घरफिचर्ससारांशमाधुरीची धकधक ‘दि फेम गेम’

माधुरीची धकधक ‘दि फेम गेम’

Subscribe

नुकतीच एक वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे, जी देशातील एका अशाच लोकप्रिय अभिनेत्रीच्या वैयक्तिक जीवनात घडणार्‍या घटनांचे काल्पनिक चित्रण करते. सुरुवातीला फाइंडिंग अनामिका नावाने रिलीज होऊ इच्छिणार्‍या सीरिजने शेवटी ‘दि फेम गेम’ नाव धारण केलं आणि ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे ओटिटीवर पदार्पण आणि सुरुवातच नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मवरून मिळणार म्हटल्यावर या सीरिजकडून अपेक्षादेखील तितक्याच होत्या, प्रेक्षकांना आवडणारा आणि सध्या सर्वत्र चालणारा असा विषय घेऊन त्यावर वेबसिरीज बनविणे कठीण काम होते, पण ते काम दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी योग्यरीत्या पार पाडले आहे.

इतरांच्या आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायला सामान्य नागरिकाला फार रस असतो, त्यातल्या त्यात तो इतरजर एखादी प्रसिद्ध व्यक्ती असेल तर हीच उत्कंठा शिगेला पोहचते. भारतीय समाजाला प्रसिद्ध व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललंय हे जाणून घ्यायची प्रचंड घाई लागली आहे, आता त्यात फार गैर नसलं तरी यामुळे माध्यमांवर मात्र दडपण आलंय आणि आधीच बातमीपासून दूर गेलेली माध्यमं याच मसाल्याच्या शोधात आपलं काम विसरून गेली आहेत. गेल्या 2 वर्षांचा इतिहास जरी तपासला तर प्रत्येक 2/3 महिन्यात अशी एखादी स्टोरी आपल्यासमोर आलेली आहे. प्रकरण सुशांत सिंगचे असो किंवा आर्यन खानचे त्यात सत्यता काय ? हे तपासण्या आधी किंवा सत्य बाहेर येण्याआधीच अनेक अफवा आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील बाबी आपल्यासमोर आल्या. नुकतीच एक वेब सिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे, जी देशातील एका अशाच लोकप्रिय अभिनेत्रीच्या वैयक्तिक जीवनात घडणार्‍या घटनांचे काल्पनिक चित्रण करते.

सुरुवातीला फाइंडिंग अनामिका नावाने रिलीज होऊ इच्छिणार्‍या सीरिजने शेवटी फेम गेम नाव धारण केलं आणि ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. धकधक गर्ल माधुरी दीक्षितचे ओटिटीवर पदार्पण आणि सुरुवातच नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मवरून मिळणार म्हटल्यावर या सीरिजकडून अपेक्षादेखील तितक्याच होत्या, प्रेक्षकांना आवडणारा आणि सध्या सर्वत्र चालणारा असा विषय घेऊन त्यावर वेबसिरीज बनविणे कठीण काम होते, पण ते काम दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी योग्यरीत्या पार पाडले आहे. संजय कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी अनेक दशकांनी एकत्र येतेय आणि माधुरीचा डान्सदेखील पाहायला मिळतोय म्हटल्यावर तिच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी होती. बर्‍याच दिवसांपासून या सिरीजची चर्चादेखील बी टाऊनमध्ये रंगत होती. म्हणून याबद्दल असलेल्या अपेक्षा अधिकच वाढल्या होत्या, वेगळा विषय घेऊन त्याला प्रभावीरित्या सादर करण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे, मात्र याच भानगडीत अनेक अनावश्यक ट्रॅक मुख्य कथेला डिस्टर्ब करतात, ज्यामुळे प्रत्येकी 50 मिनिटांचे असणारे 8 एपिसोड मधेमधे थोडे रटाळ वाटायला लागतात.

- Advertisement -

रुपेरी दुनियेमागचे खरे वास्तव चित्र हे पहिल्यांदाच फेमगेमच्या माध्यमातून समोर आले आहे असं म्हणता येणार नाही, कारण याआधीही याच आशयाचे काही सिनेमे आपल्याकडे बनले आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा प्रतिसाददेखील मिळालाय. उदाहरणादाखल हिरोईन आणि फॅशन, पण वेबसिरीजच्या माध्यमातून अधिक डिटेलिंग करून हा विषय समोर आणण्याचा हा बहुधा पहिलाच प्रयत्न आहे. एक कलाकार पडल्यावर एकच भूमिका साकारतो, पण ती एक भूमिका टिकवून ठेवण्यासाठी त्याला समाजात वावरत असताना चेहर्‍यावर अनेक मुखवटे धारण करत विविध भूमिका पार पाडाव्या लागतात. फेम मिळवणं कदाचित सोपी गोष्ट आहे, पण ती फेम दीर्घकाळ टिकवून ठेवणं ही अतिशय कठीण गोष्ट आहे. त्यातल्या त्यात भारतात नायिकेसाठी ही फेम दीर्घकाळ कधीच टिकून राहत नाही. वयाची पस्तिशी ओलांडली की, तिच्या समोर नायिका सोडून मोठी बहीण किंवा आईच्या भूमिका यायला लागतात.

याच सर्वांवर भाष्य करणारी ही वेबसिरीज आहे, ज्याच्या केंद्रस्थानी आहे अनामिका आनंद (माधुरी दीक्षित) चे पात्र… देशातील आघाडीची नायिका म्हणून अनामिका आनंद सर्वांना परिचित आहे. जिचे वय झालेले असतानाही फॅन्स कमी झालेले नाहीत. बॉलिवूडची सुपरस्टार असलेली ही हिरोईन एक आई, पत्नी, मुलगी आणि प्रेमिका अशा विविध भूमिका एकाच वेळी पार पाडत असताना, अचानक एक दिवस गायब होते. मागचे 2/3 सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर तब्बल वीस वर्षांनी अनामिका आपला पूर्वीचा प्रियकर आणि इंडस्ट्रीचा सुपरस्टार मनीष खन्ना (मानव कौल) सोबत सिनेमा करत असते आणि त्याच दरम्यान एका ऍवार्ड शो नंतर ती घरातून गायब होते. सुपरस्टारचे अपहरण झाले की, हत्या ही बातमी वेगाने सगळीकडे पसरते आणि तपास सुरू होतो, ज्यात अनेक पात्रांवर संशय घेतला जातो.

- Advertisement -

अनामिकाचा पती निखिल मोरे (संजय कपूर), आई कल्याणी (सुहासिनी मुळे), मुलगी अमारा (मुस्कान जाफरी), मुलगा अविनाश (लक्षविर सरन), मेकअप आर्टिस्ट बिली आणि तिचा चाहता माधव (गगन अरोरा) या सर्वांकडे आपापली एक वैयक्तिक कहाणी आहे. ज्याचा अनामिकाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या संबंध असतो, पण तपास अधिकारी असलेल्या एसीपी शोभा त्रिवेदी (राजश्री देशपांडे )ला मात्र लवकर काहीच पुरावे सापडत नाहीत. आता विनापुराव्याशिवाय अनामिका आनंदचा खरा गुन्हेगार सापडतो का? अनामिका आनंदचे अपहरण झाले की हत्या? या सार्‍या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर तुम्हाला नेटफ्लिक्सवर ही संपूर्ण सिरीज पाहावी लागेल.

फेमगेम सुरुवातीला अनामिक आनंद कुठे आहे याचा शोध घेणारी एक मालिका वाटू शकते, पण जसेजसे आपण एक एक एपिसोड संपवत पुढे जातो तेव्हा आपल्याला लक्षात येते की, या सिरीजची कथा अनामिका कुठे आहे? अशी नसून अनामिका कोण आहे? याकडे जास्त लक्ष देते आणि म्हणून हा विषय थ्रिलरपेक्षा थोडा वेगळा ठरतो. म्हणून 8 एपिसोडमध्ये फक्त अनामिकाचा शोध असेल आणि थ्रिल असेल असा विचार करून जर आपण सिरीज बघायला बसलो तर मात्र आपला पूर्णतः भ्रमनिरास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही कथा काल्पनिक असली तरी प्रत्येक सुपरस्टारच्या वैयक्तिक जीवनात तो सुपरस्टार नसतोच आणि चेहर्‍यावरच्या मेकअपच्या आत तोदेखील अनेक मुखवटे घेऊन वावरत असतो, याचे दर्शन घडवणारी आहे. अभिनयाच्या बाबतीत माधुरी दीक्षितचा डान्स आणि तिचे फेशियल एक्स्प्रेशन्स कमाल वाटतात, डोळ्यात अश्रू असताना मेकअप करतानाचा सिन असो किंवा दुपट्टा मेरा नावाच्या गाण्यातले हावभाव ती आजही सर्वांवर भारी पडते.

संजय कपूर आणि माधुरी दीक्षितची जोडी बर्‍याच वर्षांनी एकत्र आली आहे आणि ती जोडी प्रेक्षकांनादेखील आवडेल. मनीष खन्नाच्या रूपात मानव कौल लक्षात राहतो खरा, पण जेव्हा तो एकटा वाटतो तेव्हाच. कारण माधुरी सोबतची त्याची केमिस्ट्री तितकीशी जमून आलेली नाही. माधुरीच्या आईच्या भूमिकेत असलेल्या सुहासिनी मुळेचे पात्रदेखील भाव खाऊन जाते. लक्षविर सरन आणि गगन अरोराचे पात्रदेखील लक्षात राहण्यासारखे आहे. राजश्री देशपांडेची भूमिका मात्र तितकी दमदार वाटत नाही, पोलीस अधिकारी म्हणून जितका प्रभाव अपेक्षित होता तितका सीरिजमध्ये दिसला नाही. फेमगेम ही एक अतिउत्तम प्रकारातली वेबसिरीज नाही, यात एपिसोड्सची लांबी अधिक असल्याने आणि तितकासा कनेक्ट शेवटपर्यंत राहत नसल्याने मध्यंतरात ही थोडी रटाळ बनते, दुसरी कमकुवत बाजू म्हणजे 8 एपिसोड्स पहिल्यांनंतर जेव्हा आपण क्लायमॅक्सकडे येतो, तेव्हा निराशा हाती लागते. पण तरीही जर तुम्हाला या विषयाची आवड असेल आणि माधुरी दीक्षितचे चाहते असाल तर ही सिरीज तुम्ही पाहू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -