करोनाच्या अंधारात प्रेमाचा अंकुर

कोरोनाच्या काळातल्या या कथा प्रेमाच्या, कथा ओढीच्या. कथा प्रेमाच्या, पण प्रेमकथा-प्रणयकथा नाहीत. आठ लेखकांच्या आठ कथा गूढ, विस्मय, रहस्य, जळजळीत वास्तव, संदेह. भावनोत्कटता, कधी कडवटपणा जाणवणार्‍या, कल्पित वा भास, स्वप्न जागेपणा यांची सरमिसळ असलेल्या. तरीही प्रेमाच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या. प्रेम कुणावरही असतं, कोणत्याही प्रकारे व्यक्त होतं. बोलकं, मूक. स्पष्ट सूचक. करणार्‍यालाही आपण प्रेम करतोय हे कळत नाहीय, तरीही त्यांतून वास्तव दिसतंच. कधी ते आठवणीतलंही. अव्यक्त. या कथांना संदर्भ आहे करोनानं निर्माण केलेल्या परिस्थितीचा, मनावर केलेल्या परिणामांचा. ते या कथांमध्ये दिसतात. आठ कथालेखक. प्रत्येकाची धाटणी वेगवेगळी, त्यामुळे ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ या संग्रहात वैविध्य आहे.

जगावर मोठं गंडांतर आलं. जग थांबलं. कोविड-19 अर्थात करोनामुळं हे झालं. पुढं काही महिने लोक आपापल्या जागीच होते. म्हणजे घरात. मग ती कुठंही कशीही असोत. माणसं जमेल तसं जगत होती. नुसतं थांबून काय होणार? कुणी त्यातूनच काहीतरी नवीन घडवू पाहू लागलं. उपजीविकेसाठी किंवा राहिलेली हौस पुरी करण्यासाठी. कुणी आपण होऊन तर कुणी नाइलाजानं. पण जग थांबलं, तरी त्याचा श्वास चालू होता. तो चालूच राहायला हवा होता. माणसांचे विचार भावभावना जाग्या होत्या. कदाचित अधिकच तीव्र झाल्या होत्या. कुणी भावना बोलून दाखवत होतं, कुणी प्रत्यक्ष कृतीनं.. सारं वेगळंच. प्रेम तर शाश्वतच असतं. त्याचं रूप बदलतं. प्रत्येकाची प्रेम करण्याची रीत वेगळी. सारेजण एकसारखे थोडेच असतात!

कोरोनाच्या काळातल्या या कथा प्रेमाच्या, कथा ओढीच्या. कथा प्रेमाच्या, पण प्रेमकथा-प्रणयकथा नाहीत. आठ लेखकांच्या आठ कथा गूढ, विस्मय, रहस्य, जळजळीत वास्तव, संदेह. भावनोत्कटता, कधी कडवटपणा जाणवणार्‍या, कल्पित वा भास, स्वप्न जागेपणा यांची सरमिसळ असलेल्या. तरीही प्रेमाच्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या. प्रेम कुणावरही असतं, कोणत्याही प्रकारे व्यक्त होतं. बोलकं, मूक. स्पष्ट सूचक. करणार्‍यालाही आपण प्रेम करतोय हे कळत नाहीय, तरीही त्यांतून वास्तव दिसतंच. कधी ते आठवणीतलंही. अव्यक्त. या कथांना संदर्भ आहे करोनानं निर्माण केलेल्या परिस्थितीचा, मनावर केलेल्या परिणामांचा. ते या कथांमध्ये दिसतात. आठ कथालेखक. प्रत्येकाची धाटणी वेगवेगळी, त्यामुळे ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ या संग्रहात वैविध्य आहे.

नाउ यू सी मी… ही गणेश मतकरींची कथा वास्तव, भास, स्वप्न, स्मरणरंजन यांचं मिश्रण आहे, तिच्या भूत वर्तमान आणि कल्पित यांचं मिश्रण वेगळाच परिणाम साधतं, कारण नक्की काय होतंय हे न उमगल्यानं निवेदकाप्रमाणं वाचकही चक्रावून जातो. निवेदक, त्याची पत्नी (तिच्याशी आलेला दुरावा), वडील, आई, त्याचा कुत्रा आणि एक आठवणीतील बोका. या सार्‍यांची ही कथा आहे. वडिलांबाबतचं प्रेम, त्यांना भेटता न आल्याची सल, त्यांचा फोन, नंतर त्याआधीच ते गेल्याचं कळणं, हे सारं काही खिळवून ठेवणारं. शेवटी तो लिहितो… एक अप्पा पंचत्वात विलीन झाले असले, तरी दुसरे आहेतच की. हसते-खेळते. माझ्याशी बरोबरीच्या नात्याने गप्पा मारणारे! कधीतरी काळाचा हा बंद खोका उघडेल आणि ते पुन्हा एकदा माझ्यासमोर येऊन उभे राहतील असं मानायला काय हरकत आहे? ..हे वाचताना त्यानं काहीतरी सच्चेपणानं व्यक्त केलंय असं वाटतं.

बोजेवारांची निके निके चालन लगी… ही कथा करोनाबाबतच्या समजुतीवर आधारलेली. ती रहस्यकथेच्या अंगानं पुढे जाते. वाचकाला पुढं काय असं वाटत राहातं. जेलर एका कैद्याबरोबर करार करतो. त्याला सोडतो. तो कैदी करार पाळतो का, ज्या गुन्ह्यासाठी शिक्षा असते तो गुन्हा पुन्हा करतो का, असे प्रश्न पडत असतानाच वेगळं वळण घेत कथा पुढे जाते.. कैदी, त्याचं सावज यांच्या भावनांत होणारा बदल असं सारं घडवून कथा संपते.

नीरजा एक तुकडा आभाळाचा.. आत्मनिवेदन रूपानं ती ची कथा सांगतात. पती गेल्यानंतर या एकटं पडल्याच्या काळात उसळून येणार्‍या तिच्या आठवणी, विचार, त्यांचं मोकळेपणानं त्याच्यापुढं उघडं केलेलं मन. अव्यक्त प्रेम आता बोलकं झालंय. ती म्हणतेः जसजसे दिवस जातात तसतशी ती दुःखाची धार कमी होत असावी. माझ्या दुःखाची झाली आहे का? माहीत नाही, की धार नव्हतीच दुःखाला? याचा अर्थ असा नाही की माझं काळीज दगडाचं आहे. त्याला कल्पनेतच ती सारं सांगतीय.. म्हणते, वाईट वाटलंच रे, तसे ते वाईट नव्हते, माणूस म्हणून. प्रेम केलं का नाही, माहीत नाही. पण मला सांभाळलं. प्रेम केलं का नाही, माहीत नाही. पण मला सांभाळलं. शेवटी म्हणतेः ग्रुपवर व्यक्त होताना मन वाहायला लागलं तर असं भय माझ्यासारखं तुझ्याही मनात असेलच ना? ते आता आपल्याला कळायला हवं.. की तुझ्या मनात काही भलतंच आहे? हे सारं कळायला हवं .. आकाश … माझ्यासाठी एवढाच तुकडा आहे आनंदाचा.

श्रमिक जोडपं आणि त्यांची पोरगी यांची या काळानं केलेली अवस्था, गावी गेल्यावरही फरक न होता अधिकच क्लेषकारक कशी होते, गावकरी गावात घर असूनही येऊ देत नाहीत ही व्यथा. मायं गाव कोणतं.. या कथेत आहे. शेवट असा. ती मागे वळली तेव्हा तिच्याकडच्या बाचक्यात होत्या दोन गोधड्या आणि सतरंजी, तर दुसर्‍यात दोन भगुली, परात, तीन ताटं आणि दोन वाट्या. कपडे पिशवीत कोंबलेले आणि खांद्यावर होती दोन वर्षांची झोपलेली पोर. सरळ सोप्या शैलीमुळं परेश जयश्री मनोहर यांची कथा परिणामकारक होते.

मिताली आणि स्वप्नील या जोडप्याची बी निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह ही या काळातली कथा प्रवीण धोपट यांची. जोडप्याचे संवाद, वाद, थोडं चिडवणं, पुन्हा एक होणं, वाटणारी काळजी .. सारं काही उत्सुकता वाढवत जाणारी ही कथा, शेवटी सुखद धक्का देते. जस्ट अ लव्ह स्टोरी … मध्ये प्रणव सकदेव यांनी एका वेगळ्याच प्रकारचं प्रेम दाखवलंय. आई गेल्याचं दुःख सांगताना तो तिला म्हणतोः ती तर तुला घरचं धरून चालायची. मला बाहेर पाठवून तुम्ही रात्रभर बोलत बसायच्या. आई माझं सर्वस्व होती. तुम्ही दोघीच होतात मला. शेवटी प्रथमच तिला आडनावानं हाक मारतो आणि सॉरी म्हणून ती उठते. तो म्हणतो .. म्हणजे आपल्यात जे काही घडलं, ती होती जस्ट अ लव्ह स्टोरी.

वास्तव आणि कल्पनेच्या जगाची सरमिसळ असलेली फँटसी म्हणजे मनस्विनी लता रवींद्र यांची जादूची बोट. कल्पनेचं राज्य आपलंच असतं. तिथं काहीही करता येतं. मध्येच वास्तवाची जाणीव होते, तरी मन कल्पनेच्या जगात राहण्याचाच प्रयत्न करतं, हे सिनेमाच्या धाटणीत सांगणारी ही कथा. शेवटची कुयला ही कथा विज्ञान, मायथॉलॉजी, प्रतीकं, समज अंधश्रद्धा या वाटेनं आदिम काळापासून थेट आताच्या काळात येते. लेखक सांगतोः लिहिण्याच्या किड्याचं रूप घेऊन आलेला कुयला. त्याचीच ही कथा. त्याच्यावर अतोनात प्रेम करणारा तो, ते समागमाच्या पलीकडचं. पण चार महिन्यांनी का होईना त्याच्याशी समागम करून ते शांतनिवांत कुशीत घेणारं प्रेम त्याला गवसलंच. किड्याचं वळवळणं काहीकाळ थांबलं, त्यातून गोष्ट निर्माण झाली. छापली जाऊ दे वा पडून राहू दे, त्याला काही देणं घेणं नाही.

-लव्ह इन द टाइम ऑफ करोना
-संपादनः अनुजा जगताप.
-प्रकाशकः रोहन प्रकाशन.
-पानेः 200; किंमतः 250 रु.
– आ. श्री. केतकर