घरफिचर्ससारांशसंघर्षमय आठवणींचा ठेवा

संघर्षमय आठवणींचा ठेवा

Subscribe

लेखक, कवी अनिल भालेराव यांनी विपुल साहित्य संपदा निर्माण केलेली आहे. ‘कडिकाळ’ ही त्यांची एकविसावी साहित्य निर्मिती आहे. हा एक प्रचंड संघर्षमय जीवन प्रवास आहे. ही कादंबरी म्हणजे स्वकथनात्मक प्रकारची आहे. यातील अनुभव किंवा प्रसंग हे असे रेखाटले आहेत की जणू लेखकच आपल्याशी बोलत आहे. आणि कादंबरी कधी सीमा पार करते तेच कळत, ती वैश्विक होत जाते. वाचणार्‍याच्या भावाविश्वाची होऊन जाते. आपण ज्या परिस्थितीतून आलो त्याच परिस्थितीमध्ये राहायचे नाही, तर ही परिस्थिती, व्यवस्था बदलली पाहिजे, त्याकरिता त्या संघर्षाची नांदी विद्यार्थीदशेपासून सुरुवात होते. अतिशय नकारात्मक अनुभव वाट्याला आल्याचे जाणवते.पण सकारात्मक एकेक पाऊल पुढे टाकत, लेखक आपले यशाचे शिखर गाठतो, या अनुभवावर आधारित ही कादंबरी आहे.

-शामराव सोमकुवर

मुंबईला येणारे बरेच कामधंदा, नोकरीकरीता येतात,परंतु लेखक मात्र मुंबईला शिक्षण घेण्यासाठी आणि तेही इंग्रजी माध्यमातून घ्यायचे ही महत्वाकांक्षा बाळगूनच. नातेवाईक किंवा इतर कुणाकडे राहणे शक्य नाही, जर कामधंदा करीत असेल तरच बहुतेक नातेवाईक ठेवतात, कारण प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम मिळत असते, परंतु शिक्षण म्हटले की उलट जास्त खर्च येतो, म्हणून लेखक होस्टेलचा पर्याय निवडतो. होस्टेलमध्ये प्रवेश घेते वेळी आलेले अनुभव व प्रवेश घेतल्यानंतर आलेले अनुभव अत्यंत विदारक आहेत. गरीब विद्यार्थी शिक्षणाकरिता हॉस्टेलमध्ये राहतात, त्याकरिता सरकार अनुदान देते, परंतु जेवण मात्र तुरुंगातील कैद्यासारखे मिळते. इंग्रजी येत नाही किंवा समजत नाही म्हणून इंग्रजीचे क्लास न लावता रद्दीच्या दुकानातून नायक डिक्शनरी विकत घेतो.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का मिळत नाही?, निर्वाह भत्ता का मिळत नाही? त्यासाठी केलेला संघर्ष दिलेला आहे. उदाहरणदाखल एवढा संवाद पुरेसा आहे. आपल्याला शिष्यवृत्ती मिळत नाही, निर्वाह भत्ता मिळत नाही याकरीता आम्ही प्रशिकमध्ये गेलो. मी त्यांना समजावून सांगितले.
तो तुमचा प्रश्न आहे, आमचा नाही, त्यातला एकजण म्हणाला. पण निर्वाह भत्ता तुम्हाला नको का? मी म्हणालो.
आम्ही आमचे बघू,पण येथे प्रशिक नको. का, प्रशिक का नको? ती मागासवर्गीयांची आहे? तुम्ही मागासवर्गीय नाहीत का? तेवढ्यात दहा ते पंधरा विद्यार्थी माझ्या बाजूने येऊन उभे राहिले. ते बघून अ. भा. वि. प. च्या विद्यार्थ्यांनी काढता पाय घेतला. ‘मायदेशा’ ही कविता कादंबरीत आहे. मायदेशा जर्मनी दुभंगणारी बर्लीन भिंत कोसळून पडली पण हे मायदेशा, या देशातील जातीची भिंत कधी कोसळणार? असा प्रश्न मी या कवितेतून केला, तेव्हा मंचावरील पाहुण्याच्या भुवया उंचावल्या होत्या. शिकलेली मंडळी अजूनही प्रतिगामी म्हणून वागतात यासारखं उदाहरण नाही. लेखक आणि कवी सामाजिक विषयावर तासनतास चर्चा करीत असे, त्यामुळे त्यांना प्रथमच तामिळनाडूचा मल्याळम संघ इथे भाषण देण्याकरीता बोलविण्यात आले. भाषण संपल्यावर ५० ते ६० तरुण उपस्थित होते, हीच अवस्था केरळ आणि तामिळनाडूमध्ये आहे, त्यांनी जातीभेदभावाला कंटाळून ख्रिश्चन धर्म स्वीकारला.
पान न ५७. वरील परिच्छेद खूप बोलका आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या ऑफिसमधील संवाद.
नमस्कार सर, आम्ही दोघांनी त्याना नमस्कार केला.
लाल सलाम,त्यांनी नजरेने आम्हाला बसायला सांगितले. बरं कोठे राहता तुम्ही?
भीमनगर, कल्याण, मी म्हणालो. म्हणजे झोपडपट्टीत का? म्हटलं तर हो, म्हटलं तर नाही. म्हणजे?
मानसिकतेवर अवलंबून आहे. कार्ल मार्क्स काय शूद्र होता? त्याने खोचक शब्दात विचारले. आम्ही त्याला लाल सलाम केला आणि तडक बाहेर पडलो. त्या व्यक्तीच्या बोलण्यातून कळलं होतं,तो समाजवादी ब्राह्मण होता. बहुजन स्टुडंट फ्रंटच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर किल्लारी भूकंपग्रस्त निधीकरीता मदतफेरी काढण्याचे ठरविले असता काही गुंडाकडून धमक्या आल्या, तरी पण कादंबरी नायक आनंदा बॅनर घेऊन निघाले, तेव्हा फक्त पाच लोक होते. नंतर हळूहळू लोक वाढत गेले व दोन हजार जमवून आम्ही तहसिलदारांना सोपविले. एकदा आपण निघालो की मार्ग मिळत जातात आणि आत्मविश्वास वाढत जातो. फक्त स्वतःवरचा विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली असते, हेच लेखक अनिल भालेराव यांनी सिध्द केलेले आहे. तुम्ही चांगले काम करायला निघता तेव्हा लोक तुमच्या पाठीशी येत नाही, पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवता,आगेकूच करता, तेव्हा कारवा वाढत जातो.
नायक आनंदाची प्रौढ शिक्षण योजनेअंतर्गत कॉलेजमधून व्यवस्थापक म्हणून निवड झाल्यानंतर भटके, विमुक्त, आदिवासी या समाजाचे जीवन अनुभवता आले, या समाजात शिक्षणाचा अभाव, प्रचंड दारिद्य्र त्यांच्याकडे रेशनकार्ड नसल्यामुळे त्यांचे मतदारयादीत नाव नाही. त्यामुळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नसत.
पान न ८२ वर संवाद अगदी हृदयद्रावक आहे. बाबरी मस्जिद उध्वस्त झाल्यानंतर झोपडपट्टीमध्येच सर्वात जास्त पोलीस बंदोबस्त दिसत होता. धर्माचे रक्षण करण्याचा मक्ता जास्त करून झोपडपट्ट्या आणि मोहल्ल्यांमध्ये दिसून आला. गरिबाच्या मदतीसाठी ना राम आला ना रहीम आला, गरीबच गरिबाला मारत होता. दंगली शांत झाल्यानंतर हिंदुत्ववादी विद्यार्थी जय श्रीराम करत छाती फुगवून फिरत होते, खरं तर ते विद्यार्थी गरीब आणि मागासवर्गीय होते, पण धर्म भावनेमुळे आंधळे झाल्याचे जाणवत होते. पान नं ८९ वर लेखकाने एका ओबीसी व्यक्तीबाबत संवाद प्रभावीपणे मांडला आहे. तो मंडल आयोगाच्या समर्थनार्थ मोर्चा..या विषयी आहे.
अरे चुत्या, तुम्हा लोकांना मोर्चा, आंदोलनाशिवाय काहीच काम नाही का? वड्डीवार म्हणाला.
अरे चुत्या, तुमच्या ओबीसीसाठीच मंडल आयोग आहे, तुमच्यासाठी आम्ही मंडल आयोगाचा झेंडा हाती घेतला आहे. तुम्हाला हक्क अधिकारापेक्षा तुम्हाला धर्म महत्वाचा आहे. खरं तर तुम्ही आंधळे झाले आहात, मी त्याला आवेशात म्हणालो. पान न.९९ वर.वरील सामाजिक प्रसंग लेखकाने रेखाटला आहे. कदाचित त्यातून आपल्याच समाजातील आहारबदलाची ती नांदी असावी. हे काय? एवढे मोठे मटणाचे पीस? अरे आनंदा मोठ्याचं मटण आहे. अरे दादा, कधी खाल्लं नाही आयुष्यात. अरे खा ना, काय होतं? दादा, उपाशी राहीन पण खाणार नाही.
पान न १३२ वरील प्रसंग लेखक सांस्कृतिकदृष्ठ्या जागृत असल्याचे जाणवते. आपला ऐतिहासिक वारसा आपण जपला पाहिजे, हे लेखकाच्या रोखठोक संवादतून दिसून येते. आम्ही अजंठा लेणी पाहत पाहत लेणी क्रं.१० मध्ये पोहोचलो. तेथील मंडप, ब्लॅक ब्युटी, राण्यांची चित्रे पाहून कॅम हरखून गेला, जातक कथा पाहून तात्कालिन समाज कसा होता यांची माहिती लेणीतील गाईड सांगत होता. तो यक्षयक्षिणिविषयी सांगत होता, हे कलियुगातील दुःख बघुन त्यांनी छताला हात लावलेले आहेत.
व्हॉट इस कलियुग? कॅमने मला विचारले.
काका, आपले नाव काय? मी त्या गाईडला विचारले.
मी पाटील आहे, तो म्हणाला. काका, चुकीचे सांगू नका. येथे काय संबंध कलियुगाचा, मी त्याच्यावर ओरडलो. तो जरा आम्ही चांगले अभ्यासक असल्याचे पाहून घाबरला. स्वाभिमान, अन्यायाविरुद्ध येणारी चीड आणि त्याकरिता पेटून उठणे, त्यावर लिखाण करणे ही जरी खासियत लेखकाची असली तरी कादंबरीचा नायक हाच लेखक जाणवायला लागतो. ही एक समानुभूतीवर आधारित असलेली कादंबरी जाणवते. सशक्ततेची निर्मिती ही या कादंबरीचे वैशिष्ठ्य आहे. कादंबरी वाचनीय झालेली आहे.
स्वाभिमान, अन्यायाविरुद्ध लढणे,आणि शुल्लक कारणासाठी किंवा स्वार्थासाठी तडजोड न करणे हे गुण कादंबरी नायकात ठासून भरलेले आहेत, नवनिर्मितीचे स्वप्न घेऊन निघालेला नायक लेखकाच्या रूपाने दिसून येत आहे हेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -