– संजय सोनवणे
रोहिणी हट्टंगडी ही अत्यंत वाईट बाई आहे. अटनबरोंच्या ‘गांधी’मध्ये कस्तुरबा होणार्या या बाईने त्याच्या अगदी विपरीत कमालीचा ‘हलकट’पणा बेनाम बादशहात पडद्यावर केलाय. एवढ्या मोठ्या अभिनेत्रीला थेट असं संबोधण बरं नसतंय पण नाईलाज आहे. कसं ते सांगतो, ‘वो उर्मी उधर अस्पतालमें मे मर नही रही, और ये दामिनी हमे यहा जिने नही दे रही, …’ उर्मीवर बलात्कार केलेल्या गुप्ताच्या पोरापेक्षा त्याला पाठीशी घालणारी (सुमित्रा गुप्ता) अर्थात रोहिणी हट्टंगडीवर इथं डबल संताप ओतलेला असतो. यावेळी सामान्य कुटुंबातल्या दमिनीवर असलेला रोहिणीबाईचा द्वेष वंचित पीडितांना किडेमुंगी समजणार्या श्रीमंतांच्या एलिट क्लासचं नेतृत्व करतो, पण ही बाई कमालीची वंचित, पीडित, उपेक्षित अशी घरकाम करणारी तरीही करारी, ताठ मानेची श्रमिक बाईही होते. तेव्हा तिच्यातल्या अभिनयातला बदल दोन विरुद्ध टोकांचा असतो. यासाठी महेश भट्टचा ‘अर्थ’ समजून घ्यावा लागतो, नाहीतर एन. चंद्राचा प्रतिघात आठवावा.
शबानाचा नवरा (इंदर) कुलभूषण खरबंदा अभिनेत्री असलेल्या (कविता सन्याल) स्मिता पाटीलच्या नादाला लागलाय. त्यामुळे (पूजा मल्होत्रा) शबानाचे घर फुटल्यात जमा आहे. अशा वेळी शबानाच्या बाजूनं स्मिता पाटीलला कचाकचा हमरीतुमरीवर येऊन भांडणारी रोहिणी हट्टंगडी स्मिता, शबानाच्या जुगलबंदीतही लक्षात राहते. अरे…रोटी छिनलो, पैसा छिनलो, मरद कायको छिनताय…यावेळी रोहिणीनं पडद्यावर ओतलेला संताप आणि ‘मरदप्रेम’ कुठल्याही झोपडपट्टी, चाळवजा घरातला दारुडा नवरा आणि सोबतचा संसार जपण्यासाठीच्या मेहनतीवर रोजच्या जगण्याचा दम भरणार्या श्रमिक बाईचा पोटापाण्याचा संघर्ष, घालमेल दाखवतो. रोहिणीनं पडद्यावर साकारलेल्या ‘बाया’ आपल्या आजूबाजूला, घरात, लोकल ट्रेनच्या लेडिज डब्यात इस्ततः विखुरलेल्या असतात. रोहिणी हट्टंगडी नावाच्या बाईत नावातच सहज अभिनयाचा हट्ट असतो आणि बाईपणाच्या पलीकडे पडद्यावर अनेकदा खल ‘गडी’ नायकाला पुरून उरणारी परिणामकारक अभिनेत्री असते. अगदी अनेकदा अमरिश पुरीसमोरही.
दमिनीत ऋषी कपूर बलात्कारी भावाला चपलेनं कुत्र्यासारखा हाणत असताना तेव्हा ही बाई बलात्कारी पोरासाठी असा काही साळसूद आव आणते की ‘अब मार डालेगा क्या इसे, हुई गलती उससे,’ बोलून त्याला वाचवते तेव्हा प्रेक्षकातल्या चांगल्या माणसाच्या संतापाचा कडेलोट होतो. विषय ‘माणसातल्या हलकटपणाचा असलाच’ तर या बाईचा ऐंशीच्या दशकातला ‘बेनाम बादशहा’ टाळता येणार नसतो. अमरिश पुरी हे नाव हिंदी पडद्यावर अभिनयातल्या ‘सर्वोच्च’ वाईटपणाचं असतं. समोरच्या नायिकेला पाहून ‘गिळू की खाऊ’ अशा खुनशी डोळ्यांनी पाहणार्या खलनायकात अमरिश अभावानेच येतो. अमरिशनं असले छचोर, लंपट रोल कमीच केलेले असतात. एखाद दुसरा अपवाद वगळता डॅनी, अनुपम, अमरिशकडे ही ‘संधी’ कमीच आलीय.
अमरिश पुरीच्या श्रीमुखात भडकवण्याची हिंमत फक्त दिलीप कुमारांनी मशालमध्ये केलेली असते. इतर कोणाचं ते काम नसतं. अमरिशच्या समोर उभं राहण्यासाठी डॅनी, सनी, अनिल, अजय, नसिर असे तुल्यबळ कलावंतच हवेत. पडद्यावर बलात्कारासाठी खलनायिकी आब राखणारी ही मंडळी कधीच हपापलेली नसतात. या डिपार्टमेंटच्या प्रमुखपदावर शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर या ‘अनुभव’तज्ज्ञांची गरज असावी, मात्र कोयला वगळून बेनाम बादशहामध्ये अमरिशनं असं ‘लंपट-लोचट’ काम केलेलं असतं, यात त्याची सोबतीण रोहिणी असते. अमरिशच्या वयोमानानुसार थकलेल्या ‘मर्दाळू’पणाला जमिनीवर आणणारी (कामेश्वरी देवी) हट्टंगडी त्याच्या पुरुषी अहंकाराची औकात काढते. इतकं टोकदार अमरिशला त्याच्या पडद्यावरच्या हयातीत दुसरं कोणत्या पुरुष अभिनेत्यानंही ऐकवलेलं नाही.
अपवाद अर्धसत्यमधल्या ओम आणि दामिनीतल्या सनीचा असावा. तर असो, मात्र बाई एकच, रोहिणी हट्टंगडीच. अमरिशला त्याची ‘औकात’ दाखवण्याची ताकद तिच्याच अभिनयाला साजेशी आहे. रोहिणीचा ठिकाना आठवतोय, स्मिता पाटील तीची मुलगी असतेय. स्मिता आणि अनिल कपूरच्या ‘सच्चाई’ची किंमत जगाच्या बाजारात दोन ‘कौडी’ची नाही हे सुनावणारी रोहिणी महेश भट्टच्या संवादांना पुरेपूर न्याय देते. अमिताभ आणि दिलीप कुमारच्या जुगलबंदीचं कौतुक शक्ती पाहणार्यांनी अनेकदा केलंय, पण स्मिता आणि रोहिणी या दोघींच्या संवाद युद्धासाठी ‘ठिकाना’ पाहायला हवा. हे संवाद घराघरातल्या मायलेकीत होणारे असल्यानं मेलोड्रॅमेटीक नाहीत. महेशच्या सिनेमातली भांडणं, हाणामार्या रस्त्यातल्या हाणामार्यांसारखीच माणुसपणाच्या मर्यादेत असतात. यातली रोहिणी मिसेस गोयल नावाच्या कनिष्ठ मध्यमवर्गातल्या जगण्याच्या अनुभवांनी पिचून समृद्ध झालेल्या ‘कठोर’ आईपणात इतकी समरसून जाते की आज पन्नाशीत असलेल्यांना आपल्याच आईची आठवण यावी.
द पार्टी सिनेमातली (मोहिनी) रोहिणी लैच डेंजर अस्तेय. एनएफडीसीची निर्मिती, महेश एलकुंचवारांचं लेखन असतं आणि गोविंद निहलानींचं दिग्दर्शन… यातली ‘मत गाओ, मत पिओ…द पार्टी बिगन्स नाऊ…’ हातात ग्लास घेऊन पडद्यावर या पार्टीची सुरुवात करणारी रोहिणी हट्टंगडी अर्थात मोहिनीत कित्येक दबलेल्या घुसमटलेल्या बायांची कचकचून गर्दी सापडते. रोहिणी हट्टंगडीनं श्रीदेवीला चालबाजमध्ये लय छळलेलं असतंय. नायिकांना छळण्यात ही बाई एक नंबर, पण अन्यायग्रस्त पिचलेल्या बायांची बाजू घेणारी रोहिणी ही घरकामगार बाई प्रतिघात, अर्थमध्ये पाहायला मिळते. इथं ती थेट १८०च्या कोनात बदललेली, फिरलेली असते.
अमरिशला थप्पड लगावणीसाठी दिलीप कुमार किंवा राजकुमार हवेत, मात्र त्याच्या निगरगट्ट हलक्तपणाला तेवढ्याच किंबहुना काकणभर जास्तच हलकटपणाने उत्तर देणारी बाई अख्ख्या इंडस्ट्रीत फक्त रोहिणी हट्टंगडी असते. मै तेरी औकात जाणती हूं… थेट अमरिश पुरीची अवकात काढणारी बेनाम बादशातली रोहिणी हट्टंगडी आठवावी. यू ट्यूबवर ‘पार्टी’ पहिला, ‘मै अभी भी खूबसूरत हूं, असं रोहिणी कुलभूषण खरबंदाला काकुळतीने सांगतेय. नवरा बाहेरच्या बायांच्या नादी लागून आपल्याकड पाहत नाही हे उपेक्षित एकार्लेपण रोहिणीनं असं काही उभं केलंय की पार्टीच्या चकाचौंधमध्ये तिच्या देहाची आग आणि मनातला गडद अंधार एकाच वेळेस ठळक दिसावा.
जब तेरा बाप मरा था तो मे बहुत रोयी थी, लेकिन अंदर ही अंदर खुश हो रही थी की एक शराबीसे छुटकारा मिल गया…अब उसकी उलटीयां साफ नही करनी पडेंगी…नातीगोती, सुख दुःख, नायिका, अभिनेत्री, गरीब, श्रीमंत, चांगल्या वाईट पुरुष बाईच्या पलीकडे माणसाच्या मनातलं ग्रे शेडमधलं स्पष्ट माणूसपण रोहिणीच्या ठिकानातल्या अभिनयात पुरेपूर भरलेलं असतं. हट्टंगडी बाई अमिताभची आई दोन वेळेस झालीय. शहंशाहमध्ये प्राणसमोर अमिताभला छडीनं मारणारी आणि अग्निपथमध्ये त्याला जेवणाआधी हात धुवायला सांगणारी दिनानाथ चौहानसारखीच लक्षात राहणारी सुहासीन चौहान, रोहिणी हट्टंगडी नेहमीच मुलगा असलेल्या नायकाच्या बरेचदा विरोधात असते. दामिनी, ठिकाना, अग्निपथ, शहंशाह ही काही उदाहरणं.
चक्र, रात, चालबाज, मुन्नाभाई एमबीबीएस, सारांश, द पार्टी, गांधी… यात रोहिणी हट्टंगडी अनेकविध रंगांमध्ये आढळते. हे रंग अभिनेत्री, महिला-पुरुषाच्या पलीकडे अनेकदा निखळ माणूसपणाचे असतात. डॉ. लागू सांगतात तसं आम्ही कलाकार म्हणजे दिलेल्या भूमिकेतल्या गरजा-जाणिवांचा इकडचा माल तिकडे म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहचवणारे लमाण असतो. उस्मानाबादच्या ग्रामीण भाषेत अशा महिलेला लमाणीन म्हटलं जातं. हिंदी, मराठी, कन्नड, तेलुगू, गुजराती, इंग्रजी भाषेतही दिलेल्या व्यक्तिरेखेचा माल प्रेक्षकांपर्यंत आहे तसा पोहचवणारी रोहिणी हट्टंगडी ही त्या अर्थानं पडद्यावरची तद्दन लमाणीनच असावी.