Maharashtra Assembly Election 2024
घरफिचर्ससारांशMaharashtra Election 2024 : प्रलोभने नेती विलया...

Maharashtra Election 2024 : प्रलोभने नेती विलया…

Subscribe

निर्मळ अंतकरणाने मतदान करणे आणि आपल्या भागाच्या विकास प्रक्रियेमध्ये कृतियुक्त सहभाग नोंदवणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे आद्य कर्तव्यच. येथे निर्मळ या शब्दाला थोडं विशेष महत्त्व आहे. त्याचे कारण असे की कुठल्याही प्रलोभनाला वा आमिषाला बळी न पडता या प्रक्रियेत सहभागी होणे हे येथे अपेक्षित आहे. निवडणुका जवळ आल्या की अधिक जागं राहणं हे प्रत्येक मतदाराने स्वत:च्या मनाशी ठरवण्याची गरज आहे. कारण जेव्हा आपण एखाद्या प्रलोभनाला बळी पडतो तेव्हा आपण आपला स्वाभिमान, आपली सद्सद्विवेकबुद्धी, सर्वंकष व चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता स्वहस्ते गमावून बसतो हे लक्षात घेतले पाहिजे.

-अमोल पाटील

सबंध जगामध्ये आजमितीला ज्या लोकशाही व्यवस्था असलेल्या देशाकडे कौतुकाने आणि आदराने पाहिले जाते त्यामध्ये आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेचा सहभाग आहे. जगातील मोठ्या लोकशाही व्यवस्था असलेल्या देशांपैकी आपला एक देश. ही बाब सबंध भारतवासीयांसाठी निरंतर अभिमानास्पद अशीच. ज्या व्यवस्थेमध्ये लोकांच्या मतांमधून त्यांच्या भविष्याची प्रत आकार घेते अशी ही लोकशाही व्यवस्था थोरच.

- Advertisement -

जेव्हा अनेक लोक विधायक हेतूने किंवा स्वहस्ते स्वभविष्य निर्मितीसाठी एकत्र येतात आणि एकमेकांच्या सर्वंकष उद्धारासाठी परस्परांशी बांधील असतात तेव्हा त्या ठिकाणी सर्वोदय होणार असे म्हटले तर वावगे ठरू नये. लोकशाहीमध्ये ‘लोक’ ही संकल्पना फार महत्त्वाची आहे. या व्यवस्थेच्या केंद्रस्थानी ‘लोक’ ही संकल्पना असल्याचे अभ्यासाअंती लक्षात येते. लोकांचा लोकांकडून उद्धार या व्यवस्थेमधून अपेक्षित असते. या व्यवस्थेच्या मुळाशी ‘लोक’ हाच घटक मूलाधार असल्यामुळे या व्यवस्थेच्या यशामध्ये याच घटकाचा मोलाचा वाटा असल्याचे आपल्याला पाहायला मिळते.

म्हणूनच जितकी लोकजागृती अधिक तितकी ही व्यवस्था अधिक भक्कम व अधिक निकोप हे तत्त्वही दृढ होण्यामागे हेच एकमेव कारण. या लोकशाही व्यवस्थेची महती थोरच. याची थोरवी अनुभवण्यासाठी व त्या उत्तुंग थोरवीच्या माध्यमातून होणारा जनउद्धार अनुभवण्यासाठी या व्यवस्थेचा पाया असणारा म्हणजेच ‘लोक’ हा घटक तितकाच भक्कम व जागृत असणे फार गरजेचे आहे.

- Advertisement -

या व्यवस्थेचा मूलाधार असलेला हा घटक आपले मत नोंदवून आपले प्रतिनिधी निवडून देतात. पुढे हेच त्यांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी म्हणून कायदेमंडळात प्रवेश करतात. लोकप्रतिनिधींकडून आपल्या पदाच्या माध्यमातून सबंध लोकांची विकासकामे, लोकांसाठी पायाभूत सोयीसुविधा, शिक्षण, आरोग्य, दळणवळण आदी बाबींवर काम करणे अपेक्षित असते.

ज्या हेतूसाठी आपण आपले अमूल्य मत देऊन आपला लोकप्रतिनिधी निवडून देत असतो त्या लोकप्रतिनिधींनी आपल्या समस्या, अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असावे ही प्रत्येक नागरिकाची तशी रास्तच अपेक्षा. जेव्हा नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक सहज आणि निर्मळ प्रस्थापित होतो तेव्हा प्रगतीचे वारे सर्वदूर वाहू लागण्याची शक्यता अधिक असते हा साधा आणि सोपा नियम. हाच नियम या व्यवस्थेशी संबंधित असणार्‍या प्रत्येक घटकाने निरंतर स्मरणात ठेवण्याची आवश्यकता आहे.

आपल्या व्यवस्थेमध्ये आपल्याला आपला प्रतिनिधी निवडण्याची दर 5 वर्षांनी संधी प्राप्त होत असते. या संधीचे सोने करण्यासाठी प्रत्येक मतदाराने तत्पर राहण्याची आवश्यकता आहे. मतदान करणे हे आपले परम कर्तव्य समजून घेणे व आपल्याला मिळालेल्या या अमूल्य अशा अधिकाराचा जेव्हा जागृतीने वापर केला जाईल तेव्हा आपली व्यवस्था अधिक भक्कम होण्यास त्याची फार मदत होईल हे खरे.

निर्मळ अंतकरणाने मतदान करणे आणि आपल्या भागाच्या विकास प्रक्रियेमध्ये कृतियुक्त सहभाग नोंदवणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे आद्य कर्तव्यच. येथे निर्मळ या शब्दाला थोडं विशेष महत्त्व आहे. त्याचे कारण असे की कुठल्याही प्रलोभनाला वा आमिषाला बळी न पडता या प्रक्रियेत सहभागी होणे हे येथे अपेक्षित आहे. निवडणुका जवळ आल्या की अधिक जागं राहणं हे प्रत्येक मतदाराने स्वत:च्या मनाशी ठरवण्याची गरज आहे.

कारण जेव्हा आपण एखाद्या प्रलोभनाला बळी पडतो तेव्हा आपण आपला स्वाभिमान आपली सद्सद्विवेकबुद्धी, सर्वंकष व चिकित्सक प्रश्न विचारण्याची क्षमता स्वहस्ते गमावून बसतो हे लक्षात घेतले पाहिजे. जेव्हा मतदारराजा सजग, जागृत व सद्सद्विवेकबुद्धी वापरून मतदान करेल तेव्हा या व्यवस्थेचे फलित तुम्हा आम्हास पाहावयास मिळत असते ही लक्षात घ्यावयाची बाब आहे. आपल्या हाती असलेला मतदानाचा अधिकार हेच आपले खरे सामर्थ्य आहे. बुद्धिवंतांनी याचे महत्त्व यथाशक्ती यथामार्गे सर्वजनांस पटवून देण्याची खरोखर आज गरज आहे.

आपल्या व्यवस्थेमध्ये मतदारांना ‘राजा’ म्हणून संबोधण्यात आले आहे. त्याच्या हाती असलेल्या मतदानाचा अधिकार हेच त्यास ‘राजा’ असे संबोधण्यामागे एक प्रमुख कारण असल्याचे आपल्या लक्षात येते. म्हणून निर्मळ अंत:करणाने कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपली सद्सद्विवेकबुद्धी वापरून हा हक्क बजावण्याची आवश्यकता आहे हे प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे.

आपण दैनंदिन जीवन जगताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांवर आपण नेहमी भाष्य करतो आणि दु:खी होतो. त्या समस्या नष्ट व्हाव्यात व आपले जीवन अधिक सुखावह व्हावे अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते. उदाहरणार्थ रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, दळणवळण, रोजगार आणि महागाई आदी सर्वच विषयांशी संबंधित काही ना काही तक्रारी आपल्या सामान्यजनांकडे असतात.

आपण अशा तक्रारींचे पाढे गात बसण्यापेक्षा आपल्याच सुजाण संवेदनशील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यातील बर्‍याच समस्यांवर यशस्वी मार्ग काढू शकतो आणि सर्वसामान्यांचे जीवनमान अधिक सुखावह करू शकतो हे अगोदर नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ही व्यवस्था आपल्याला समजणे फार महत्त्वाचे आहे. या जगातील बहुतांश समस्यांचे मूळ कारण जर काही असेल तर ते आपले अज्ञान असते हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.

एखाद्या बाबतीत आपण अडाणी असणे म्हणजे त्या अज्ञात बाबीत आपणाकडून चुका होण्याची शक्यता अधिक हा साधा सरळ नियम आहे. विद्वानांच्या संगतीत राहण्याची महती थोरांनी गायली आहे ती यामुळेच. म्हणूनच लोकशाही व्यवस्था अधिक भक्कम होण्यासाठी लोकजागृती फार मोलाची आहे. लोकांना आपल्या मतदानाच्या अधिकाराचे सामर्थ्य ओळखता आले पाहिजे.

याच हक्काचा योग्य रीतीने वापर करून आपण आपले भविष्य निर्माण करीत असतो हा मूळ विषय समजणे व समजून घेणे याकडे प्राथमिकतेने पाहण्याची आवश्यकता आहे. सुज्ञांनी स्वत: जागरूक होऊन आपल्या बांधवांना जागरूक करून ही व्यवस्था अधिक दृढ आणि अधिक विकासाभिमुख करण्यामध्ये निरंतर हातभार लावण्याची गरज आहे.

आजचा काळ अधिक सजग आणि अधिक सावध राहण्याचा आहे. जो अधिक सजग, अधिक सावध आणि अधिक जागृत राहील तोच केवळ समाधानाचा धनी असेल असे बहुतांश चित्र आहे. प्रत्येक बाबतीत आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करण्याची आणि त्यायोगे कृती करण्याची आजमितीला गरज आहे.

लोकशाही व्यवस्थेचा मूलाधार असलेल्या मतदारराजाने कुठल्याही प्रलोभन व आमिषाला बळी पडता कामा नये. जागे राहून आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करावा. संपूर्ण विचाराअंती आपला हक्क बजावावा. त्यातून सर्वोत्कृष्ट फलनिष्पत्ती त्याच्या हाती लागेल हे निश्चित. ही व्यवस्था अधिक भक्कम, अधिक निकोप होण्यासाठी मतदारराजाने जागे राहून स्वत:च्या मताचे खरे सामर्थ्य जाणण्याची अनिवार्यता मात्र फार महत्त्वाची आहे.

मतदारराजा जागं राहा
तुझ्या निर्मळ भविष्यासाठी
मतदारराजा जागं राहा
लोकशाहीच्या समृद्धीसाठी…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -