घरफिचर्ससारांशगांधीजी आणि कस्तुरबा!

गांधीजी आणि कस्तुरबा!

Subscribe

गांधीजी हे जगासाठी मानवतेचे देवदूत होते. भारतासाठी राष्ट्रपिता होते..ते कोणासाठी जीवनदृष्टी देणारे होते..कोणासाठी मार्गदर्शक होते. कोणासाठी वैद्य होते..कोणासाठी नेता होते. कोणासाठी स्वातंत्र्यसैनिक होते..अशी बरीच रूप त्यांची जगाला माहीत आहेत. मात्र गांधी हे कोणासाठी पिता होते..कोणासाठी पती होते. कोणासाठी मित्र होते..गांधी असे बरेच काही होते..पण तरीसुध्दा गांधीजी सर्वत्र जगताना सामान्यांसारखेच जगत होते. त्यांच्या या सामान्यपणाच्या प्रवासातच त्यांचे असामान्यपण साठवलेले आहे. त्यांचा कस्तुरबांशी असलेला व्यवहार हा पती म्हणून अभ्यासताना त्यांच्यातील नाते माणूसपण दर्शित करणारे आहे हे लक्षात घ्यायला हवे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची 151 वी जयंती झाली. या निमित्त हा विशेष लेख...

साधारणपणे पती-पत्नी यांचे संबंध जसे असतात त्याचप्रमाणे त्यांचे दोघांचे नातेसंबंध होते. ते महात्मा झाले..स्वातंत्र्याची चऴवळ गतीमान झाली आणि त्यांच्या हाती सूत्रे आली तरी त्यांचे कस्तुरबांशी असणारे नाते तितकेच होते जे अगोदर होते. त्यांनी जेव्हा आपल्या विचाराने कस्तुरबा चालण्यास नकार देत होत्या तेव्हा त्यांना विरोध करण्याचेही काम केले होते. आश्रमात एकदा अस्पृश्य कुटुंब ठेवले म्हणून विरोध करण्यात आला होता. अनेकांनी विरोध केला होता. तो विरोध समजण्यासारखा होता. गांधीनी तोही विरोध मोडून काढला. मात्र लोकांच्या भावना लक्षात घेऊन कस्तुरबा गांधीनी ते जोडपे आश्रमात ठेऊ नका, असे सांगितले. तेव्हा गांधी म्हणाले, तुला राहायचे असेल तर रहा अऩ्यथा आश्रम सोडून जा. गांधीनी जी तत्वे जीवनमूल्य म्हणून स्वीकारली होती, त्यात कोणी आडवे आले तर गांधी संतापत होते. पुढे गांधीजींची विचारधारा डोक्यावर घेऊन कस्तुरबा जीवनभर चालत राहिल्या. मात्र त्यांनी पुढे कधीच अस्पृश्यतेचा विचार केला नाही. आश्रमातील अगदी एखाद्या हरिजन मुलीलादेखील स्वतःच्या मुलीप्रमाणे जीव लावला हे पुढे गांधीजींनीच मान्य केले आहे.

कस्तुरबांना सर्वजन बा म्हणत होते. बा आगाखान पॅलेसमध्ये असताना गांधींच्या सोबत होत्या. खरेतर दोघांचे एकमेकांवर प्रचंड प्रेम होते. कस्तुरबा जीवनभर गांधीजींच्या सावली बनून राहिल्या. जेव्हा गांधी, बा यांना भेटण्यासाठी हरिलाल आला होता. तेव्हा तो गांधींना म्हणाला होता की, माझी बा आहे म्हणून तुम्ही आहात आणि ते गांधीनींही स्वीकारलं होतं. आगाखान पॅलेसमध्ये शेवटच्या क्षणीदेखील त्याचाच पुरावा मिळतो. बांना मृत्यूची तशी चाहूल लागली होती. त्या जाणिवेत बांनी गांधीजींचा हात हातात घेतला होता. बांनी पकडलेला घट्ट हात पाहिल्यावर गांधीजींना अंदाज आला होता. बा आता आपल्याला सोडून जाणार. बा जेव्हा सोडून गेल्या तेव्हा गांधी सर्वाधिक दुःखी झाले होते. बा आणि गांधी यांचे एक भक्कम नाते होते. गांधीजींच्या जीवन तत्वज्ञानावर त्यांचे भरण झाले होते. त्या वाटेने चालताना त्यांनाही संघर्ष करावा लागला. अनेकदा स्वतःला मुरड घालावी लागली. पण त्या संघर्षातही त्यांची वाट अधिक प्रकाशमानच राहिली.

- Advertisement -

पण गांधीजींच्या मनात बांबद्दल आतला कोपरा नेहमीच संवेदनशील राहिलेला दिसतो. आगाखान पॅलेसमध्ये मीराबेन यांनी भगवान कृष्णाचे मंदिर निर्मिले होते. कस्तुरबा त्या कृष्णाचं नियमित दर्शन घ्यायच्या. भारतीय संस्कृतीप्रमाणे तेथे असलेल्या तुळशी वृंदावनाला रोज दिवा लावायच्या. गांधीजी जेव्हा आगाखान पॅलेसमधून बाहेर पडले तेव्हा त्यांनी आपल्या सोबत ते तुळशीवृंदावन घेतले होते. त्या तुळशी वृंदावनाशी बांचे नाते होते. त्यांनी सोबत आणून आपल्या कार्यकर्त्याकडे दिले. त्यांनी आपल्या घरी ती तुळस लावली, त्याप्रमाणे सेवाग्राममध्ये कस्तुरबा यांच्या अंगणात देखील लावली. यावरून गांधीजी किती हळवे होते हे सहजतेने लक्षात येईल. गांधीजींच्या मनात बांबद्दल नेहमीच आदर होता. कधी कधी रागावले असतील, पण आपली चूक झाली असेल तर त्यांनी माफीदेखील मागितली असेल. बांनी आपल्याला नेहमीच समजून घेतले आहे आणि त्या समजून घेतात हे गांधींना ठाऊक होते. त्यामुळे गांधीजींचा प्रवास सुरू असताना त्यांना अधिक जबाबदारीची जाणीव होत राहिली.

कस्तुरबादेखील गांधीजींच्या तत्वज्ञानावरती चालत राहिल्या. आरंभी त्यांना हे चालणे काहीसे कठीण बनले, त्यांना गांधीजींशी संघर्ष करावा लागला. गांधी कुटुंबीय आफ्रिका सोडून भारतात येणार होते. त्यांची देश सोडून जाण्याची तयारी सुरू असताना तेथील गांधीजींच्या मित्रांनी निरोपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या निमित्ताने अनेक महागड्या वस्तू त्यांना देण्यात येणार होत्या. अगदी हिरे, सोन्याच्या वस्तूंचा त्यात समावेश होता. गांधीनी या वस्तू नाकाराव्यात अशा मताचे होते. आपण अशा वस्तू स्वीकारणे म्हणजे आपण ज्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतो आहोत त्या मूल्यांना नाकारणे ठरणार होते. गांधीना जशा वस्तू भेट मिळणार होत्या, मुलांच्या हातीदेखील काही मिळणार होते…आता काय करायचे असा प्रश्न त्यांच्या मनात होता. आपण नाकारल्या तर कुटुंबातील सदस्यांचे काय हा प्रश्न छळत होता. मुलांना समजून सांगता येईल. ते ऐकतील पण कस्तुरबांचा काय..गांधी कस्तुरबांना म्हणालेदेखील अशा प्रकारे आपण वस्तू स्वीकारणे हे अऩैतिक आहे. तेव्हा कस्तुरबा म्हणाल्या मला तसे वाटत नाही. मग तु काय करणार आहेस या वस्तूंचे ..तेव्हा बा म्हणाल्या माझ्या सुनांसाठी त्या वस्तू जपूण ठेवीन. मुलांना गांधींचा तसा धाक होताच, मुलेही म्हणाली आम्हाला नकोत त्या वस्तू. कस्तुरबांचा त्याग मोठा होता. मुळात फकिराशी विवाह केल्यानंतर त्याच्यासोबत चालणे म्हणावे तितके सोप नव्हते.

- Advertisement -

त्यांच्या नात्यात एक प्रकारे विश्वास होता. त्याचबरोबर पती म्हणून पत्नी म्हणून एकमेकाचे स्वातंत्र्य मान्य करण्याबरोबर आदर करणेदेखील घडत होते. एकदा गांधींना भेटण्यासाठी सेवाग्रामला काही महिला येणार होत्या, त्याही गांधीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. गांधीनी त्यांना होकार कळविला, पण तुमचा हा भाऊ गरीब आहे त्यामुळे येताना तुम्ही तुमचा जेवणाचा डबा सोबत आणा असेही कळविले. अखेर त्या तीस एक महिला गांधीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी सेवाग्राम आश्रमात आल्या. गांधीना भेटल्या. कार्यक्रम संपला आणि दुपारच्या जेवणासाठी सर्वजन पांगले. या महिला देखील आपल्या सोबत आणलेला जेवणाचा डबा घेऊन जेवणासाठी तयारी करू लागल्या होत्या. कस्तुरबांनी ते पाहिले, या महिलांनी आपल्या सोबत जेवणाचा डबा आणला आहे. त्या जेवण करणार आहेत, ते पाहून त्यांनी आश्रमात खिचडी शिजवली आणि त्या महिलांना जेवणासाठी दिली. त्या महिला गांधीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना भेटण्यासाठी येतात आणि त्यांचे जेवन त्याच करतात हे त्यांना पसंत पडले नाही. आपण भारतीय आहोत आणि अतिथी देवो भव हा आपला संस्कार आहे ही भावना समजून कस्तुरबांनी आदरातिथ्य केले. गांधीजींच्या कानावर ही बातमी गेली. त्यांनी बांनी केलेली कृती योग्यच होती. गांधीनी बांच्या निर्णयाचा आदर केला होता. जे-जे म्हणून उत्तम असेल त्याकरीता गांधी दोन पावले मागेदेखील येत होते.

गांधीजींच्या सोबतच्या चळवळीत बा अग्रभागीच होत्या. चलेजावचा नारा दिला तेव्हा गांधीजींना अटक झाली. अटक झाल्यानंतर बाही त्यांच्यासोबत जाणार होत्या. पण गांधी म्हणाले, मी जे काम सुरू केले आहे ते काम तू सुरू ठेव. त्या प्रमाणे बा दुसर्‍या दिवशी आंदोलनात भाषण करण्याचा व आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय घेतला, पण दुर्दैवाने त्यांनाही अटक झाली. गांधीजींचा स्त्रीयांविषयीचा असलेला दृष्टिकोन घेऊन त्या चालत राहिल्या. जमनालाल बजाज यांच्या श्रद्धांजली सभेत गांधीजी बोलणार होते. या कार्यक्रमास देशभरातून कार्यकर्ते जमा झाले होते. त्यास जमनालाल बजाज यांचाही परीवार आलेला होता. त्यांच्या पत्नी जानकीदेवी पदर मुखावरती घेऊन बसल्या होत्या. गांधीजीनी ते पाहून म्हणाले, देशातील स्त्रीयांनी आता आपले आदर्श बदलायला हवेत. पूर्वीच्या काळी पतीबरोबर सती जाणे हे स्त्रीसाठी पती कसोटी होती.

आता मात्र बदलायला हवे. आता नवर्‍याचं अपुरं काम तेवढ्याच भक्तीने आणि निष्ठेने पुढे नेणे ही पती निष्ठेची कसोटी आहे. ही शिकवण आपण अंगी बानवली पाहिजे. हा विचार घेऊन देशातील अनेक बायका स्वातंत्र्याच्या लढ्यात पुढे आल्या. मात्र हा विचार घेऊन कस्तुरबा सतत मार्गक्रमण करीत राहिल्या आहेत. त्यामुळे गांधीजींच्या सोबत त्यांचा जीवनप्रवास त्यांना बळ देणारा होता. बा या माझ्या जीवन प्रवासात मला नेहमीच साथ देत होत्या, पण त्या पलिकडे अंहिसेच्या पालन व्यवहारात त्या माझ्यासाठी गुरू होत्या. बांबद्दलची ही श्रध्दा होती. गांधीजींचा विचार पुढे घेऊन जाण्याच्या कामात त्या सतत पुढे राहिल्या. त्या दोघात असलेले नाते केवळ पती-पत्नी असे न राहता गांधी विचाराची पाऊलवाट चालणारी आणि स्वतःचा विवेक जागा ठेऊन निर्णय घेणारी स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाची व्यक्ती होती. इतिहासात त्या सौ. गांधी अशाच राहिल्या असल्या तरी त्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अत्यंत महत्वाचे नाव होते हे कोणालाही विसरता येणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -