बंध हृदयाचे तुटताना…

भारतीय दंड विधान संहिता कायद्यात दोन सज्ञान व्यक्तींनी संमतीने एकमेकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास तो कायद्याचे कलम ३७६ प्रमाणे गुन्हा ठरत नाही. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असली तरी, पुढे जोडप्यात वाद झाला तर वादाचे रूपांतर तक्रारदार अनेक वेळा ‘संमती’ ऐवजी ‘बळजबरी’ या शब्दाचा वापर करते. अशा ‘प्रेमा’च्या त्सुनामीत अनेक निरपराध तरुणांना नाहक जेलची हवा खावी लागते. लग्नाचे आश्वासन, फसवणूक, शारीरिक संबंध आणि त्यातून झालेले बलात्काराचे आरोप ह्या गोष्टींचा परिणाम अनेकांना सामाजिक जीवनातून उठवतो. त्यामुळे अनेक तरुणांना प्रेम करावे की करू नये? भविष्यात आपल्यावरही असे आरोप होणार नाहीत ना? असे विचार अनेक वेळा मनात येतात.

प्रेम ही दोन हृदयाची गुंफण, हे बंध जसे फुलतात, बहरतात, त्यास चैतन्याचे धुमारेही फुटतात, तर कधी कधी अचानक तितक्याच गतीने तुटतातही. जुळलेली मनं तुटताना त्याला तितकीच धार येते, काचेसारखी, जी सुरवातीला गुळगुळीत मोहक, वास्तवाचे चित्रण करणारी, आणि तुटल्यावर शस्त्रासारखी भेदक होऊन शिरच्छेद करणारी, वास्तवाचा विपर्यास करणारी. अशाच प्रेमाच्या काळोखात गुंतलेल्या दोन हृदयाचे बंध तुटल्यावर बदलाच्या भावनेतून एकमेकास संपूर्णपणे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांना धडा शिकवण्यासाठी वाटेल ती टोकाची भूमिका घेऊन गंभीर गुन्ह्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका प्रकरणात मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने अन्सार मोहम्मद विरुद्ध राजस्थान राज्य या खटल्यात निकाल देताना असे स्पष्ट केले.

‘संबंध’ बिघडल्यावर महिला पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही. प्रकरणातील २१ वर्षीय महिलेचे आरोपीशी चार वर्षापासून प्रेम संबंध होते. दोघांमध्ये वाद झाल्याने त्यांचे संबंध संपुष्टात आले. त्यानंतर फिर्यादी महिलेने सदरचा गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आरोपीने या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केला. खालच्या कोर्टाने नाकारला म्हणून त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली व आरोपींला अटकपूर्व जामीन मंजूर केला. खरंतर हा न्यायनिवाडा एक मार्गदर्शक निवाडा म्हणून पुढे भारतभरातील न्यायव्यवस्थेत वापरला जाणार आहे.

भारतीय दंड विधान संहिता कायद्यात दोन सज्ञान व्यक्तींनी संमतीने एकमेकांशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास तो कायद्याचे कलम ३७६ प्रमाणे गुन्हा ठरत नाही. ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ असली तरी, पुढे जोडप्यात वाद झाला तर वादाचे रूपांतर तक्रारदार अनेक वेळा ‘संमती’ ऐवजी ‘बळजबरी’ या शब्दाचा वापर करते. अशा ‘प्रेमा’च्या त्सुनामीत अनेक निरपराध तरुणांना नाहक जेलची हवा खावी लागते. लग्नाचे आश्वासन, फसवणूक, शारीरिक संबंध आणि त्यातून झालेले बलात्काराचे आरोप ह्या गोष्टींचा परिणाम अनेकांना सामाजिक जीवनातून उठवतो. अनेक तरुणांना प्रेम करावे की नाही ? भविष्यात आपल्यावरही असे आरोप होणार नाही ना? ह्याचाही विचार अनेक वेळा मनात येतो.

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं, हे फक्त बोलण्यापुरते असतं, प्रेम युद्धात अडकलेल्या शरणार्थीची काय हालअपेष्टा तुरुंगात होते त्यांनाच ठाऊक. कधी कधी नितळ भावनेतून केलेले प्रेम पुढे काही कारणामुळे पातळ होत जाते. प्रेम हा विषय काचेच्या भांड्यासारखा, स्वच्छ आणि पारदर्शी वाटत असला तरी, परंतु संबंधांना तडा गेल्यानंतर ते तितकेच गुंतागुंतीचे ठरते. कधी-कधी त्यात चांगल्या प्रेमाची परिणती बलात्कारात नकळत होऊन जाते. त्याच्या अनुषंगाने वादाचे रूपांतर खून, आत्महत्या, बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये रूपांतर होते. बलात्कार हा शब्द ऐकताना किळसवाणा वाटतो, त्यामुळे पीडित स्त्रीच्या सामाजिक, मानसिक भावना, चारित्र्य, शरीर, मनावर न भरून येणारा आघात होतो, परंतु तोच गुन्हा खोटा असेल इतका त्याचा तितकाच आघात पुरुषावर होऊन त्याचे सामाजिक जीवन उध्वस्त होऊन भविष्य बरबाद होते. त्यामागील वास्तव जाणून घेणे गरजेचे आहे.

तरुण-तरुणींमधील प्रेमाचे रुपांतर घनिष्ठ मैत्रीतून, परस्पराच्या आकर्षणातून ते शरीर संबंधापर्यंत पोहोचते, त्यातून अनेक वेळा असुरक्षित शारीरिक संबंधातून गर्भधारणा होते, त्यानंतर पुरुषास लग्नासाठी गळ घातली जाते, तसेच पालकत्वाची जबाबदारी घेण्यास सांगितले जाते, तेव्हा त्यास नकार दिल्याने शेवटी त्याचे रूपांतर बलात्काराच्या गुन्ह्यात परावर्तीत होते. मोठ्या शहरांमध्ये एकत्र काम करणारे किंवा कायम संपर्कात येणारे तरुण-तरुणी प्रेमात पडल्यानंतर हल्ली ‘लव्ह इन रीलेशनशिप’ मध्ये जोडले जातात. पुढे त्याचे रूपांतर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये होते, जो मॉडर्न काळात लग्नाला पर्याय समजला जाऊ लागला आहे, त्यात वाद झाल्यास अनेक वेळा त्याची परिणती बलात्काराच्या गुन्ह्यापर्यंत पोहोचते. प्रथमता लग्नाची मागणी केली जाते, त्यास नकार दिल्यास लग्नाचे खोटे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपात अनेकांना आरोपी म्हणून जेलवारी पदरात पडते. त्यामुळे शारीरिक संबंध ठेऊन लग्नास नकार दिल्यास आपण फसवणूक आणि बलात्काराच्या गुन्ह्यात आरोपी होऊ का, असा अनेकांना प्रश्न पडतो. त्यामुळे खरंतर या गोष्टी टाळण्यासाठी कायदाही बघणे गरजेचे आहे.

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, फसवणूकीबाबत शेकडो गुन्हे एकट्या महाराष्ट्रात वर्षाला दाखल होतात, भा. द. वि. कलम ३७६ खाली बलात्काराचा, कलम ४२० प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा हा तडजोडीस पात्र नसलेला असतानासुध्दा फिर्यादी स्वतः गैरसमजातून तक्रार दिल्याचे मान्य करते. साक्षीदार फितूर होऊ नये म्हणून न्यायाधीशासमोर फिर्यादीचा घेतलेला जबाब ती दबावात दिल्याचे सांगते. ९० टक्के प्रकरणे कोर्टाबाहेर तडजोडी करून संपवली जातात. शेवटी फितूर साक्षीदाराच्या साक्षीवर भर न देता न्यायाधीशांना आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष सोडण्याशिवाय पर्याय उरत नाही. खटल्याचा निकाल देताना हल्लीच्या काळात फिर्यादी व आरोपी यांच्यामध्ये मोबाईल संभाषण कॉल डिटेल्स, फिर्यादीची वर्तणूक व चारित्र्य, आरोपीची वर्तणूक यासुद्धा गोष्टी न्यायाधीश विचारात घेतात.

खरंतर एकंदर बलात्काराच्या केसमध्ये राष्ट्रीय क्राईम रिपोर्टच्या आधारे जवळच्या नातेवाईक व ओळखीच्या लोकांकडून अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यात प्रेमसंबंध, व्यावहारिक, व्यावसायिक संबध, लग्नाचे खोटे आमिष दाखवून ठेवलेले संबध, एकमेकांचे आकर्षण, प्रेमभंग, आंतरजातीय प्रेमविवाह, इतर वाद अशा अनेक वेगळ्या बाजूंची किनार आहे. त्या बाजूंचीसुद्धा तपासणी करण्याची जबाबदारी न्यायाधीश, पोलीस यंत्रणा व वकिलावर असून प्रकरणातील सत्यशोधन करणे मोठे आव्हान होऊन बसते. खरे काय आणि खोटे काय? हे फक्त अत्याचार करणारा आणि पीडितेलाच माहिती असते. सुरुवातीला सर्व काही आलबेल वाटत असताना अनेक वेळा सामान्य माणसे प्रेम म्हणता म्हणता, त्यात भरकट जाऊन नकळत मोठ्या गुन्ह्याची शिकार होऊन बसतात. कधीकधी स्वप्नात दिसणार्‍या ‘बेड्या’ प्रत्यक्ष हातात पडतात, आणि माणूस एका मोठ्या षङ्यंत्राचा भाग बनून फसून जातो. त्यामुळे प्रेम करताना तितकेच डोळस आणि संवेदनशील मनाने केले पाहिजे. अन्यथा हृदयाचे बंध तुटल्यानंतर प्रेम करणारा प्रेमवीर हा प्रेमाच्या कैदेतून थेट तुरुंगातील कैदी बनतो हे लक्षातही येत नाही.

–अ‍ॅड. गोरक्ष कापकर ,संगमनेर