Homeफिचर्ससारांशMangesh Padgaonkar : आनंदयात्री पाडगावकर

Mangesh Padgaonkar : आनंदयात्री पाडगावकर

Subscribe

आपलं महानगरच्या या सदरातून साहित्य, कला आणि एकूणातच सांस्कृतिक क्षेत्राला पुढे घेऊन जाणार्‍या व्यक्ती आणि संस्थांच्या कार्याची, त्यांच्या कर्तृत्वाचे स्मरण इथे आपण करणार आहोत. आपल्या व्यक्तिमत्वावर संस्कार घडवणारी अनेक सांस्कृतिक केंद्रे आपल्या भवतालात असतात. त्यात जशा काही व्यक्ती असतात तशाच काही संस्थांचेही योगदान महत्त्वाचे असते. आपले जगणे आणि एकूणच आपले भावविश्व त्यांनी समृद्ध केलेले असते. अशाच एका अवलिया कवीचे स्मरण आज आपण करणार आहोत. ते कवी म्हणजे मंगेश पाडगावकर !

-डॉ. अशोक लिंबेकर

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात कविवर्य मंगेश पाडगावकर यांचे नाव आदराने घेतले जाते. महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण, साहित्य अकादमी अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. काव्य क्षेत्रात त्यांनी केलेले देदीप्यमान कार्य आपण कधीही विसरू शकणार नाहीत. पाडगावकरांनी त्यांच्या कवितेतून आपणास जगायला शिकवले. जीवनानुभवातील विविध अवस्थांतरे त्यांच्या कवितांनी टिपली. म्हणूनच ‘सांग सांग भोलानाथ’ पासून ते ‘भातुकली’च्या खेळापर्यंत रमलेली त्यांची कविता आपल्याला भेटत राहिली.

कधी बाळहट्ट तर कधी लडिवाळता, कधी निसर्गातील विभ्रम तर कधी माणसाच्या मनाच्या नानाविध भाववस्था चितारत त्यांच्या कवितेने मराठी माणसांचे भावविश्व व्यापले. माणसाचे वय आणि अवस्था कोणतीही असो पाडगावकरांच्या कवितेने सर्वांचीच सोबत केली आहे. तिला कुणाचेच वावडे नव्हते. म्हणूनच पाडगावकरांची कविता म्हणजे बागेत उमललेल्या नानाविध रंगांच्या फुलांचा उत्सवच जणू. त्यांच्या कवितेत निसर्गाची सारी रूपे आपणास दिसतात.

थेट इवलाशा गवतफुलापासून ते या सृष्टीला जागवणार्‍या सूर्यापर्यंत त्यांची कविता स्वाभिमानाने, आनंदाने जगणे शिकवते. ‘जरी तुझिया सामर्थ्याने ढळतील दिशाही दाही ! मी फुल तृणातील इवले उमलणार तरीही नाही ! असा आत्मविश्वास, सत्वाची भाषा प्रकट करणारी त्यांची कविता रसिकाला स्वसामर्थ्याची जाणीव करून देते. ‘फुलून येता फूल बोलले! मी मरणावर हृदय तोलले! अशी जेव्हा त्यांची कविता बोलते तेव्हा माणसाचे रडगाणे किती फिजूल आहे याची जाणीव होते आणि दुःखाचा किती बाऊ करावा? याचे चिंतन नकळत आपल्या मनात येते.

एक दोन दिवसाचे अल्प आयुष्य लाभणारे फुल आपले निर्माल्य होणार याची जाणीव असूनही आपले फुलणे सोडत नाही हा आशावाद व्यक्त करणारी पाडगावकरांची कविता म्हणून तर आनंदाचे निखळ विधान आहे. सांगा कसं जगायचं? कुढत कुढत की गाणी म्हणत तुम्हीच ठरवा… असे जेव्हा त्यांची कविता सांगते तेव्हा खरोखरच ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!’ या जाणीवेने मन भरून येते.

मंगेश पाडगावकर हे माझेच काय अनेकांचे आवडते कवी. त्यांचा पिंड हा सौंदर्यवादी. असे असले तरी सलाम, गझल, विदुषक यातील कवितांनी त्यांचे सामाजिक, राजकीय चिंतन अभिव्यक्त झाले. धारानृत्य हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९५० साली प्रकाशित झाला आणि त्यांतर मराठी कवितेच्या क्षितिजावर उगवलेला हा शुक्रतारा आपल्या स्वयंभू तेजाने पुढील सहा-सात दशके मराठी कवितेच्या आभाळात तळपतच राहिला. भटके पक्षी, मीरा, उत्सव, बोलगाणी, जिप्सी, छोरी, तुझे गीत गाण्यासाठी हे त्यांचे काही काव्यसंग्रह तर भोलानाथ, बबलगम, चांदोमामा या त्यांच्या बालकवितेने रसिकांना भुरळ घातली.

त्यांच्या कवितांनी लहान थोरांच्या जीवनात खर्‍या अर्थाने आनंद पेरला. निसर्गावर, त्याच्या विविधांगी रूपावर, माणसाच्या मनावर, जगण्यावर प्रेम करायला शिकवणारा हा कवी मानवी जीवनाची अर्थपूर्णता कवितेत रचत बसला. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी, असे म्हणताना पेला अर्धा सरला आहे असेही म्हणता येते आणि पेला अर्धा भरला आहे, असेही म्हणता येते. सरला आहे म्हणायचे की, भरला आहे म्हणायचे ..? तुम्हीच सांगा कसे जगायचे, गाणे म्हणत की रडत कुढत तुम्हीच ठरवा, असे जीवनाचे सार, जीवनाचे सकारात्मक तत्वज्ञान सांगितले.

पाडगावकरांच्या कवितांनी आपणास काय दिले ? तर मला वाटते त्यांच्या कवितांनी जगण्याचा सकारात्मक उद्गार दिला. जगण्याची उमेद दिली. अस्वस्थता हा तर मानवी जीवनाला लाभलेला शापच. माणूस जसा प्रत्येक युगात भटकत इथपर्यंत येऊन स्थिरावला असला तरी तो स्वस्थ नाही. चंचलता ही मानवी मनाचा स्थायी भाव. त्याला काबुत ठेवणे तसे कठीणच. काही स्थितप्रज्ञ योगी कठोर साधना करून या मनाला लगाम घालू शकतात; पण समान्य माणसाचे तसे नसते. तो नेहमीच ‘जिप्सी’ असतो.

त्याचे मनही असेच जिप्सी असते; परंतु या गतिमान, प्रवाही मनाला आणि माणसाच्या जीवनाला कुठेतरी स्थिर व्हावेच लागते. असे स्थिर होण्याचे ठिकाण म्हणजे निसर्ग, प्रेम, जगण्यातील सुंदरता! अशा मनाला शांत करणार्‍या, सुखावणार्‍या समृद्ध वाटा, मनोहारी जागा पाडगावकरांच्या कवितेने दाखवल्या. म्हणूनच त्यांच्या कवितेतील विरह, दु:ख मनाला चटका लावून जात असले तरी ते उसवून टाकत नाही. मनाला उद्ध्वस्त करत नाही. ते आपल्या मनाला हलवून, गदगदून टाकते, पण आत्महत्येस प्रवृत्त करत नाही.

अखेरचे येतील माझ्या, हेच शब्द ओठी ! लाख चुका असतील केल्या ..केली पण प्रीती! अशी समजंस जाणीव त्यांच्या कवितेच्या मागे आहे. त्यांच्या कविता अभ्यासल्या म्हणजे ही सकारात्मकता दिसून येते. वरवर त्यांच्या काही कविता विरही, दु:खद अनुभूतीने व्याप्त वाटतात. तर तिच्या शेवटात असलेला सकारात्मक दृष्टिकोन समंजस जगण्याचा मंत्र देणारच आहे. त्यांच्या भातुकलीच्या खेळामधली हे गाणे पाहा.

‘का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना..का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना … वार्‍यावरती विरून गेली एक उदास विराणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी …’ हे गीत कुणाही संवेदनक्षम माणसाच्या मनाला चटका लावून जाणारेच; पण पाडगावकर या गाण्यातही आशावादच प्रकट करतात. म्हणूनच ती रडगाणी नाहीत तर बोलगाणी आहेत. तिला विचारी राजा, का हे जीव असे जोडावे, का दैवाने फुलण्याआधी फुल असे तोडावे …? कधी कधी असे वाट्याला येते खरे.

भातुकलीचा खेळ पुरा होण्याआधीच उधळून जावे, तसे माणसाच्या खर्‍या आयुष्याचा खेळ जेव्हा असा वार्‍यावर उधळला जातो नि आयुष्याच्या वाटा वेगळ्या होतात, तेव्हा काय करायचे असते? असा पेच असतो. या भिन्न वाटांनी प्रवास करणे हेच तेव्हा भागध्येय असते. पुन्हा कधीही एकत्र न येण्यासाठी. हा जीवनाला लाभलेला शाप मरणापेक्षा काय कमी असतो…? पण जगणे आणि जागणे थांबवता येत नाही.

आयुष्याचा प्रवास सुरूच ठेवावा लागतो. अशा वेळी त्या मरणावर हृदय तोलणार्‍या फुलांचाच आदर्श घ्यावा लागतो. म्हणूनच पाडगावकरांची कविता सांगते ‘राणी वदली बघत एकटक, दूरदूरचा तारा, उद्या पहाटे दुसर्‍या वाटा, दुज्या गावचा वारा, ‘राणीची ही भाषा गूढ असली तरी तिचा स्वीकार करण्याखेरीज राजाला कोणताच पर्याय नसतो.

कारण त्यांच्या प्रेमाच्या मागे असलेला प्रगल्भ, समंजस सुसंस्कृततेचा पूल त्यांना जगण्याचा अव्हेर करू देत नाही. पाडगावकरांच्या कवितेने अशा जगण्याच्या नानाविध वाटा दाखवल्या. म्हणूनच ते म्हणू शकले, हासत दुःखाचा केला मी स्वीकार! वर्षिले चांदणे पिऊन अंधार, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री, आनंदयात्री मी आनंदयात्री.

क्रमश :