Maharashtra Assembly Election 2024
घरफिचर्ससारांशMaharashtra Election 2024 : उमेदवारांच्या मालमत्ता वाढीचे वास्तव

Maharashtra Election 2024 : उमेदवारांच्या मालमत्ता वाढीचे वास्तव

Subscribe

निवडणूक लढवणार्‍या उमेदवाराची स्थावर मालमत्ता असते त्याचे आताचे अदमासे बाजार मूल्य प्रतिज्ञापत्रामध्ये असते आणि जंगम मालमत्तेची किंमतही प्रतिज्ञापत्राच्या दिनांकाची शिल्लक असेल ती असते. एखादा उमेदवार परत निवडणूक लढवत असेल म्हणजे त्याने 2019 ला पण निवडणूक लढवली असेल आणि तो आता पण निवडणूक लढवत असेल तर दोन्ही प्रतिज्ञापत्रांमधील जी काही अदमासे चालू किमतीमधील वाढ आहे, ती त्या उमेदवाराची प्रॉपर्टी तेवढ्या किमतीने वाढली, असा दावा केला जातो, परंतु ही वाढलेली किंमत ही फक्त त्या दोन तारखेच्या अदमासे बाजार मूल्याच्या किमतीमधील फरक असते. तेवढी मालमत्ता त्या उमेदवाराने पाच वर्षात खरेदी केली असा त्याचा अर्थ होत नाही.

-राम डावरे

महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीचा धुराळा चालू आहे. आता कोण कोण उमेदवार आहे हेसुद्धा फायनल झाले आहे. सर्वांनी निवडणुकीचे आपले फॉर्म भरताना आपल्या मालमत्तेचे प्रतिज्ञापत्रसुद्धा निवडणूक अर्जासोबत जोडलेले असते आणि त्या प्रतिज्ञापत्रावरूनच वेगवेगळ्या वर्तमानपत्रात माहिती येत असते की कुठला उमेदवार किती श्रीमंत आहे, कुठल्या उमेदवाराने मागील पाच वर्षांमध्ये किती मालमत्ता कमावली, परंतु या प्रतिज्ञापत्राचा बारकाईने अभ्यास केल्यास काही वेगळी तथ्ये आपल्या निदर्शनास येतात.

- Advertisement -

या संदर्भात आजच्या लेखात आपण माहिती घेऊ. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या संपत्तीचे आणि त्याच्यावरती असलेल्या कर्जाचे एक प्रतिज्ञापत्र उमेदवारी अर्ज भरताना त्यासोबत द्यावे लागते. या प्रतिज्ञापत्राचा फॉरमॅट बघितला तर त्यात खालील गोष्टींची माहिती द्यावी लागते. उमेदवारावरती असलेल्या गुन्ह्यांचा तपशील हासुद्धा त्या प्रतिज्ञापत्रात द्यावा, परंतु आपण या लेखांमध्ये आर्थिक बाबीचाच विचार करणार आहोत. त्यामुळे गुन्ह्यांच्या तपशीलाबाबत आपण सखोल चर्चा करणार नाही.

1. मागील पाच वर्षात किती आयकर भरला याची माहिती :

- Advertisement -

उमेदवाराने व त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मागील पाच वर्षात दरवर्षी किती आयकर भरला याची माहिती या प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते. तसेच सर्वांचे पॅन नंबरसुद्धा द्यावे लागतात.

2. जंगम मालमत्ता माहिती :

प्रथम सर्व जंगम मालमत्ता ज्या काही असतील त्याची माहिती द्यावी लागते. त्यात हातातील रोख शिल्लक, बँक खात्यातील ठेवी, एफडीआर आणि मुदत ठेवी, शेअर्स, म्युच्युअल फंड, विमामधील इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक, कोणाला जर काही उसनवार कर्ज दिलेले असतील तर त्याचा तपशील, मोटार वाहने, जड जवाहीर, सोने-चांदी, मौल्यवान वस्तू व अन्य कोणत्याही मालमत्ता यांचे वर्णन त्यामध्ये द्यावं लागतं. या वर्णनामध्ये ती गुंतवणूक कधी केली आहे.

त्याची तारीख, त्याची रक्कम किंवा एखादी मोटार कार किंवा टू व्हीलर कधी खरेदी केली आहे, त्याची खरेदी किंमत, गाडीचा क्रमांक द्यावा लागतो. ही सर्व माहिती उमेदवाराची स्वत:ची, त्याच्या पत्नी किंवा पतीची व त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या व्यक्तीची जसे की आई वडील, मुलगा, मुलगी यांचीही द्यावी लागते. मोटार गाड्या व दागिने, सोने याचे अदमासे चालू बाजारमूल्य द्यावे लागते.

3. स्थावर मालमत्ता माहिती :

यानंतर स्थावर मालमत्तांचासुद्धा तपशील या प्रतिज्ञापत्रात द्यावा लागतो. या स्थावर मालमत्तांमध्ये शेतजमीन, बिगरशेती मालमत्ता, वाणिज्य इमारती, निवासी इमारती या सर्वांची माहिती द्यावी लागते. या माहितीमध्ये ती मालमत्ता कधी खरेदी केली त्याची तारीख, त्याचे क्षेत्र (एकर, चौरस फूट इ.), पत्ता, खरेदी किंमत आणि त्या मालमत्तेचे अदमासे चालू बाजार मूल्य ही माहिती द्यावी लागते.

4. कर्ज व देणी यांची माहिती :

यानंतर उमेदवारावर असणार्‍या कर्जाचीसुद्धा माहिती या प्रतिज्ञापत्रात द्यावी लागते. या कर्जामध्ये त्या उमेदवाराने आणि त्याच्या फॅमिली मेंबरने आणि त्याच्यावर अवलंबून असणार्‍या मेंबरने जे काही बँकेकडून, फायनान्शियल संस्थेकडून किंवा इतर कुणाही खासगी व्यक्तीकडून कर्ज घेतले असेल तर त्याचाही तपशील यामध्ये द्यावा लागतो. बर्‍याच वेळेस मालमत्ता खरेदीसाठी बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले जाते. तसेच त्या उमेदवाराची इतरही काही व्यावसायिक व इतर शासकीय देणी असतील तर ती देणीसुद्धा या प्रतिज्ञापत्रात द्यावी लागतात.

वरील सर्व स्थावर व जंगम मालमत्ता यांचे सध्याचे अदमासे चालू बाजार मूल्य काढले जाते. त्यातून असणारे कर्ज वजा जाता जी शिल्लक राहते ती त्या उमेदवाराची आणि त्याच्या फॅमिली मेंबरची एकूण निव्वळ मालमत्ता असते आणि या निव्वळ मालमत्तेच्या किमती बर्‍याच वर्तमानपत्रात येत असतात.

5. मालमत्तेतील वाढ ही बाजार मूल्यातील फरक असते :

यामध्ये विशेष लक्षात घेणारी बाब म्हणजे जी काही स्थावर मालमत्ता असते त्याचे आताचे अदमासे बाजार मूल्य या प्रतिज्ञापत्रामध्ये असते आणि जंगम मालमत्तेची किंमतही प्रतिज्ञापत्राच्या दिनांकाची शिल्लक असेल ती असते. एखादा उमेदवार परत निवडणूक लढवीत असेल म्हणजे त्याने २०१९ ला पण निवडणूक लढवली असेल आणि तो आता पण निवडणूक लढवीत असेल तर दोन्ही प्रतिज्ञापत्रांमधील जी काही अदमासे चालू किमतीमधील वाढ आहे ती त्या उमेदवाराची प्रॉपर्टी तेवढ्या किमतीने वाढली, असा सर्व वर्तमानपत्रांमध्ये दावा केला जातो.

परंतु ही वाढलेली किंमत ही फक्त त्या दोन तारखेच्या अदमासे बाजार मूल्याच्या किमतीमधील फरक असून तेवढी मालमत्ता त्या उमेदवाराने पाच वर्षात खरेदी केली असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे वर्तमानपत्रात येणार्‍या मालमत्ता वाढीच्या रकमा या दिशाभूल करणार्‍या असतात. एका उदाहरणाने हे आपण समजून घेऊ.

2019ला एखाद्या मालमत्तेचे त्यावेळेचे अदमासे बाजारमूल्य जर शंभर रुपये असेल आणि 2024 ला त्याच मालमत्तेचे अदमासे बाजारमूल्य जर दोनशे रुपये झाले तर त्या उमेदवाराने पाच वर्षत शंभर रुपयाची मालमत्ता खरेदी केली असा त्याचा अर्थ होत नाही. ही वाढ फक्त बाजारमूल्याची वाढ असते आणि स्थावर मालमत्तेचे बाजार मूल्य हे नेहमी वाढतच असते.

6. निवडून येणार्‍या उमेदवाराची होते आयकर विभाकडून चौकशी :

यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे काही उमेदवार निवडून येत असतात त्या निवडून येणार्‍या प्रत्येक उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडून संबंधित आयकर विभागाकडे पाठविले जात असते आणि आयकर विभाग त्याची संपूर्ण चौकशी करत असते. या चौकशीत त्याने मालमत्ता कशी खरेदी केली, त्यासाठी पैसे कुठून आणले, त्याचे उत्पन्न किती याची पडताळणी केली जाते.

त्यामुळे हे उमेदवार कोट्यधीश असतात तरी ते इन्कम टॅक्स भरत नाहीत किंवा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांना काही करत नाही हेसुद्धा नागरिकांचे म्हणणे बरोबर नाही. वास्तविक पाहता जे उमेदवार निवडणूक जिंकतात त्यांच्या सर्वांच्या मालमत्तेचे स्त्रोत आयकर खात्याकडून तपासले जातात आणि त्यात जर काही उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असतील तर आयकर कायद्याच्या तरतुदीतील व नियमानुसार त्या व्यक्तीची असेसमेंट होते आणि त्याने जर कमी आयकर भरला असेल तर त्याला टॅक्ससुद्धा भरावा लागतो.

7. मालमत्ता जेव्हा विकली जाते तेव्हाच आयकर भरावा लागतो :

स्थावर व जंगम मालमत्तांपासून काही उत्पन्न येत असेल जसे की, बँक व्याज, गुंतवणूकीवरील व्याज, शेअर्सचा डिव्हिडंड, मालमत्तेचे रेंट यावर त्या त्या वर्षात आयकर भरावा लागतो, परंतु मालमत्ता विक्री केली तरच त्यावर आयकर भरावा लागतो. फक्त मालमत्तेचे बाजार मूल्य वाढले तर त्यावर आयकर भरावा लागत नाही.

वरील उदाहरणामध्ये 2019 ला एखाद्या मालमत्तेचे बाजार मूल्य जर शंभर रुपये असेल आणि त्या मालमत्तेचे 2024 ला अदमासे बाजार मूल्य जर दोनशे रुपये झाले असेल तर फरकातील शंभर रुपयावरती टॅक्स भरावा लागत नाही. ती मालमत्ता जेव्हा विक्री केली जाते तेव्हाच त्या विक्रीवरती कुठल्याही माणसाला टॅक्स भरावा लागतो.

आपण सर्व मतदार हे करदातेसुद्धा आहोत. आपल्या लोकप्रतिनिधींची मालमत्ता किती आहे हे जाणून घेण्याचा हक्क प्रत्येकालाच आहे, परंतु फक्त मालमत्तांच्या 5 वर्षांतील बाजार मूल्यांतील फरक म्हणजे त्या उमेदवाराने तेवढी मालमत्ता कमावली असा अर्थ त्यातून निघू नये आणि आयकर खाते लोकप्रतिनिधींना मेहेरबान असत नाही हे समजून घेणे आवश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -