घरफिचर्ससारांशउत्तर गंगेचे क्रंदन

उत्तर गंगेचे क्रंदन

Subscribe

वर्तमान परिस्थितीत गंगा प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. जवळजवळ १४८ मध्यम आणि मोठी महानगरे आणि हजारो खेडी गंगेकाठी वसली आहेत. या सर्व नागरी आणि ग्रामीण वस्त्यांचे सांडपाणी आणि मानवी कचरा सरळ गंगेत येऊन मिळतो आणि मैल दर मैल गंगा प्रदूषित होत वाहते. कानपूर, प्रयागराज, वाराणसी, पाटणा यांसारख्या काठावर वसलेल्या अनेक औद्योगिक शहरांमध्ये असलेल्या रासायनिक कंपन्या, कापड गिरण्या, डिस्टिलरी, कत्तलखाने, कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प आणि रुग्णालये गंगेत प्रक्रिया न केलेले अवशिष्ट सरळ मिसळून प्रदूषणाचे फार मोठे घातक कर्म रात्रंदिवस करीत आहेत. त्यातून अनेक प्रकारची घातक रसायने, शिशे, तांबे, पारा यांसारखे धातू हजारो पटींनी पाण्याला सूक्ष्म स्तरावर प्रदूषित करतात.

-संजीव आहिरे

गंगा भारतीयांचे सर्वात मोठे श्रद्धास्थान, सर्व भारताची माता, पापमोचक आणि मोक्षदायिनी नदी. गंगेवाचून भारताची कल्पना करणे शक्य नाही. गंगा हा कोटी कोटी भारतीयांच्या आस्थेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. जीवनात एकदा तरी गंगास्नान व्हावे अशी प्रत्येक भारतीयाची अपेक्षा असते. या गंगेचे जल भारताच्या घराघरामध्ये श्रद्धेने जपून ठेवले जाते. प्रत्येक सणवार, मंगलकार्य या गंगाजलाच्या सिंचनाने पार पडतात एवढेच नव्हे तर मृत्यूसमयी प्राण जाण्याआधी त्या व्यक्तीच्या तोंडात गंगाजल टाकून त्याच्या मोक्षाचा मार्ग मोकळा केला जातो.

- Advertisement -

अशी ही पतितपावनी, संपूर्ण भारताची अगाध श्रद्धा असलेली आणि सर्वांची माता असलेली गंगा. या गंगेकाठीच आमचे ऋषीमुनी, राम, कृष्ण राहिले. भारतीय संस्कृती या गंगेच्या काठावरच जन्माला आली. म्हणून आपल्या देशाला गंगा-यमुना संस्कृतीचा देश म्हटले जाते. हिमालयात गंगोत्रीपासून जन्म घेत अनेक नद्यांना आपल्यात सामावून घेत ही भागीरथी गंगा ११ राज्यांतून २५२५ किमीचा प्रवास करीत बंगालच्या उपसागरास मिळते.

गंगा गंगेति यो ब्रूयात योजनानां शतैरपि
मुच्यते सर्वपापेभ्यो विष्णुलोक स गच्छन्ति

- Advertisement -

अर्थात जो शेकडो योजन अंतरावरूनही गंगा-गंगा असे उच्चारण करतो, त्याची सर्व पापांपासून मुक्ती होऊन तो विष्णुलोकास प्राप्त होतो अशी गंगेची महती आहे.

गंगा संरचना-भागीरथी गंगा मुख्यत: उत्तराखंड गढवाल येथील हिमालयाच्या गंगोत्री हिमनग शिखरात एका गुफेसारख्या भागातून उगम पावून प्रवाहांचे रूप धारण करते. पुढे या प्रवाहात नंदादेवी, कामात पर्वत आणि त्रिशूल पर्वताचे बर्फाळ पाणी मिळून प्रवाहाला धारदार बनवते. हिमालयाच्या दुसर्‍या शिखरातून निघालेली अलकनंदा नदी आपल्या प्रवाहात सहायक धोली, विष्णुगंगा, नंदाकिनी, कर्णगंगा आणि मंदाकिनी या पाच नद्यांना आपल्यामध्ये सामावून देवप्रयाग येथे भागीरथी गंगेला मिळते.

या संगमापासून पुढे हा प्रवाह गंगा नदीच्या नावाने ओळखला जातो. अशा प्रकारे २०० किमी हिमालयाच्या गिरिशिखरातून निमुळत्या मार्गाने प्रवास करीत गंगा नदी ऋषिकेश मार्गे हरिद्वारच्या मैदानी प्रदेशात येते. पुढे हरिद्वारपासून ८०० किमीचा मैदानी प्रवास करीत बिजनौर, फरुखाबाद, कन्नोज, बिठूर कानपूर मार्गे प्रयागला पोहचते. या ठिकाणी यमुना नदी गंगेला येऊन मिळ्ते. तोच हा प्रसिद्ध तीर्थराज प्रयाग संगम हिंदू धर्मियांचे महातीर्थ प्रयागराज! यानंतर गंगा वाराणसीला पोहचून उत्तरेकडे वळण घेते. त्यामुळे ती उत्तरवाहिनी गंगा म्हटली जाते.

उत्तरेकडे वळलेला हा गंगाप्रवाह बिहारच्या गाजीपूर, पाटना, भागलपूर येथून जाताना सोन, गंडकी, शरयू आणि कोसी यांसारख्या पवित्र नद्या गंगेला येऊन मिळतात. पुढे हा महाप्रवाह पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याच्या गिरिया येथून गंगा भागीरथी आणि पद्मा अशा दोन वाहिन्यांमध्ये विभाजित होतो. भागीरथी गिरियापासून दक्षिण दिशेला वाहू लागते. त्याचवेळेस पद्मा नदी दक्षिण-पूर्व दिशेला वाहत फरक्का मार्गे बांगलादेशात प्रवेश करते. गंगेच्या या विभाजनाबरोबरच डेल्टा निर्माणास सुरुवात होते. हीच भागीरथी गंगा हुबळी शहरापासून सागरात विलीन होईपर्यंत हुबळी नावाने ओळखली जाते. ही हुबळी नदी कोलकाता, हावडा येथून सुंदरबन डेल्टा मार्गे बंगालच्या उपसागरास मिळते. गंगा आणि सागराच्या या मिलनास गंगा-सागर म्हटले जाते, जे हिंदूंचे पवित्र तीर्थस्थळ आहे.

गंगेची जैविक आणि पर्यावरणीय स्थिती

सोळाव्या आणि सतराव्या शतकापर्यंत गंगा यमुनेचा संपूर्ण प्रदेश घनदाट जंगलांनी व्यापलेला होता. हत्ती, रानम्हसी, वाघ, गेंडा, सिंह इत्यादी प्राण्यांनी गजबजलेला होता. तिच्या तटवर्ती क्षेत्राच्या शांत आणि अनुकूल पर्यावरणामुळे नानाविध रंगीबेरंगी पक्ष्यांचे संसार तेथे थाटलेले होते. त्यावेळी गंगेच्या पाण्यात शार्क, डॉल्फिनसह १४० भिन्न विभिन्न माशांच्या प्रजाती, विविध सरीसृप तसेच सस्तन प्राण्यांच्या अनेक जाती नांदत होत्या. नीलगाय, सांभर, ससे, मुंगूस, चिंकारा आणि सरपटणार्‍या प्राण्यांची ही जंगले आश्रयस्थाने होती. गंगेच्या पर्वतीय किनार्‍यांवर वानर, लाल वानर, भुरे अस्वल, कोल्हे, बर्फाळ प्रदेशातील चित्ते, हरीण, सांभर, कस्तुरीमृग असे प्राणी मोठ्या संख्येने आढळून येत. सुंदरबन तर प्रसिद्ध वनस्पती आणि बंगालच्या प्रसिद्ध वाघांचे गृहक्षेत्र होते.

गंगा आणि तिच्या सहाय्यक सर्व नद्या भारताच्या जवळजवळ ४० टक्के भूभागाला सिंचनाने समृद्ध करतात. या गंगेच्या तटवर्ती भूभागावर धान, ऊस, तीळ, विविध डाळी, सरसो, बटाटा, मिरची अशी अनेक प्रकारची पिके घेतली जातात. संपूर्ण गंगा नदीत मच्छीमारीचा उद्योग मोठ्या उत्पन्नाचे साधन आहे. प्राकृतिक सौंदर्याने बहरलेल्या अनेक पर्यटनस्थळांनी आणि हरिद्वार, प्रयागराज, वाराणसी यांसारख्या तीर्थक्षेत्रांनी समृद्ध करीत गंगा आजही सर्वांच्या भौतिक, सामाजिक आणि आध्यत्मिक गरजा भागवणारी सर्वांची माता आहे.

गंगा प्रदूषण

वर्तमान परिस्थितीत गंगा प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय बनला आहे. जवळजवळ १४८ मध्यम आणि मोठी महानगरे आणि हजारो खेडी गंगेकाठी वसली आहेत. या सर्व नागरी आणि ग्रामीण वस्त्यांचे सांडपाणी आणि मानवी कचरा सरळ गंगेत येऊन मिळतो आणि मैल दर मैल गंगा प्रदूषित होत वाहते. कानपूर, प्रयागराज, वाराणसी, पाटना यांसारख्या काठावर वसलेल्या अनेक औद्योगिक शहरांमध्ये असलेल्या रासायनिक कंपन्या, कापड गिरण्या, डिस्टिलरी, कत्तलखाने, कोळशावर चालणारे ऊर्जा प्रकल्प आणि रुग्णालये गंगेत प्रक्रिया न केलेले अवशिष्ट सरळ मिसळून प्रदूषणाचे फार मोठे घातक कर्म रात्रंदिवस करीत आहेत.

त्यातून अनेक प्रकारची घातक रसायने, शिशे, तांबे, पारा यांसारखे धातू हजारो पटींनी पाण्याला सूक्ष्म स्तरावर प्रदूषित करतात. कानपूरच्या चर्मोद्योगातून प्रचंड प्रमाणावर क्रोमियम गंगेत मिसळले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून विष मिसळण्याचे हे प्रयोग अव्याहतपणे सुरू आहेत. त्यातून गंगेच्या काठावर राहणार्‍या बिहार आणि त्यानंतरच्या प्रदेशातल्या नागरिक आणि ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

गंगेच्या विषारी पाण्यातून अनेक दुर्धर आजार बळावलेले या प्रदेशात दिसून येतात, पण सामान्य नागरिक काय करणार? आभाळालाच आग लागलेली असताना तोकडी उपाययोजना आग कुठवर काबूत आणू शकेल? तशात दिवसेंदिवस गंगेचा जलस्तर रोडावत चालला आहे. त्यामुळे प्रदूषणाची तीव्रता त्याच पटीने वाढत आहे आणि निरपराध, ग्रामीण नागरिक याचे बळी पडत आहेत. पांढरपेशा वर्ग बिसलेरीच्या पाण्याला आता चांगला सरावला आहे. त्यामुळे त्यांना त्याची झळ न बसता सर्वसामान्य रहिवाशांवर मात्र चांगलीच संक्रांत आली आहे.

गंगेच्या पाण्याला बाधित करणारा दुसरा घटक म्हणजे गंगेवर बांधलेली मोठमोठी धरणे आणि पम्पिंग स्टेशन्स. ब्रिटिशांनी बांधलेल्या हरिद्वार धरणामुळे प्रवाह कमी होऊन नदीचा क्षय झाला आहे. फराक्का धरणाने तर गंगेच्या पाण्याच्या गुणवत्तेला कमालीचा सुरुंग लावला आहे. हे धरण झाल्यानंतर गंगेचे पाणी क्षारीय होऊन नदीकाठच्या भूजल आणि मातीवर याचा विध्वंसक परिणाम झाला.

भारत आणि बांगलादेशच्या संबंधांवर याचा मोठा परिणाम झाला आहे. याशिवाय बिजनौर, नरोरा आणि कानपूर येथील धरणे कांजोली, कछार, हकनीपूर, शेकपूर, चौसा, लामूई येथील पम्पिंग स्टेशन्स दिवसरात्र गंगेचे पाणी उपसून प्रवाहाला पतित करण्याची भूमिका बजावत आहेत. अशा परिस्थितीत गंगेला जिवंत ठेवायचे असेल तर योग्य प्रमाणात मूळ प्रवाह वाहत राहणे गरजेचे आहे. तसा प्रवाह आणण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक बनले आहे.

तिसरा गंगा प्रदूषणाचा कारक म्हणजे धार्मिक, पारंपरिक कारणांमुळे होणारे प्रदूषण. पापक्षालनासाठी दरवर्षी कोट्यवधी लोक गंगेत स्नान करतात आणि सोबत आणलेले निर्माल्य, पूजा सामुग्री, अन्न, कचरा नदीत सोडतात. याशिवाय गंगेकाठी केले जाणारे अंत्यसंस्कार, त्यातून निर्माण झालेली राख, अर्धवट जळालेली प्रेते आणि न जाळता सोडलेली प्रेते यामुळे गंगेच्या पाण्याच्या स्थितीची आपण कल्पना करू शकतो.

परिणामस्वरूप गंगा आता गंगा राहिली नसून तिला विषगंगेचे स्वरूप आले आहे. तिचे पाणी अमृत नाही तर विष झाले आहे. पाण्यातली जैविक ऑक्सिजन पातळी कमालीची घसरली असून जलचरांचे जगणे असह्य झाले आहे. एका सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेश, बिहार आणि बांगलादेशातील गंगाकिनारी राहणारे रहिवासी केव्हाही कर्करोगाला बळी पडू शकतात. गंगेच्या पाण्यात आढळणारे विशेष डॉल्फिन मासे, खोल पाण्यातली कासवे आता लुप्तप्रायच्या यादीत समाविष्ट झाले आहेत.

माशांच्या शरीरातील पारा माणसांमध्ये पोहचून चित्रविचित्र आजार समोर येत आहेत. कालरा, आमांश, हेपिटायटिस आणि गंभीर अतिसार असे जलजन्य आजार किनार्‍यावरील मुलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. अशी ही आमची मोक्षदायिनी गंगा आणि तिच्या विगल होत जाणार्‍या देहाची कहाणी. गंगेतले विष असेच वाढत राहिले तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी शिवाच्या जटेतून प्रसवलेली गंगा शिवाला साकडे घालेल आणि त्यानंतर होईल ते फक्त तांडव नृत्य. सरकार आणि गंगेला माता मानणारी आम्ही माणसे त्या घटिकेची वाट पाहत आहोत काय?

उपाययोजना

भारतातल्या काही गंगापुत्रांनी गंगेचे प्रदूषण रोखण्याकरिता गंगा महासभा, गंगा कृती योजना, नमामि गंगा यांसारखे महाप्रकल्प राबवून गंगेचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र गंगा आजपर्यंत प्रदूषणमुक्त होऊ शकली नाही. यासाठी जनमाणसांना सोबत घेऊन त्यांच्या माध्यमातून काम व्हायला हवे, तरच सर्वसामान्य जनता गंगेशी जोडली जाईल. याशिवाय नदीचा किमान आवश्यक प्रवाह कसा शाबूत ठेवता येईल याचा अभ्यास करून त्याप्रमाणे कृती व्हायला हवी. गावशहरातील गंगेत सोडले जाणारे उत्सर्जक पाणी आणि कारखान्यांचे अवशिष्ट यासाठी कडक कायदा करून त्याची अंमलबजावणी करण्यात यायला हवी. गंगेशी आईसारखा व्यवहार करा, असा व्यापक विचार जनमानसात रुजवावा लागेल, तरच आम्हाला गंगेला आई म्हणण्याचा अधिकार राहील.

भागीरथजी हम शर्मिन्दा है, संजो ना सके गंगा को
मत पूछना गंगा कैसी है, हम बचा ना सके गंगा को
तुमने कितनी पावन गंगा सौपी थी बड़े विश्वास से
कैसा कठिन तप करके गंगा, सौपी हमको आस से
पर हमने कुछ ना समझा इसको, गंगा को लुटा इस कदर
निजी स्वार्थ में अंधे होकर चप्पे चप्पे में उसके भरा जहर
ऊपर से हम माँ कहते गंगा को और मोक्ष कामना करते है
दिनरात उसमे गरल घोलकर, बस चाह अमृत की धरते है
कथनी, करनी के अंतर का विवेक हम में अब जगाना माँ
कही देर ना हो जाये जागने में हमको, इतना मत सुलाना माँ

-संजीव आहिरे
-अमृतधाम, पंचवटी, नाशिक
-संपर्क – ९१३०७४९९८०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -