आनंदघन

Subscribe

खेबुडकर म्हणाले, ‘व्वा, गायिका म्हणून तुमच्याकडची प्रतिभा आजवर आम्हाला माहीतच आहे, पण गाण्यात एखादा समर्पक शब्द सुचवताना तुमच्या प्रतिभेच्या ह्या पैलूचीही आम्हाला ह्या निमित्ताने ओळख झाली.’ पुढे ‘साधी माणसं’तलं ते गाणं लोकांसमोर आलं. लोकांना आवडलं. आधी आनंदघन नावाचे हे कुणी नवेकोरे संगीतकार आले आहेत असं सिनेमाप्रेमींना वाटलं. पण हळूहळू त्याचा उलगडा झाला आणि आनंदघन म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द लता मंगेशकरांनीच हे नाव धारण केलं असल्याचं कानोकानी झालं.

गीतकार जगदिश खेबुडकरांनी साधी माणसं नावाच्या सिनेमासाठी गाणं लिहिलं होतं. गाण्याचे शब्द होते-ऐरणीच्या देवा तुला अगिनफुलं वाहू दे. खेबुडकरांच्या ह्या शब्दाला संगीताचा साज देत होत्या दस्तुरखुद्द स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर. पण संगीतकार म्हणून नाव होतं आनंदघन. लता मंगेशकरांनी संगीतकार म्हणून ते नाव धारण केलं होतं. खेबुडकर कोल्हापुरातल्या एका शाळेत तेव्हा शिक्षक होते. लता मंगेशकरांना त्या गाण्यासाठी ज्या दोन-चार चाली सुचल्या होत्या त्यातली एक चाल त्यांना जरा जास्तच पसंत पडली होती. पण खेबुडकरांनी लिहिलेला ‘अगिनफुलं’ हा शब्द त्यांना काहीसा खटकत होता. अगिनफुलं ह्या एका शब्दापेक्षा सरळ सरळ ‘ठिणगी ठिणगी’ असे दोन शब्द सुटे सुटे लिहून गायले जावेत असं त्यांना वाटत होतं. त्यासाठी मुंबईहून त्यांनी खेबुडकरांना कोल्हापूरच्या त्या शाळेत फोन लावला. त्यावेळी मुंबईहून बाहेर फोन करायचा झाल्यास महागडा ट्रंक कॉल लावायला लागायचा. पहिल्या वेळी हा फोन लावला तर खेबुडकर एका वर्गात शिकवायला गेले होते. त्यामुळे त्यांचा तो तास कधी संपेल हे लता मंगेशकरांनी विचारलं आणि त्याप्रमाणे फोन लावला. लता मंगेशकरांनी फोनवर खेबुडकरांना अगिनफुलं हा शब्द बदलून त्या ठिकाणी ठिणगी ठिणगी हे शब्द तुमच्या अनुमतीने घेतले तर चालतील का, असा विनंतीपूर्वक प्रश्न केला. खेबुडकरांनाही ते शब्द साधेसोपे आणि गाण्याच्या मुखड्याला लावलेल्या चालीत प्रवाही वाटले.

वर ते लता मंगेशकरांना म्हणाले, ‘हे शब्द कुणाला सुचले?’
लता मंगेशकर नम्रपणे म्हणाल्या. ‘चाल सुचता सुचता मलाच ते सुचले.’

- Advertisement -

खेबुडकर म्हणाले, ‘व्वा, गायिका म्हणून तुमच्याकडची प्रतिभा आजवर आम्हाला माहीतच आहे, पण गाण्यात एखादा समर्पक शब्द सुचवताना तुमच्या प्रतिभेच्या ह्या पैलूचीही आम्हाला ह्या निमित्ताने ओळख झाली.’
पुढे ‘साधी माणसं’तलं हे गाणं लोकांसमोर आलं. लोकांना आवडलं. आधी आनंदघन नावाचे हे कुणी नवेकोरे संगीतकार आले आहेत असं सिनेमाप्रेमींना वाटलं. पण हळूहळू त्याचा उलगडा झाला आणि आनंदघन म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून खुद्द लता मंगेशकरांनीच हे नाव धारण केलं असल्याचं कानोकानी झालं.
आनंदघन हे नाव आणि त्या आनंदघनातून बरसणारं संगीत ह्याबद्दल नंतर बर्‍याच चर्चा सुरू झाल्या. आनंदघन हे मंगेशकर कुटुंबियांपैकी कुणाचं नाव असेल?…मंगेशकर कुटुंबियांमध्ये ह्या नावाचं कुणी नसेल तर मग लता मंगेशकरांनी हे नाव धारण करण्याचं कारण काय?…हे इतकं काव्यात्म नाव त्यांना कुणी सुचवलं असेल?…त्यांच्या घरी येणार्‍या एखाद्या कवीने, विशेषत: त्यांचा धाकटा भाऊ हृदयनाथ मंगेशकरांच्या तशाच एखाद्या कविमित्राने तर सुचवलं नसेल ना?…की लता मंगेशकरांच्या निकट असलेल्या कुणा कवयित्रीने सुचवलेलं असेल? आनंदघन ह्या नावाबद्दल तेव्हा काही जणांना असे बरेच प्रश्न पडले होते. पण खरी गंमत वेगळीच होती.

झालं होतं असं की, भालजी पेंढारकर तेव्हा एका सिनेमाच्या तयारीत होते. सिनेमाचं नावही त्यांनी ठरवून टाकलं होतं. ‘मोहित्यांची मंजुळा.’ त्यांच्या ह्या सिनेमासाठी त्यांना संगीतकार मिळत नव्हता. आघाडीच्या संगीतकारांपैकी एकही संगीतकार त्यांच्या ह्या सिनेमासाठी उपलब्ध होत नव्हता. वसंत देसाई व्ही. शांतारामांच्या सिनेमासाठी आधीच बुक झाले होते. सुधीर फडके पुण्यातल्या एका कामात बिझी होते. ते त्या कामातून कधी मोकळे होतील हे त्यांना सांगता येत नव्हतं. इतरांच्या बाबतीतही अशीच गोची झाली होती. लता मंगेशकरांनी इतर काही संगीतकारांची नावं सांगून पाहिली, पण भालजींना त्यांच्या त्या सिनेमासाठी ती पटली नाहीत.

- Advertisement -

भालजी पेंढारकर आपल्या ह्या अडचणी सांगता सांगता लता मंगेशकरांना म्हणाले, ‘हे बघ लता, माझ्या ह्या सिनेमात लढाई, घोडे असा सगळा मामला आहे, त्यात संगीत ह्या प्रकाराला फारसा वाव नाही, पण तरीही काही गाणी त्या कथानकाचा लोकांच्या मनावरचा ताण घालवण्यासाठी लागणार आहेत.’
आपली ही अडचण बोलून दाखवतानाच भालजींनी लता मंगेशकरांना आपल्या सिनेमासाठीच्या तीन गाण्यांचे शब्दही सांगून टाकले- ‘निळ्या आभाळी कातरवेळी’, ‘बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला’, ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुनाची भीती.’ लता मंगेशकरांनी हे शब्द ऐकले आणि त्या भालजींना म्हणाल्या, ‘बाबा, मग तुमच्या सिनेमाला मीच संगीत देते.’
भालजी त्यांना म्हणाले, ‘अगं, तुझं नाव गायिका म्हणून मोठं आहे. तू जर संगीत दिलंस आणि त्यात जर तुला अपयश आलं तर तुझं नाव उगाच खराब हाईल…आणि तुला संगीत द्यायचंच असेल तर एखाद्या हिंदी सिनेमाला दे, माझा हा सिनेमा म्युझिकल नाही. ऐतिहासिक आहे.’

पण लता मंगेशकरांनी त्यावर उपाय सुचवला. त्या भालजींना म्हणाल्या, ‘मग आपण माझ्यासाठी टोपणनाव घेऊया.’
तोपर्यंत ‘निळ्या आभाळी कातरवेळी’ ह्या गाण्याची चालही लता मंगेशकरांना सुचली. ती त्यांनी भालजींना फोनवर ऐकवली. भालजींसारख्या कसबी कलाकाराला ती मनापासून आवडली. त्यावेळी हृदयनाथ मंगेशकर हैदराबादला होते. त्यामुळे ह्या गाण्याच्या म्युझिक अ‍ॅरेंजमेंटसाठी ते उपलब्ध होऊ शकणार नव्हते. पण त्यासाठी लता मंगेशकरांनी दत्ता डावजेकरांची मदत घेतली. ती घेताना त्यांना लता मंगेशकर म्हणाल्या, ‘कोणत्याही वादकाला मी संगीत देतेय असं सांगू नका. कुणी विचारलंच तर कोल्हापूरचा एक नवीन संगीतकार संगीत देतोय असं सांगा.’
शेवटी अशा कसरती करत लता मंगेशकरांनी ती संगीताची जबाबदारी पार पाडली. शेवटी टोपणनाव काय घ्यायचं, हा प्रश्न आला. भालजींनी जयशंकर हे नाव सुचवलं. पण लता मंगेशकर तेव्हा संत रामदास वाचत होत्या. त्यातले आनंदवन-भुवनी हे शब्द त्यांच्या मनात बरेच दिवस तरळत होते. त्यावरूनच त्यांनी नाव धारण केलं -आनंदघन.

…आणि त्या काव्यात्म नावाप्रमाणेच लता मंगेशकरांनी काव्यात्म संगीतही दिलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -