घरफिचर्ससारांशप्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे...

प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे देणे…

Subscribe

जगात आपण सगळं विकत घेऊ शकतो, पण आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यासोबत राहण्याचा आनंद, समाधान पैसा कमी असला तरी मिळवता येतो. आपला माणूस फक्त ओंजळभर प्रेमाचा, ओंजळभर सुखाचा भुकेलेला असतो. म्हणून पैसा आपल्याला आनंद देत नाही, तर तो केवळ आपली इच्छा, अपेक्षा, आवड, गरज पूर्ण करू शकतो. जेव्हा पैशांचा वापर करून आपण आपल्या माणसांसोबत राहतो, तेव्हा आपल्याला खरा आनंद मिळतो. हाच आनंद, सुख आपण दुसर्‍यांना, इतरांना देऊ तेव्हाच आनंद म्हणजे काय याची आपल्याला खरी ओळख पटते.

–संकेत शिंदे

आपली ओंजळ ही खूप छोटी असते, पण त्यात मावणारं सुख, आनंद, प्रेम, दान खूप मोठं असतं. ओंजळभर पाण्याने एखाद्याची तहान भागते, ओंजळभर आनंद कुणाला दिला तर एखाद्याचे मन सुखावते. भुकेने व्याकुळ होणार्‍याला ओंजळभर धान्य दिलं तर त्याची भूक शमते. ज्ञान वाटल्याने आपले ज्ञान अजून वाढते. आपल्याकडे असलेल्या कोणत्याही गोष्टीचे ओंजळभर दान केल्याने आपली भरभराट होते. ही हाताची ओंजळ म्हणजे दिसायला छोटी पण तिच्यात मावणारे प्रेम, आपुलकी, माया, आनंद, सुख, ज्ञान हे आभाळाएवढे विशाल आणि समुद्रासारखे विस्तारलेले असते. कुणाचा आनंद, सुख, समाधान, धन-संपत्ती हिसकून घेण्यापेक्षा आपल्याकडे असलेले सुख, आनंद, संपत्तीचा अगदी ओंजळभर भाग जरी आपण कुणाला देऊ शकलो तर त्याने मिळणारे समाधान, आनंद, सुख खूप मोठे असते. जे आपली ओंजळ अजून भरून टाकते. म्हणून जास्त देऊ शकत नसाल तरी चालेल, पण ओंजळभर सुख नक्कीच वाटण्याचा प्रयत्न करा.

- Advertisement -

आपण जेव्हा देत असतो तेव्हा दया असो की माया असो, जीव असो की प्राण असो, जेव्हा एका हाताने देतो तेव्हा देव दुसर्‍या हाताने देत असतो. म्हणजे उशिरा का होईना पण देव देतोच आपल्याला कळतदेखील नाही. म्हणून आपले विचार, मन, हृदय नेहमी साफ असायला हवे. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा ठेवू नका. निदान मूठभर नाही तर चिमूटभर तरी द्यावे. भुकेलेल्या जीवाची भूक आणि तहानलेल्या जीवाची तहान जरी जाणली तरी पुरे झाले. नाहीतर आज समाजात हे कुठे दिसून येते. एखाद्या गोष्टीत, कलेत आपण माहीर असतो.

मलाच सगळं येतं, मलाच सर्व कळतं असा विचार ठेवून इतरांना संधी न देण्याचा स्वार्थीपणा करण्यापेक्षा जर आपल्याला जे येते ते दुसर्‍यांना शिकवून पाहा. आपल्याकडे असणार्‍या गोष्टी इतरांना देऊन टाकल्याने आपण गरीब नाही तर लाखपटींनी श्रीमंतच होत असतो. पण हे वास्तव लोक लक्षात घेताना दिसत नाहीत. जे हे लक्षात घेतात, त्यांच्या जीवनात ते आनंद निर्माण करतात आणि त्याचसोबत दुसर्‍यांच्या जीवनात आनंद निर्माण करतात. खरे तर आपल्याकडील ज्ञान आणि कला ही दुसर्‍याला दिल्याने कमी होत नाही, तर ती वाढत जाते. पण त्यासाठी आपले मन अधिक व्यापक करून अनेकांना आपल्या मनाच्या कक्षेत आणण्याची गरज असते.

- Advertisement -

कधीही केवळ एकटे मोठे होण्याचा विचार तुमचा घात करतो. त्यापेक्षा जर मिळून मोठे होण्याचा प्रयत्न कराल तर नेहमी फायद्यात राहाल हे निश्चित असते. कधी ऐकलंय का, कोणत्याही खेळात, ग्रुप स्पर्धांमध्ये केवळ एकाच व्यक्तीमुळे ती स्पर्धा जिंकली आहे. नाही ना! मग आपल्याही आयुष्याचे असेच आहे. अशा वेळी मागचे दिवस आठवून बघा, जेव्हा आपल्या सोबत पूर्ण जग विरोधात होते तेव्हा आपलेच घरचे लोक आपल्या सोबत होते आणि ते होते म्हणूनच आज आपण इथे आहोत.

निदान हा विचार जरी मनात आला तरी पुरे, असो. ज्यावेळी सोबतीने, लोकांना धरून तुम्ही आयुष्य जगायला सुरू कराल तेव्हा ते अधिक चांगल्या पद्धतीने जगाल हे निश्चित. योग्य वेळी, योग्य प्रकारची संधी इतरांना देणं हेदेखील जमायला हवं व तेच खरे माणूस असण्याचे पहिले लक्षण आहे. ओंजळ सुखाची, ओंजळ प्रेमाची, ओंजळ ज्ञानाची, ओंजळ गाण्यांची, ओंजळ फुलांची, ओंजळ पाण्याची, ओंजळ आनंदाची, ओंजळ दानाची ही ओंजळ सतत भरभरून द्यावी, कधीच रिती नसावी. समाधानाची ओंजळ मनाला नेहमी सुखावत राहते. प्रत्येक वेळी आपल्याकडे खूप काही असेल असे नाही, त्यामुळे काही लोक असा विचार करतात की, माझ्याकडे खूप असते तर मी दुसर्‍याला दिले असते, पण एक लक्षात घ्यायला हवे की, आपल्याकडे जे आहे, त्यातील आेंजळभर जरी दिले तरी ते गरजवंतासाठी अतिशय महत्वाचे आणि प्रसंगी त्याचा जीव किंवा इभ्रत वाचवणारे असते.

जगात आपण सगळं विकत घेऊ शकतो, पण आपल्यावर मनापासून प्रेम करणारी माणसं विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यासोबत राहण्याचा आनंद, समाधान पैसा कमी असला तरी मिळवता येतो. आपला माणूस फक्त ओंजळभर प्रेमाचा, ओंजळभर सुखाचा भुकेलेला असतो. म्हणून पैसा आपल्याला आनंद देत नाही, तर तो केवळ आपली इच्छा, अपेक्षा, आवड, गरज पूर्ण करू शकतो. जेव्हा पैशांचा वापर करून आपण आपल्या माणसांसोबत राहतो, तेव्हा आपल्याला खरा आनंद मिळतो. हाच आनंद, सुख आपण दुसर्‍यांना, इतरांना देऊ तेव्हाच आनंद म्हणजे काय याची आपल्याला खरी ओळख पटते. नाहीतर नेहमी आपण हाच विचार करत असतो की, ही व्यक्ती आपल्या पुढे कशी चालली आहे, हा इतका सुखी कसा काय आहे तर मग लगेच त्याला खाली खेचण्याचे काम चालू होते.

त्यांचे सुख हिरावून घेण्यापलीकडे काहीच दिसत नाही. का…? का करावं पण, जर कुणाचं चांगलं करता येत नसेल तर निदान कुणाचं वाईट तरी करू नये, कुणी का असेना समोरच्या माणसाच्या हतबलतेचा कोणी फायदा घेत असेल तर आपली ती आयुष्यात केलेली सर्वात मोठी चूक असते असेच समजा. कारण आयुष्यात ह्याच गोष्टी करत राहाल तर आयुष्यात तुम्ही याव्यतिरिक्त केलं काय, समाजामध्ये आपली ओळखच खेकड्यागत असेल, म्हणून थोडासा प्रसंग मांडवासा वाटतोय. एका ठिकाणी जलचर प्राण्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यातील खेकड्यांच्या विभागात अनेक ठिकाणचे खेकडे ठेवण्यात आले होते. ठिकठिकाणाहून आणलेल्या खेकड्यांना बरण्यात भरून ठेवले होते. अनेक वैशिष्टे त्यांच्यात होती. काहीसा वेगळेपणादेखील होता. सगळ्या बरण्यांना झाकण लावले होते फक्त भारतातून आणलेल्या खेकड्यांच्या बरणीला झाकण लावले नव्हते. प्रदर्शन पाहायला आलेल्या लोकांमधील एका व्यक्तीस हा प्रश्न पडला. अर्थात त्या प्रश्नाचे निराकरण केले गेले. सगळ्या खेकड्यांच्या बरण्यांना झाकण लावले आहे.

कारण ते बाहेर येण्याचा प्रयत्न करताहेत, पण भारतातून आलेल्या बरणीला झाकण लावायची गरजच नाही. कारण यातील एकाने वर चढण्याचा प्रयत्न केला की दुसरा त्याला खाली खेचतो. त्यामुळे यातील एकही जण बाहेर जाणार नाही याची खात्री होती. त्यामुळे ती बरणी झाकण न लावताच ठेवली होती. मनाला वाईट वाटले. ह्या अर्थाने या गोष्टीकडे बघताना आपल्याकडे ही वृत्ती का वाढावी, ही खेदाची गोष्ट आहे. माझे भले व्हावे, दुसर्‍याचे नाही झाले तरी चालेल. इतका का स्वार्थीपणा आला आहे. दुसर्‍याचे आपण कितीही काढून घेतले तरी ते आपल्याला पुरू शकत नाही आणि आपल्या नशिबातले कोणी घेऊन जाऊ शकत नाही. हा साधा विचार का शिवत नाही मनाला कोणास ठाऊक? म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्या माणसांसोबत सर्व छोटे मोठे आनंदाचे क्षण जगण्यासाठी थोडा वेळ काढा. तुमचं प्रेम, सहवास त्यांना मिळू द्या. त्यांचं प्रेम तुम्हाला अनुभवता येऊ द्या. कारण तेच आपल्या जगण्याचं कारण असतं. कोणीतरी म्हटलंच आहे, आयुष्य जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहेच, पण पैसाच सर्व काही नाही.

खरोखरंच आपल्या आसपास असे अनेकजण असतात जे नेहमी लोकांच्या मिळकतीवर, श्रीमंतीवर चर्चा करत असतात. त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असतो, पण हेच जर ती व्यक्ती स्वतःच्या मिळकतीतून काही भाग गरजूंना देत असेल तर त्या व्यक्तीकडे पाहण्याची लोकांची नजर अतिशय सन्मानाची, आदराची असते. अशा व्यक्ती समाजासाठी पूजनीय असतात. आपणही आपल्या क्षमतेप्रमाणे समाजाला काही ना काही देण्याचा प्रयत्न नक्की करू. निदान काही नाही देता आले तरी चालेल, पण ओंजळभर सुख मात्र नक्की द्यावे. कारण तुमची श्रीमंती तुम्ही किती मिळवता यावर नाही तर तुम्ही किती निस्वार्थीपणे देऊ शकता यावर ठरत असते आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे मनापासून इतरांना देता, ते दुप्पट होऊन पुन्हा तुमच्या आयुष्यात येतच असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -