घरफिचर्ससारांशमेकिंग ऑफ आंदोलन

मेकिंग ऑफ आंदोलन

Subscribe

वरून आदेश आला-आंदोलन करायचं आहे, मोर्चा काढायचा आहे, कामाला लागा. कार्यकर्त्यांपर्यंत निरोप पोहोचवा…
अध्यक्षांच्या कानात तो आदेश शिरताच कानात वारं शिरावं तसा त्यांचा मोबाइल भिरभिरू लागला. सरचिटणीस चिकनचिली खात बसले होते त्यांच्या कानात अध्यक्षांचा मोबाइल भिरभिरला. सरचिटणीसांनी आधी चिकनचिली संपवली. मग तृप्त ढेकर दिला. मग अध्यक्षांनी दिलेल्या वरच्या आदेशाच्या अंमलबजावणीला सुरूवात केली. त्यांनीही आपला मोबाइल काढून गल्लीबोळातल्या कायकर्त्यांच्या कानोकानी केला. तारीख-वेळ सांगितली. जेवणाखाण्याचा इंतजाम असल्याचं सांगितलं. काही कार्यकर्त्यांना स्वत:सोबत काही रिक्त, काही अतिरिक्त लोकांना घेऊन यायचं फर्मान काढलं.

कार्यकर्त्यांनीही काही रिक्त, अतिरिक्त लोक गोळा करण्याचं मनावर घेतलं. काहींच्या आधीच ते संग्रही होते. काहींना ते गोळा करायला वेळ लागला नाही. त्यातले काही मोफत वाचनालयात, काही संध्याकाळी पिंपळाच्या पारावर मिळाले. काही रात्री बारबाहेर घुटमळताना, काही भजनसंध्येत मिळाले. त्यांना आंदोलनाची तारीख-वार देण्यात आली. त्यातल्या काहींनी आंदोलनाचा विषय कोणता हे विचारलं नाहीच, पण पक्ष कोणता हेही विचारण्याचे कष्ट घेतले नाहीत. ज्या काही सूज्ञांनी आंदोलनाचा विषय विचारला त्यांना सामान्य माणसाची ताकद दाखवून द्यायचंय इतकंच सांगण्यात आलं. त्यातले काही सळसळत्या रक्ताचे, काही मावळत्या रक्ताचे होते.

- Advertisement -

आंदोलनाच्या वेळेबरोबरच ते किमान किती वेळात होईल हेही सांगण्यात आलं. काही चिकित्सकांना कुठल्या मुद्याने ते सुरू होईल, कुठल्या मुद्यावर ते बिनचूक संपेल हेसुध्दा आगाऊ सांगण्यात आलं. आंदोलन सभास्थानी येताच संख्या एकाएकी ढेपाळू नये ह्याची ती व्यवस्था होती.

शहरातल्या काही लेखक-कवी-पत्रकारांकडून आंदोलनासाठी चमकदार घोषणा लिहून घेण्यात आल्या. हे लेखक-कवी-पत्रकार म्हणे अशा घोषणांची विक्री शहरातल्या सर्व लहानथोर पक्षांना प्रसंगी करतात. घोषणा डिजिटल पेन्टरकडे सोपवण्यात आल्या. त्याच्याकडे घोषणा येताच त्याने त्या वाचल्याही नाहीत. त्याआधी फलकांची, बॅनरची साइझ विचारली. घोषणेतल्या मजकुरापेक्षा, त्यातल्या सृजनशीलतेपेक्षा फलकाच्या साइझची त्याला जास्त काळजी होती. भाषेतल्या र्‍हस्वदीर्घापेक्षाही त्याच्यासाठी फलकाची साइझ महत्वाची होती. कितीतरी वेळा ‘आणि’ हा शब्द त्याने वाचला होता, स्वत:च्या कॉम्प्युटरवर गिरवला होता, पण तरीही ‘आणि’तला ‘णि’ तो त्याच्या हाताला जे वळण लागलं आहे त्याप्रमाणे दीर्घच टाइप करत होता.

- Advertisement -

…तर अशा व्याकरणाचार्याकडून फलक, बॅनर रंगवून झाल्यानंतर ते पक्षाच्या कार्यालयाच्या माळ्यावर ठेवण्यात आले. काही इनमिन महिला आंदोलनाला येणार होत्या त्या मोर्चाच्या पहिल्या फळीत असाव्यात, मागे सगळा पुरूष कार्यकर्त्यांचा घोळका असावा अशी आंदोलनाची नेपथ्यरचना ठरली.

ठरल्या तारीख, वेळ, वाराला सगळे आंदोलनजीवी पक्षकार्यालयात जमले. काही आत बसले, काही हातातल्या घड्याळात वारंवार बघत उभे राहिले. नेते आत-बाहेर करत बसले. त्यांच्याकडे त्यांच्या हातावरच्या मौल्यवान घड्याळातले आकडे पहाण्याइतकी सवड नव्हती. त्यांचं लक्ष आजचं आंदोलन कव्हर करायला कोणत्या चॅनेलचा कोणता कॅमेरामन येतो ह्याच्याकडे होतं.

इतक्यात मी चोवीस तासचा कॅमेरामन त्याच्या वायरींचं जंजाळ घेऊन हजर झाला. पक्षाच्या शहराध्यक्षांनी त्याला आला तसा कार्यालयात नेला आणि उकाळा पाजला. तो गरम गरम उकाळा घोट घोट घेत असतानाच शहराध्यक्ष बाहेर आले. त्यांनी आणखी कोणत्या चॅनेलचा आणखी कोणता कॅमेरामन आला आहे का ह्याची घारीच्या नजरेने पहाणी केली. इतक्यात त्यांच्या नजरेने लोबीपी माझा चॅनेलच्या कॅमेरामनला टिपलं. तो जवळ येताच एखाद्या प्राणीमात्राने आपल्या भक्ष्यावर घालावी तशी शहराध्यक्षांनी त्याच्यावर झडप घातली. त्याला लगोलग कार्यालयात नेलं. केबिनमध्ये बसवलं. त्याच्यासाठी एसी मोठा केला. त्याला पेप्सी आवडत असल्याचं शहराध्यक्षांना माहीत होतं. त्यांनी त्याच्यासाठी पेप्सीची ऑर्डर दिली.

आता चावी नाइन चॅनेलचा कॅमेरामन येऊन दाखल झाला होता. शहर वार्ता, शहर टाइम्स, शहर शक्ती, शहर दीप, शहरबंधु वगैरे शहरातल्या शहरात शहरापुरतीच तळपणार्‍या चॅनेलच्या कॅमेरामन्सनीही येऊन नांगर टाकला होता. पण त्यांची तहान गुलाबी चहावर भागवण्यात आली होती.

आता आंदोलनासाठी जमलेल्यांपेक्षा जमवण्यात आलेल्यांची चुळबुळ वाढू लागली होती. ते काही नेत्यांना आपली घड्याळं दाखवू लागले होते. आंदोलनाला उशीर होतोय अशी तक्रार करू लागले होते. नेते शहराध्यक्षांपर्यंत ती तक्रार पोहोचवू लागले होते.

शहराध्यक्ष म्हणाले, ‘हे बघा, मी चोवीस तासचा कॅमेरामन आलाय, लोबीपीचा कॅमेरा आलाय, चावी नाइनचा आलाय…आता फक्त कायबीएनचा कॅमेरामन यायचा शिल्लक आहे.’

शहराध्यक्षांनी त्याचं नाव घेतलं मात्र, तोही तात्काळ कार्यालयासमोर हजर झाला. शहराध्यक्ष म्हणाले, ‘चला, सगळे आले रे.’

आता शहराध्यक्ष अग्रभागी आले आणि त्यांनी जोरात घोषणा दिली, ‘हम से जो टकराएगा…’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -