घरफिचर्ससारांशसाहित्याची वारी

साहित्याची वारी

Subscribe

ळाव्या शतकातील बहुजन समाजाची भाषा ही तुकारामांच्या रचनेत आहे. म्हणून मला तुकोबांचे अभंग हे सर्वसामान्यांना आपले वाटत असावेत असे वाटते. सर्वसामन्यांच्या मनातील भावना भक्तीरुपाने मांडताना, ‘नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता,’ असं म्हणताना आढळतात. तुकोबांच्या एकूण अभंगात सामान्य माणसांची बंडखोरी, त्यांचा उद्वेग, त्यांची नीतिमत्ता, त्यांची खदखद ही सगळी एका गाथेच्या माध्यमातून व्यक्त होताना आढळते.

वारी हा शब्द जरी उच्चारला तरी टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या वाटेवर ज्ञानबा तुकारामाचा गजर, जयघोष करणारे वारकरी डोळ्यासमोर सहज येतात. त्यांच्या मागोमाग डोक्यावर तुळशी घेऊन जाणार्‍या आयाबहिणी दिसतात, महाराष्ट्रातील वारीचे हे पारंपारिक दृश्य. ह्या वारीला नक्की काय इतिहास आहे याबद्दल ठोस काही सांगता येत नसले तरी अनेक पिढ्यांची ह्या वारीशी नाळ जुळल्याचे आढळते. भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार बहुतेक ह्या वारीच्या माध्यमातून झाल्याचे आपल्याला आढळून येते. वारीतील एकंदरीत भक्तीच्या वातावरणाबरोबर सामाजिक भावना किती रूढ आहेत याची कल्पना आपल्याला आल्या वाचून रहात नाही.

अत्यंत निरामय जीवन जगणार्‍या महाराष्ट्रात तेराव्या शतकाच्या अखेरीस अल्लाउद्दिन खिलजीने आक्रमण केले त्यावेळची परिस्थिती बघता ज्ञानेश्वरांनी केवळ समाज प्रबोधनाच्या माध्यमातून बृहन्महाराष्ट्र एका छत्राखाली यावा म्हणून संस्कृत भाषेत अडकून राहिलेली भगवतगीता मराठीत अनुवादित केली. मराठीचा महिमा गाणार्‍या ज्ञानेश्वरांनी हे ज्ञान लोकांसाठी मोकळे केले. अज्ञानाच्या अंध:कारात पडलेल्या समाजाला हा ज्ञानसंचय मोकळा करण्यामागे हाच हेतू होता. ह्या ज्ञानेश्वरीच्या शेवटी लिहिलेल्या पसायदानातून ज्ञानेश्वरांनी दुरिताचे तिमिर जावो हे मागण्याचे कारण हेच आहे. मला वाटते भागवतधर्माच्या प्रचाराची हीच खरी सुरुवात होती. ज्ञानेश्वरांच्या अनेक अभंगांना भक्तिसंगीताचा स्पर्श होऊन त्यांना गीताचे स्वरूप जरी प्राप्त झाले असले तरी ज्ञानेश्वरांचे अनेक अभंग, त्यांच्या ओव्या, विराण्या ह्या गावोगावी होणार्‍या वारकरी संप्रदायाने जिवंत ठेवल्या, ही मौखिक परंपरा ह्या वारीच्या माध्यमातून जिवंत ठेवली गेली. मुद्रित स्वरुपात हे साहित्य गेल्या दीडशे वर्षात उपलब्ध होऊ लागले.

- Advertisement -

ज्ञानेश्वरांच्या समकालीन परंपरेत अजून एक उल्लेखनीय नाव म्हणजे संत नामदेव. नामदेवांनी उत्तरेपासून ते भारताच्या पश्चिम भागात प्रवास केला. ह्या प्रवासाच्या माध्यमातून त्यांनी ही परंपरा आणि भक्तीपाठ चालू ठेवताना भाषिक मर्यादा तोडून टाकल्या. एक बोली किंवा प्रमाण भाषा ह्याच्या पलीकडे जाऊन अनेक परंपरा ह्यांच्या मागे न जाता नामदेवांनी एकाच गवळणीत पाच भाषांचा अंतर्भाव केलेला आढळतो. मला वाटत फक्त भाषिकतेच्या दृष्टीने नाहीतर अखिल मानवाच्या दृष्टीने केलेला तो प्रयत्न असावा. नामदेवांच्या रूपाने ते अभंग थेट पंजाब प्रांतात जाऊन पोचले. अलीकडच्या काळी काळात ह्या संत साहित्यातील मानवतावाद साहित्य संपदेत पुन्हा डोकावू लागला. मौखिक स्वरूपातील ह्या संतांच्या साहित्याला वारीच्या दृष्टीने फार महत्व वाटते. नामदेवांच्या गवळणीचा आजच्या काळात भजनीबुवा आपल्या बारीत स्थान देतात तेव्हा त्यांचे मूल्य आपल्या लक्षात येण्यासारखे आहे. प्रत्येक अभंगाच्या शेवटी असणारी संतांची नाममुद्रा हीच केवळ त्या अभंग रचनेची ओळख नसून त्यातील बंडखोरपणा हादेखील आपल्याला भावतो.

भाषिक आणि परंपरेच्या दृष्टीने ह्या पलीकडे तुकारामांची रचना वारीत बहुसंख्य प्रमाणात आढळते. त्या काळातील म्हणजे सोळाव्या शतकातील बहुजन समाजाची भाषा ही तुकारामांच्या रचनेत आहे. म्हणून मला तुकोबांचे अभंग हे सर्वसामान्यांना आपले वाटत असावेत असे वाटते. सर्वसामन्यांच्या मनातील भावना भक्तीरुपाने मांडताना, ‘नम्र झाला भूता, त्याने कोंडिले अनंता,’ असं म्हणताना आढळतात. तुकोबांच्या एकूण अभंगात सामान्य माणसांची बंडखोरी, त्यांचा उद्वेग, त्यांची नीतिमत्ता, त्यांची खदखद ही सगळी एका गाथेच्या माध्यमातून व्यक्त होताना आढळते. वारकरी भजनात मुख्यपणे तुकोबांच्या अभंगांचा अंतर्भाव झालेला आढळतो, याचे कारण हेच असावे. ह्याच गाथेतील अभंग गात ग्यानबा.. तुकाराम हा गजर करत वारकरी पंढरपूरच्या वाटेवर जाताना दिसतात. वाटेत कुठेतरी रिंगण करतात. वारीतील हा सोहळा नक्कीच बघण्यासारखा असतो. उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता किंवा जातिभेदाच्या आणि लिंगभेदाच्या अनेक कल्पनांना मागे टाकत ह्या वारी पुढे जात असतात.

- Advertisement -

ह्या वारीला जेव्हा अध्यात्माचा रंग आहे, भक्तिरसाचा जेवढा रंग आहे तेवढाच रंग हा समाज जाणिवेचा आहे. ह्या वारीतील समाज जाणिवा मला विशेष भावतात. केवळ भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार हा वारीचा उद्देश नाहीच. १९४६ साली सानेगुरुजींनी हरिजनांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून जे उपोषण केले होते त्याला आता पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होतील. ह्या उपोषणाला नक्कीच सामाजिक बांधिलकीचा आधार होता. साने गुरुजींनी स्वतः म्हटले की रूढी म्हणजे माझा धर्म नव्हे. मी प्रेमधर्माचा उपासक आहे. खरी धर्मवृत्ती सर्वातच असते. रशियात महायुद्धाच्या काळात लाखो लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करत. जोपर्यंत मानवजात आहे तोपर्यंत धर्म ही संकल्पना कोणत्यही स्वरुपात रहाणार. कोरोनाच्या काळात दोन वर्षे प्रतिकात्मक वारी झाली. ह्या वारीच्या माध्यमातून हजारो वर्षाची परंपरा जपली गेली. वारीचा उदेश तसा सहज ध्यानात येत नाही, पण समाजात क्रांती किंवा बदल घडवण्याचे काम देखील वारीच्या माध्यमातून झाल्याचे दिसून येते.

ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव सांगितला त्याआधी देखील वारी होतीच. त्याआधी देखील महानुभाव पंथ होता. पंडित नरेंद्र यांच्या सारखे प्रचंड प्रतिभा असणारे कवी होते, चक्रधरस्वामीनी काही रचना केल्या होत्या. तरी नक्की धर्म ही संकल्पना म्हणजे जातीत बंदिस्त न रहाता त्याला समाजाभिमुख करण्याचे श्रेय पुन्हा ज्ञानेश्वरांकडे जाते. विश्वाला सद्भावना आणि विश्वबंधुता देण्याचे कार्य हे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून झाले आहे, त्यामुळे ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’, हे वाक्य फार समर्पक वाटते. वारीच्या माध्यमातून वारा, पाऊस, ऊन, कधी वादळेदेखील येतात. त्यात उभा राहणारा वारकरी स्वतःच्या आयुष्यातदेखील असाच उभा रहात असावा. जगण्याच्या माध्यमातील अनेक खाच खळगे त्यांना लगेच कळतात. वारीचे महत्व काय हे तुकोबांना बरोबर कळले म्हणून त्यांच्या शब्दात सांगायचे तर…

होई होई होई होई वारकरी
पाहे पाहे पंढरी
असं म्हणतात. किंवा

वेढा वेढा रे पंढरी । मोर्चेवला भीमातीरी ॥
चला चला संतजन । करू देवासी भांडण ॥
लुटा लुटा पंढरपूर । धारा रखुमाईचा वर॥
तुका म्हणे चला चला । घाव निशाणी घातका ॥

यातील हा बंडखोरपणा हा ह्या वारीला चपखल बसतो. अगदी देवाशी भांडण करण्यासाठी म्हणजे आजच्या काळात व्यवस्थेला शह देण्यासाठी निघालेले हे वारकरी मला वाटतात आणि घाव निशाणी घातका हा पर्यवसनाचा भाग तेवढाच अस्सल आहे. तुकोबाचा हा भाग वारीतल्या वारकर्‍यांनी आपल्या वागण्या बोलण्यातून चालू ठेवला. ह्या पालख्या एकमेकांना भेटतात तेव्हा वारकर्‍यांची होणारी उरा उरी भेट हा एक विलक्षण सोहळा मानावा लागेल. सर्व पाश सोडून जी विरक्ती वारकरी अनुभवतो ह्याला फक्त निष्ठा म्हणता येईल. समाजातील अनेक स्तर अनुभवत ही वारी जाते तेव्हा समाजाचे एक वेगळे रूप ह्या वारीतून प्रकट होते. वारी हा केवळ भक्तीच्या वाटेवर आपण तिला सीमित ठेऊ शकत नाही, तिचे खरे स्वरूप हे सामाजाभिमुख आहे हे अधोरेखित करावे लागेल.

पंढरीच्या आषाढी वारीच्या वाटेवर कोणतीही व्यवस्था नसताना लाखो वारकरी निर्माण होणार्‍या गैरसोयी सुद्धा सोय मानतात. जागा मिळेल तिथं मुक्काम. एरवी भौतिक सुविधांमध्ये रमणारा माणूस वारीच्या वाटेवर उपलब्ध अवस्थेतसुद्धा सुखाची अनुभूती घेतो, हेच पंढरीच्या वारीचं वैशिष्ठ्य आहे. वारी हे या महाराष्ट्राचं वैभव आहे. महाराष्ट्राची संस्कृती निर्माण करण्यात, तसंच तिचं रक्षण करण्यात वारकरी संप्रदायाचे योगदान अतिशय मोठे आहे. संतवाङ्मयाचं पारायण, भजन यांच्या माध्यमातून वारी ही संस्कृती अधिकच बळकट आणि प्रगल्भ रूप घेते. वारी ही एकात्मतेचं प्रतीक आहे. तिच्यात सामाजिक विषमतेचा लवलेश नाही.

वारीत वारकर्‍यांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येनं, त्यातून येणार्‍या भव्यतेनं संस्कृतीमध्ये नित्यनूतनता जशी येते, तशी तिची पाळेमुळेही आणखी चांगली रुजत आहेत. मानवी जीवनाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आवश्यक सर्वगुणांची प्राप्तता, त्यांचे संवर्धन आणि त्यांची परिपूर्णता वारीमध्ये परावर्तित होताना दिसते. व्यष्टी आणि समष्टी जीवनाचा अर्थ वारीतून कळतो. त्याच्या धन्यतेची पायाभरणीही वारीतच होते. संप्रदायाच्या दृष्टीनं वारी हे पारमार्थिक साधन आहे. ते एक शारीरिक तप आहे. त्यातून शरीर थकत असल, तरी मनाची उमेद निश्चित वाढते. अडचणींवर मात करण्याची ताकद वारी देते. अहंकाराला राम राम करून अतूट श्रद्धा वाढवणारं वारीइतकं चांगलं साधन नाही. म्हणूनच वारी हे पारमार्थिक मानवी जीवनाचं व्यापक दर्शन होय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -