घरफिचर्ससारांशसाहित्य, समाज आणि संस्कृतीचा अनुबंध!

साहित्य, समाज आणि संस्कृतीचा अनुबंध!

Subscribe

गोदाकाठी भरणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. यथायोग्य पध्दतीने संमेलनाची पुरेपुर जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसे पाहिले तर असंख्य अडचणींवर मात करीत हे संमेलन उभे राहिले आहे. कोरोनाच्या कालखंडात सुमारे वर्षभर रखडलेले आणि असंख्य नव्या प्रश्नांना रोज उठून उत्तर देत संमेलनाची तुतारी फुंकण्याची घटीका समिप आली आहे. आणि म्हणूनच या निमित्ताने साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्या अनुबंधाची मांडणी होणे अपरिहार्य ठरते. जेव्हा मराठी साहित्याची समाजाशी असलेली सांस्कृतिक नाळ असा विषय समोर येतो तेव्हा मराठी संस्कृतीचे आगळे-वेगळे प्रतिक असलेल्या साहित्य संमेलनाचा उल्लेख अवश्य होतो. हा गेल्या साडेतीन दशकांपासून सर्वांचाच आवडीने चर्चा करण्याचा विषय ठरला आहे. एकूणच साहित्य संमेलन हा आपल्या तमाम मराठी भाषिकांचा आवडता उपक्रम आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

गेली दोन वर्षे कोरोनाचे सोडले तर आजमितीस विविध विषयांना समर्पित असलेले किमान दोनशेहून अधिक मराठी साहित्य संमेलनाचे उपक्रम राज्यात आणि राज्याबाहेर देखील मोठ्या अलोट उत्साहाने संपन्न होत असतात. विद्रोही साहित्य संमेलन, समरसता संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, ख्रिस्ती साहित्य संमेलन, प्रतिमा संगम, बालकुमार साहित्य संमेलन, ग्रामीण सहित्य संमेलन, आखिल भारतीय मुस्लीम साहित्य संमेलन, विचारवेध, समाजप्रबोधन युवा, दलित, अहिराणी, बौध्द, जैन-मराठी, फुले-आंबेडकरी, एकता, झाडीबोले, उद्योजकीय असे अनेक साहित्य संमेलन मराठी भाषिक मंडळी मोठ्या उत्साहाने भरवितात. कोणताही उपक्रम यशस्वी करायचा असल्यास त्याला अनेक प्रकारचे पाठबळ लागते.

कार्यक्रमांचे संघटन करण्यापासून अनेकविध प्रकारची आर्थिक समीकरणेदेखील महत्वपूर्ण ठरणारी असतात. मात्र तरीही हे सगळे गणित जुळविले जाते. भव्यतेच्या संकल्पना या स्थळ, काळ, विषय सापेक्ष असतात. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, जात, पंथ, धर्म, लिंग इत्यादींच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या संमेलनात आपला लेखक, कवींच्या साहित्य गुणांचा विकास घडविणे, विशिष्ट प्रदेश, विभाग, जिल्हा इत्यादी भौगोलिक परिक्षेत्रातून स्थानिक लेखकांना मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या लेखनाला व्यासपीठ मिळावे हाच प्रमुख हेतू असतो. नाशिक येथे कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून सुरू झालेला सावानाचा जिल्हा साहित्यिक मेळावा हे अशाच संमेलनाचे जिल्हास्तरीय स्वरुप आहे. असंख्य प्रथितयश लेखक अशा प्रकारच्या संमेलनातूनच घडले आहेत.

- Advertisement -

विशिष्ट विचारसरणीचा प्रचार आणि पुरस्कार करणार्‍या संमेलनातून साहित्येतर प्रयोजन असले तरी त्यातून मूलतः साहित्य विषयक जाणिवाच वाढीस लागलेल्या असतात. त्यामुळे मराठी साहित्याचा पट अधिक विशाल होत जातो. समाजातील दुर्लक्षित क्षेत्रे, अनुभव, जाणिवा समाजापर्यंत अधिक व्यापकतेने पोहचविण्यात जेणेकरुन लोकांचे अनुभवविश्व अधिक समृध्द व्हावे याच हेतूने आयोजित करण्यात आलेली साहित्य संमेलने मराठी समाज जीवनाचे भावविश्व सुसंस्कृत करीत जातात. या सर्व संमेलनांचे उगमस्थान म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय. न्यायमूर्ती रानडे व लोकहितवादी यांनी 1878 साली ‘ग्रंथकारांचे संमेलन’ या नावाने हे संमेलन भरविले होते.

या संमेलनाचा तात्कालिन हेतू हा राजकीय होता, अशी मांडणी काही इतिहासकार करतात. त्यावर्षी हिंदुस्थानचे व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांनी देशी भाषेतील वृत्तपत्रांची गळचेपी करण्याचा कायदा अंमलात आणला होता. ब्रिटिशांचा पगडा असलेल्या तत्कालीन मुंबई विद्यापीठाने मराठीला हद्दपार केले असले तरी मराठी वृत्तत्रांच्यामार्फत मराठी भाषेचे संवर्धन घडत होते. त्यावर हे गडांतर आलेले पाहून मराठी भाषेच्या रक्षणाचा उपाय शोधण्याच्या न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादींसारख्या स्वाभिमानी विचारवंतांनी या ग्रंथकार संमेलनाच्या माध्यमातून केलेेला प्रयत्न होता. राजकीय हेतूंमुळे प्रेरणा मिळाली असली तरी मराठी वाङ्मयाचे संवर्धन करुन त्याला प्रतिष्ठा प्राप्त करुन देणे हा हेतूच संस्थापकांनी या प्रसंगी बाळगला होता.

- Advertisement -

जी ओरड आज 2021 मध्ये आपण करतो आहोत, तीच एकशे तीस वर्षापूर्वीदेखील होती. मराठी वाङ्मयाची आजची स्थिती अत्यंत निराशजनक असल्यामुळे त्याचे संवर्धन केले पाहिजे आणि ग्रंथकारांना उत्तेजन दिले पाहिजे, या उद्देशाने ही सभा आयोजित केली होती. ग्रंथकारांना उत्तेजन द्यावे, स्वस्त दराने ग्रंथ प्रसिध्द व्हावेत व वाचकांनी दरसाल पाच रुपयांचे ग्रंथ विकत घ्यावेत हा या सभेचा मर्यादित हेतू होता. दिनांक 7 फेब्रुवारी 1878 च्या ज्ञानप्रकाशात या वृत्तपत्राद्वारे न्यायमूर्ती महादेव रानडे आणि लोकहितवादी यांच्या नावाने जाहीर पत्रकाद्वारे वाचकांना असे स्पष्ट आवाहन करण्यात आले होते. सुदैवाने पुढील काळातही साहित्य संमेलनात आयोजन वाङ्मय प्रेरणेतूनच होत राहिले. या संमेलाचा मुख्य हेतू मराठी भाषेची अभिवृध्दी हाच राहिला. वास्तविक प्रत्येक साहित्यिक आपल्या साहित्यातून असे भाषाभिवृध्दीचे कार्य वैयक्तिकपणे करतच असतो. पण अशा अनेक प्रयत्नांचे सूत्रबध्द प्रकटीकरण करुन त्याला दिशा देण्याचा प्रयत्न साहित्य संमेलनातून होत असतो. या सगळ्या प्रयत्नांना सुसंघटित रुप साहित्य संमेलनातून मिळत असते.

अनेक वाचक या संमेलनाला उपस्थिती लावत असतात. अशा वाचकांच्या प्रतिसादाची लेखकाला अपेक्षा असते. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी व त्यांचा स्नेह अनुभवण्यासाठी तोही उत्सुक असतो. वाचकांचा व लेखकांचा असा मनमोकळा संवाद घडविण्याचा हेतूही अशा संमेलनांमध्ये असतो. सर्वसाधारण वाचकाला संमेलनाच्या बौद्धिक प्रकटीकरणाशी फारसे सोयरसुतक नसते, असे प्रत्यक्ष संमेलनात जाणवत राहते. मात्र असे असले तरी ज्या लेखकांना, कवींना अगदी शालेय पाठ्यपुस्तकातून अनुभवले आहे ज्यांच्या कविता, कादंबर्‍या वाचून आपल्या तारुण्यातील दिवस बहरले आहे अशा लेखक, कवींना जवळून बघण्याची, ऐकण्याची त्यांच्या सहवासाची संधी अशाच संमेलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य वाचकांना उपलब्ध होत असते.

चार दिवस खेळीमेळीने घालवावेत, विचारांचे आदान प्रदान करावे व सर्वांच्या प्रयत्नांनी मराठी भाषेच्या वाड्.मयाचे वैभव वाढवावे हा या संमेलनाचा सर्वमान्य उद्देश असतो. भावनात्मक ऐक्याला संमेलनाचे असे सोहळे पोषक ठरणारे होतात. साहित्य व्यवहाराशी संबंधित इतर घटक म्हणजे प्रकाशक, शासन, ग्रंथ विक्रेते यांची संमेलनातील उपस्थिती महत्वाची ठरत असते. कारण या सर्वांचाच सहभाग ग्रंथव्यापाराच्या समृध्दीत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भर घालत असतो. साहित्य विषयक चळवळी या अशाच सहभागाचे फलित असतात. त्यामुळे प्रकाशक, ग्रंथ विक्रेते इ. साहित्यक्रेंद्री व्यावसायिक आणि शासन, प्रशासन इत्यादी घटक साहित्य संमेलनात महत्वाची भूमिका बजावत असतात. आणि त्यांच्या या सहभागामुळे साहित्य व्यवहाराचाही विकास होतच असतो.

थोडक्यात रसिक वाचकांची रसिकता वाढीला लावावी, लेखकांच्या दृष्टीने साहित्यविषयक विचारांना मुक्त व्यासपीठ मिळवून द्यावे, मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करुन द्यावी. पर्यायाने मराठी वाङ्मयाचे संवर्धन व अभिवृध्दी घडवून मराठी भाषेची क्षितीजे रुंदावत न्यावीत इत्यादी वाङ्यीन हेतुतून या संमेलनांची निर्मिती झालेली दिसते.

संमेलन : साहित्याचे की वादविवादांचे
लक्षावधी रुपयांचा खर्च करणारी साहित्य संमेलने आज घ्यावीत का, असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. संमेलानाच्या निमित्ताने अनेक अपप्रवृत्ती शिरतात. विचारांचे मुक्त व्यासपीठ हे संमेलनाचे स्वरुप कमी होऊन उत्सवी थाट वाढीला लागतो. अशी टीकादेखील कायम होत असते. संमेलनाच्या आधी व संमेलनात एखादा वाद, एखादी चर्चा खळबळजनक ठरु लागते आणि त्या अनुषंगाने संमेलनाच्या कामकाजावर दबाव आणण्याचे अनेक प्रयत्न होऊ लागतात. राजकीय किंवा सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी साहित्य संमेलनाचे व्यासपीठ वापरले जाऊ लागले. याचेच पर्यवसान राजकारणी व्यक्ती व्यासपीठावर आणल्या जाव्यात का? इत्यादी वाद निर्माण झाले. राजकीय व्यक्तीमत्वे खरे तर समाजाचा महत्वपूर्ण भाग असतो. असंख्य कथा, कादंबर्‍या, नाटके, कविता यांच्यामध्ये राजकीय व्यक्तीरेखांचे चित्रण करण्यात आलेले आहे. समाजाचा एक अविभाज्य आणि नेतृत्व करणारा घटक ऐवढ्या मोठ्या व्यासपीठावरुन का व्यक्त होऊ नये, असे देखील मत मांडले जाते. राजकीय क्षेत्रातील मंडळी उलटपक्षी लोकप्रतिनिधी असतात. त्यामुळे सारस्वतांनी उलट त्यांना व्यासपीठावर बोलवून विविध प्रश्नांची मांडणी करण्याची संधी घेतली पाहिजे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आता शतकीय वाटचाल पूर्ण करण्यापासून केवळ सहा पावलेच मागे आहे. अगदी पहिल्या ग्रंथकार संमेलनापासून आजपर्यंतच्या प्रत्येक संमेलनात वाद-विवाद आणि चर्चा घडत आल्या आहेत. अर्थात निर्माण होणार्‍या वादविवादांकडे अधिक सकारात्मतेने बघितले गेले पाहिजे. संमेलन हे याचसाठी तर असते. वादविवाद हे व्यक्तीद्वेष सूचक नसतील तर त्यातून विचारांची आदानप्रदानच होत असते. एखादा विषय काही लोकांच्या मतानुसार दुर्लक्षित करावयाचा असला तरीही इतर काही लोकांच्या मते तो अत्यंत महत्वाचा असू शकतो. कोणत्याही प्रकारच्या वादविवादांमुळे संमेलनाचे आयोजन कधीही थांबले नाही आणि त्यामुळे यापुढे भविष्यात त्याची शक्यताही नाही. उलट वादविवादांमुळे संमेलनाचे साहित्यविषयक व्यासपीठ अधिक प्रगल्भ होत जाते.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास 1878 मध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत सुमारे 125 वर्षे सलगपणे ही वेगवेगळी साहित्य संमेलन भरत आहेत. या दीर्घ कालावधीत विविध क्षेत्रात आणि विषयांत या संमेलनांनी भरीव कार्य केलेले आहे. हे कार्य साहित्यिकदृष्ठ्या तर महत्वाचे आहेच, पण त्याबरोबर भाषिकदृष्ठ्या, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ठ्याही तितकेच मोलाचे आहे. या कार्याचा आवाका पाहिला असता साहित्य संमेलनाची आवश्यकता पटते. येत्या ३ ते ५ डिसेंबर दरम्यान साहित्याचा हा महाकुंभ गोदावरी तटावर नाशिकक्षेत्री भरत आहे. एकूणच गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बोथट झालेल्या आपल्या साहित्य संवेदना सजग आणि अधिक जागरुक करण्यासाठी या महापर्वणीचा लाभ आपण अवश्य घेतला पाहिजे. या निमित्ताने एवढेच…

— डॉ. स्वप्नील तोरणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -