घरफिचर्ससारांशप्रेम प्रकरण - धोके आणि सावधगिरी....

प्रेम प्रकरण – धोके आणि सावधगिरी….

Subscribe

ज्या वयात शिक्षण घेणे, आरोग्य जपणे, सातत्याने नवीन शिकणे, निसर्गाने या वयात बहाल केलेली ऊर्जा, उत्साह, बुद्धिमत्ता सकारात्मक कामासाठी कारणी लावणे, वाचन करणे, छंद जोपासणे याऐवजी तरुण पिढीला खोट्या तकलादू प्रेमाचा विळखा पडलेला दिसतोय. बरं हे प्रेम फक्त एकमेकांना भेटून गप्पा मारणे, थोडाफार सहवासाचा आनंद घेणे इतपर्यंत न राहता रात्रंदिवस एकमेकांना फोन, मेसेज, विडिओ कॉल करणे, सतत स्वतःचे अपडेट्स एकमेकांना देणे, सातत्याने अतिशय फुटकळ आणि फालतू विषयावर तासंतास गप्पा मारणे, यावर प्रचंड वेळ युवा पिढी घालवताना दिसते.

प्रेम !!! एक नाजूक, निष्पाप, तरल आणि नैसर्गिक भावना. विशेषतः सोळावं वरीस धोक्याचं या उक्तीनुसार शालेय महाविद्यालयीन जीवनात प्रेम होणे, प्रेमात पडणे, प्रेमात वेड होणे, साथ जियेंगे साथ मरेंगे अशा शपथा घेणे अतिशय स्वाभाविक आहे. या अवखळ आणि नाजूक वयात एकमेकांबद्दल आकर्षण वाटणे, ओढ वाटणे, एखाद्यावर आपला जीव ओवाळून टाकायची भावना निर्माण होणे, सातत्याने गोड सुखद स्वप्नात रमणे, स्वतःच्या करियरकडे दुर्लक्ष करीत, शाश्वत आणि व्यावहारिक जीवनाचा विसर पडून आपल्या प्रेमाला विरोध करणारे आपले कुटुंबीय आणि हा समाज आपला दुश्मन आहे असे वाटणे स्वाभाविक असते. कोणाचेही कोणतेही चांगले सल्ले, मार्गदर्शन चूक काय बरोबर काय हे ऐकण्याची मनस्थिती या वयात शक्यतो नसते, कोणत्याही परिणामांची जाणीव नसते. बालिशपणा, अवखळपणा, खोडकर पणा, निष्काळजी पणा तर या वयाची विशेष वैशिष्ठ्ये असतात.

सामाजिक नीतिमत्ता, कुटुंबातील संस्कार, बंधने, मोठ्या माणसांनी दिलेले सल्ले, शिक्षकांनी शाळा महाविद्यालयांनी घातलेली बंधने, नियम तसेच या वयातील प्रेमाच्या आड येणारी कोणतीही गोष्ट कशी झिडकारून लावायची, आपलंच खरं करायचं आणि त्यातून जोपर्यंत काही अनुचित, अघटित, वाईट घटना घडत नाही तोपर्यंत त्यातून काहीच शिकायचं नाही हा पायंडा आजकाल तरुण युवक युवतींमध्ये पहायला मिळतो.

- Advertisement -

घरच्यांना, शिक्षकांना अनेकदा जवळच्या मित्रमैत्रिणींनादेखील चोरून, लपून अंधारात ठेऊन नको त्या वयात आपल्या भावनांना आवर घालता न आल्याने अनेक युवकयुवती चुकीच्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरणात स्वतःला झोकून देतात आणि त्यावेळेस भावनिक मानसिक शारीरिक सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडून स्वतःच आयुष्य सैरभैर करून टाकतात. आपण ज्या भावनेला प्रेम समजतोय, ते खरंच प्रेम आहे की आकर्षण आहे की शारीरिक गरज आहे, की कोणी आपला वापर करतंय, की कोणी आपल्याला फसवतंय याचा विचार करण्याची सद्सद्विवेकबुद्धी ही पिढी अशावेळी गहाण ठेवते. विशेष तरुण मुली खूपच बिनधास्त आणि निष्काळजीपणे समाजात वावरताना दिसतात. कोणावरही पटकन विश्वास ठेवणे, कुठेही हिंडायला फिरायला जायला लगेच तयार होणे, सेलिब्रेशन, पार्टी, पिकनिक, नाईट आऊट याबाबत अती उत्साहीपणा यांच्यामध्ये पाहायला मिळतो.

ज्या वयात शिक्षण घेणे, आरोग्य जपणे, सातत्याने नवीन शिकणे, निसर्गाने या वयात बहाल केलेली ऊर्जा, उत्साह, बुद्धिमत्ता सकारात्मक कामासाठी कारणी लावणे, वाचन करणे, छंद जोपासणे याऐवजी तरुण पिढीला खोट्या तकलादू प्रेमाचा विळखा पडलेला दिसतोय. बरं हे प्रेम फक्त एकमेकांना भेटून गप्पा मारणे, थोडाफार सहवासाचा आनंद घेणे इतपर्यंत न राहता रात्रंदिवस एकमेकांना फोन, मेसेज, विडिओ कॉल करणे, सतत स्वतःचे अपडेट्स एकमेकांना देणे, सातत्याने अतिशय फुटकळ आणि फालतू विषयावर तासंतास गप्पा मारणे, यावर प्रचंड वेळ युवा पिढी घालवताना दिसते. अतिशय कमी वयातील हे प्रेमवीर एकमेकांवर रागावणे, रुसणे, फुगणे, एकमेकांची समजूत काढणे, झुरणे, रडणे त्यातून स्वतःला डिस्टर्ब करुन घेणे, घरात, अभ्यासात, इतर कामात चित्त न लागणे, स्वतःच्या झोपेवर, खाण्यापिण्यावर परिणाम करुन घेणे इतके एकमेकांच्या आहारी गेलेले दिसतात. आपल्या आयुष्यातील किती महत्वाचा गोल्डन पिरियड आपण किती फालतू विषयांवर वाया घालवत आहोत याची थोडीसुद्धा जाणीव अशा प्रकारे वागणार्‍या मुलामुलींमध्ये दिसत नाही.

- Advertisement -

एकमेकांना एकांतात वेळ देता यावा, कोणी बघू नाही, ओळखीचे कोणी भेटू नाही, आपले प्रेमप्रकरण कोणाला माहिती होऊ नये म्हणून दक्षता बाळगणारी ही पिढी सगळ्यांपासून लपायला म्हणून अतिशय आडोशाच्या, कमी गर्दीच्या, आडबाजूच्या स्थळांवर एकमेकांना भेटत राहणे पसंत करते. यामुळेदेखील खूप मोठी जोखीम युवक युवती घेत असतात. कोणत्याही ठिकाणची पूर्ण माहिती नसताना, तेथील वातावरण, तेथील स्थानिक नागरिक, तेथील धोके ठाऊक नसताना अशा प्रकारे कुठेही जाऊन बसणे आपल्या इज्जतीसाठी आणि जीवितासाठी किती धोकेदायक आहे याची शहानिशा कोणीही करताना दिसत नाही. मुलींनी याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपल्यासोबत असलेली व्यक्ती कितीही विश्वासू असेल तरी आपण ज्या ठिकाणी जातो आहोत तिथे आपल्याला चुकीच्या प्रवृत्तीचे लोक भेटू शकतात. तेथील एकांताचा गैरफायदा घेऊन बलात्कार, खून, मारामारी यासारख्या गोष्टींना आपल्याला सामोरे जायला लागू शकते यावर विचार होणे आवश्यक आहे.

युवा पिढीमध्ये अजून एक वाईट सवय रूजताना दिसते आहे. कोणतीही खबरदारी न घेता, रहदारीचे नियम न पाळता, केवळ एकमेकांना इंप्रेस करण्यासाठी बेलगाम वागत गाड्यांवर धिंगाणा घालत फिरणे, मुलींना डबलसीट घेऊन मोकाट गाड्या चालवणे, अंधार्‍या आडबाजूच्या ठिकाणी मुलींना कारमध्ये घेऊन बसणे यासारखे धोके सर्रास पत्करले जातात. यामध्ये आपल्या एकमेकांविषयी कितीही प्रांजल आणि चांगल्या भावना असतील तरी आपल्याकडे बघणार्‍यांचा दृष्टीकोन अतिशय खालच्या पातळीचा असतो हे लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे.

गड, किल्ले, धरणं, धबधबे अशा ठिकाणी घरात कोणालाच न सांगता शाळा कॉलेजला सुट्ट्या टाकून, पिरियड ऑफ करून क्लासला सुट्टी टाकून फिरायला जाणे, ट्रेकिंगला जाणे असे प्रकार सर्रास केले जातात. कोणताही अधिकृत माहितगार ग्रुप, गाईड अथवा विश्वासू व्यक्ती, जबाबदार नागरिक अथवा घरातील मंडळी सोबत नसताना अशा ठिकाणी युवक युवतींनी जाणे म्हणजेच अपघाताला निमंत्रण देणे होय. अशा ठिकाणी एकटे दुकटे गेल्यावर पण विविध स्टंट करणे, मुद्दाम आडमार्गाचा अवलंब करणे, पोहण्याचे धाडस करणे, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने जीव गमवावा लागणे, डोंगर दर्‍यांमध्ये अडकून पडणे, रस्ता चुकणे, अपघात घडणे अशी उदाहरणे सर्रास घडतात. पावसाळ्यात तरुण पिढीच्या प्रेमाला फुटलेली पालवी त्यांना विविध निसर्गरम्य ठिकाणी आकर्षित करते. निसर्गाचा आस्वाद घेताना, सेल्फी घेताना खबरदारी तितकीच महत्वाची आहे याचा विचार न करता बेफाम वागणूक युवकांमध्ये पाहायला मिळते.

सातत्याने खोटे बोलणे, मित्रमैत्रिणींना विश्वासात घेऊन त्यांची मदत घेऊन त्यांना पण या यासारख्या चुकीच्या कृत्यात सहभागी करून घेणे असे फंडे वापरले जातात. तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी नेणे अतिशय सोपे असते. अशाप्रकारची संगत करताना विचार होणे आवश्यक आहे. गंमत म्हणून व्यसन करताना आपण कधी त्याच्या पूर्ण आहारी जातो ते आपल्यालाच कळत नाही. व्यसन करुन वादविवाद, मारामारी त्यातून एकमेकांवर हल्ले यासारख्या घटना घडताना दिसतात. व्यसन करुन गाड्या चालविणे, तरुण वयात अपंगत्व येणे अथवा जीव गमवावा लागणे यासारख्या दुर्दैवी घटना घडताना दिसतात. प्रेमात आकंठ बुडालेली एकमेकांना जराही विरह सहन न होणारे हे युवक युवती प्रेमाखातर, एकमेकांची मनमर्जी सांभाळण्याखातर स्वतःचे नको त्या अवस्थेतील फोटो विडिओदेखील बिनधास्त सामाजिक माध्यमातून शेअर करताना दिसतात. परंतु समोरील व्यक्ती अथवा इतर कोणी आपल्या व्हिडिओ फोटोचा गैरवापर करु शकतो हे त्यांच्या गावीसुद्धा नसते. मुलींनी याबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.

मित्रमैत्रीणीला गिफ्ट देणे, विविध डे साजरे करणे, हॉटेलिंग, पिकनिक, एकमेकांचे वाढदिवस साजरे करणे या सगळ्यासाठी लागणारा पैसा किती जण खरंच प्रामाणिकपणे घरी सांगून पालकांकडून मागून घेतात? किंवा स्वतः त्यासाठी मेहनत करुन पैसे कमवण्याची धमक ठेवतात? अशा प्रकारची मौजमजा आपल्या प्रियकर अथवा प्रेयसीसोबत करण्यासाठी कोणकोणत्या चुकीच्या मार्गाचा अवलंब करून पैसा उभा करतात हा चिंतेचा विषय आहे. आपले कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल यामधील ज्ञान आपण कोणताही सायबर गुन्हा करायला तर वापरत नाही ना? कोणत्याही चुकीच्या ऑनलाईन स्कीमला, अप्लिकेशनला बळी पडून आपण आपले पैसे अनाठायी उडवत नाही ना याबद्दल चिकित्सक राहणे योग्य राहील.

आपण ज्याला प्रेम समजतो आहे ते आपल्याला नक्की कुठे घेऊन जाणार आहे याची थोडीही जाणीव या युवापिढीला नसते. स्वतःच्या आयुष्याबद्दल कोणतंही नियोजन, करियरबद्दल गांभीर्य, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी, आईवडिलांच्या आयुष्याचे चीज करण्याची कोणतीही धमक, उमेद या वयातील आभासी प्रेमापेक्षा कितीतरी पटीने आपल्याला यशस्वी करु शकते याची सूतराम कल्पना या वयात नसते.

चित्रपट, समाज माध्यमातून तर या गोष्टींना खतपाणी घातलं जातंच, पण या आभासी जीवनातला फोलपणा समजण्याइतपत तरुण पिढीची बौद्धिक, वैचारिक तयारीच नसते. शालेय महाविद्यायीन जीवनात काही प्रेम प्रकरणं यशस्वी होतातदेखील, पूर्णत्वाला जातातदेखील आणि सुखी संसारदेखील करतात ! पण त्याचे प्रमाण खूपच नगण्य असते. या उलट या वयात केलेली अनेक प्रेम प्रकरणं तरुण पिढीला बरबाद करीत आहेत, व्यसनाधीन करीत आहेत, आत्महत्येला प्रवृत्त करीत आहेत. अभ्यासासाठी असलेला वेळ अशाप्रकारे वाया घालवल्यामुळे युवापिढी कायमस्वरूपी बेरोजगारदेखील होत आहे.

आयुष्यभरासाठी चुकीच्या मार्गाला गेलेली, आयुष्यभर पश्चाताप करणारी, करियर संपलेली, जीवन, आयुष्य कुटुंब उध्वस्त झालेली, प्रेम प्रकरणातून नैराश्य आलेली, आत्महत्या, घातपात, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून हल्ले झालेली, प्रेमाच्या त्रिकोणातून हत्या झालेली, ब्लॅकमेलिंग झालेली प्रकरण मोठ्या प्रमाणात समाजात पहायला मिळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -