घरफिचर्ससारांशही चाळ ‘संस्कृती’ कोन्ची?

ही चाळ ‘संस्कृती’ कोन्ची?

Subscribe

चित्रपट दिग्दर्शक, निर्माता महेश मांजरेकर यांच्या ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’, या चित्रपटाने आठवडा गाजवला. एकीकडे वर्षातील पहिल्या मकरसंक्रांतीच्या सणाचा उत्साह वातावरणात भरलेला असताना दुसरीकडे चाळ संस्कृतीचे अत्यंत विकृत आणि बिभत्स प्रदर्शन करणार्‍या या चित्रपटाने प्रेक्षक, समीक्षक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, वृत्तपत्रे अशा सर्वांचेच लक्ष वेधले. या चित्रपटात मुंबईची जुनी ओळख असणार्‍या चाळ विश्वातील गिरणी कामगारांच्या कुटुंबियांतील महिला आणि मुलांचे केलेले हिडीस चित्रण असणारे प्रोमो पाहिल्यावर सगळीकडून संतापाची लाट उसळली. शेवटी महेश मांजरेकरांनी याविषयी दिलगिरी व्यक्त करून प्रक्षोभावर पडला टाकला, पण मांजरेकरांनी दाखवलेली ही चाळ ‘संस्कृती’ कोन्ची असा लोकांना प्रश्न पडला.

आठवड्याच्या सुरुवातीलाच ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’, या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आणि वादाला तोंड फुटले. ऐन मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांत चित्रपटावर सगळीकडून टीका झाली. अखेर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळून गिरणी कामगारांच्या कुटुंबियांसाठी एक निवेदन जाहीर केले. दिवंगत ज्येष्ठ लेखक, पत्रकार जयंत पवार यांच्या ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’, या कथासंग्रहावर आधारीत हा चित्रपट बनवण्यात आला.

चित्रपट आणि वाद हे समीकरण महेश मांजरेकर यांच्यासाठी काही नवीन नाही. यापूर्वीही त्यांचे अनेक चित्रपट वादग्रस्त ठरले आहेत. गिरणी कामगारांच्या आयुष्यावर बेतलेल्या 2010 साली प्रदर्शित झालेल्या ‘लालबाग परळ’ हा त्यापैकीच एक चित्रपट. जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकावरून ‘लालबाग परळ’ हा चित्रपट बनवण्यात आला होता. शिवाय याच साली प्रदर्शित झालेल्या ‘शिक्षणाच्या आयचा घो’, या चित्रपटाच्या नावावरूनच वाद उफाळून आला. या चित्रपटांमधील ‘चाळ’ हादेखील महेश मांजरेकरांचा आवडीचा विषय. चाळीतल्या लोकांचे जीवन दाखवणारे अनेक चित्रपट त्यांनी बनवले. त्यांच्या दिग्दर्शनात पहिला 1999 साली आलेला ‘वास्तव : द रिअ‍ॅरिली’ हा चित्रपट चाळीतील एका तरुणावर बेतलेला होता, जो पुढे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतो.

- Advertisement -

अभिनेता संजय दत्त याच्या फिल्मी करिअरला कलाटणी देणारा हा चित्रपट ठरला. ‘वास्तव’ चित्रपट सुपरहिट झाला. मात्र या चित्रपटातही दारूडा, बिनकामाचा, बायकोला मारहाण करणारा नवरा. शिक्षणाच्या नावाने बोंब, पण नको त्या व्यसनांच्या नादाला लागणारी युवा पिढी. होतकरू तरूण परंतु अप्रिय घटनेमुळे बनलेला अंडरवर्ल्ड डॉन, असे नकारात्मक पैलू वास्तवमध्ये दाखवले गेले. पुढे याच चित्रपटाचा सिक्वेल ‘हत्यार’ चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला. ‘गुंडे का बेटा गुंडाही बनेगा’, याचे उदाहरण दर्शवणारा संजय दत्त अभिनीत हा चित्रपटदेखील पुन्हा चाळीतील दाहक जीवन दर्शवणारा ठरला. वास्तवमधल्या रघुने (संजय दत्त) पत्नी बनवून मानसन्मान मिळवून देलेली वेश्या व्यवसायातील सोनू (नम्रता शिरोडकर) रघुच्या मृत्यूनंतर पुन्हा देहविक्रीच्या मार्गावर जाते, हे ‘हत्यार’ चित्रपटात दाखवले गेले. हीदेखील महेश मांजरेकरांच्या चित्रपटांतली आणखी एक काळी बाजू प्रेक्षकांनी पाहिली.

चाळीतील लोकांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याचा सिलसिला मांजरेकरांनी अविरत सुरूच ठेवला. ‘वास्तव’ आणि ‘हत्यार’नंतर ‘तेरा मेरा साथ रहे’ (2001), ‘प्राण जाये पर शान न जाये’ (2003), ‘लालबाग परळ’ (मराठी) तर ‘सिटी ऑफ गोल्ड’ (हिंदी) (2010) यासारख्या कलाकृती त्यांनी बनवल्या. मात्र तोच तोच विकृतपणा या चित्रपटांमध्येही पाहायला मिळाला. त्यातही मराठीतील सुप्रसिद्ध लेखक संजय पवार यांच्या ‘सती’ या एकांकिकेवर आधारीत ‘प्राण जाये पर शान न जाये’ हा मराठी, हिंदी कलाकारांची भलीमोठी फौज असलेला चित्रपट टीकेचे लक्ष्य ठरला. या चित्रपटात त्यांना नेमके काय दाखवायचे होते, हे शेवटपर्यंत प्रेक्षकांना समजले नाही. या चित्रपटातदेखील महिलांचे चरित्रहनन करणारी अनेक दृश्ये, पात्र होती.

- Advertisement -

लोकांच्या घरात धुणीभांडी करणारी कष्टकरी महिला घरी आल्यावर मात्र दारूड्या नवर्‍यासाठी केवळ शरीरसंबंधापुरती मर्यादित राहते. वासनाधीन नवर्‍याच्या इच्छापूर्तीसाठी माहेरी राहणारी मुलगी आपल्याच आई-वडिलांना घराबाहेर काढते. चाळीतून मोठ्या घरात राहण्याची स्वप्न पाहणारी गृहिणी पैशासाठी अंधश्रद्धेला बळी पडते. युवा पिढीचा थिल्लरपणा, चाळीतल्या मुलींची पैसा आणि सौंदर्याअभावी न जुळणारी लग्न, अशा सर्व नकारात्कम गोष्टींची सरमिसळ मल्टिस्टारर चित्रपटात होती. मात्र मांजरेकरांना चाळीतल्या लोकांची कष्टकरी वृत्ती, गिरण्या बंद पडल्यानंतर रोजगारासाठी केलेली धडपड, मुलांनी दिवसा काम आणि रात्रीची शाळा करत पूर्ण केलेले शिक्षण, महिलांनी वेळप्रसंगी वडापावची गाडी, खाद्यपदार्थ विक्री, घरकाम करून कुटुंबाचा हाकलेला गाडा, न परवडणार्‍या लालबाग परळसारख्या परिसरात उपनगराकडे घेतलेली धाव यावर प्रकाशझोत टाकावासा वाटला नाही का, असा प्रश्न त्यांचे चित्रपट पाहिल्यावर पडतो.

प्रामुख्याने गिरणी कामगारांच्या कुटुंबियांवर आधारीत दोन चित्रपट महेश मांजरेकर यांनी बनवले. अकरा वर्षांपूर्वी आलेला ‘लालबाग परळ’ आणि आताचा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ हे चित्रपट. 1980-81 या कालखंडात मुंबईतील गिरण्या बंद पडून त्या जागी मोठमोठे व्यापार, उद्योग सुरू झाले. या गिरण्या कवडीमोलाच्या भावात बिल्डरांनी विकत घेतल्या. त्यामुळे गिरणी कामगारांच्या हातातील काम सुटले. अचानक आलेल्या बेरोजगारीमुळे लालबाग, परळसारख्या परिसरात राहणार्‍या गिरणी कामगारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली. अशा भयानक परिस्थितीत येथील चाळीत राहणार्‍या कुटुंबियांची कशी वाताहत झाली, याचे चित्रण लालबाग परळमध्ये दाखवले गेले.

या चित्रपटातही महिलांच्या चारित्र्यहननाचे अनेक प्रसंग, अश्लिलतेचे चित्रीकरण, वासनापूर्तीसाठी विवाहबाह्य संबंध ठेवणारी स्त्री, पैशासाठी वाण्याच्या मुलासोबत शरीरसंबंध ठेवणारी कामगाराची मुलगी, असे पात्र चित्रपटात दाखवण्यात आले. थोड्याफार प्रमाणात गिरणी कामगारांचा लढा, कुटुंबाला सावरणारी आई, अशा बकाल परिस्थितीतही शिक्षणाच्या जोरावर आयुष्याची वेगळी वाट निवडणारा मुलगा याचे दर्शन घडले. परंतु गिरणी कामगारांची मुलं पुढे खून, दरोडेच घालू लागले, महिलांनी शरीर विक्रीचाच मार्ग निवडला, हेच चित्रपटांतून प्रतिबिंबित झाले. जे भयानक होते. हा चित्रपट ‘सिटी ऑफ गोल्ड’ या नावाने हिंदीतही प्रदर्शित झाला.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक अशी ओळख असणार्‍या महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘भाई : व्यक्ती की वल्ली’, सारखे अनेक दर्जेदार चित्रपटदेखील प्रेक्षकांना दिले आहेत. यापुढेही त्यांच्यासारख्या अनुभवी फिल्ममेकरकडून समाजप्रबोधन करणार्‍या कलाकृतींची प्रेक्षक, समीक्षकांना अपेक्षा आहे. ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’, चित्रपटासंबंधीचा वाद महेश मांजरेकर यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केल्यावर निवळला असला तरी भविष्यात चाळ संस्कृती, गिरणी कामगारांच्या कुटुंबियांच्या संघर्षाचे, लढ्याचे दर्शन घडवणारे, त्यांच्या जीवनाची सकारात्मक बाजू दाखवणारे चित्रपट मांजरेकर तयार करतील, अशी आशा समस्त महिलावर्गाला आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -