-अमोल पाटील
सबंध जग आजमितीला आपल्या लोकशाही व्यवस्थेकडे अत्यंत कौतुकाने आणि आदराने पाहत आहे. एवढ्या मोठ्या देशामध्ये ही व्यवस्था उभी करणे आणि ती यशस्वीपणे राबवणे हे खरोखरंच कौतुकास्पद असेच आहे. येथील प्रत्येक व्यक्तीला आपले अमूल्य मत नोंदवून त्याद्वारे आपले लोकप्रतिनिधी निवडून कायदेमंडळात पाठवता येतात ही प्रक्रिया अप्रतिमच. आपला देश विविधतेने नटलेला आहे. या विविधांगी देशात एकतेला प्रचंड महत्त्व आहे. जेव्हा प्रश्न राष्ट्राचा येतो तेव्हा प्रथमत: आणि अंतिमत: राष्ट्र प्रगतीला प्राधान्य देणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्यच आहे.
आपल्या प्रत्येकाने मिळून हा आपला देश आज उभा राहिलेला आहे. आपल्या प्रत्येक कृतीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या अवतीभोवतीच्या समाजावर व अंतिमत: राष्ट्रावर परिणाम होत असतो. जेव्हा राष्ट्रातील प्रत्येक नागरिकासाठी अग्रक्रमाने प्रथमत: आणि अंतिमत: राष्ट्रहित असते तेव्हा त्या देशाचा सर्वोदय होण्यास विलंब लागत नाही. आपल्या संविधानाने आपल्या सर्वांना दिलेला थोर अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आहे.
एक अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जेव्हा आपण या अधिकाराचा वापर करू तेव्हा निश्चितच आपल्याच मताद्वारे आपण आपल्या भविष्याची निवड करणार असतो, असे म्हटले तर अजिबात वावगे ठरणार नाही. खरंतर आपला उमेदवार निवडताना त्या उमेदवाराचे चारित्र्य, गोरगरिबांच्या प्रश्नांची त्याला असलेली जाण, निस्वार्थ व निरपेक्ष भावना आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भविष्यकालीन धोरणात्मक तरतुदींबाबत त्यांच्या ठायी असलेला अभ्यास व दृष्टिकोन आदी बाबी तपासण्याची गरज आहे.
या सर्व पैलूंवर खरा ठरलेला उमेदवारच निवडून देण्याकडे खरंतर सूज्ञ मतदारांचा कल असला पाहिजे. उमेदवार निवडीच्या वेळेस सर्व प्रकारचे पूर्वग्रह, भेदाभेद निर्माण करू पाहणारे कुविचार व संधीसाधू लोकांकडून त्यांची स्वत:ची पोळी भाजता यावी म्हणून त्यांनीच जाणीवपूर्वक उभे केलेले अतार्कीक अधिष्ठाने ओळखता आली पाहिजेत. असे दुष्ट विचार व दुष्ट अधिष्ठाने ओळखणे जितके महत्त्वाचे तितकेच त्यापासून स्वत: व स्वत:च्या अवतीभोवतीच्या समाजालाही सावध करणे हे खरे पाहता सुज्ञांचे खरे काम आहे.
आपल्याकडे पाच वर्षात एकदा ही संधी मिळते. बघा जेव्हा आपण योग्य मोबदला देऊन बाजारातून भाजी खरेदी करतो तेव्हा ती भाजी पाच-दहा वेळा वरून खालून तपासून चाचपून खरेदी करतो. त्याचे कारण हेच असते की खराब व निकृष्ट दर्जाची भाजी योग्य मोबदला देऊनही आपल्या गाफील राहून किंवा तपासून न घेतल्यामुळे पदरी पडू नये.
जर एकावेळी जेवणाच्या भाजी खरेदीकरिता आपण एवढे संवेदनशील असतो तर पाच वर्षे ज्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे, राबवलेल्या धोरणांमुळे व केलेल्या कृतीमुळे तुमच्या, माझ्या व येणार्या पिढ्यांच्या भविष्यावर थेट परिणाम होणार असतो तेव्हा त्या उमेदवार निवडीसाठी किती संवेदनशील व सावध आपण असले पाहिजे याची कल्पना करू शकता. म्हणून सावध मतदार तर उज्ज्वल भवितव्य असे म्हटले तर त्यात काहीही गैर नाही.
आपला देश कृषिप्रधान आहे. शेतीवर व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून असलेला वर्ग हाच या देशाचा कणा आहे. देशाला प्रगतीची शिखरे गाठायची असतील तर या देशाच्या कृषी विकासाला व शेतकरी, शेतमजूर वर्गाला प्राधान्यक्रम देऊनच धोरणे आखण्याची आवश्यकता आहे. आज वर्तमान परिस्थितीचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय असलेला हा शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर व शेतीपूरक व्यवसायावर उपजीविका असणारा वर्ग आपसूकच अडचणीत आला आहे.
आपण कितीही हायवे, ब्रिज, स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटी उभ्या करीत सुटलो तरी जितकी त्याची आवश्यकता आहे त्याच्या कैकपटीने अधिक आवश्यकता येथील पुरता मोडून पडलेल्या व आत्महत्येचा पर्याय स्वीकारू पाहणार्या शेतकर्याला परत उभं करण्याची आहे. म्हणून तो विकासाच्या अग्रभागी असावा असं कुठल्याही संवेदनशील सुज्ञ मनाला वाटेल. अगोदर माणसं वाचवणे महत्त्वाचेच. शेतीप्रधान देशातील शेतकरीच जर आत्महत्येचा पर्याय स्वीकारत असतील तर आपण यावर तात्काळ पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
आज जग आपल्याकडे युवांचा देश म्हणून पाहत आहे, पंरतु आपल्या या युवांना आज रोजगारासाठी दारोदार भटकावे लागत आहे. हातालाच काम नसेल तर त्याच्याकडे पैसे कुठून येणार, तो उंच भरारी कशी घेणार व स्वत:ला सिद्ध करून कसा दाखवणार, हा मोठा प्रश्न आहे. ज्या लोकांकडे उत्पन्नाची साधनेच नाहीत ते या वाढलेल्या महागाईच्या परिस्थितीत स्वत:चा प्रपंच कसा चालवत असतील हे सुज्ञांनी ओळखावे.
‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ या दोन वर्गातील दरी दिवस दरदिवस नाही तर क्षणोक्षणी वाढत चालली आहे की काय, असा प्रश्न मनाला पडावा इतकी भीषण परिस्थिती या आर्थिक विषमतेच्या बाबतीत आहे. महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, ज्येष्ठांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न, शिक्षणावर होत असलेल्या खर्चाचे प्रश्न, दळणवळण, रस्ते, पाणी आणि वीज अशा कैक बाबतीतील प्रत्येक प्रश्नाचा विचार करून त्यावर योग्य तोडगा काढू शकणारा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा सक्षम उमेदवार निवडणे हे खरंतर सूज्ञ, सुजाण व सावध मतदाराचेच काम आहे.
या ठिकाणी सावध हा शब्द मी मुद्दामच वापरला आहे. त्याचे कारण राजकारणाच्या भाऊगर्दीमध्ये सर्वच लोक हे वरील बाबतीत तंतोतंत खरे ठरणारे असतीलच असे नाही. पद, पैसा, मानसन्मानासाठी हपापलेले व जनसेवा, जनविकास हा शब्दही ज्यांच्या लेखी नाही असे हौसी लोकही यात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशाच मंडळींकडून त्यांच्याकडे असलेल्या धनशक्तीद्वारे या पवित्र प्रक्रियेत ढवळाढवळ होण्याची दाट शक्यता असते. अशांकडूनच सर्वसामान्यांचे भविष्य संकटात येऊ शकते. अशांचा डाव ओळखून सामान्य मतदारांनी सावध होणे गरजेचे आहे. कुणी येऊन प्रलोभने देऊन, आमिष दाखवून आपल्याकडूनच आपले भविष्य चोरणार नाही याची काळजी मात्र केवळ सावध मतदारच घेऊ शकतील हे निरंतर खरे आहे.
आपल्या थोर संविधानाने आपणास हा थोर अधिकार दिला आहे. या अधिकाराचा सजग, सावध राहून, स्वत:च्या व येणार्या पिढ्यांच्या सुंदर अशा भविष्यनिर्मितीसाठी जागरूकपणे वापर करून स्वत:च्या हाताने स्वत:चे व भावी पिढ्यांचे भविष्य लिहा. सज्जनहो, भरपूर वाचा, चिंतन-मनन करा, ज्ञानी आणि जागृत व्हा. कारण ज्ञानी माणूस हा शांत, समाधानी असतो.
तो चिकित्सा करतो व त्याच्याकडून या समाजाला एक चांगली दिशा मिळते. आपल्याच अडाणीपणामुळे कुणी आपणास बेसावध पाहून आपल्याच हाताने आपले भविष्य चोरू पाहत असेल तर वेळीच त्याला त्याची जागा दाखवून स्वत:च्या जागृतीचे दर्शन सबंध समाजाला घडवून आणा. कारण मानवतेच्या उद्धाराकरिता निरंतर जागृत समाजाचीच गरज असते.
मतदारांनो सावध राहा,
अमूल्य असे तुमचे मत आहे,
सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी
विचारपूर्वक ते वापरण्यातच हित आहे.