घरफिचर्ससारांशशाश्वत विकासातच दडलीय कोकण विकासाची पहाट!

शाश्वत विकासातच दडलीय कोकण विकासाची पहाट!

Subscribe

कोकण उद्योग पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली 25 वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक विकास यात काम करत आहोत. हे काम करत असताना आम्हाला अनेक गोष्टी दिसून आल्या. पहिली म्हणजे कोकणात मोठ्या प्रमाणात वनजमिनी असून या सर्व जमिनी पडीक आहेत. आंबोली हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून या परिसरात माझ्या परिचयाचे काही शेतकरी आहेत. काही वर्षांपूर्वी त्या जागा पूर्णपणे त्यांच्या मालकीच्या होत्या. पण कालांतराने त्यांच्या सातबारामध्ये इतर अधिकारांत त्या ‘शासन वने’ म्हणून लागल्या आणि कालांतराने खर्‍या जमीन मालकाला इतर अधिकारात टाकून ‘शासन वने’ मुख्य अधिकारात आल्या. यामुळे अनेक वर्षं झाली त्या जागा पडीक असून अशा जागेत वनशेती, बांबू लागवड व कृषी पर्यटन केले तर त्याचा भरपूर फायदा होईल.

सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे माझे कोकण!
राष्ट्रदेवीचे निसर्गनिर्मित केवळ नंदनवन!

खरंच…स्वर्गाचं अंगण आहे कोकण! या स्वर्गतुल्य कोकणाला निसर्ग व तौक्ते चक्रीवादळ आणि आता महाजलप्रलयाने अक्षरक्ष: होत्याचे नव्हते केले आणि मृत्यूूने जणू तांडव उभे केले. गाव काय आणि शहर काय कोणालाच निसर्गाने सोडले नाही. निसर्गाने या संपूर्ण जगालाच विचार करण्याची वेळ आणली आहे. वातावरण बदलत चालले आहे. निसर्गाने वेळोवेळी आपल्याला याची जाणीव करुन दिली आहे. या सर्व प्रकाराला आपणच आपल्यासाठी तयार केलेला जबरदस्तीचा विकास जबाबदार आहे का? कोकणी माणसा आता तरी जागा हो. कोकणच्या सुरक्षित आणि शाश्वत विकासातच दडलाय. कोकणचा सर्वांगीण विकास, हे लक्षात घे… कोकण हे जैवविविधतेने नटलेले असून निसर्गाची हानी करुन जर आपण विकासाचे आराखडे तयार केले तर भविष्यात आतापेक्षा जास्त भयंकर विनाशाला सामोरे जावे लागणार हे निश्चित आहे. देवाने कोकणाला भरभरुन दिले आहे. हिरवागार, नयनरम्य भौगोलिक परिसर, डोंगरदर्‍या, स्वव्छ, सुंदर नद्या-खाड्या, अथांग, स्वच्छ समुद्राची 720 किमीची किनारपट्टी कोकणाला लाभली आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारपेठ व भारताची आर्थिक राजधानी मुंबई याच कोकणात आहे. हे सर्व असल्यावर शाश्वत विकासाला आणखी काय पाहिजे? असा प्रश्न उभा राहतो.

- Advertisement -

या प्रश्नाचे पहिले उत्तर म्हणजे प्रदूषणमुक्त आणि हिरव्यागार उद्योगांचे माहेरघर म्हणजेच कोकण. कोकणातील भौगोलिक परीस्थितीनुसार आपण योग्य नियोजन करुन त्याप्रमाणे विविध व्यवसाय केले तर नक्की फायदा होणार. प्रत्येक गावात खूप मोठ्या प्रमाणात पडीक जमिनी आहेत. जे खरंच गावाकडे शेतात काम करुन उदरनिर्वाह करीत आहेत. त्यांच्यापैकी अनेक जणांकडे जमीन कमी प्रमाणात आहे. अशा कष्टकरी शेतकर्‍यांनी एकत्र येऊन व्यावसायिक पध्दतीने गावातील पडीक जमीन लागवडीखाली आणली तर ज्यांची पड जमीन आहे, त्यांनाही चांगले पैसेे मिळतील व प्रत्यक्ष काम करणार्‍यांना भरघोस उत्पन्न मिळेल. उदा. माझे गाव सिंधुदुर्गात मु. पो. पेंडूर हे आहे. आमच्या गावातील तरूण मुलांनी एकत्र येऊन यंदा कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात केली. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी बाजारपेठांमध्ये आमच्या गावचे कलिगंड विक्रीसाठी असतात. दोन वर्षांपूर्वी त्यांनी रेकॉर्डब्रेक उत्पन्न मिळवले. विशेष म्हणजे त्यांचे वार्षिक आर्थिक व्यवहार काही कोटी रुपयांपर्यंत झाले. अशा प्रकारे जर प्रत्येक गावातील तरुणांनी एकत्र येऊन काम करायला हवे. फार्मर्स प्रोड्युसर कंपनी किंवा सहकार संस्था तयार करुन सामुदायिक शेती केली तर शासनाची चांगली मदत घेता येते. कमी व्याजदरात लोन मिळते, सबसिडी मिळते. हा एक्स्ट्रा फायदा शेतक-यांना मिळतो. जे नुकसानदायी पीक आहे ते न घेता मार्केटचा अभ्यास करुन फायदा देणारी लागवड केली पाहिजे.

कोकणात आंब्याप्रमाणेच फणस, जांभूळ, काजू, नारळ, सुपारी, आवळा, कोकम यांची मोठ्या प्रमाणात व्यावसायिक पध्दतीने लागवड केली पाहिजे. आंबोलीसारख्या ठिकाणी पेरु लागवड छान होईल. या सर्वांना आज चांगले मार्केट आहे. या फळांवर आधारीत प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणात करता येऊ शकतात. कोकणात अनेक ठिकाणी एमआयडीसी असून येथे 24 तास लाईट पाणी, मोठे रस्ते वगैरे सर्व सुविधा आहेत. अशा ठिकाणी जागा घेऊन प्रक्रिया उद्योग उभारले पाहिजेत. आज मी बघतोय की महाराष्ट्राबाहेरून दिल्ली, केरळ, राजस्थानमधील उद्योजकांनी कोकणात काजू कारखाने व इतर व्यवसायात भरारी घेतली आहे. आपल्याला सर्व सुविधा आहेत, पण कोकणवासीयांकडे इच्छाशक्तीचा अभाव आहे. हे लक्षात घेता मुंबईतील चाकरमान्यांनी एकत्र येऊन गावच्या आपल्या भावंडांना व्यवसायात आणले पाहिजे. कंपनीप्रमाणे काम करताना आपल्याला काय करायचे आणि काय नाही करायचे याचादेखील नीट अभ्यास करायला हवा. आजूबाजूचे यशस्वी प्रकल्प पहायला हवेत. म्हणजे नक्की काय करायचे याची दिशा मिळेल. कोकणात मसाला शेती खूप चांगली होते. त्यात काळी मिरी लागवड केली तर चांगलेे उत्पन्न मिळते. कमी जागेत जास्त उत्पन्न कसे कराल याचे तंत्रज्ञान आपल्या जवळच्या कृषी विद्यापीठात मिळेल. शासन दरबारी सर्व काही असून पण आपल्याला त्यांचा पाठपुरावा करायला हवा. नीट अभ्यास करून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून काम केले तर यश नक्की मिळेल.

- Advertisement -

कोकणात समुद्र, नद्या, बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात आहेत. या जलसंपत्तीतून भरपूर उत्पन्न मिळण्यासारखे असून मत्स्यशेती, खेकडा पालन व पाण्यातील जैवविविधता यांचा नीट अभ्यास करून मोठ्या प्रमाणावर प्रकल्प व्हायला हवेत. त्यासाठी ‘पाण्यातील शाळा’ व्हायला हवी. नदी-समुद्र किनार्‍यांवरील कोळी बांधवांना याचे योग्य प्रशिक्षण यायला हवे. अनाम प्रेम परिवार आणि लुपिन फाउंडेशनच्या माध्यमातून या दिशेने चांगले काम सुरू आहे. आता सर्वजण आपल्या आरोग्याकडे खूप लक्ष देत असून नैसर्गिक-आयुर्वेदिक उपचार पध्दतीकडे सर्वांचा कल असतो. गुळवेल, शतावरी, अडुळसा, कोरफड, काळी हळद वगैरे आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड केली तरीही त्याला चांगली बाजारपेठ असून सावंतवाडीला याचे प्रशिक्षण केंद्र आहे.

आपला मुलगा शिकून मोठा व्हावा म्हणून पालक भरपूर खर्च करुन त्याला परदेशात शिकायला पाठवतात. पण, आपला मुलगा 100 वर्षे जगायला पाहिजे आणि या सृष्टीचा चांगला उपभोग घेऊन सुखकर जीवन जगायला पाहिजे म्हणून किती पालक विचार करतात? सिंधुदुर्गात धामपूरला सचिन देसाई हे स्यमंतकच्या (युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ) माध्यमातून या नैसर्गिंक जीवनप्रणालीसाठी खूप चांगले कार्य करीत आहेत. शाश्वत विकास हवा असेल तर जुनं ते सोनं हेच खरे आहे.

कोकण उद्योग पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून आम्ही गेली 25 वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक विकास यात काम करत आहोत. हे काम करत असताना आम्हाला अनेक गोष्टी दिसून आल्या. पहिली म्हणजे कोकणात मोठ्या प्रमाणात वनजमिनी असून या सर्व जमिनी पडीक आहेत. आंबोली हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून या परिसरात माझ्या परिचयाचे काही शेतकरी आहेत. काही वर्षांपूर्वी त्या जागा पूर्णपणे त्यांच्या मालकीच्या होत्या. पण कालांतराने त्यांच्या सातबारामध्ये इतर अधिकारांत त्या ‘शासन वने’ म्हणून लागल्या आणि कालांतराने खर्‍या जमीन मालकाला इतर अधिकारात टाकून ‘शासन वने’ मुख्य अधिकारात आल्या. यामुळे अनेक वर्षं झाली त्या जागा पडीक असून अशा जागेत वनशेती, बांबू लागवड व कृषी पर्यटन केले तर त्याचा भरपूर फायदा होईल. त्यासाठी शासनाकडून रीतसर संमती घेऊन काम करावे लागणार आहे.

आज बांबूपासून खूप फायदे असून बांबूची व्यावसायिक शेती मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून आम्ही कोकण बांबू मिशन आणि कोकण ग्रीन वर्ल्डच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करीत आहोत. कोकणातील हजारो एकर पडीक जमिनी आम्ही शोधून काढल्या आहेत. मोठ्या प्रमाणात बांबू लागवड केली तर कोकणची आर्थिक स्थिती खूप चांगल्या स्थितीत येईल. कोकणात माणगा, चिवा, कणक या बांबूच्या जाती अतिशय चांगल्या होतात, तसेच वाल्कोवा, कटांग, अ‍ॅस्पर, ब्रांडिसी, भिमा बांबू अशा प्रकारच्या बांबूची शास्त्रीय पध्दतीने, डिप इरिगेशनचा वापर करून व टिश्यू कल्चर रोप घेऊन लागवड केली तर किमान 40 ते 50 वर्षांपर्यंत खूप चांगले उत्पन्न मिळते. बांबूपासून इथॅनॉलची निर्मिती करता येते. लाकडाला उत्तम पर्याय म्हणून भविष्यात बांबूची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. बांबूपासून प्लायवूड तयार करतात. याशिवाय हॅण्डीक्राफट, बांबूची घरं. इमारतीच्या बांधकामांमध्ये स्ट्रक्चर उभे करण्यासाठी आता लोखंडाप्रमाणे बांबूचा वापर होतो.

या आणि अशा अनेक वेगळ्या वाटा शोधत विकासासाठी पावले उचलायला हवीत. निसर्गाला बाधा न आणता केलेला शाश्वत विकासच या देवभूमीला भविष्यात तारणार आहे.

–संजय परब

-(लेखक कोकण उद्योग-पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -