घरफिचर्ससारांशललित लेखन...भावनेचा हुंकार!

ललित लेखन…भावनेचा हुंकार!

Subscribe

भारतीय भाषांमध्ये उच्च स्थानी असलेल्या मराठी भाषेच्या कादंबरी, कथा, कविता, नाटक आणि ललित या साहित्य प्रकारात नवद्दीच्या दशकानंतर अनेक बदल होत गेले. बरचसा शहरी निमशहरी तोंडवळा असलेले हे साहित्य प्रकार खेड्यापाड्यात, गावकुसातील तरुणांनी आपल्या मातीच्या सुंगधाने असे काही भारून टाकले कि त्यातून भुईचा अस्सलपणा आसमंतात बहरला... मुख्य म्हणजे शब्द, अलंकार यात हे साहित्य अडकून न पडता आपल्या बावनकशी अनुभवांनमुळे समृद्ध झाले. गेल्या वीस एक वर्षांत कादंबरी, कथा, कविता, नाटक आणि ललित साहित्य प्रकारात काय बदल होत गेले या सार्‍याचा वेध ’’आपलं महानगर’ घेत आहे पाच भागांत. याची सुरुवात होतेय ललितच्या अंगाने...

जे कथेत मावत नाही आणि कवितेत गावत नाही ते ललितलेखनात सापडते या शब्दात ललितलेखनाचे महत्व अधोरेखित केलेले आपणास आढळते. मुळात काव्यामधली मधुरता आणि गद्यातली चिंतनशीलता हे दोन्हींचा संगम ललित गद्यात होत असतो. जवळपास आठशे हजार शब्दात एखादा विषय मांडताना त्याचा आशय आणि अभिव्यक्ती या दोन्हींचा समावेश करत सकस साहित्यनिर्मिती करणे हा ललितलेखनाचा गाभा आहे ,मु ळात ललितलेखन कोणते? ,वैचारिक लेख,व्यक्तिरेखा, प्रवासवर्णन इत्यादी लेखन यांचा समावेश ललितलेखनात केला जातो.

लेखकाच्या लेखकत्वाचे समृद्ध रूप हे ललितलेखनात पहायला किंवा वाचायला मिळते. अशा प्रकारच्या लेखनात कल्पनेला जास्त वाव नसतो ,हा साहित्यप्रकार मुळात आत्मसिद्ध आहे. त्या वास्तवाला सौदर्यदृष्टी दिली कि एक प्रकारचे
ललितगद्य तयार होत असते. एखादा प्रसंग किती भावोत्कटतेने मांडतो त्यावर ललित लेखाचा दर्जा ठरत असतो. मराठी साहित्यात ललितनिबंध हा जो प्रकार रूढ झाला होता तो कदाचित ललितलेखांचा पहिला हुंकार असावा. ना.सी .फडके
किंवा भाऊसाहेब खांडेकर यांनी प्रचलित करून ठेवलेला ललित निबंध हा प्रकार आजच्या काळात ललित गद्य प्रकारात मोडतो. या लेखांचा विचार करता प्रथम आठवणी, अनुभव ,व्यक्तीचित्रे , प्रवासवर्णने , प्रादेशिकरंग -संगती , त्यातील
अनुभव यांचा अंतर्भाव करून त्यातून निबंध तयार करून त्याला सौदर्याची जोड देऊन त्याचे एक तंत्र निर्माण करून ललितगद्य तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. यातून ललितलेखाचे एक तंत्र निर्माण झाले, ते तंत्र त्या काळात वापरले गेल्याचे ना.सी.फडके यांचे ललितगद्य वाचल्यावर लक्षात येईल तोच अनुभव भाऊसाहेब खांडेकर यांचे सावंतवाडीच्या वैनतेय या साप्ताहिकात गाढवाची गीता या सदरातील लेख वाचल्यावर लक्षात येईल.

- Advertisement -

 त्यानंतरच्या काळात या तांत्रिक गोष्टीला थोडी फारकत देऊन या ललितगद्याला बहुसमृद्धी देण्याचे काम गो. वि.करंदीकर ,इरावतीबाई कर्वे, कुसुमावती देशपांडे,दुर्गाबाई भागवत यांनी केल्याचे विशेष आढळते. १९६०च्या कालखंडानंतर म्हणजे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर मराठी साहित्याचे सत्ताकेंद्र मुंबई-पुणे या शहरी भागाकडून गाव खेड्याकडे वळले तसा साहित्याचा बाज बदलत गेला. त्यात ललित साहित्य किंवा ललितगद्य किंवा ललित लेखांचे स्वरूप देखील तेवढेच बदलले. काहीजनाच्या मते ललितगद्य हा साहित्यप्रकार असूच शकत नाही या विधानाला चाप बसला. त्यात श्रीनिवास कुलकर्णी यांच्या ललितलेखनाने हि वाट अधिक रुंद केली. त्यातूनच या साहित्यप्रकारात आलेले साचलेपण दूर झाले व या साहित्यप्रकाराचा पैस विस्तारला गेला. ग्रामीणभागातील निसर्गचित्रे , तेथील कृषीसंस्कृती ,खाद्यसंस्कृती हि समर्थपणे या साहित्यप्रकारात येताना दिसली. त्यात मुख्यपणे काकासाहेब कालेलकर, अनंत काणेकर ,ना .मा.संत , मधुकर केचे या नावांचा उल्लेख करावा लागेल . त्याकाळात ज्यांनी कवितेची वाट मळवली त्या शांताबाई शेळके , इंदिरा संत यांना देखील ललितगद्यात साहित्यनिर्मिती करावी असे वाटणे, यात या साहित्य प्रकाराचे प्रसिद्ध होणारे लोकप्रिय माध्यम आहे हे सिद्ध होते.

याच काळात चिं .त्र .खानोलकर ( आरती प्रभू ) , मधु मंगेश कर्णिक यांनी देखील प्रचंड प्रमाणात ललितलेखन केल्याचे दिसून येईल. मधु मंगेश कर्णिक यांनी जवळपास बारा ललित गद्याची पुस्तके तयार होतील एवढे ललित लेखन कोकण
आणि गोवा या प्रदेशातील अनेक पैलू विचारात घेऊन लेखन निर्मिती केलेली आहे. त्यांच्याच सोबत या ललित गद्याच्या पुस्तकातील आंबा या शीर्षकाखाली जो लेख आहे त्या आंब्याला मानवीरूप देऊन त्याचे मनोगत कसे सजवले आहे हे लक्षात येईल – पावसाचे पाणी अंगावर पडेपर्यंत आंब्याचे प्रत्येक झाड असे मुके,स्तब्ध राहते आणि पावसात अंग धुऊन झाल्यावर ? मग ते मंदपणे हसू लागते, मग तो आंबा कितीही मोठा बाप्या असो ,तो लहान मुलासारखा हसू लागतो या उदाहरणावरून एक गोष्ट लक्षात येईल कि या आंब्यावर मानवी गुणांचा आरोप करून त्याला मानविरूप रूप देऊन त्याला वनस्पतीपणातून बाहेर काढले आहे. मराठी व्याकरणातील चेतनागुनोक्ती ‘ अलंकाराचा ललितगद्यात खूप उपयोग लेखकांनी केल्याचे आढळते.

- Advertisement -

कविता ,कादंबरी यांच्याप्रमाणे ललित गद्यात फारसा फरक पडला नाही याचे कारण त्याचे मूळ स्वरूप जे लालित्य आहे. अर्थात हे लालित्य नंतरच्या काळात फार कोणी सांभाळले नाही, कारण आजूबाजूच्या जनजीवनाचा संघर्ष हा मुख्यपणे साहित्याचा घटक ठरला त्यात ललितगद्य काहीसे मागे पडले तरीही ललित गद्याला थोडेसे वळण जे प्राप्त झाले त्यात वैचारिक गद्य हा मोठा भाग मानला जाऊ शकतो,या वैचारिक गद्याचे मूळ हे कथा कादंबरी – कविता यांचे बदलते रूप आहे. त्यात नॉस्टालजिया किंवा स्मरणरंजन या प्रकारात हा साहित्यप्रकार फार अडकून पडला आहे असे म्हणता येणार नाही. याची दोन उदाहरणे देता येतील. मध्यंतरी नामदेव कोळी या कवी मित्राने खानदेशातील लोकसंस्कृती
अधोरेखित करणारे काही लेख लिहिले त्यातून स्मरणरंजन हा प्रकार फार व्यापक न राहता ती निर्मिती काहीसी वास्तवाला जवळ करणारी वाटली ,एक वैचारिक बाजू मांडत असताना त्या लेखनातील लालित्य हरवणार नाही हि काळजी ललितगद्य लिहिणार्‍या लेखकाला घ्यावी लागते ती नामदेवने पुरेपूर घेतली होती, खानदेश प्रदेशातील लोकसंस्कृती समर्थपणे त्याने साहित्यात आणली.

त्याचप्रमाणे विदर्भातील साहित्यिक मित्र कवी रवींद्र जवादे यांची साहित्यनिर्मिती त्याच अंगाने होताना दिसेल. ज्यांच्या ललितगद्याविषयी बोलावे असे अजून एक नाव म्हणजे रश्मी कशेळकर. तळ कोकणातील भाषिक भेदाचे स्वातंत्र्य घेत मराठीमिश्रित मालवणीचा आधार घेत ,तेथील छोटेछोटे प्रसंग , कथा ,नैसर्गिक साधने , त्यांना शब्द .रूपाचे
लेणे देऊन त्यांनी वेगळ्या अंगाने ललितलेखन केले त्यातूनच त्यांचा पहिला भुईरिंगण हा ललितगद्यसंग्रह आणि आता नुकताच भूयपरमळ हा अजून एक संग्रह प्रकाशित झाला आहे. या दोन्ही संग्रहातील लेख वाचताना एक गोष्ट लक्षात
येते कि शब्द मर्यादा हि गोष्ट दुय्यम मानून त्या लेखातील लालित्य जराही कमी न करता एका वेगळ्या लयीत ते लेखन येऊ शकते,त्याला रस.शब्द. स्पर्श ,गंध आणि रूप यांचा मुलामा देऊन ती निर्जीव वस्तू सजीव करता येते.

त्यामुळे आजच्या काळातील ललितलेखन हे पूर्वीसारखेच आत्मकेंद्री आहे ,त्यात सौदर्यदृष्टी वेगळ्या आढळतात. सृजनशीलता हा घटक तसाच राहिला तरी आजही ललितगद्याचे स्वरूप काव्यात्मकता हे गुणविशेष आजही टिकून आहे. आपल्या अवतीभवतीचा परिसर, त्याचे भावचिंतन आणि त्याविषयी वाटणारे ममत्व हे गुण आताही तसेच आहेत कारण ललितलेखनाचा तो स्थायीभाव आहे. आठवणीच्या किंवा स्मरणरंजनात्मक लिखाणात आपल्या आठवणीचा पट काहीसा उफाळून येतो. त्यातून आपण नक्की काय हरवून बसलो आहोत याची अंतर्मनात बैठक तयार होते .

जागतिकीकरण, औद्योगीकरण यामुळे शहरे आणि पर्यायाने खेडी बदलत चालली आहेत. तेथील माणूस देखील आणि निसर्ग देखील बदलताना दिसतो. काळाच्या ओघात हे सर्व बदलताना त्याचा बरा वाईट परिणाम ललित गद्यावर पडताना आढळतो. आणि त्याप्रमाणे ते गद्य आता आपले मूळ स्वरूप बदलताना दिसत. त्यातील लालित्य टिकून ठेवावे म्हणत असताना देखील टिकले जात नाही. त्यात वैचारिक भाव डोकावत असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -