यहाँ किसी का कोई ठिकाना नही…

‘दिवार’मध्ये इन्स्पेक्टर असलेला शशी कपूर रोटी चोरणार्‍या मुलावर गोळी झाडतो. त्या मुलाचे वडील शशी कपूरला नैतिक शिकवण देतात, त्यानंतर शशी आपला मोठा भाऊ विजय वर्मा म्हणजे अमिताभच्या गुन्हेगारी कारवायांची फाईल तपासासाठी ताब्यात घेतो, हा नैतिक निर्णय होऊन ‘दिवार’चे कथानक वळण घेते. ‘ठिकाना’मध्ये मात्र मनाच्या न्यायालयाने सुनावलेला निर्णय आणि त्याचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम थेट असतो. या निर्णयातून निर्माण होणारी घुसमट, उद्वीग्न हतबलता पटकथेसोबतच समांतर प्रवास करत असल्यानं दिवारच्या तुलनेत ठिकाना जास्त परिणामकारक ठरतो. दोन्ही चित्रपटांतून मानवी मनाच्या दोलायमान अवस्थांचा अचूक वेध घेण्यात आला आहे.

माणसाला स्वतःशी खोटं बोलता येत नसतं. मनाच्या न्यायालयात प्रत्येक गोष्ट स्पष्ट असते. अमिताभ, शशीचा अभिनय असलेला यश चोप्रांचा ‘दिवार’ आणि महेश भट्टचा ‘ठिकाना’ या दोन्ही चित्रपटाच्या कथाकांचं हे एक सामायीक सूत्र आहे. दिवारमध्ये मनाच्या न्यायालयात इन्स्पेक्टर रवी वर्मा म्हणजेच शशी कपूर स्वतःला त्या वेळी उभं करतो, ज्यावेळी त्याने डबलरोटी चोरणार्‍या गरीब मुलावर तो गोळी चालवलेली असते. हा गरीब मुलगा एका कफल्लक शिक्षकाचा असतो. परिस्थितीमुळे आपल्या खरेपणाशी किंचितही तडजोड न केल्यामुळे कुटुंबासह भणंग जगणं ओढावलल्या ए.के.हंगल या गरीब शिक्षकाकडून इन्सपेक्टर रवीची एका झोपडीत नैतिक मूल्य शिकवणारी शाळा भरवली जाते.

इथं मनाच्या न्यायालयात रवी वर्मा थेट दोषी ठरवला जातो. पुढे या दोषातून सुटका होण्यासाठी रवी आपला मोठा भाऊ विजय वर्मा अर्थातच अमिताभच्या गुन्हेगारी कारवायांची फाईल तपासासाठी ताब्यात घेतो, हा नैतिक निर्णय होऊन दिवारचे कथानक वळण घेते. ठिकानामध्ये मात्र मनाच्या न्यायालयाने सुनावलेला निर्णय आणि त्याचा नातेसंबंधांवर होणारा परिणाम थेट असतो. या निर्णयातून निर्माण होणारी घुसमट, उद्वीग्न हतबलता पटकथेसोबतच समांतर प्रवास करत असल्यानं दिवारच्या तुलनेत ठिकाना जास्त परिणामकारक ठरतो. ठिकानामध्ये स्मिता पाटीलने साकारलेल्या शशी या अनिलच्या बहिणीने हा हतबल परिणाम साध्य करण्याचा सर्वात मोठा वाटा उचललेला आहे.

यश चोप्रांच्या दिवारमध्ये सुरुवातीचा प्रसंग पोलीस अकादमी पुरस्कार सोहळ्याचा आहे. ज्यात रवी आणि त्याच्या आई सुमित्रादेवी ( निरुपा रॉय) यांना गौरवलं जात आहे. ठिकानामध्येही पहिलाच प्रसंग वकिलांच्या बार कौन्सिलच्या पुरस्कार सोहळ्याचा आहे. ज्यात वकील रवी गोयल म्हणजेच अनिल कपूर, त्याची आई रोहिणी हट्टंगडी आणि बहीण स्मिता पाटील यांचाही गौरव केला जात आहे. ठिकानाचा नायक वकिल अनिल कपूर (रवी गोयल ) हा एखाद्या दारुत बुडालेल्या स्वप्निल कवीसारखा आहे. जगात आनंद, शांतता, समता नांदावी असं त्याचं स्वप्न आहे.

सपना है मेरा यही..फूल खिले गली गली
जहाँ तक निगाहे जाए..मंजर सुहाना हो

असं तो सुरेश धर्मकच्या शब्दांतून पडद्यावरच्या संध्याकाळी दारुच्या नशेत मुंबईतल्या सडकांवर गुणगुणंत फिरतोय. त्याचं माणूसपणावर प्रचंड प्रेम असतानाच वकिल असतानाही खोटं पचवणं त्याला शक्य नाही. त्याचं हे वागणं त्याच्या वकिली व्यवसायाच्या विरोधात अडचणीचं आहे. त्याची बहीण शशी घरातील कर्ता पुरुष आहे, रवी आजही बहीण शशीकडूनच पैसे घेऊन तिला राखीपौर्णिमेला ओवाळणी देतो. रवीचा वकील असलेला दारुडा बाप देहाने जरी मरून गेलेला असला तरी त्याने खर्‍याशी तडजोड न करण्याचा उपजत वारसा त्याने रवीला जन्मतःच नकळत दिलेला आहे. या खरेपणाच्या बापलेकाच्या पाट्यात रवीची आई रोहिणी हट्टंगडीचं जगणं पार विस्कटून गेलं आहे. महेश भट्टच्या सिनेमातला नायक सामान्य माणूसच असल्याचं वैशिष्ठ्य ठिकानातही कायम आहे. रवी कमावता नसल्यानं त्याच्या आईकडून त्याला बहिणीच्या जीवावर बसून खाणारा ऐतखाऊ म्हणून टोमणे ऐकावे लागत आहेत. रवीला बहिणीच्या लग्नाची चिंता आहे.

तर मुलगी सासरी गेल्यावर आपलं घर कसे चालणार, अशी आई रोहिणी हट्टंगडीला भीती आहे. यात बहीण स्मिता पाटीलचं लग्नाचं वय उलटून चाललंय, या परिस्थितीत तिचं (सुरेश ऑबेरॉय) रणविर सिंग या पोलीस अधिकार्‍याशी प्रेम होऊन लग्न ठरलंय, शशी रणवीरच्या मुलाची आई होणार आहे. मात्र पोलीस असतानाही रणवीर सिंगने एका निष्पाप माणसाची हत्या केलीय आणि या मारेकरर्‍याला शिक्षा करण्यासाठीचं वकिलपत्र रवी म्हणजेच अनिल कपूरनं घेतलं आहे. रणवीरला कोर्टात आरोपी सिद्ध करणं म्हणजे स्वतःच्या बहिणाला लग्नाआधी विधवा करण्यासारखं आहे. रवीची होणारी ही घुसमट अनिल कपूरने पडद्यावर ताकदीने मांडली आहे. तर या घुसमटीतून त्याची सुटका करणारी मोठी बहीण शशी पडद्यावर साकारताना स्मिता पाटीलने अभिनयाची जी उंची गाठली आहे ती आक्रोश, मंडी, बाजार या चित्रपटांच्या तुलनेत तसूभरही कमी नाही. मात्र गोविंद निहलानी आणि इतर समांतर कलात्मक चित्रपटांच्या तुलनेत स्मिता पाटीलच्या ठिकानाची चर्चा होत नाही.

ऐंशीच्या दशकात आलेला ठिकाना बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. हे दशक एकूणच हिंदी पडद्यासाठी निराशाजनकच होतं. अनिल कपूरच्या गंभीर व्यक्तीरेखा साकारणार्‍या साहेब, मशाल या चित्रपटांच्या जवळ जाणारा ठिकाना विस्मृतीत गेला. ठिकानामधील प्रत्येक व्यक्तीरेखेचा कथनकानुसार स्वतःशी संघर्ष सुरू आहे. व्यवस्थेने ड्युटी म्हणून उभ्या केलेल्या परिस्थितीसमोर हताश ठरलेला सुरेश ऑबेरॉय किंवा त्याचा सहकारी पोलीस अधिकारी अनुपम खेर हे सर्वच हतबल आहेत. ही हतबलता नातेसंबंधांना संपुष्टात आणणारी अशी जीवघेणी आहे. या व्यवस्थेने माणसांमध्ये स्थैर्य, पैसा कमावणे आणि जिवंत राहाण्याची स्पर्धा तयार केली आहे. हा पैसा कसा कमावला जातो, जगण्यात स्थैर्य कसे मिळवले जाते, हा प्रश्न व्यवस्थेच्या परिघात येतच नाही.

या स्पर्धेत टिकून राहाणे म्हणजे यश अशी व्याख्या जगण्याची झाल्यामुळे ही व्यवस्था नाईलाजाने पोसावी लागत आहे. ठिकाना ही हतबलता थेटपणे मांडतो. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या व्यवस्थेची ही इमारत त्याचा भाग असलेल्या माणसांनीच बांधलेली आहे. या इमारतीच्या वीटा इथली माणसंच आहेत, प्रत्येकाने स्वतःची वीट बाजूला केल्यास ही इमारत जमीनदोस्त होण्यास वेळ लागणार नाही, या व्यवस्थेत रचलेली पहिली वीट बाजूला करणार्‍या स्मिता पाटीलचा गौरव त्यामुळेच बार कौन्सिलकडून केला जात आहे. ठिकानाची सुरुवात याच गौरवाच्या प्रसंगातून होते. माणसाच्या मनाची साद आणि मनाने दिलेला खर्‍याखोट्याचा निर्णय थेट आणि स्पष्ट असतो, तरीही मनाविरोधात गेल्याने मुडदे झालेल्या माणसांचे देह कुटुंब, समाज व्यवस्थेला दाखवण्यासाठी जिवंतपणाचा आव आणतात. ठिकाना माणसांचे हे माणूस म्हणून मेलेपण थेट दाखवतो.

राजकुमार संतोषीच्या दामिनीतही बलात्काराच्या खटल्यात मनाच्या न्यायालयाचा न्याय अखेरीस केला जातो. न्यायासनाकडूनच त्यावर भाष्य केलं जातं. दिवार चित्रपटात त्यासाठी प्रसंग घडावा लागतो, ठिकानामध्ये हाच प्रसंग संपूर्ण पटकथा असल्याने हा खटला अवास्तवपणे समोर येत नाही, शिवाय तो शिकवणीच्या स्वरुपातही जात नाही, हे दिग्दर्शक आणि पटकथाकार सुरज सनिमचे यश आहे. स्मिता पाटील, अनिल कपूरचा संयत अभिनय, कुठलीही व्यावसायिक गणितं न जुळवता केलेलं पटकथेला न्याय देणारं दिग्दर्शन, सामान्य माणसांच्या जगण्यातील रोजचे संवाद, त्याच्या अडचणी समोर आणणारा ठिकाना म्हणूनच एक चांगला अनुभव ठरतो.