…एक काळ महेशकुमारचा!

महेशकुमार अ‍ॅन्ड ऑर्केस्ट्रासाठी हा रिपिट ऑडियन्स तेव्हा का यायचा?...महेशकुमार अ‍ॅन्ड ऑर्केस्ट्राचं सर्वात मोठं आकर्षण हे होतं की महेशकुमार हा केवळ पुरूषांचीच नव्हे तर महिलांचीही गाणी गायचा. आणखी स्पष्ट करून सांगायचं तर महेशकुमार केवळ पुरूषांच्याच आवाजातली नव्हे तर महिलांच्याही आवाजातली गाणी गायचा...आणि त्याच्याही पुढे जाऊन आणखी फोड करून सांगायचं तर महिलांच्या आवाजात तो वेगळेपण सादर करायचा, म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त ते शमशाद बेगम, कशाला शारदाचाही आवाज पेश करायचा.

महेशकुमार आणि नरेशकुमार कनोडिया हे बंधू गेले.

परवा ही बातमी वाचली आणि एकेकाळचा ऑर्केस्ट्राचा जमाना आठवला. ऑर्केस्ट्रासाठी धावत थिएटर गाठणारे लोक तेव्हा होते. हे लोक ऑर्केस्ट्राची जाहिरात वर्तमानपत्रात झळकल्या झळकल्या ऑर्केस्ट्राची तिकिटं पुढल्या काही तासांत विकत घेऊन थिएटर हाउसफुल करून टाकायचे. मुंबईतल्या षण्मुखानंद हॉलसारखं अप्पर बाल्कनी असलेलं मोठं थिएटर हे ऑर्केस्ट्रे हाउसफुल करण्याची किमया करून दाखवायचे. व्यावसायिक मराठी नाटकांच्या जाहिरातींबरोबरच ह्या ऑर्केस्ट्रांच्या जाहिरातीही तितक्याच तोलामोलाने वर्तमानपत्रात मिरवल्या जायच्या.

‘ह्या अशा एका काळात मेलडी मेकर्स’, प्रमिला दातारांचा ‘सुनहरी यादें’, विनोद गिध ह्यांचा ‘झंकार’ ह्यासारख्या नाणावलेल्या ऑर्केस्ट्रांच्या पंक्तीत आणखी एक ऑर्केस्ट्रा होता तो ‘महेशकुमार अ‍ॅन्ड पार्टी.’ महेशकुमार कनोडियाचा हा ऑर्केस्ट्रा.

‘महेशकुमार अ‍ॅन्ड पार्टी’चं तेव्हा संगीत ऐकण्यासाठी जीव टाकणार्‍या पब्लिकमध्ये खूप नाव होतं. हा ऑर्केस्ट्रा पुन्हा पुन्हा पाहणारा असा रिपिट ऑडियन्स हे महेशकुमार अ‍ॅन्ड पार्टीचं एक वैशिष्ठ्य असायचं. हा ऑर्केस्ट्रा एकदा ऐकून आणि एकदा पाहून तृप्त न होणारं हे पब्लिक असायचं. हा ऑर्केस्ट्रा आपण पुन्हा पुन्हा किती वेळा पाहिला आहे ह्याचा पुरावा खुद्द महेशकुमारना दाखवण्यासाठी ह्यातलं काही हौशी पब्लिक ऑर्केस्ट्राची तिकिटं जपून ठेवायचं. एकदा महेशकुमारनी तर चक्क ह्या पब्लिकला भर स्टेजवरून ‘बोलो दोस्तों, हमारा ये ऑर्केस्ट्रा दोबारा देखने वाले आज थिएटरमध्ये कितने लोग मौजुद है‘ असा भलताच धाडसी प्रश्न केला होता. हा धाडसी प्रश्न अशासाठी होता की जर समजा प्रेक्षकांमधून काही प्रतिसादच मिळाला नसता किंवा अतिशय अल्प प्रतिसाद मिळून जर शोभा झाली असती तर ऑर्केस्ट्राच्या ह्या आयोजकांची पंचाईतच झाली असती. पण महेशकुमारने तो प्रश्न प्रेक्षकांना बिनधास्त केला आणि प्रेक्षकांकडे पाहिलं. प्रेक्षकही त्या प्रश्नाला प्रतिसाद म्हणून उत्साहाने, आनंदाने उभे राहिले. प्रेक्षकांमधले जवळ जवळ चाळीस टक्के लोक तेव्हा उभे राहिले होते. महेशकुमारने त्या प्रेक्षकांना तसंच उभं राहायला सांगितलं आणि त्यांना अतिशय लवून नमस्कार केला.

महेशकुमार अ‍ॅन्ड ऑर्केस्ट्रासाठी हा रिपिट ऑडियन्स तेव्हा का यायचा?…महेशकुमार अ‍ॅन्ड ऑर्केस्ट्राचं सर्वात मोठं आकर्षण हे होतं की महेशकुमार हा केवळ पुरूषांचीच नव्हे तर महिलांचीही गाणी गायचा. आणखी स्पष्ट करून सांगायचं तर महेशकुमार केवळ पुरूषांच्याच आवाजातली नव्हे तर महिलांच्याही आवाजातली गाणी गायचा…आणि त्याच्याही पुढे जाऊन आणखी फोड करून सांगायचं तर महिलांच्या आवाजात तो वेगळेपण सादर करायचा, म्हणजे लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त ते शमशाद बेगम, कशाला शारदाचाही आवाज पेश करायचा. महेशकुमारच्या ह्या ऑर्केस्ट्रातलं हे वेगळेपण इतर कोणत्याही ऑर्केस्ट्रात तेव्हा दिसून यायचं नाही, त्यामुळे महेशकुमार अ‍ॅन्ड हिज पार्टी बघायला लोकांची तोबा गर्दी जमायची, एका अर्थी महेशकुमार हा त्या गर्दीचा हिरो असायचा.

एकदा त्याच्या एका शोममध्ये त्याने लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम वगैरे गायिकांची गाणी पेश केली आणि त्याने प्रेक्षकांना सहज म्हटलं, ‘देखिए, लताजी, आशाजी, गीताजी सभी का गाना हुवा, अब कौन रहा हैं?’…तितक्यात तिसर्‍या रांगेतली एक महिला उभी राहिली, तिने हात वर केला आणि ती स्टेजच्या दिशेने पुढे आली. तिने महेशकुमारला म्हटलं, ‘शारदा का गाना रह गाया हैं, मुझे देखना हैं के उस की बिलकूल अलग आवाज में आप कैसे पेश आते हो?’…त्या महिलेने जरी ते नम्रपणे म्हटलं होतं तरी महेशकुमारसाठी ते एक तसं आव्हानच होतं. पण महेशकुमारने ते आव्हान तिथल्या तिथे स्वीकारलं आणि पुढच्याच क्षणी जे गाणं सुरू केलं त्या गाण्याचे शब्द होते – तितली उडी, उड जो चली, फुल ने कहां, आ जा मेरे पास, तितली कहे मैं चली आकाश.

महेशकुमारने शारदाचा तो कणभर अनुनासिक आवाज अणि त्या गाण्यातला तिचा तो हसताखेळता मूड जसाच्या तसा पकडला होता. महेशकुमार हे गाणं गात होता आणि काही वेळापूर्वी ज्या महिलेने ह्या गाण्याची फर्माइश केली होती तिच्यासकट सगळ्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत त्या गाण्याचा ताल पकडला होता. गाणं संपलं तेव्हा नेहमीप्रमाणे प्रेक्षकांमधून वन्समोअर, वन्समोअर असा एकच गलका झाला. पण महेशकुमारने शारदाचं गाणं दुसरं सुरू केलं-देखो मेरा दिल मचल गया…गलका करणार्‍या प्रेक्षकांच्या कानावर त्या गाण्याचे सूर पडताच प्रेक्षक एकदम शांत झाले आणि त्यांनी त्या गाण्याला दाद म्हणून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

महेशकुमारकडे कलाकार म्हणून एक हातोटी होती. तो चाकं लावलेल्या एका टेबलावर आपली हार्मोनियम ठेवायचा आणि ते फिरतं टेबल इकडून तिकडे नेत हार्मोनियम वाजवता वाजवता असं काही गाणं पेश करायचा की शेवटपर्यंत प्रेक्षकांना पकडून, जखडून ठेवायचा. त्याच्या प्रत्येक शोला वेगवेगळी गाणी असायची, पण एक गाणं मात्र त्याच्या प्रत्येक शोला असायचं ते म्हणजे ‘कुहू कुहू बोले कोयलया.’ त्याच्या एखाद्या शोमध्ये हे गाणं त्याच्याकडून अनवधानाने राहून गेलं तर लोक त्याला त्या गाण्याची आठवण करून द्यायचे इतकं ‘कुहू कुहू बोले कोयलया’ ह्या गाण्याचं आणि महेशकुमार अ‍ॅन्ड पार्टी ह्या ऑर्केस्ट्राचं एक नातं होतं.

महेशकुमारसोबत त्याच्या भावाचाही त्याच्या ह्या ऑर्केस्ट्राच्या यशात सिंहाचा वाटा असायचा. तो गाणं गायचा, नृत्य करायचा, निरनिराळे रंगीबेरंगी कपडे घालून विनोदी किस्से सांगायचा आणि ऑर्केस्ट्रात आपले रंग भरायचा. हे दोघंही त्या एका काळात इतके लोकप्रिय होते की त्या लोकप्रियतेच्या जोरावर महेशकुमार खासदार तर नरेशकुमार आमदार झाला होता.
परवा त्या दोघांच्या निघून जाण्याने त्यांचा तो एक काळ डोळ्यासमोर उभा राहिला. महेशकुमार आणि नरेशकुमार, दोघांनाही श्रध्दांजली!