कलावंतांचा जीवनसंघर्ष

झगमगत्या दुनियेमध्ये स्वत:ला सिद्ध करण्यासाठी या कलाकारांनी घेतलेले कष्ट, स्वत:ची कलावंत म्हणून ओळख प्रस्थापित करत असताना आलेले अपमानाचे क्षण, निराशा, झालेले अपेक्षाभंग आणि मग मिळालेल्या एका संधीमुळे पालटलेलं त्यांचं आयुष्य...या सार्‍या गोष्टींचा लेखाजोखा आशिष निनगुरकर यांनी ‘स्ट्रगलर’ या पुस्तकामधून मांडला आहे.

–प्रदीप कडू

चमचमत्या चंदेरी दुनियेचं सर्वांनाच आकर्षण असतं. या चंदेरी दुनियेमध्ये काम करणार्‍या कलाकारांचं यश सगळ्यांनाच दिसतं, पण त्यामागे ते घेत असलेली मेहनत ही नेहमीच पडद्याआड दडलेली असते. स्ट्रगल प्रत्येकाच्या जीवनातील एक अविभाज्य टप्पा, अशी पायरी जी चढल्याशिवाय यशाचा किल्ला सर करणे अशक्यच. काहींना दहावी, बारावीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण करणेही एक स्ट्रगल वाटू शकतो, तर आपल्या स्वयंपाकाच्या चवीने पतीराजांना भुरळ घातली पाहिजे, असा प्रेमळ विचारही काही गृहिणींना स्ट्रगलची चव चाखवतो. त्यामुळे स्ट्रगल या शब्दाशी प्रत्येक व्यक्ती आपापल्यापरीने अर्थजोडणी करते. व्यक्तीसापेक्ष असा हा स्ट्रगल काहींना आयुष्याच्या प्रारंभी चकवतो तर काहींना आयुष्यभर.

काहींचा स्ट्रगल न संपणारा, अविरत, अविश्रांत तर काहींचा अगदी क्षणभंगुर. स्ट्रगल करणार्‍या स्ट्रगलरचे ग्रह कधी फिरतील, त्याला यशप्राप्तीचा मार्ग गवसेल का, हे सर्वोतोपरी स्ट्रगलरच्या प्रयत्नांवर आणि नियतीवर निर्भर करते. पण, त्यातही हा शब्द बहुदा वाचनात येतो, तो कलाकारांच्या मुलाखतीत. मग ते नाट्यकर्मी असो, मालिकाकर्मी किंवा रुपेरी पडद्यावरील दिग्गज. त्यांचा स्ट्रगल सर्वसामान्यांच्या लेखी एक वेगळीच प्रतिमा उभी करतो. त्यांचा स्ट्रगल इतरांनाही आयुष्याशी झगडा करुन परिस्थितीशी कलेकलेने घेत आपल्या पायावर उभं राहण्याचं बळ देतो. मराठी सिनेसृष्टीतील तारे-तारकांचा स्ट्रगलचा कणखर प्रवास आशिष निनगुरकर यांनी ‘स्ट्रगलर’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडला आहे.

स्ट्रगलची प्रत्येकाची आपली अशी एक वेगळीच कहाणी असते. त्यातही सिनेसृष्टीचा विचार केला तर, ऑडिशन, रोलसाठी भटंकती, रिजेक्शन, डिप्रेशन अशा निराशाजनक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यातून जो तावून-सुलाखून निघतो, त्याचेच सोने होते. त्यातही घरची परिस्थिती हलाखाची असेल, तर जबाबदार्‍यांचे ओझेही पेलावे लागते. अभिनेता सिद्धार्थ जाधवचा एक ‘स्ट्रगलर’ म्हणून प्रवासही असाच म्हणावा लागेल. शालेय जीवनात अभिनयाची स्वप्नं मनात पेरुन अनेक समस्यांचा सामना करत सिद्धार्थने मराठीत एक यशस्वी, मेहनती अभिनेता म्हणून नाव कमावले. पण हे साध्य करण्यासाठी छोटे रोल स्वीकारणे, ‘तू दिसायला खराब आहेस, तू अभिनेता होऊ शकत नाहीस’, अशा मन खच्ची करणार्‍या टीकांनाही तो नेटाने सामोरा गेला. प्रयत्नांची पराकाष्ठा, इतर कलाकारांची लाभलेली साथ, कुटुंबाचा आधार आणि प्रेक्षकांच्या प्रेमाच्या जोरावर सिद्धार्थ जाधव आज मराठी सिनेसृष्टीत अव्वल स्थानी आहे.

निनगुरकर यांनी अशा स्ट्रगलर्सचा प्रवास वर्णन करताना, त्यांच्या शालेय जीवनापासून ते आयुष्यातील प्रत्येक टप्प्यातील संमिश्र भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. प्रत्येक कलाकार कसा घडला, त्यांचे प्रेरणास्थान, कुटुंबीयांचा-मित्र परिवाराचा त्यांच्याकडे बघण्याचा एकूणच दृष्टिकोन अशा स्ट्रगलरच्या प्रवासातील प्रत्येक टप्प्याचे लेखकाने सखोल चित्रण केले आहे. भावी कलाकारांचा शाळेतील एकांकिकांपासून ते रंगभूमीचा प्रवास, त्यांच्या आयुष्याला एक कलाकार म्हणून कसा कलाटणी देतो, याचीही प्रचिती हे पुस्तक वाचताना येते. प्रत्येक कलाकार एका वेगळ्या विश्वात जन्मलेला, पण त्यांच्या स्ट्रगलचा प्रवास मात्र समांतर वाटतो. निनगुरकर यांनी कलाकारांच्या भावनांना स्ट्रगलरच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा केलेला हा प्रयत्न खरंच प्रशंसनीय आहे. कारण आज पडद्यावर दिसणार्‍या यशवंत कलाकारांनीही त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, ज्याची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे या कलाकारांचा स्ट्रगल वाचल्यानंतर, त्यांच्याविषयीचा आदर, प्रेम निश्चितच वधारते. कलाकारांची पंढरी म्हणजे मुंबई. या मुंबईला आत्मसात करण्याचा, तिच्याशी हळूहळू जुळलेल्या संबंधांचाही दाखला स्ट्रगलरचे प्रत्येक पान उलटताना जाणवत राहतो.

सुनील बर्वे, मुक्ता बर्वे, पंढरीनाथ कांबळे, शरद पोंक्षे, मकरंद अनासपुरे, भार्गवी चिरमुले, जितेंद्र जोशी, संतोष जुवेकर, क्रांती रेडकर, श्रेयस तळपदे या व अशा एकूण २० अभिनेता-अभिनेत्रींचा स्ट्रगल या प्रवासात उलगडला आहे. लेखनशैलीही अत्यंत सोपी आणि बोलकी आहे.त्यामध्ये कुठेही क्लिष्टपणा, रटाळपणा वाटत नाही. प्रत्येक कलाकाराची मोजक्या शब्दात पण त्यांच्या जीवनप्रवासाचा सर्वांगीण आढावा देणारी स्ट्रगलरची कथा मनाला भावते. पुस्तक कृष्णधवल जरी असले तरी, कलाकारांचा स्ट्रगल त्यात रंग भरण्याचे पुरेपूर काम करतो. मुखपृष्ठही अगदी सुबक आणि पुस्तकाच्या थिमला अनुसरुन आहे.

त्यामुळे आपल्या लाडक्या मराठी सिनेतारकांना जवळून अनुभवण्याची संधी, हे पुस्तक नक्कीच प्रदान करते. या सर्व कलावंतांचा चंदेरी दुनियेतील संघर्ष आणि त्यानंतर बहरलेली त्यांची कारकीर्द याचा वाचनीय मागोवा या पुस्तकात घेण्यात आला आहे. कलावंत कितीही सेलिब्रिटी झाला तरी, त्यासाठी करावा लागलेला स्ट्रगल तो कधीच विसरत नाही. त्याच्या आजच्या यशाला, ग्लॅमरला भुलणार्‍या सर्वसामान्यांना त्यामागची त्याची मेहनत, घेतलेले कष्ट निश्चितपणे या पुस्तकातून समजतील. लेखक आशिष निनगुरकर यांनी कलावंताच्या कारकिर्दीचा घेतलेला हा धांडोळा अतिशय रसाळ आहे. त्यामुळे एकदा हे पुस्तक हातात घेतलं की, ते संपूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेववत नाही.

-(लेखक नाट्य अभिनेते आहेत)