध करून देणारी आहेत.

तसेच दहशतवाद्यांचे अड्डेही यातील काही देशांमध्ये आहेत. देशातील बंडाळीत यातील काही संघटनांना सरकारच हाताशी ठेवते. तर बाकीच्या वेळी या संघटनेचे दहशतवादी दुसर्‍या देशांमध्ये स्लीपर सेलच्या माध्यमातून हल्ले घडवून आपली दहशत कायम ठेवण्याचे काम करतात. यामुळे या देशांबरोबर नाते तोडणे, त्यांच्याबरोबर वाद ओढवून घेणे म्हणजे दहशतवादाला आमंत्रणच. असंच काहीस नुपूर शर्मा यांच्या बाबतीत झालं आहे. यामुळे मोदी सरकारला त्यांच्यावर नाईलाजाने कारवाई करावी लागली आहे. नुपूर शर्मा या बेडर आणि बेधडक, निडर महिला म्हणून ओखळल्या जातात. त्यातून त्या अनेकवेळा वादही ओढवून घेतात, पण यावेळी त्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी विधान करत जगभरातील मुस्लीम राष्ट्रांचा रोष ओढवून घेतला आहे. नुपूर यांच्या मागे मोदी व अमित शहा नेहमीच खंबीरपणे उभे राहिले होते, पण धर्माच्या या युद्धात त्या एकट्या पडल्या आहेत. यापुढे त्यांना बोलताना भान राखावेच लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे त्या आता केव्हा जाहीर माफी मागणार आणि काय बोलणार याकडे देशाचेच नाही तर जगाचे लक्ष लागले आहे.

तर गेल्या काही वर्षात देशात घडलेल्या मॉब लिचिंगच्या घटनांमुळे भारतात अल्पसंख्याकांवर अत्याचार होत असल्याचा संदेश जगभऱात पसरला आहे. यामुळे ज्यावेळी मॉब लिचींगसारखी घटना घडते तेव्हा भारतातील समाजव्यवस्थेवर त्याचा ठपका ठेवला जातो. पण जेव्हा कन्हैयालाल हत्याकांडाची घटना घडते तेव्हा आंतरराष्ट्रीय मीडिया मात्र एका टेलरला नुपूर शर्माचे समर्थन केल्याची शिक्षा मिळाल्याची सिंगल कॉलम बातमी छापून आणतो. यातच सगळे दडले आहे. पण कन्हैया लालची दुसरी बाजू दाखवण्याचे साधे सौदार्ह आंतरराष्ट्रीय मीडिया दाखवत नाही. हेही नसे थोडके. कारण जर कन्हैया लालवर जास्त लिहिले त्याची बाजू दाखवली तर आपण भारताच्या बाजूने आहोत असा संदेश जगभरात जाईल आणि कट्टर पंथीयांच्या हिटलिस्टवर आपलेही नाव येईल या भीतीच्या सावटाखाली जगभरातला मीडिया वावरतोय. हे विसरता येण्यासारखे नाही.