Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स सारांश तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर

तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर

उत्तम अभिनेत्री, गायिका, वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक, नृत्य, अभिनय, तमाशा फड मालकीण अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना कांताबाई सातारकर यांना अनेकवेळा तारेवरची कसरत करावी लागली. मात्र, त्या कधीही डगमगल्या नाहीत. येणार्‍या आव्हानांचा सामना करत तमाशा फड उभा केला आणि पुढे यशस्वीरीत्या चालवून सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं. गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणार्‍या साहेबराव आणि चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी 1939 साली कांताबाई यांचा जन्म झाला. घरात तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. मात्र, कांताबाईना नृत्याची आवड होती. कांताबाईंचं नुकतंच निधन झालं, यांच्या एकूणच संघर्षमय कारकिर्दीचा आढावा घेणारा हा लेख.

Related Story

- Advertisement -

संपूर्ण महाराष्ट्राला लोककलावंत म्हणून परिचित असलेलं नाव म्हणजे कांताबाई सातारकर. तमाशाचा विषय निघाला की, कांताबाई सातारकर हे नाव आपसूकच सर्वांच्या तोंडी येत. ग्रामीण भागापासून ते शहरातील थेटर्सपर्यंत तमाशाने आपलं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं होतं. हे अस्तित्व निर्माण करण्यात ज्यांचं ज्यांचं योगदान आहे. अशा मंडळींमध्ये कांताबाई यांचं नाव हे कायमस्वरुपी अग्रस्थानी राहील. अशा या लोकप्रिय तमाशा कलावंत कांताबाई यांचं नुकतच वयाच्या 82 व्या वर्षी निधन झालं. कांताबाई यांनी तमाशाच्या स्टेजवर अनेक पात्रं हुबेहुब साकारली. यातील लोकांच्या स्मरणात चिरकाल राहतील अशी पात्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका. याच भूमिकांनी कांताबाईंना तमाशात एक स्वतंत्र स्थान निर्माण करुन दिलं. यासोबतच रायगडची राणी (सोयराबाई), गवळ्याची रंभा (रंभा), गोविंदा गोपाळा (राणी), 1857 चा दरोडा (सुशीला), तडा गेलेला घडा (अलका), अधुरे माझे स्वप्न राहिले (नर्तकी), कलंकित मी धन्य झाले (अनाथ मुलगी), असे पुढारी आमचे वैरी (आवडा), सख्खा भाऊ पक्का वैरी (बायजा), हरिशचंद्र – तारामती (तारामती), महारथी कर्ण (कुंती), कोंढाण्यावर स्वारी (जिजाबाई) यांसारख्या वगनाट्यातून लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

उत्तम अभिनेत्री, गायिका, वगनाट्य दिग्दर्शिका, उत्तम व्यवस्थापक, नृत्य, अभिनय, तमाशा फड मालकीण अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना कांताबाईंना अनेकवेळा तारेवरची कसरत करावी लागली. मात्र, त्या कधीही डगमगल्या नाहीत. येणार्‍या आव्हानांचा सामना करत तमाशा फड उभा केला आणि पुढे यशस्वीरीत्या चालवून सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं. गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणार्‍या साहेबराव आणि चंद्राबाई या दांपत्याच्या पोटी 1939 साली कांताबाई यांचा जन्म झाला. घरात तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. मात्र, कांताबाईना नृत्याची आवड होती. पुढे आई-वडील गुजरात सोडून आपल्या मूळ गावी सातार्‍याला आले. कांताबाई या गावातील मित्रांसोबत नृत्य करायच्या. गावात होणार्‍या विविध मेळ्यामध्ये होणारे नर्तिकांचे नृत्य बघून त्यादेखील तशाच नृत्य करायच्या.

- Advertisement -

पुढे सातार्‍यातीलच नावझंकार मेळ्यात त्यांना नृत्याची संधी मिळाली. त्या संधीच सोन करत सर्वांची वाहवाह मिळवली आणि आपल्या कलाप्रवासाचा श्रीगणेशा केला. त्यावेळी कांताबाईंचं वय होत अवघं नऊ वर्षं. पुढे जाऊन तामशातला पहिला ब्रेक मिळाला तो सातार्‍यातील सर्जेराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात. येथे संधी मिळाल्यावर कांताबाईंनी मागे वळून कधी बघितलंच नाही. अन कांताबाई सातारकर हे नाव लोकांमध्ये गाजायला सुरुवात झाली. पुढे वेगवेगळ्या तमाशा फडात काम करताना त्यांना पुणे-मुंबईमधील थेटरमध्ये सादर होणार्‍या तमाशाची माहिती मिळाली. मात्र, घरच्यांनी जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे ऐकून एकदिवस एकटीच पळून जात मुंबई गाठली. मुंबईत हनुमान थिएटरमध्ये सादर होत असलेल्या इंदुरीकरांच्या फडात दाखल झाल्या. इथेच तुकाराम खेडकर यांचादेखील फड आलेला होता. खेडकरांचा फड बघून त्या भारावून गेल्या आणि त्यांच फडात जाण्याचा निर्णय घेतला.

तुकाराम खेडकर यांच्या फडात आल्यावर त्यांनी कसदार अभिनय अन हुबेहुब भूमिका वठवत आपल्यातील उत्तम कलावंताच दर्शन घडवलं. पुढे कांताबाई आणि तुकाराम या जोडीने प्रचंड लोकप्रियता मिळवली. यातूनच पुढे एकत्र येत खर्‍या आयुष्यातील जोडीराचा एकमेकांत शोध घेतला आणि दोघे विवाहबद्ध झाले. पुढे कांताबाई आणि तुकाराम यांना अलका, अनिता, मंदाराणी आणि रघुवीर अशी चार मुले झाली. 1964 मध्ये येवला तालुक्यात तमाशा चालू असताना तुकाराम खेडकर यांची अचानक तब्येत बिघडली. उपचारासाठी पुण्याला नेत असतानाच त्यांचे निधन झाले. आणि कांताबाईंवर एकप्रकारे आभाळ कोसळलं. अन, स्वतःच्याच तमाशातून बाहेर पडण्याची वेळ त्यांच्यावर आली. खान्देशातील आनंदराव महाजन यांच्या फडात काही काळ काम केल्यानंतर पुन्हा स्वतःचा फड उभा करण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. पैसे जमवले आणि इतर फड मालकांकडून जुनं सामान खरेदी करुन एक जुनी गाडीदेखील घेतली. 1969 साली पुन्हा त्याच जोमाने ‘कांताबाई सातारकरसह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ’ या नावाने स्वतःचा नवीन तमाशा फड उभा केला. कांताबाईंनी पुरुषांच्या भूमिका जशाच्या तशा वठवल्या आणि लोकांची प्रचंड लोकप्रियता मिळवली. यावेळी त्यांना अलका आणि अनिता यांचीदेखील साथ मिळाली.

- Advertisement -

तमाशा लोकप्रिय होत असताना पुन्हा 1989 च्या दरम्यान फडावर आर्थिक संकट ओढावले. तमाशा बंद पडण्याची वेळ आली. मात्र, न डगमगता त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांची भेट घेऊन आपली अडचण सांगितली. पवार साहेबांनी लागलीच व्यक्तिगत पंधरा हजार रुपयांची मदत केली. संगमनेरचे तत्कालीन प्रांताधिकारी आणि सातार्‍याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांची देखील भेट घेतली. या भेटीत कांताबाईंनी नरवीर तानाजी मालुसरे यांचा पोवाडा पाटील साहेबांना ऐकवला. तो पोवाडा ऐकून साहेब अचंबित झाले. त्यांनी आपल्या पत्नीचा हस्ते साडीचोळी देऊन कांताबाईंचा सन्मान केला. आणि स्टेट बँकेतून कर्ज मिळवून देत कर्जाला स्वतः जामीन देखील राहिले. अशा या मदतीतून कांताबाईंनी पुन्हा फड उभा केला. पूर्ण महाराष्ट्र फिरुन तमाशा गावागावात नेला. पैसे आले ते पैसे कर्ज फेडण्यासाठी घेऊन पुन्हा श्रीनिवास पाटील साहेबांकडे यांच्याकडे गेल्या आणि घेतलेले दहा हजार रुपये परत केले. तेव्हा पाटील साहेबांनी हक्काने सांगितले की, अक्का तुला काहीही अडचण आली तर सांग मी आहे. असे सांगून एकप्रकारे बहीण भावाच्या नात्याला मूकसंमती दिली.

पुन्हा कांताबाईंनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. मुलगा रघुवीरच्या साथीने आपला तमाशा फड यशोशिखरावर नेला. रघुवीर खेडकरदेखील तमाशातील सोंगाड्या म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. पुढे वयोमानाने त्या थकल्या, परंतु फडासोबत गावोगाव फिरत राहिल्या. यामुळे संपूर्ण कुटूंबातील लोक तमाशा फडात सामील झाले. आणि आजतागायत हा तमाशा लोककलेची सेवा करत आहे. कांताबाईंचा तमाशा इतका नावारुपाला आला की, दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाप्रसंगी कांताबाई आणि रघुवीर खेडकर यांना तमाशा सादर करायचा बहुमान मिळाला. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात सिनेमा, नाटक यात काम करणार्‍या आणि शिकाऊ कलाकारांना तमाशा दाखविण्याची पहिली संधी देखील मिळाली. कांताबाईंच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनातर्फे तमाशातील योगदानासाठी दिला जाणारा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार 2005 साली देऊन कांताबाईंचा सन्मान केला. यासोबतच विविध संघटना आणि संस्थांनीदेखील कांताबाईंचा कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव केला. कांताबाई जरी काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी देखील तमाशा क्षेत्रातील त्यांच लोककलावंत म्हणून असलेलं योगदान, त्यांनी तमाशात गाजवलेल्या भूमिका हा महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक आणि ही तमाशा रंगभूमी कधीही विसरणार नाही.

- Advertisement -