घरफिचर्ससारांशमानवी संस्कृतींचं लोभसवाणं थडगं

मानवी संस्कृतींचं लोभसवाणं थडगं

Subscribe

गेल्या खेपेला लेबनॉन आणि बैरूतबद्दल तोंडओळख करून दिली होती. हा देश आणि या शहरात असलेल्या अदृश्य भिंतींबद्दलही बोललो होतो. पण आज लेबनॉन आणि बैरूत तुम्हाला का भुरळ पाडतं, ते जाणून घेऊ...

14 जुलै 2019 रोजी लेबनॉनच्या धरतीवर पहिलं पाऊल ठेवलं. त्याच दिवशी वर्ल्डकप आणि विंबल्डन या दोन्ही स्पर्धांच्या फायनल होत्या. अरब जगतात ना क्रिकेटचं वेड ना टेनिसचं! त्यामुळे टीव्हीवर या दोहोंपैकी काहीच दिसत नव्हतं. अशात लेबनॉनमध्ये माझं जणू पालकत्त्वंच घेतलेल्या खालिदचा फोन आला. ‘तासाभरात तयार राहा, तुझ्या हॉटेलखाली तुला घ्यायला येतोय,’ असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. तोपर्यंत आमची भेटही झाली नव्हती. जे काही संभाषण होतं, ते फोन किंवा ईमेलद्वारे!

लेबनॉनमध्ये सूर्य उशिरा मावळतो. त्यामुळे रात्री साडेसात-आठपर्यंत चांगला उजेड असतो. खालिद संध्याकाळी चारच्या सुमारास आला. साधारण साडेपाच-पावणे सहा फूट उंच, सावळा, तरतरीत नाक, शिडशिडीत देहयष्टी आणि चमकदार डोळे असा खालिद मराठी बोलत असता, तर सहज कोकणातल्या एखाद्या गावात खपून गेला असता. मूळ सौदीच्या असलेल्या खालिदने आतापर्यंत जवळपास 90 देश बघितले आहेत. जीवनाविषयी एक वेगळाच दृष्टिकोन असलेला खालिद पहिल्या भेटीतच मला भावला.

- Advertisement -

त्याने त्याच्या गाडीत बसवलं आणि गाडी डोंगराच्या दिशेने पिटाळली. हा एकच एक डोंगर नाही. तर डोंगररांग आहे आणि डोंगरांमध्ये अनेक हॉटेल्स, फार्म हाऊसेस, इमारती वगैरेदेखील आहेत. तर अशाच एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो. ती संध्याकाळ मी आयुष्यात विसरणार नाही. सुंदर लाकडी फर्निचर, भरपूर झाडं, फुलं आणि समोर दिसणारा अथांग दर्या! हे सौंदर्य कमी म्हणून की काय, पण अनेक लेबनिज ललना मुक्तपणे वावरत होत्या. खालिदचे दोन मित्र समोर बसले होते आणि हुक्का, अराक नावाची वारुणी आदींची रेलचेल होती.

या अराकबद्दल थोडंसं विस्ताराने लिहायला हवं. द्राक्षांचा अर्क आणि त्यात थोडासा बडिशेपचा फ्लेवर असलेली ही अराक पाण्यासारखीच दिसते. जेवढी अराक घेऊ त्याच्या तीन पट पाणी टाकलं की, तिचा रंग दुधी होतो. हे काहीसं गोव्याला उराक मिळते, त्याच्यासारखंच. फक्त उराक द्राक्षापासून बनवत नाहीत. बडिशेपचा फ्लेवर असल्याने घोटाघोटाला बडिशेप खातोय, असं वाटतं. पण चांगलाच ‘लत्ताप्रहार’ बसतो. खालिदच्या कृपेने त्याच्या एका मित्राने घरी तयार केलेली अराकही प्यायला मिळाली. ती कशी करतात, याचं प्रात्यक्षिकही त्या मित्राने दाखवलं.

- Advertisement -

खाण्यापिण्याच्या बाबतीत तर लेबननमध्ये चंगळ आहे. मांसाहार तर ओघाने आलाच, पण शाकाहारातही मजा आहे. वांगी, पुदिना, आणखी कसल्याशा भाज्या, यांचा वापर करून शाकाहारी पदार्थांचीही रेलचेल असते. तबुल्ले, फत्तौश, फलाफल असे अनेक पदार्थ सर्रास खाऊ शकता. पण मुख्य भर मांसाहारावर! शॉर्मा तर रस्त्यारस्त्यांवर मिळतो. त्यात काही नावीन्यदेखील नाही. पण काफ्ता, किबेह असे इतरही अनेक प्रकार तुमच्या जिभेला आव्हान देत असतात. बरं, मध्यपूर्वेचं पॅरिस अशी बैरूतची ख्याती असल्याने इथे अनेक देशांमधील पदार्थांची रेलचेल असते. लेबनॉन फ्रेंचांची वसाहत होती, त्यामुळे फ्रेंच पदार्थही असतातच. त्याशिवाय आर्मेनियन, मोरोक्कन, इजिप्शियन, सौदी, इराणी अशा अनेक खाद्यसंस्कृतींचे तुकडे बैरूतभर आणि लेबनॉनभर विखुरले आहेत.

लेबनॉनमध्ये सर्वात खटकणारी बाब म्हणजे इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था! इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नावाचा काही प्रकार नाही. म्हणजे सार्वजनिक वाहतूक आहे, पण त्याची व्यवस्था लावणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्त्वात नसावी. फ्रेंचांनी म्हणे समुद्रकिनार्‍यालगत रेल्वे बांधली होती. पण त्या रेल्वेचे काही अवशेष वगळता काहीच दिसत नाही. त्यामुळे सगळी वाहतूक शेअर टॅक्सी किंवा शेअर बसच्या माध्यमातून करावी लागते. दुसरा पर्याय म्हणजे खासगी टॅक्सी! पण तो खूप खर्चिक असतो. म्हणजे साधारण 30-34 किलोमीटरसाठी 25 डॉलर्सपर्यंत खर्च येतो. हेच या शेअर टॅक्सी किंवा बसने गेलं, तर तीन हजार लेबनीज पौंड म्हणजे दोन डॉलरमध्ये भागतं. फक्त मुख्य रस्त्यावर उतरून इच्छित स्थळापर्यंतची पायपीट करावी लागते.

गायडेड टूर्स नावाच्या प्रकारावर माझा विश्वास नाही. पण आंजर-बालबक या दोन ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी अशा टूर्स करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण हा अनुभव अत्यंत सुखद होता, हे नक्की! प्रत्येक बसमध्ये मोजके प्रवासी, त्यांच्यासाठी तज्ज्ञ गाईड, जेवणाची व्यवस्था आणि सगळी तिकिटं अशी पॅकेजेस असतात. हे गाईड्सही प्रशिक्षित असतात आणि मुख्य म्हणजे ‘या ठिकाणी अमुक चित्रपटाचं शूटिंग झालं’, अशी निरर्थक माहिती वगळता इतर सर्व उपयुक्त माहिती ते अक्षरश: हसतखेळत देतात. आमची गाईड एक मध्यमवयीन महिला होती. लायला असं नाव होतं तिचं. दिसायला देखणी आणि बोलायला अत्यंत चटपटीत! तिने इतिहासात पदवी घेतली होती आणि त्यानंतर हा गाईडचा कोर्स केला होता.

बालबक हे लेबनॉनचं प्रमुख आकर्षण आहे. सध्या ही वास्तू भग्नावस्थेत आहेत. जर्मन पुरातत्त्वतज्ज्ञ आणि अभियंते या वास्तूला पुन्हा उभार देण्याचं काम करत आहेत. पण नाश होऊनही जे शिल्लक आहे, ते अतिभव्य आहे. माणसाच्या खुजेपणाची जाणीव करून देणारं आहे. या बालबकच्या मंदिराच्या आवारात संगीत महोत्सव होतो. त्या भग्न वास्तूमध्ये संगीताचे सूर झिरपत असतील. एखाद दिवशी त्या वास्तूने आपली कहाणी गायची ठरवली, तर ऐकणार्‍यांचे कान धन्य होतील.

आंजर हे बालबकच्या तुलनेत खूप लहान आहे. पण मला जास्त भावलं. जगातील पहिली मुस्लिम राजवट असलेल्या ओमेयाद राजांपैकी दुसर्‍या राजाने हे शहर वसवलं. जेमतेम 34 वर्षं तो त्या शहरात राहिला. त्याच्यानंतर आलेल्या राजाने या शहरावरून नांगर फिरवला आणि तेव्हापासून ते ओस पडलंय. फक्त एका राजाच्या वास्तव्यासाठी उभं राहिलेलं एक शहर, ही ओळखच मनाला खूप भावली.

लेबनॉनमध्ये सर्वात आवडलेली जागा म्हणजे बिबलॉस किंवा बायब्लॉस! बैरूतपासून 40 किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी असलेलं हे शहर! इसवी सन पूर्व 8000 पासून हे शहर अस्तित्त्वात आहे आणि इथे वेगवेगळ्या अशा सात राजवटींनी राज्य केलं होतं. बैरूतच्या तुलनेत निवांत पहुडलेल्या या शहरात एक जादू आहे. ते तुम्हाला बोलावतं, असं वाटतं. बिबलॉसचा किल्लादेखील आहे समुद्रकिनारी! त्या किल्ल्याच्या मनोर्‍यावरून संपूर्ण बिबलॉस दिसतं. ते डोळ्यात साठवत राहावंसं वाटतं. इथेही समुद्रकिनारी किल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संगीत महोत्सव होतो.

असंच मुंबईची आठवण करून देणारं आणखी एक ठिकाण गवसलं. हारिसा नावाचं! आपल्याकडे जशी मोतमावली किंवा माऊंट मेरी आहे, तसंच हे हारिसा! डोंगरकड्यावर तिचा पुतळादेखील आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी रोप वे आहे. अनेक भाविक तिथे येऊन मेणबत्त्या लावून जातात. जोडपी हातात हात घालून गुजगोष्टी करत असतात, चिल्लीपिल्ली बागडत असतात आणि संध्याकाळच्या वेळी चर्चची घंटा वाजली की, वातावरणात एक गहिवर दाटल्यासारखं होतं. या लेबनॉनच्या मोतमावलीनेही जादू केली.

अशीच जादू केली ती जेईता ग्रोटो नावाच्या एका नैसर्गिक चमत्काराने! माऊंट लेबनॉनमध्ये पावसाचं पाणी डोंगराच्या पोकळीत पडून निर्माण झालेला हा चमत्कार! खडकांमधून माती, चुना पाण्यामुळे खाली झिरपून असंख्य आकार तयार झाले. त्या आकारांवर प्रकाशझोत टाकून हा चमत्कार लोकांसमोर आणला आहे. खाली थंडगार आणि स्फटिकासारखं स्वच्छ पाणी आणि त्यावर हे सुळके आणि असंख्य आकार… निसर्गाला आणि त्याने घडवलेला हा चमत्कार मोठ्या खुबीने लोकांसमोर पेश करणार्‍या माणसांच्या कल्पकतेला दाद देतच माणूस तिथून बाहेर येतो.

लेबनॉनमध्ये बघण्यासारखी खूप स्थळं आहेत. एकट्या बैरूतमध्ये फिरायचं म्हटलं, तरी तीन-चार दिवस पुरणार नाहीत. बैरूतचं म्युझियम बघायलाच दोन दिवस लागतील. पण इथे सर्वात जास्त बघण्यासारखं काही असेल, तर इथली माणसं. पण त्यांच्याबद्दल पुन्हा केव्हातरी!

नागरी युद्ध, बंदरात झालेला स्फोट, परस्परांबद्दलचा अविश्वास, इस्राएल-पॅलेस्टाईन-सीरियासारखा शेजार या सगळ्यांचा विचार करूनही लेबनॉन सुंदर आहे. पण या देशाला विनाशाचा शाप असल्यासारखं वाटतं. उगाच नाही, या देशाच्या मातीत एकापाठोपाठ एक सात संस्कृती गाडल्या गेल्या. मानवी संस्कृतींचं लोभसवाणं थडगं, असंच या देशाकडे बघून वाटतं. ते का, ते मात्र मनाला उमगत नाही!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -