-डॉ. ठकसेन गोराणे
देशभरातील हजारो कुटुंबातून अनेक सदस्य श्रद्धेपोटी आणि भक्तीभावाने महाकुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आणि स्नान करण्यासाठी प्रयागराज येथे गेले होते. मात्र या चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या दु:खाला पारावर नाही. शेकड्याने भाविक जखमी झाले. कदाचित त्यांच्यामध्ये अनेकांना आयुष्यभराचे अपंगत्व आले असणार, पण याचा विचार करण्यापेक्षा आणि मूलगामी मदत करण्यापेक्षा वेळ मारून नेणे, हे संबंधितांना सोईचे असते. हे सर्व स्वीकारण्याची जबाबदारी ज्यांची आहे तेच ही घटना लपवण्यासाठी पुढे सरसावताना दिसतात.
श्रद्धा आणि परंपरा या जडत्वासारख्या असतात. त्या वेळोवेळी तपासून कालसुसंगत कराव्या लागतात. त्यासाठी विचार आणि तर्क या गतिवादी साधनांचा उपयोग करावा लागतो. म्हणजे त्यातील फोलपणा आणि कालबाह्यता कमी होण्यास मदत मिळते. पण तसे करून द्यायला लोक सहजासहजी तयार नसतात. कारण तो कुटुंबातून, समाजातून संस्कारक्षम वयातच दृढ झालेला संस्कार असतो.
वास्तविक मानवी समाजाचा आजवरचा इतिहास पाहता असे लक्षात येते की माणसाने वेळोवेळी या सर्व श्रद्धा, परंपरा, विचार सामाजिक आणि नैसर्गिक अशा सर्व घटनांची आंतर्बाह्य चिकित्सा, तपासणी केलेली आहे. त्यातूनच त्याने आजपर्यंतचा विकास आणि प्रगती साधलेली आहे.
असे असले तरी प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी कोट्यवधींच्या संख्येने लोकसमुदाय का एकत्र झाला, हा प्रश्न शिल्लक राहतोच. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक भारतीय नागरिकाला त्याची श्रद्धा, उपासना, अभिव्यक्ती, विचार, धार्मिक आणि पारलौकिक कल्याण साधण्याचे स्वातंत्र्य जरूर दिलेले आहे. पण हे स्वातंत्र्य उपभोगताना काही निर्बंधही राज्यघटनेने घातलेले आहेत. त्यामध्ये हे सर्व करीत असताना सार्वजनिक आरोग्य, नीतिमत्ता आणि कायदा सुव्यवस्था राखली जाईल, ही बंधनं घातलेली आहेत.
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात घडलेल्या दुर्घटनेमध्ये हे निर्बंध पाळले गेले असते तर हकनाक भाविकांचा बळी गेला नसता, हे मात्र निश्चित. ज्यांच्या हाती राजसत्ता आहे, त्यांना ती कायमस्वरूपी टिकवण्यासाठी धर्मसत्ता आणि आर्थिक सत्ता बळकवण्याची आणि ती बळकट करण्याची घाई झालेली असते. त्यामुळे महाकुंभमेळ्यात लोकांचे, भाविकांचे, श्रद्धाळूंचे बळी गेले तरी अशा राजसत्ता टिकवण्यासाठी व उपभोगण्यासाठी वेडे झालेल्या लोकांना त्याचे काही देणेघेणे नसते.
मुळात लोकांच्या श्रद्धेला, भक्तिभावाला, आदरयुक्त साद घालून त्यांच्यासाठी आवश्यक त्या सुखसुविधा उभारून, असे उत्सव अतिशय कल्पकतेने परंतु सावधगिरीने आयोजित केले तर त्याला आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही. परंतु लोकांच्या धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्यात ज्यांना रस आहे, त्यांना लोकांच्या श्रद्धा, भावना,सुखदुःख यांच्याशी काही घेणे देणे नसते.
मौनी अमावस्येचा मुहूर्त साधण्याचे आणि गंगेवर स्नान केल्याने आपले पाप धुतले जाते, पवित्रता लाभते, पुण्य मिळते अशी खुळचट आणि भिकेला लावणारी वेडगळ कल्पना लोकांच्या डोक्यात घुसवून गर्दी जमवली गेली. त्यामुळे मुहूर्त साधण्याच्या नादात ऐनवेळी गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि त्यातून ही दुर्घटना घडली. दररोजच्या जगण्याच्या लढाईमध्ये लोक फारशा घटना लक्षात ठेवत नाहीत हे धूर्त राजकीय नेत्यांच्या अंगवळणी पडलेले सूत्र आहे. त्यामुळे पुढील कुंभमेळ्यात अशी दुर्घटना घडणारच नाही याच्याबद्दल काळजी करण्याचे शासन, प्रशासनाला आताच काही कारण नाही.
कारण 2003 साली नाशिकला झालेल्या कुंभमेळ्यात एका तथाकथित साधूने उधळलेली चांदीची नाणी मिळवण्याच्या नादात भाविकांनी प्रचंड गर्दी केली. त्यात चेंगराचेंगरी होऊन 29 भाविकांचा मृत्यू झाला होता. तरी पुन्हा आता प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात 30 भाविकांना आपले प्राण गमवावे लागले. खरं तर 2027 ला पुन्हा नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी आतापासूनच शासन, प्रशासनाने काळजी घ्यायला हवी.
महाकुंभमेळ्यासाठी देशभरातून आलेल्या भाविकांना डावलून, तिष्ठत ठेवून, अनेक राजकीय नेत्यांनी गंगेच्या पाण्यात उतरून स्वत:चे पाप धुण्याचे, पवित्र होण्याचे आणि पुण्य मिळवण्याचे कर्मकांड अतिशय निवांतपणे पार पाडले. त्यात बराच वेळ गेला. त्यामुळे भाविकांच्या भावनांचा कडेलोट झाला असणार. मुहूर्ताची वेळ साधण्यासाठी त्यांनी प्रचंड गर्दी केली. त्यातून ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे.
मागील पाच, सात वर्षांमध्ये काही राज्यांमधून ठराविक धर्माचा प्रचार, प्रसार करण्यासाठी काही तथाकथित धार्मिक बुवा, महाराज या राज्यातून त्या राज्यामध्ये कथा, प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने सतत फिरत असतात. तीन दिवसापासून दहा दिवसापर्यंत धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात.
लाखोंचा समुदाय जमवतात. स्थानिक राजकीय नेते त्यांना मनोभावे सहकार्य करतात. विशेष म्हणजे हे अनेक धर्मांमध्ये चालते. अलीकडे असे राष्ट्रीय पातळीवर धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाखाली कथा, प्रवचन करणार्या बुवाबाबांची संख्या झपाट्याने वाढते आहे. धर्म तत्त्वज्ञानाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी घटनेने त्यांना स्वातंत्र्य दिलेले आहे. सनदशीर मार्गाने त्यांनी ते करावे .
पण जेव्हा लाखोंच्या समुदायापुढे ते चमत्कार सदृश्य व अवैज्ञानिक गोष्टी लोकांना सांगतात. संविधानातील मूल्यांची हेळसांड, उल्लंघन, पायमल्ली करतात, विसंगत गोष्टी सांगतात. तेव्हा काही पुरोगामी विचारसरणीच्या व्यक्ती, संस्था, संघटना त्यांना विरोध करतात. कारण हे तथाकथित बुवा, महाराज हे, त्या त्या धर्मातील कथा, प्रवचना पुरते न बोलता समाजात धार्मिक द्वेष, धार्मिक तेढ, सामाजिक तेढ निर्माण होईल, असे सर्रास बोलतात. चमत्कार सदृश्य गोष्टी लोकांना सांगतात.
कायदेशीररित्या त्यांना विरोध केला की अशावेळी हे बुवा गाशा गुंडाळतात. एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी दुकान मांडतात, मात्र ज्यांचे राजकारण केवळ धर्माच्या कट्टरतेवर चालते, असे काही राजकीय नेते ह्या बुवाबाबांना पुन्हा आपापल्या मतदारसंघात आणतात आणि लोकांच्या धर्मश्रद्धेचा स्वत:साठी उपायोग करून घेण्याचा प्रयत्न करतात.
असे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अलीकडे सातत्याने घडत आहे. त्यामुळे तीर्थयात्रा, तीर्थस्थाने आणि कुंभमेळे या ठिकाणी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून असे अपघात, गैरप्रकार चेंगराचेंगरी, मृत्यू घडताना दिसतात. लोकांनी जत्रायात्रा, सण, उत्सव, समारंभ जरूर साजरे करावेत. पण स्वत:चे जीवित धोक्यात घालू नये. दैववादी व अंधश्रद्धाळू बनू नये. प्रत्येक घटना आणि गोष्ट तपासण्याची, चिकित्सा करण्याची सवय विकसित करावी.
पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, याची संपूर्ण काळजी घ्यावी.
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यामध्ये आणखी एक गोष्ट तीव्रतेने जाणवली. ती म्हणजे काही तथाकथित साधू तोंडातून, कपाळातून, हातातून आगीच्या ज्वाला काढताना दिसत होते. असे चमत्कारसदृश्य प्रकार करून ही तथाकथित साधू मंडळी लोकांमध्ये, भाविकांमध्ये अंधश्रद्धा, दैवी शक्ती, चमत्कार असे अवैज्ञानिक प्रकार रूजवण्याचे आणि पसरवण्याचे काम करताना दिसत होते. वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्याशी हे पूर्णपणे विसंगत आहे. केंद्र सरकारने या विरोधात तातडीने कायदा करण्याची गरज आहे.
एकविसाव्या शतकात आपण आज जगतो आहोत. मात्र महाकुंभमेळ्यातील अनेक घटना, कर्मकांडे पाहिल्यानंतर असे वाटत होते की, आजही अनेकांचे विचार आणि आचार हे बाराव्या शतकाला सुसंगत असेच आहेत. कुंभमेळ्याबद्दल संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगातून चारशे वर्षांपूर्वी सर्वांनाच खडे बोल सुनावलेले आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि नाशिकचे साहित्य वैभव असलेले कवी कुसुमाग्रज यांनी प्रत्यक्ष सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये फिरून, सिंहस्थ कुंभमेळा ही प्रबोधनपर आणि तितकीच वस्तुनिष्ठ आशय दर्शवणारी कविता लिहिलेली आहे.
२०२७ ह्या वर्षी नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र शासनाने संत तुकाराम महाराजांचे कुंभमेळ्याबद्दलची अभंग वाणी आणि कुसुमाग्रजांची सिंहस्थ कुंभमेळा, ही कविता तमाम भारतीय भाषांमधून भाषांतरित करून ती भारतभर प्रसारित करावी. म्हणजे नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी आपोआपच कमी होईल. आता लोकांनीच अधिक शहाणं व्हायला हवं.
स्वत: घामातून कमावलेला पैसा जेव्हा विविध कराच्या रूपाने सरकारच्या तिजोरीत भरला जातो. तेव्हा तो पैसा समाजाच्या, लोकांच्या आवश्यक त्या गरजांवर व ज्वलंत समस्या सोडवण्यासाठीच अगोदर खर्च केला पाहिजे, असा आग्रह लोकांनीच आता शहाणपणानं धरायला हवा. म्हणजे सगळ्यात दुर्घटना बर्यापैकी कमी होतील.