जगण्याची भीषण वास्तवता- म्होरक्या

६५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ चित्रपट नुकताच अमेझॉनवर प्रदर्शित झाला आहे. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि ‘ऐसपैस’ची प्रस्तुती असलेल्या सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन अमर देवकर यांनी केले असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. ग्रामीण जीवनातील वास्तव जीवनाचे यतार्थ चित्रण यातून प्रभावीपणे मांडले आहे. म्हणूनच हा सिनेमा काळजाला हात घालतो व विचार करायला भाग पाडतो.

— आशिष निनगुरकर

समुदायाचे नेतृत्व करायला प्रत्येकाला आवडते. याची सुरुवात लहानपणी शाळेतच होते. कुणाला वर्गाचा मॉनिटर व्हायला आवडते. कुणाला पहिला नंबर काढायला आवडतो. कुणाला खेळात ‘टॉप’ राहायला आवडते, तर कुणाला लेझीम पथकाचे नेतृत्व करायला, मात्र प्रत्येकाच्या वाट्याला ‘लीडरशीप’ येतेच, असे नाही. लेखक-दिग्दर्शक अमर देवधरने त्यांच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘म्होरक्या’ चित्रपटातून लोकशाहीतील नेतृत्वाबद्दल भाष्य करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

प्रजासत्ताक दिनी शाळेत होणार्‍या परेडचे नेतृत्व करायला मिळावे यासाठी संघर्ष करणार्‍या चौदा वर्षीय मुलाची कथा आणि व्यथा ‘म्होरक्या’ चित्रपटात मांडण्यात आली आहे. बार्शीतील एका खेडेगावातील अशोक उर्फ आश्या (रमण देवधर) याला परेडची खूप आवड असते, मात्र केवळ भाग न घेता ‘लीडर’ बनावे अशी त्याची इच्छा असते. त्याच आवडीपोटी तो शाळेत जातो, मात्र आश्याला त्याच्या शेळ्या-मेंढ्या सांभाळून शाळा शिकावी लागते. त्यामुळे शाळेत नियमितपणे उपस्थित राहणे त्याला शक्य होत नसते; परंतु परेडचे खूळ त्याच्या डोक्यातून जात नाही. परेडमधला खणखणीत आवाज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतो. आश्याला लाभलेला आवाज जमेची बाजू ठरते, मात्र गावातील पाटलाचा मुलगाही परेडच्या ‘लीडर’च्या स्पर्धेत असतो. आश्याला कोंडी आणि अडचणीमध्ये पकडण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतो.

परेड शिकण्यासाठी आश्याला त्याच्या गावातील वेडा आण्णा (अमर देवधर) याची मदत होते. आण्णा आश्यातील ‘लीडर’ हेरून त्याला परेड शिकवतो. शेवटी प्रजासत्ताक दिन उजाडतो. आश्याची आई आणि आजीसह आण्णा तसेच त्याच्या सहकार्‍यांमध्ये परेडची उत्सुकता ताणली जाते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या आश्याला परेडचे नेतृत्व करण्याची संधी मिळते का, हा सस्पेन्स आहे. आश्या आणि वेडा आण्णा ही दोन्ही पात्रे प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. प्रेक्षकांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सिनेमाच्या उत्तरार्धात मिळते. तसेच दिग्दर्शकाला त्या कथेपलीकडील सांगायची गोष्टही आपल्यापर्यंत पोहोचते.

लेखक-दिग्दर्शक म्हणून अमर देवधरचा पहिलाच चित्रपट असला तरी दोन्ही आघाड्यांवर तो सहजपणे वावरला आहे. संवाद आणि सिनेमाच्या पटकथेची मांडणी सिनेमाच्या मूळ गोष्टीला न्याय देणारी आहे. रमण देवधरने आश्या सर्वोत्कृष्ट साकारला आहे. आण्णा नामक वेड्याला अमर देवधर यांनी न्याय दिला आहे. रमणसह यशराज कर्‍हाडे हे बालकलाकार तसेच रामचंद्र धुमाळ, अनिल कांबळे, सुरेखा गव्हाणे यांनी आपापल्या भूमिकांना न्याय दिला आहे. सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासह बालकलाकार रमण देवकर आणि यशराज कर्‍हाडे यांना अभिनयासाठी विशेष उल्लेखनीय कामगिरीचा पुरस्कार मिळाला आहे. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. तरीही सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. या व्यतिरिक्त ‘म्होरक्या’ने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही ठसा उमटवला आहे.

सिनेमातील प्रत्येक पात्र, त्यांचे संवाद आणि उभारलेले प्रत्येक दृश्य म्हणजेच म्होरक्या. ही कथा म्हणजे कोणाच्या आसपास घडत असलेली. कोणाच्या आयुष्यात घडून गेलेली वा कोणाच्या आयुष्यात घडणारी. वरवर पाहिले तर एवढी साधी आणि खोलवर पाहिले तर तेवढीच उंची गाठलेली कथा. अगदी सहज घडणार्‍या घटना किती मोठ्याने व्यवस्थेवर बोलू पाहतायत. म्होरक्या म्हणजे पुढे जाऊ पाहणार्‍यांची कथा आणि व्यथा आहे.

कधी जातीचं, कधी परिस्थितीचं, कधी भीतीचं, कधी रंगाचं रूपाचं, संस्कृतीचं वा राजकारणाचं कारण करून आश्यासारखे कित्येक म्होरके असे अलगदपणे प्रवाहाच्या बाहेर फेकले असतील. कारणे खूप असतील, पण परिणाम एकच आहे. तो म्हणजे समाजातील म्होरक्या नाकारनं. योग्यता असूनदेखील खरा म्होरक्या ढोल पिटत उघड्या डोळ्याने योग्यता नसणार्‍यांचा खेळ पाहतोय. त्याला जाणीवसुद्धा होऊ दिली जात नाही की त्याला नाकारलं आहे. एवढी तीक्ष्ण आणि कावेबाज आपली व्यवस्था झाली आहे. प्रवाहाच्या बाहेर एक वेगळीच दुनिया आहे. ज्या दुनियेमध्ये कित्येक रेकॉर्ड; कसलेही रेकॉर्ड न ठेवता तुटत असतील. मग तो पोहण्याचा, चालण्याचा वा हे सारं सहन करण्याचा रेकॉर्ड असेल.

अक्करमाशी म्हणून हिणवणे असो वा कोयत्यासारखं वणवण भटकणं किंवा आश्यासारखं पावलोपावली परिस्थितीशी झगडत स्वतःला म्होरक्या म्हणून सिद्ध करणं असो. एवढं सारं होऊनदेखील म्होरक्या, म्होरक्या राहत नाही, तर व्यवस्था त्याचं निव्वळ बुजगावनं करते…!!अप्रतिम दिग्दर्शन मांडणी अभिनय आणि कथा सर्वांनी पहावा असाच म्होरक्या अमेझॉन प्राईमवरती आलेला आहे. लेखक-दिग्दर्शक अमरला सिनेमाची भाषा चांगलीच कळते. आपला विचार रूपकातून कसा मांडायचा, त्यासाठी प्रतिमा आणि प्रतीकांचा वापर कसा करायचा याची उत्तम जाण या दिग्दर्शकाला आहे. कथासूत्र अगदी साधे अन सरळ.

खूप मोठे टर्न-ट्विस्ट नाही की धक्कातंत्र नाही. अगदी सामान्य मुलाच्या जगण्याचा अगदी साधासा दिनक्रम. त्यात त्याच्या मनात उमललेले छोटेसे स्वप्न. त्याचा त्याने केलेला पाठपुरावा. अन हे सगळं मांडताना अमर, सिनेमॅटोग्राफर गिरीश आणि त्यांच्या सर्व कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी केलेले एक सुंदर विणकाम आपल्या समोर उलगडत जाते. हा सगळा ताना-बाना आपल्याला भारतीय समाजाचे आणि जागतिक समाजाचेसुद्धा प्रातिनिधिक रूप दाखवतो. प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करतो. त्यामुळे हा सिनेमा वैश्विक अनुभवांच्या जवळ पोहोचतो.

विषय रिलेट होणे, अनुभव विश्वाशी नाळ जोडणे, गुंतवून ठेवणे, विचार करायला स्पेस आणि स्कोप ठेवणे, मनात भावनात्मक आंदोलन निर्माण करणे, ही सिनेमा कलाकृतीची ताकद असते. माजिद माजीदीच्या सिनेमात आपण हे सगळं अनुभवतो. आपल्याकडेही अशा कॅलिबरचे फिल्ममेकर उभे राहतायत. अमरने त्याच्या पाहिल्याच सिनेमात खूप आशा जागविल्या आहेत. म्होरक्या पाहताना जाणवते की, अमर जनतेचा सिनेमा बनवू पाहतोय. जनतेचा हा सिनेमा जनतेपर्यंत खर्‍या अर्थाने पोहोचला पाहिजे. म्हणून, आपण सर्वांनी या सिनेमाला आणि टीम म्होरक्याला साथ द्यायला हवी. महाराष्ट्रात गावोगावी, कानाकोपर्‍यात हा सिनेमा जायला हवा. हा जनतेचा सिनेमा आहे, तो जनतेपर्यंत वेगवेगळ्या कल्पक पद्धतीने पोहोचवायला हवा. ग्रामीण जीवनातील वास्तव जीवनाचे यतार्थ चित्रण यातून प्रभावीपणे मांडले आहे. म्हणूनच हा सिनेमा काळजाला हात घालतो व विचार करायला भाग पाडतो.

–(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)