घरफिचर्ससारांशदलबदलूंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ!

दलबदलूंचा करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ!

Subscribe

सध्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत राजकीय पुढार्‍यांबाबतच्या पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत असाच राजकीय लपंडाव सुरू राहील. त्यामुळे राजकीय पुढारी खुर्चीसाठी सर्वसामान्यांचा बळी घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत हे त्यांच्या पक्ष बदलण्याच्या प्रक्रियेवरून स्पष्ट दिसून येते, परंतु मतदार बंधू-भगिनींनो दलबदल करणार्‍या सर्वच उमेदवारांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची हीच खरी संधी आहे. राज्यातील किंवा देशातील कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार असो त्याने जर दलबदल केला असेल तर मतदारांनी अन्य कोणालाही मतदान करावे, परंतु दलबदलवाल्या कोणत्याही उमेदवाराला अजिबात मतदान करू नये. कारण सत्तेसाठी जो पक्षाचा होऊ शकत नाही तो सर्वसामान्य जनतेचा कसा होईल. त्याचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हीच वेळ आहे.

-रमेश लांजेवार

सध्याच्या परिस्थितीत जवळपास सर्वच पक्षांची उमेदवारी जाहीर झालेली आहे. या उमेदवारीमध्ये काही उमेदवार पक्षांशी निष्ठा ठेवणारे तर काही उमेदवार आयात केलेले किंवा सत्तेच्या लालसेने किंवा ईडीच्या कारवाईच्या भीतीने आयाराम -गयाराम असे अनेक उमेदवार सर्वच पक्षांमध्ये आपल्याला रिंगणात उतरल्याचे दिसतात. अशा उमेदवारांना पक्षांशी निष्ठा नाही, ते उमेदवार देशाच्या जनतेचे कसे काय भले करणार याचाही विचार देशातील मतदारांनी करायला हवा. आयाराम-गयाराम हे सत्तालोभी असल्याने स्वत:च्या स्वार्थापोटी संपूर्ण नीतिमत्तेवर पाणी फेरून सत्तेसाठी कोणत्याही पक्षासमोर लोटांगण घालताना दिसतात.

- Advertisement -

सध्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राज्यातच नाही तर देशात अनेक पक्षांतील राजकीय पुढार्‍यांचे किंवा लोकप्रतिनिधींचे दलबदल झाले आहेत, परंतु यासाठी ठोस कायदा नाही किंवा शिक्षाही नाही. मनात येईल तेव्हा सत्तेसाठी पक्ष बदलणे हा राजकीय पुढार्‍यांचा गोरखधंदा बनल्याचे दिसून येते. कारण काही कायदे राजकीय पुढारी आपल्या हितासाठी बनवत असतात. ही लोकशाहीच्या दृष्टीने शोकांतिकाच म्हणावी लागेल. यामुळे सर्वसामान्यांचा लोकप्रतिनिधीवरून व राजकीय पुढार्‍यांवरून हळूहळू विश्वास उडत असल्याचे दिसून येते.

पक्ष बदलल्यानंतर त्याला सहा वर्षांसाठी पक्षातून काढले जाते, मग दुसरा पक्ष त्याला का घेतो? दुसर्‍या पक्षासाठी त्याची वर्तणूक कशी काय चांगली असेल? ही राजकीय पुढार्‍यांची मनमानी नाही का? त्यामुळे पक्ष बदलल्यानंतर कोणत्याही पक्षाने त्या राजकीय पुढार्‍यांना आपल्या पक्षात आश्रय द्यायला नको, जर दिला तर कोणतेही राजकीय पद किंवा लोकप्रतिनिधित्व पद यापासून दूर ठेवायला हवे, परंतु पक्ष सोडलेल्या राजकीय पुढार्‍यांना हे सर्वच संपत्तीच्या बळावर ताबडतोब मिळते. त्यामुळे असे वाटते की यांच्यासाठी काहीही कायदेकानून किंवा नियमावली नाही. राज्यात किंवा देशात पक्ष

- Advertisement -

बदलण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे त्यांच्याजवळ असलेली करोडो रुपयांची वाममार्गाने कमवलेली अमाप चल-अचल संपत्ती असणे. ती वाचवण्यासाठी कोणत्याही सत्ताधारी पक्षात प्रवेश करणे किंवा केलेले घोटाळे बंद करण्यासाठी किंवा वाममार्गाने कमवलेल्या संपत्तीवर ईडी किंवा इतर कारवाई होऊ नये या उद्देशाने राज्यात राजकीय पुढारी या पक्षातून त्या पक्षात उंदरासारख्या उड्या मारताना दिसतात. तरीही स्वत:ला आमदार-खासदार (लोकप्रतिनिधी-जनप्रतिनिधी) समजतात हे स्वतंत्र भारताचे दुर्भाग्य म्हणावे लागेल. राज्यात किंवा देशात गेल्या काही वर्षांत असा एकही राजकीय पुढारी दिसला नाही की त्याने जनहितासाठी किंवा लोककल्याणासाठी पक्ष सोडला असावा.

राजकीय पुढारी या पक्षातून त्या पक्षात जातात तेव्हा त्यांना नीतिमत्ता, पक्षांचे नियम, पक्षासाठी घेतलेली शपथ, एकनिष्ठता, समाजाबद्दलची जागृकता, पक्षाबद्दल स्वाभिमान, पक्षाची नियमावली, पक्षाने आपल्याला दिलेले वैभव हे संपूर्ण एका क्षणात विसरतात. अशांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ आहे. स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणारा पक्ष किंवा राजकीय वर्तुळात विरोधी पक्षावर ताशेरे ओढणारे राजकीय पुढारी अचानक सर्वच गोष्टी विसरतात हे कसे काय?

कोणत्याही राजकीय पक्षाचा आमदार-खासदार (लोकप्रतिनिधी) किंवा राजकीय पुढारी असो तो जेव्हा पक्ष बदलतो तेव्हा त्याला काहीच कसे वाटत नाही? ज्या पक्षाचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व राजकीय पुढारी करतो तेव्हा तो विरोधकांवर तुटून पडतो. अशा वेळी लोकांना खरे वाटते व तो राजकीय पुढारी लोकांची मने जिंकतो, परंतु हाच राजकीय पुढारी ज्यांच्या विरोधात बोलतो त्यांच्याच पक्षात प्रवेश करतो तेव्हा याला काय म्हणावे? यावरून स्पष्ट होते की आजचा राजकीय पुढारी फक्त स्वार्थासाठीच राजकारण करतो. ही बाब मतदारांनी लक्षात ठेवली पाहिजे.

राजकीय पुढारी जेव्हा पक्ष बदलतात तेव्हा सर्वसामान्यांच्या जिव्हारी लागते, मन दुखावते. कारण राजकीय पुढार्‍यांचे किंवा लोकप्रतिनिधीचे किंवा आमदार-खासदार यांनी सत्तेसाठी पक्ष बदलणे म्हणजे ज्या ताटात खाल्ले त्याच ताटाला छिद्र पाडणे होय. महाराष्ट्रातील राजकारण पाहता राजकीय पुढार्‍यांना असे वाटते की फक्त आपणच खूप हुशार आहोत व बाकी सर्व लोक अनपड-गवार आहेत. कारण गेल्या काही वर्षांपासून राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जणू काय राजकीय भूकंप आला की काय असे वाटते. राजकीय उलथापालथींमध्ये राज्याचा कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला.

याचा सरळ परिणाम गरीब, सर्वसामान्यांना व शेतकर्‍यांना भोगावा लागत आहे. कोट्यवधींचा भ्रष्टाचार राजकीय पुढारी करतील आणि त्याचे प्रायचित्त गरीब, सर्वसामान्यांनी व शेतकर्‍यांनी भोगावे हा कुठला न्याय म्हणावा? कारण गेल्या काही वर्षांपासून राजकीयदृष्ठ्या सर्वसामान्यांची किंमत झीरो बजेटमध्ये असल्याचे दिसून येते. यामुळे राजकीय पुढारी तुपाशी आणि सर्वसामान्य जनता उपाशी असल्याचे दिसून येते. राजकीय पुढारी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात व सत्तेसाठी हापापल्यासारखे करतात. एकमेकांवर कुत्र्या-मांजरासारखे तुटून पडतात. यात सर्वसामान्यांचा किंवा मतदारांचा तीळमात्र विचार केला जात नाही, हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

गेल्या काही वर्षांत राजकीय पुढार्‍यांनी स्वत:च्या स्वार्थापोटी सगळी हद्द पार केल्याचे दिसून येते. कारण आमदारांना-खासदारांना (लोकप्रतिनिधींना) जनता पाच वर्षांसाठी निवडून यासाठी देते की राज्याचा आणि देशाचा कारभार सुरळीत चालावा. विकास झपाट्याने व्हावा, परंतु राजकीय पुढारी राज्याचा किंवा सर्वसामान्यांचा विकास करण्यापेक्षा स्वतःच्या विकासावर जास्त भर देताना दिसतात, मग तो कोणत्याही पक्षाचा पुढारी असो. याचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर आहे. राजकीय पुढारी निवडून आल्यानंतर मतदारांना विसरतात हे जनतेच्या चांगलेच लक्षात आले.

गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रात राजकीय पुढार्‍यांनी जणू तमाशा मांडला की काय असे चित्र सर्वांनीच पाहिले. यावरून स्पष्ट होते की राजकीय पुढारी जनतेच्या भावनांशी खेळताना दिसतात. सत्ताधारी पक्षाने भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या पक्षातील राजकीय पुढार्‍यांना सत्ताधारी पक्ष आपल्या सोबत घेतो हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. मग काय भ्रष्टाचारी राजकीय पुढारी जर सत्तेसोबत गेले म्हणजे शुद्ध होतात काय, असाही प्रश्न उपस्थित होतो. अशा प्रकारे असे अनेक प्रश्न उद्भवतात. यामुळे राजकीयदृष्ठ्या राज्याची परिस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होताना दिसते.

याकरिता कायद्याच्या माध्यमातून राजकीय पुढारी आमदार-खारदार (लोकप्रतिनिधी) यांना लगाम घालणे अत्यंत गरजेचे आहे. कारण राज्याच्या घडामोडी या लोकशाहीसाठी चिंताजनक आहेत. राजकीय पुढारी आपल्या स्वार्थापोटी पक्षांतर करतात व सत्तेत सहभागी होतात. याचा मनस्ताप लोकांमध्ये दिसून येतो. याकरिता पक्षांतर बंदी कायद्यात मोठ्या प्रमाणात सुधारणेची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत सर्वच राजकीय पुढारी निष्ठा, पक्षाचे आचारविचार हे सर्व बाजूला सारून सत्तेकडे धावताना दिसतात. त्यामुळे कायद्याच्या माध्यमातून राजकीय पुढार्‍यांच्या मुसक्या आवळणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्या राज्यातील राजकीय घडामोडींमुळे सर्वसामान्यांमध्ये अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत राजकीय पुढार्‍यांबाबतच्या पक्षांतर बंदी कायद्यात सुधारणा होत नाही तोपर्यंत असाच राजकीय लपंडाव सुरू राहील. त्यामुळे राजकीय पुढारी खुर्चीसाठी सर्वसामान्यांचा बळी घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. हे त्यांच्या पक्ष बदलण्याच्या प्रक्रियेवरून स्पष्ट दिसून येते.

परंतु मतदार बंधू-भगिनींनो दलबदल करणार्‍या सर्वच उमेदवारांना त्यांची योग्य जागा दाखवण्याची हीच खरी संधी आहे. राज्यातील किंवा देशातील कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार असो त्याने जर दलबदल केला असेल तर मतदारांनी अन्य कोणालाही मतदान करावे, परंतु दलबदलवाल्या कोणत्याही उमेदवाराला अजिबात मतदान करू नये. कारण सत्तेसाठी जो पक्षाचा होऊ शकत नाही तो सर्वसामान्य जनतेचा कसा होईल याचा मतदारांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

-(लेखक नागपूरचे माजी विद्यापीठ प्रतिनिधी आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -