घरफिचर्ससारांशजगण्यातील गधडेपणाचा शोध

जगण्यातील गधडेपणाचा शोध

Subscribe

नाटककार चंप्र आपल्या जवळ जवळ सगळ्याच नाटकांतून मानवी जगण्यातील अ‍ॅब्सर्डिटीचा, त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर जगण्यातील गधडेपणाचा उभा आडवा तिरकस शोध घेत आले आहेत. त्या शोधातून त्यांना दिसलेला गधडेपणा खुमासदार पद्धतीने संवादांतून सांगणं, हे त्यांच्या नाटकांचं मोठं वैशिष्ठ्य आहे. त्याशिवाय, मानवी संबंधांतील-मग ते समाज म्हणून असोत वा स्त्री-पुरूष म्हणून असोत-गोम आणि गोची त्यातल्या खाचखळग्यांसकट दाखवून देणारी नाटकं हा चंप्रंचा नाटककार म्हणून मोठा विशेष आहे.

एकूणच भारतीय रंगभूमीला बहुविध आशयाची नाटकं लिहिणार्‍या अनेक थोर नाटककारांची परंपरा आहे. पण नाटकं लिहिता लिहिता कवी म्हणूनसुद्धा आपली स्वत:ची अशी नाममुद्रा उमटवणारे मराठी नाटककार म्हणून चटकन आठवणारी नावं म्हणजे राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे आणि वि.वा.शिरवाडकर होत. गडकरी ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने, अत्रे ‘केशवकुमार’ या नावाने कविता करीत असत तर शिरवाडकरांचे ‘कुसुमाग्रज’ हे टोपणनाव आपल्या सगळ्यांच्या चांगलंच परिचयाचं आहे. कुठले नाटककार नाटक लिहिताना कवितेच्या प्रांतातही मुशाफिरी करत होते, हे सांगण्याचं या लेखाचं प्रयोजन नाही. परंतु नाटककार असण्यासोबतच समांतरपणे तितक्याच ताकदीची अभिव्यक्ती कवितेतून करणारे नाटककार मराठी रंगभूमीवर मोजकेच आहेत. इतकंच नव्हे तर, नाटककार हा ‘कवी’ असणं अपरिहार्यच आहे असं वाटावं, इतपत कवी म्हणून आपली स्वतंत्र प्रतिभा या नाटककारांनी दाखवून दिली आहे. अशा मोजक्या नाटककारांपैकी एक म्हणजे चंद्रकांत प्रभाकर देशपांडे!

नव्वदच्या दशकाच्या अखेरीस ‘आविष्कार’च्या माहीमच्या जागेत जे सांस्कृतिक केंद्र दर महिन्याला चेतन दातार चालवत असे, त्याचा मी नियमित प्रेक्षक होतो. तिथे चंप्रंच्या नाटकांशी माझा पहिल्यांदा परिचय झाला. अर्थात, चंप्र त्याच्याही अनेक वर्षे आधीपासून नाटक लिहीत होतेच. पण तेव्हा पाहिलेल्या ‘नाणेफेक’, ‘बुद्धीबळ आणि झब्बू’, ‘समतोल’, ‘डावेदार’ आणि ‘ढोलताशे’ या नाटकांमुळे चंप्रंची एक कसदार नाटक लिहिणारे बुद्धिमान नाटककार म्हणून मला आणि माझ्या पिढीतल्या अनेक नाट्यरसिकांना ओळख झाली. पुढे उत्तरोत्तर ती ओळख त्यांच्या इतर नाटकांच्या वाचनातून दृढच होत गेली. असं असलं तरी त्या पलीकडे, नाटककार चंप्रंच्या लेखन व्यक्तिमत्वाचा आणखी एक अनोखा आयाम आहे आणि तो म्हणजे त्यांच्या कविता ! सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे नाटककार हा ‘कवी’ असणं अपरिहार्यच आहे असं वाटावं इतक्या सहजतेने चंप्र कविता लिहितात. तेव्हा त्यांच्यातल्या नाटककार आणि कवीचा जो मेळ माझ्या तोकड्या रसिकतेला जाणवला, तो थोडक्यात सांगावासा वाटतो.

- Advertisement -

नाटककार चंप्र आपल्या जवळ जवळ सगळ्याच नाटकांतून मानवी जगण्यातील अ‍ॅब्सर्डिटीचा, त्यांच्याच शब्दांत सांगायचं झालं तर जगण्यातील गधडेपणाचा उभा आडवा तिरकस शोध घेत आले आहेत. त्या शोधातून त्यांना दिसलेला गधडेपणा खुमासदार पद्धतीने संवादांतून सांगणं, हे त्यांच्या नाटकांचं मोठं वैशिष्ठ्य आहे. त्याशिवाय, मानवी संबंधांतील-मग ते समाज म्हणून असोत वा स्त्री-पुरूष म्हणून असोत-गोम आणि गोची त्यातल्या खाचखळग्यांसकट दाखवून देणारी नाटकं हा चंप्रंचा नाटककार म्हणून मोठा विशेष आहे. त्यांच्या संकेतस्थळाला भेट दिली असता आपल्याला प्रश्नांची एक छोटेखानी मालिका दिसते. त्यावर चंप्रंचे असलेले उत्तर हा त्यांचा लेखक म्हणून असलेला पवित्रा अधोरेखित करते. ‘मानवी जगण्याचे प्रवाही, कृतिशील भान भाषेत व्यक्त होणे म्हणजे सर्जक लेखन’.

चंप्रंचे हे विधान त्यांच्या आजवरच्या लिखाणाच्या तजुर्ब्यावर आधारलेले आहे, असं म्हटलं तर असे सर्जक लेखन करण्यासाठी त्यांना कवितेचा फॉर्म जवळचा न वाटता तरच नवल ! खरंतर नाटक लिहिता लिहिताच समांतरपणे कविता लिहिणं हे चंप्रंच्या लेखन कारकीर्दीच्या सुरूवातीपासूनच असल्याचं आढळून येतं. म्हणूनच नाटककार आणि कवी असा त्यांचा समांतरपणे सुरू असलेला लेखन प्रवास हा त्यांच्या नाटक आणि कवितेतील अभिव्यक्तीचा अन्योन्य संबंध दाखवून देणारा आहे. किंबहुना, दोन अंकी नाटकातून जे साधता येत नाही ते एका कवितेतून साधता येऊ शकते, अशी जाणीव लेखनाच्या एखाद्या टप्प्यावर चंप्रंना नक्की झाली असावी. त्या जाणिवेतूनच त्यांच्या कवितेचा इतका मोठा पैस ते निर्माण करू शकले असावेत, असं मला वाटतं.

- Advertisement -

सगळीकडेच वैयक्तिक, सामाजिक आणि परिवर्तनशील आशयाच्या कवितांचा अक्षरश: गदारोळ असताना चंप्रंच्या कवितेने एक वेगळी वाट चोखाळलेली दिसते, ती म्हणजे नकविता, जिला इंग्रजीत आपण अ‍ॅन्टी-पोएट्री या संज्ञेने ओळखतो. मध्यंतरी ‘नकविता’ लिहिणार्‍या जगभरातील महत्वाच्या कवींच्या कवितांचा अनुवाद करण्याचा प्रकल्प चंप्रंनी हातावेगळा केला. त्या अनुवादावरून त्यांचे नकवितेच्या वेगळ्या वाटेविषयी वाटणारे प्रेम आणि आस्था पुरेपूर जाणवते. उदाहरणादाखल त्यांची स्वत:ची एक कविता इथे उद्धृत करतो,

आपण एकटे होतो
तेव्हा आपण खूप केविलवाणे होतो
आपल्याला अपमान सहावा लागतो
तेव्हा आपण खूप केविलवाणे होतो
कुणी फसवते तेव्हा
कुणी बदनामी करते तेव्हा
कुणी क्षुद्र समजते तेव्हा
कुणी गैरसमज करून घेते तेव्हा
कुणी काही आरोप करते तेव्हा

कुणाचातरी खूप राग येतो तेव्हा
कुणाला सुधारायची गरज वाटते तेव्हा
जे जसे आहे ते तसे खटकत राहते तेव्हा
मतभेद समोर येतात तेव्हा

जगात काय बदल व्हायला हवेत
हे आपल्याला जाणवते तेव्हा
सगळी माणसे स्वार्थामुळे आंधळी झाली आहेत
असे वाटते तेव्हा
आपण फार फार केविलवाणे होतो

जितके केविलवाणे तितकेच हिंसक होतो
आपले आपण संतप्त धोक्याचे

वरील कविता ही फक्त त्यांच्या नकवितेचा परिचय करून देण्यासाठी वानगीदाखल उद्धृत केलीय. त्यांच्या संकेतस्थळावर या नकवितांचा खजिना आहे. इच्छुक रसिक www.champralekhan.com या त्यांच्या संकेतस्थळाला भेट देऊन या कवितांचा आनंद घेऊ शकतात. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे चंप्रंनी नाटक आणि कवितेसहीत त्यांचे समग्र साहित्य त्यांच्या संकेतस्थळावर विनामूल्य उपलब्ध करून दिलं आहे. माझ्या माहितीनुसार, आपल्या साहित्याचं अशाप्रकारे दस्तावेजीकरण करणारे आणि ते रंगकर्मी आणि वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणारे चं.प्र.देशपांडे हे भारतातील बहुदा एकमेव आणि विरळा लेखक असावेत.

नाटक आणि कविता या दोन्ही फॉर्ममधील त्यांच्या अभिव्यक्तीची जातकुळी आणि आशयातील वैश्विकता (Universality) लक्षात घेता चंद्रकांत प्रभाकर देशपांडे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करू शकतील अशा मोजक्या लेखकांच्या पंक्तीत नि:संशयपणे बसतात, हे इथे नम्रपणे नमूद करावंसं वाटतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -