चला भटकंतीला

आयुष्यभर माणूस प्रवासीच असतो. इथला मुक्काम जितका अधिक तितकी वळणं, रस्ते, गाव, शहर तुडवत जो तो जीवन प्रवास करीत असतो. हाच प्रवास अज्ञानातून ज्ञानाकडे, तिमिरातून तेजाकडे, रिक्तपणातून अनुभव संपन्नतेकडे, पायथ्यापासून शिखरापर्यंत नेणारा असतो. त्यामुळे भटकंती करीत राहणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे.

— कस्तुरी देवरुखकर

मला भटकंती करायला खूप आवडते. मग ती विचारांची भटकंती असो वा प्रत्यक्षपणे गावोगावी, शहरांमधून फिरणे असो. आवडीच्या मानाने फिरायला जाण्याचे योग माझ्या वाट्याला तसे कमीच आले. असो, पण जितक्या ठिकाणी फिरणे झाले तिथले अनुभव खूप छान होते. त्यातील दोन अनुभव ह्या लेखाच्या निमित्ताने सामायिक करतेय. एखाद्या स्थळी प्रवास करायचा म्हटल्यावर त्या ठिकाणाविषयी आपण जास्तीत जास्त माहिती गोळा करायला सुरुवात करतो. त्यात पहिला प्रश्न असा पडतो की कसे व कुठल्या वाहनाने जायचे?

मला नेहमी समुद्रातून प्रवास करायला खूप आवडतो. त्यानंतर मग आगीनगाडीतून पर्याय व सर्वात शेवटी नाईलाजास्तव रस्त्यावरील प्रवास अशी माझी निवड असते. अलिबागला जाताना बोटीने प्रवास करायचा भन्नाट अनुभव मी घेतला. बंदरात धक्क्यावर उभी असलेली भलीमोठी बोट जेव्हा प्रवाशांना सामावून घेत हळूहळू समुद्रातून मार्गक्रमण करते तेव्हा किनार्‍यावर उभ्या असलेल्या व्यक्तीला ती गवतात पडलेल्या सुईसमान भासते. तर अलिबागला जाताना आम्ही चर्चगेट ते मांडवा असा समुद्रीमार्गे प्रवास केला. सागराच्या मध्यभागी बोट हेलाकावे घेत असते तेव्हा तिची उसळणार्‍या लाटांसोबत चाललेली जलक्रीडा पाहताना त्यातलीच एखाद्यी लहर मन गाभारा भिजवतेय असा भाव दाटून येतो. शांत दुपार, जलभ्रमंती, लाटांचे कर्णमधुर संगीत अन् अंतरी विचारांचा पाठशिवणीचा खेळ… एक भटकंती बाहेरील जगात आणि एक भटकंती मानवी विचारांच्या जंगलात सुरूच असते.

तासाभराच्या प्रवासानंतर आमची बोट मांडवा येथील धक्क्यावर येऊन थांबली. मांडवा जेट्टीच्या बाहेर पडताच प्रवाशांना मुक्कामाच्या ठिकाणी पोहचवण्यासाठी जेट्टीची खास बस, विक्रम रिक्षा असे पर्याय उपलब्ध असतात. आम्ही विक्रमने जायचे ठरवले. जवळपास पाऊण तासाने ठरवलेल्या मुक्कामाच्या जागी म्हणजे वर्सोली गावी येऊन पोहचलो. तिथल्या एका गावकर्‍याने पर्यटन व्यवसायाकरिता राहत्या जागेतच दोन मजली वास्तू बांधली आहे, जेणेकरून येणार्‍या जाणार्‍या पर्यटकांना वस्तीला चांगले घर व उत्तम मराठमोळे जेवण मिळेल. तिथला पाहुणचार, खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य वातावरण, समुद्र किनारे सारं काही सुखावह आहे. विशेषत: तिथले माशाचे कालवण, तळलेले मासे, ताजा बांगडा, सुरमई, पापलेट, कोलंबी, तिसर्‍या, हातसडीच्या तांदळाचा गरमागरम भात म्हणजे चविष्ट मेजवानीच. अलिबागमध्ये पाहण्याजोगी काही प्रसिद्ध ठिकाणे आहेत. अलिबागचा किल्ला, किहिम बीच, वर्सोली बीच, बिर्ला मंदिर वगैरे.

निसर्गाच्या सान्निध्यात दोन दिवसांची विश्रांती घेतल्यावर आम्ही मुंबईकर पुन्हा बोटीचा प्रवास करण्यास सज्ज झालो, परंतु मांडवा बंदरावर पोहचताच समजले की सागरी लाटांची पातळी अस्थिर असल्याने दोन तास बोट उशिराने येईल. तिथल्या गर्दीत दोन तास उभे राहणे त्रासदायक वाटत होते म्हणून तिथूनच जवळच्या गावी म्हणजेच सासवणे येथील

गावदेवीचे जागृत देवस्थान आहे तिथे दर्शनासाठी गेलो. गाभार्‍यात देवीची प्रसन्न मूर्ती पाहून मन आनंदी झाले. येथून निघताना आम्ही सोबत अलिबागचे प्रसिद्ध खाजे, साखरी पेढे, दुधी हलवा घेतला होता. त्यातील पेढ्यांचा पुडा मंदिरात देवीच्या चरणापाशी अर्पण करून व मातेचा आशीर्वाद घेऊन पुन्हा मांडवा जेट्टीला परतलो. परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीच्या प्रहरी समुद्रात दूरवरून येणार्‍या व रंगीत दिव्यांचा मुकुट धारण करून झोकात डुलणार्‍या बोटींचा थाट देखणाच असतो. तो चित्तवेधक नजारा पापण्यात साठवत आम्ही स्वगृही परतलो.

भटकंती – बडोदे
गुजरात-बडोदे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. तिथे कविकट्टाकरिता माझ्या कवितेची निवड झाल्याने आम्ही दोन दिवसांचा बेत आखला. येथे प्रवास आगगाडीतून म्हणजेच ट्रेनने करायचे ठरवल्याने त्या पद्धतीने सर्व नियोजन केले होते. त्यानिमित्ताने गुजरातमधील एका सुंदर शहराची, तिथल्या भौगोलिक मांडणीची, इतिहासाची, राहणीमानाची, खाद्यसंस्कृतीची ओळख झाली. तिथे पाहण्याजोगी बरीच ठिकाणे आहेत. त्यातल्या त्यात आमच्या वेळेनुसार ऐतिहासिक ठेवा जपणारे संग्रहालय आणि आकाराने मोठे तसेच विविध प्रकारच्या वन्यजीवांना सामावून घेणारे प्राणीसंग्रहालय पाहिले. तिथली खाद्यसंस्कृती थक्क करणारी आहे.

बडोदेकरांच्या खवय्येपणाचा उत्तम नमुना म्हणजे तिथल्या एका चौकात भरणारा रात्री बाजार. हा बाजार म्हणजे एका चौकात सर्व प्रकारची खाद्यपदार्थांची छोटी मोठी दुकाने लावली जातात. जिथे रात्रीच्या परिपूर्ण जेवणापासून चटकदार पदार्थांपर्यंत, गरम मसालेदार पदार्थांपासून थंडगार आईस्क्रीमपर्यंत आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी सर्व उपलब्ध असते. आम्हीसुद्धा त्याचा मनमुराद आस्वाद घेतला.

भटकंती आयुष्याची
आयुष्यभर माणूस प्रवासीच असतो. इथला मुक्काम जितका अधिक तितकी वळणं, रस्ते, गाव, शहरं तुडवत जो तो जीवन प्रवास करीत असतो. हाच प्रवास अज्ञानातून ज्ञानाकडे, तिमिरातून तेजाकडे, रिक्तपणातून अनुभव संपन्नतेकडे, पायथ्यापासून शिखरापर्यंत नेणारा असतो. त्यामुळे भटकंती करीत राहणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. आयुष्याचा परीघ शोधण्याचा मार्ग आहे.

-(क्रमश 🙂