घरफिचर्ससारांशकथा कर्णनची

कथा कर्णनची

Subscribe

ज्यांच्या घरातील स्त्रिया दवाखान्यात जायला बस मिळाली नाही म्हणून मृत पावल्या त्यांच्यासाठी यापेक्षा अधिक महत्वाचा दुसरा विषय नाही. मारी सेल्वराजचा ‘कर्णन’ त्याच समाजाच नेतृत्व करतो ज्यांच्या अनेक पिढ्यांनी हे दुःख सोसलं आहे, इथे न मिळणारी बस हे केवळ एक उदाहरण आहे. कारण या बसच्या आधीही त्यांना सहजासहजी काही मिळालेलं नाही, संघर्ष पाचवीला पुजलेल्या समाजाच्या एका अजून संघर्षाची कथा म्हणजे कर्णन... व्यावसायिक सिनेमांच्या भाऊगर्दीत जेव्हा असा एखादा सिनेमा बनतो तेव्हा यावर बोलणं आणि व्यक्त होणं देखील गरजेचं आहे.

प्रत्येक सिनेमाचा एक विषय असतो, त्यावर आधारित कथा, पात्रं असतात आणि मग तो सिनेमा बनविला जातो. पण कुठला विषय हा सिनेमाचा विषय होऊ शकतो? याची काही विशेष व्याख्या नाही. व्यावसायिक सिनेमांमध्ये साधारणतः ज्या विषयात लोकांना इंटरेस्ट अधिक त्यावर आधारित कथा घेऊन सिनेमा बनविला जातो, पण आजही भारतीय समाजात अनेक असे विषय आहेत ज्यांना स्पर्श करण्याची हिंमत निर्मात्यांनी कधी दाखवली नाही, किंवा असं म्हणूया की, त्यावर सिनेमा होऊ शकतो असं त्यांना कधी वाटलं नाही. दाक्षिणात्य सिनेमा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या काही काळात दाक्षिणात्य सिनेमा विशेष करून तामिळ सिनेमाने वेगळे विषय हाताळून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय ज्याला यशदेखील मिळालं. पा रणजित हे नाव आज बर्‍यापैकी माहिती झालंय पण त्यासोबतच आपल्या पेरियरम पेरुमल या पहिल्याच सिनेमातून ज्या दिग्दर्शकाने प्रेक्षक आणि समीक्षकांची वाहवा लुटली होती, अशा मारी सेल्वराजचा दुसरा सिनेमा कर्णन नुकताच प्राईमवर प्रदर्शित झाला.

या सिनेमावर प्रचंड लिहिलं गेलं, चर्चा झाल्या, काहींना यात वापरलेली रुपकं भावली तर काहींना सिनेमॅटोग्राफी, काहींना संगीत तर काहींना अभिनय, पण या सर्वात एक गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे सिनेमाची कथा आणि विषय… सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे, सिनेमासाठी विषय हा फार महत्वाचा असतो. पण हे महत्व काय आणि कुठला विषय महत्वाचा हे कोण ठरवतं? मला सांगा एका गावात बस थांबत नाही, हा सिनेमाचा विषय होऊ शकतो का? एका क्लिकवर ओला उपलब्ध असणार्‍यांसाठी कदाचित हा विषय तितका महत्वाचा नसू शकतो, पण ज्यांच्या घरातील स्त्रिया दवाखान्यात जायला बस मिळाली नाही म्हणून मृत पावल्या त्यांच्यासाठी यापेक्षा अधिक महत्वाचा दुसरा विषय नाही. मारी सेल्वराजचा ‘कर्णन’ त्याच समाजाच नेतृत्व करतो ज्यांच्या अनेक पिढ्यांनी हे दुःख सोसलं आहे, इथे न मिळणारी बस हे केवळ एक उदाहरण आहे. कारण या बसच्या आधीही त्यांना सहजासहजी काही मिळालेलं नाही, संघर्ष पाचवीला पुजलेल्या समाजाच्या एका अजून संघर्षाची कथा म्हणजे कर्णन… व्यावसायिक सिनेमांच्या भाऊगर्दीत जेव्हा असा एखादा सिनेमा बनतो तेव्हा यावर बोलणं आणि व्यक्त होणं देखील गरजेचं आहे.

- Advertisement -

मारी सेल्वराजच्या पहिल्या सिनेमाचा विषय देखील एका दुर्लक्षित राहिलेल्या समाजाची कथा होती, ज्यात नायकाची इच्छा केवळ वकिलीचे शिक्षण घेणे एवढी आहे. हे विषय सामान्य माणसाला वाचायला फार सोपे आणि साधारण वाटतात खरे पण त्या मागचे दाहक वास्तव कुणालाच जाणून घ्यायचे नसते. कर्णन पहिल्यांनंतर अनेकांच्या प्रतिक्रियेत एक साधर्म्य होते, हा सिनेमा स्तब्ध करतो, धक्का देतो किंवा याच्यातून सावरायला वेळ लागतो पण यात मला तसं काही वाटलं नाही. एव्हाना कुठल्याही वंचित घटकाला या सिनेमाबद्दल फार अप्रूप वाटणार नाही , कारण यात केवळ तेच चित्र दाखवलंय जे आजही देशातील अनेक भागात पाहायला मिळतं. स्वरूप बदललं असलं तरी मानसिकतेत फार फरक झालेला नाही, घरासमोर अमावस्या मागायला आलेल्या बाईची सावलीसुद्धा उंबर्‍यावर पडू नये, तिने मोठ्याने मारलेली हाकसुद्धा आपल्याला अपमान वाटते.

मग सिनेमात फक्त नावं सवर्णांसारखी आहेत म्हणून जनावरासारखं तुडविणार्‍या एसपी आणि आपल्यात काय फरक उरतो ? तिथे त्याच मारणं केवळ पॉवर आहे म्हणून दाखवलंय उद्या आपल्या हातात ती असेल तर आपण ते करणार नाही, हे कशावरून ? म्हणून कर्णनची कथा फार वेगळी वैगरे नव्हती. धक्के देणारी, थक्क करणारी तर अजिबात नाही, ते केवळ समाजाचं प्रतिबिंब होतं, ज्यात शोधलं तर कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्यातला प्रत्येक जण सापडेल. जंगली लोकांना बसची काय गरज म्हणणार्‍या कंडक्टरपासून ते शेजारच्या गावातल्या सरपंचापर्यंत, पोलीस स्टेशनमधील वृद्ध लाचार हवालदारापासून ते हिंसेला घाबरणार्‍या बसच्या मालकापर्यंत… एक गाव जिथं बस थांबत नाही, म्हणून तिथल्या गावकर्‍यांना शेजारच्या गावातील थांब्यावर जावं लागतं. पण तिथल्या लोकांनाही यांना त्यांच्या थांब्यावरून बसमध्ये चढणे आवडत नाही, ते महिलांची छेड काढतात, म्हणून मुलींचं शिक्षण बंद झालंय. अशातच एक दिवस आपल्या आईला उपचारासाठी घेऊन जाणारा मुलगा बस थांबली नाही म्हणून दगड मारून काच फोडतो आणि सुरु होतो संघर्ष हक्काचा, असा हक्क जो आपल्यासाठी साधारण असला तरी त्या गावकर्‍यांसाठी सर्वस्व आहे. पुढे काय घडतं? हे सिनेमात पाहणं योग्य ठरेल.

- Advertisement -

सिनेमात मुख्य भूमिका केलीये धनुषने ज्याचं नाव आहे कर्णन, गावाचा मुखिया ज्याचं नाव आहे दुर्योधन, कर्णनच्या प्रेयसीचं नावं आहे द्रौपदी, असे अनेक महाभारताशी जोडणारे संदर्भ सिनेमात आढळतात. जमिनीवर रेंगणार्‍या किड्यांपासून, पाय बांधलेल्या गाढवापर्यंत, धड नसलेल्या पुतळ्यापासून ते उष्ठ्या जेवणाची वाट पाहणार्‍या मांजरापर्यंत अशी अनेक रूपके दिग्दर्शकाने दाखवली आहेत. ज्यांचा कथेशी थेट संबंध येतो. पण कथेबद्दल अजून एक गोष्ट म्हणजे यात दिग्दर्शकाने सिनेमाचं नाव जरी नायकाच दिलं असलं तरी या लढ्याला वैयक्तिक ठेवलं नाहीये, म्हणजे सिनेमात कर्णन नायक असला तरी त्याचा लढा हा एकट्याचा नाहीये, तो प्रत्येक गावकर्‍याचा लढा आहे, म्हणून त्याने मिळवलेली तलवार तुम्हाला कुणाच्याही हातात सहज दिसेल.

नायक सोडून जाईल तेव्हा त्या लढाईच नेतृत्वसुद्धा कोणीही घेऊ शकतं, जसं यात यमन त्याची जागा घेतो. कथेतील प्रत्येक पात्राला त्याची वेगळी छटा आहे आणि त्याला ताकद दिलेली आहे, इथे बहिणीचं लग्न झालं नाही म्हणून जशी ती टोमणे ऐकते तसंच जेव्हा भाऊ दारू पितो तेव्हा सर्वांसमोर त्याच्या डोक्यावर बादलीभर पाणी ओतून ओढत घरी घेऊन जाण्याचं धाडसही करते. इथे नायकाला आधी विरोध करणारे त्याला वाचविण्यासाठी पुढेही येतात आणि पोलिसांचा मारही खातात. ज्याकथेची सुरुवात आणि शेवट एकाच बिंदूवर येऊन होतो, त्याला परिपूर्ण कथा म्हंटलं जातं, कर्णनने हाच वर्तुळ अतिशय प्रभावीपणे पूर्ण केलाय. उत्तम दिग्दर्शनाला सुरेख सिनेमॅटोग्राफीची जोड दिलीये, इथे संगीतही श्रवणीय आहे आणि अभिनयही दमदार म्हणून कर्णन हा केवळ सामाजिक सिनेमा किंवा आर्ट फिल्म न राहता एक परिपूर्ण सिनेमा बनला आहे, असा हा अनुभव एकदा घ्यायला हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -