घरफिचर्ससारांशमामन्नन...माणसाच्या संविधानिक प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष

मामन्नन…माणसाच्या संविधानिक प्रतिष्ठेसाठीचा संघर्ष

Subscribe

-संजय सोनवणे

मारी सेल्वराजच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला आणि उदयनिधी स्टॅलिनचा मामन्नन नेटफ्लिक्सवर येऊन अडीच महिने उलटलेत, मात्र अजूनही चित्रपट हिंदीत नाही. इंग्रजी सबटायटल्सने आशय पोहचायला मदतच होते. जाणिवा संवेदनांना भाषेचा अडसर नसल्यानं मामन्नन खोल परिणाम करतो. ज्याप्रमाणे नागराजचा फँड्री, सैराट हिंदीत डब झाल्याच्या कल्पनेतच आशयविषय मागे पडून केवळ शाब्दिक भाषांतराचा धोका असतो. फँड्रीतल्या संवादांचा अर्थ, सिनेमाच्या मराठी मातीतल्या संबंधित जाणिवा आणि कथानकाचा ग्रामीण बाज हा मराठीच असल्यानं चित्रपटाच्या परिणामाला हिंदी किंवा इतर कुठल्याही भाषेत धोकाच पोहचू शकतो. इंग्रजी किंवा सबटायटल्समध्ये ही भानगडच नसते. अशा कलाकृती भाषेच्या पलीकडे माणसांच्या कथा सांगणार्‍या असल्यानं मामन्ननचा परिणाम कायम असतो. मामन्नन म्हणजे राज्य करणारा राजा. हे राजपद मिळवण्याची संधी नागरिक आणि माणूस म्हणून संविधानाने जरी दिली असली तरी वर्णवर्चस्वातल्या जातीय अहंकाराने वंचितांना अद्याप माणूस म्हणून मान्यता देऊन त्यांच्या या संधीचा स्वीकार केलेला नाही.

- Advertisement -

मारी सेल्वराजचा हा तिसरा सिनेमा. पेरीयेरम पेरुमल, कर्नननंतर मामन्नन या सर्वच चित्रपटात ‘वंचितांचा भवताल’ कायम आहे. या तीनही सिनेमांची हाताळणी, पार्श्वभूमी वेगळी असली तरी वंचित म्हणजे उपेक्षितच सामाजिक आणि राजकीय दृष्टीने, आर्थिक, सांस्कृतिक उपेक्षा हा त्यापुढचा टप्पा मामन्ननमध्येही येतोच. मामन्नन हा समाजपटाचा पाया असलेला संपूर्ण राजकीय पट असतो. संवाद, सीनमधून पडद्यावर चित्रपट उलगडत गेल्यानं केवळ भरलेल्या प्रसंगातून मुक्तता होते. सेल्वराजला वेगळ्या एडिटिंगची गरज नसावी इतकं बांधलेलं कथानक मामन्ननचं असतं. वंचितांच्या जगण्यातही प्रस्थापितांच्या कित्येक पटीत कलेतलं मानवी सौंदर्यमूल्य असू शकतं हे मामन्नन अनुभवल्यावर स्पष्ट व्हावं. मारीनं दक्षिणेकडे आंबेडकरी जाणिवांचे सिनेमे बनवायला घेतलेत.

हे धाडस त्यानं संपूर्ण ताकदीनं पडद्यावर यशस्वी केलंय. मारीच्या कथानकाचे संदर्भ इथल्या सिनेइंडस्ट्रीनं नाकारले होते. या रांगेत सत्यजीत रे, श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, जब्बार पटेल, सागर सरहदी, अलीकडचे अनुभव सिन्हा, वेट्रीमारन आणि नागराज मंजुळे अशी मोजकीच नावं यावीत. बाकी उरलेली इंडस्ट्री ओटीटीमुळे सेन्सॉरच्या कात्रीतून सुटून बरेचदा वास्तवाच्या नावावर लव्ह, सेक्स, धोका, गुन्हेगारी, शिवीगाळ, स्कँडल्समध्ये कथानकं शोधणारी झालीय. यात मामन्ननचं वेगळेपण त्याच्या टेकींगमुळे उठून दिसावं. कर्ननमध्ये सामान्य वंचितांच्या वस्तीतल्या बसथांब्यासाठी केलेल्या रक्तरंजित संघर्षाचं जीवघेणं चित्रण मारीनं केलं होतं. बसच्या एक तिकीट काढण्याच्या केवळ अधिकारासाठी माणसांच्या जीवाचं घेतलं जाणारं मोल आधुनिक मानल्या जाणार्‍या समाजव्यवस्थेतली दरी स्पष्ट करणारं होतं. मामन्नन त्याही पुढं जातो.

- Advertisement -

इथं शोषण आहे, पण ते राजकीय अर्थानं. सत्ता, मानमरातब असतानाही शोषित गटात मोडणार्‍या जाती समूहांना माणूस म्हणून ओळखलं जात नाही. राज्यघटनेनं व्यावहारिक आणि भौतिक जगात पुढे जाण्याची संधी दिली, परंतु जातीय वर्चस्वाचा माज असलेल्या उतरंडीतल्या वरच्या जात घटकांची मने बदललेली नाहीत. वरच्या घटकांकडून खालच्या घटकांप्रति दया, उपकाराची, नोकरपणाची भावनाच कायम आहे. त्यात बदल झालेला नाही. मामन्नन हेच स्पष्ट करतो. ‘जोपर्यंत सामाजिक समता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत आर्थिक आणि राजकीय समानतेला अर्थ नाही’ हे बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य हे मामन्ननचं कथाबीज आहे.

मामन्ननमध्ये आंबेडकरी चळवळीच्या प्रतीकांचा योग्य वापर सेल्वराजनं केलाय. चित्रपटाची पहिलीच फ्रेम बाबासाहेबांच्या भिंतीवरल्या स्केचवरून होते. त्यानंतर बुद्ध मूर्ती, बोधी, पिंपळवृक्ष, लेखणी, कागद, खुर्ची ही प्रतीके पुरेशी बोलकी केल्याने समुपदेशक संवाद नाहीत. मामन्नन म्हणजे राज्य करणारा राजा. हे राजपद मिळवण्याची संधी संविधानाने जरी दिली असली तरी वर्णवर्चस्वातल्या जातीय अहंकारातून सर्व प्रकारच्या सत्ता मिळवणार्‍यांनी अद्याप या संधीचा स्वीकार केलेला नाही. जात वर्चस्वातून होणारे शोषण कायम आहे. जरी सत्तेत समान वाटा मिळाला तरी समान संधी, समान मान, समान जागा, समान माणुसकी इथला वर्चस्ववादी समुदाय शिकलेला नाही. मामन्नन हेच पडद्यावर आणतो.

अभिनेते वेदीवेलूंनी साकारलेला मामन्नन कमालीचा संतुलित झालाय. चित्रपटाला बापल्योकाच्या नात्याच्या संवेदनेची किनार आहे. ही किनार सेल्वराजने उगाचच इमोशनल केलेली नाही. त्यामुळे मुख्य कथानकावरून कथा, पटकथा भरकटण्याचा धोका टळलेला आहे. उदयनिधी स्टॅलिनने साकारलेला अधिवीरन विरा अत्याधुनिक जगात श्वास घेऊ पाहणार्‍या तरुणाची घुसमट पडद्यावर गडदपणे मांडतो. आजची नवा विचार करणारी टेक्नोसॅव्ही तरुणाई जुन्या पिढीतल्या तत्त्वांच्या संघर्षाचीही मामन्ननची कथा आहे. हिंसा, जीव घेणे, क्रौर्य, माणसाचा निर्दयपणे रक्त सांडून जीव घेण्याची विकृती हजारो वर्षे पोसण्यामागे जातीय अहंकाराच्या विषाने औषधाचे काम केले आहे. मामन्नन हा विषारी अहंकाराचा परिणाम थेटपणे समोर आणतो. वंचित, पीडित, शोषित समुदायाचे राजकीय सत्ता हे साध्य नाही. ते साधन असून त्यातून संविधानाला अपेक्षित असलेला सामाजिक न्याय आणि माणसाची प्रतिष्ठा जपण्यासाठीचीही लढाई असल्याचे मामन्ननमधून ठळकपणे समोर येते.

अभिनयात फहाद फासीलने पडद्यावर उभा केलेला राजकारणी रत्नवेलू कमालीचा परिणामकारक झालाय. चित्रपटात नेहमीच घोडेस्वारी करणारा फहाद हा सिनेइंडस्ट्रीतला लंबी रेसचा घोडा आहे हे त्याने याआधी दक्षिणेकडच्या ‘पुष्पा’तून दाखवून दिलंय. संयत, डोळ्यांतून बोलणारा फहाद म्हणूनच पंकज कपूर, इरफान खान, नवाजुद्दीनच्या रांगेत जाऊन बसलेला आहे. रवीना रवीनं साकारलेली ज्योती नव्या पिढीच्या महिलांचं प्रतिनिधित्व करते. फुकाची लव्हस्टोरी, उपदेशी संवाद, भडक बटबटीत प्रसंग, माणसाच्या मर्यादेपलीकडचा काल्पनिक नायक सेल्वराज नेहमीच पडद्यावर टाळत आलेला आहे. त्यामुळे दक्षिणेकडचा असूनही त्याच्या सिनेमातला हिरो पाच पन्नास जणांना हिरो स्टाईलमध्ये बुकलून काढत नाही. कर्नन आणि पेरुयेरम पेरुमलमध्येही त्यानं अवास्तव नायक नाकारला होता.

पेरुयेरममधला श्वान, धनुषने परिणामकारकतेने साकारलेल्या कर्ननच्या हातावर रेंगाळणारी किडामुंगी, करकचून पाय बांधलेलं गाढव, झडप घालून कोंबडीची पिल्लं नेणारी घार ही पशूप्रतीकं सेल्वराज माणसांच्या रांगेत आणून ठेवतो. पेरुयेरममध्ये नायक असलेला श्वान मामन्ननमध्ये खलनायक होतो. या श्वानातलं कुत्रेपण कमालीचं तिरस्कारणीय असंच अदखलपात्र असतं. कुत्री आणि माणसांमध्ये फरक न करणारा रत्नवेलू संयतपणे अंगावर येतो. इथं उपेक्षित जगणं डुकरांच्या वाट्याला आलेलं आहे. माणसांच्या मनात लपलेला श्वान, डुक्कर आणि घोडा माणसांच्या राजकारणात गरजेच्या वेळेनुसार माणसाच्या देहातून बाहेर पडतो. एकसारख्या दिसणार्‍या माणसांना पाळीव पशूंच्या रांंगेत नेणारा सेल्वराज दखलपात्र ठरतो. सेल्वराजच्या कथा, दिग्दर्शनाचे इतर अनेक पैलू पडद्यावर उतरतात. ए. आर. रेहमानचं संगीत मानवी आक्रंदन गडद करतं. सिनेमॅटोग्राफीसाठीही मामन्ननचं कौतुक करायला हवं. श्वानातली स्पर्धा, असेम्बी, निवडणुका, पाऊस, अंधारलेले रस्ते, वाहनांच्या हेड, टेललाईट्सही व्यक्तीरेखा होतात.

मामन्नन आणि अधिवीरनची केमेस्ट्री जुळून आली. श्वानांचे युद्ध, शर्यत, मार्शल आर्टमधली फ्री स्टाईल फाईट, आमदार असतानाही मामन्ननला खुर्चीवर बसण्यासाठी वाटलेला संकोच जातीव्यवस्थेच्या विषमतेचा भेसूर चेहरा समोर आणतो. सर्वहारा समुदायातल्या मागासांसाठी पैसा, संधी, आरक्षण ही माणसाची माणूस म्हणून संपूर्ण प्रतिष्ठा मिळवण्यासाठी साधने आहेत. सत्तेच्या राजकारणाला जातीय, धार्मिक अहंकाराची जोड मिळाल्यावर असे समाज आणि राजकारण रक्तपिपासू चवताळलेल्या कुत्र्यासारखे बेलगाम होते. या माणसातल्या जनावराला नियंत्रणात आणण्यासाठी कायदेशीर मार्गाने चालवल्या जाणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मार्ग दाखवलेल्या निवडणुकीतील लोकशाहीचेच औषध असते, म्हणूनच मामन्ननच्या पडद्यावर डॉ. आंबेडकर ही व्यक्तीरेखाही विचार म्हणून पडद्यामागे अदृश्य अशी दिसत राहते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -