घरफिचर्ससारांशपॅन कार्डवर लक्ष ठेवा

पॅन कार्डवर लक्ष ठेवा

Subscribe

तुम्ही सर्वजण पॅन कार्ड वापरत असालच! ह्या पॅन कार्डची गोपनीयता जर जपली नाही, तर तुम्ही संकट ओढवून घेऊ शकता, हे तुम्हाला माहीत आहे का? काही दिवसांपासून पॅन कार्डच्या गैरवापराशी संबंधित अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे, याची खात्री तुम्ही ताबडतोब करून घ्या.

आपल्या महत्वाच्या कामांसाठी, कागदपत्रांसाठी, ओळख पटविणार्‍या पुराव्यांची गरज पडते. त्यात अग्रस्थानी आधार कार्ड आणि त्यानंतर पॅन कार्डचा नंबर लागतो. हे पॅन कार्ड एक प्रकारे इन्कम टॅक्स विभागाकडून मिळालेले आपले ओळखपत्र असते. बँकेत खाते उघडणे, आर्थिक व्यवहार पार पाडणे, हॉटेल बूकिंग, मोबाइलचे सिम, सोने किंवा मालमत्ता खरेदी खरणे, कर्ज घेणे, कर भरणे इत्यादी महत्वाच्या कामकाजांसाठी पॅन कार्ड गरजेचे असते. त्यामुळे त्यांची गुप्तता जपणे हे अत्यावश्यक आहे. पण, जर ती जपली गेली नाही, तर तुम्ही मोठ्या आर्थिक संकटात पडू शकता. आज ह्या लेखात आपण हे जाणून घेणार आहोत की, पॅन कार्ड संबंधी गुन्हे कसे घडतात, आपल्या पॅन कार्डचा जर कुणी गैरवापर केला, किंवा करत असेल, तर आपण ते कसे जाणून घेऊ शकतो. आणि असे होऊ नये म्हणून काय काळजी घेऊ शकतो.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या फ्रॉड्सपैकी एक ह्या पॅन कार्डच्या माध्यमातून झालेला आहे. हा फ्रॉड चक्क सात हजार पस्तीस कोटीचा आहे. एक मोठी कंपनी वेगवेगळ्या देशांमध्ये जवळपास एकतीस ठिकाणी हॉटेल्स चालवत होती. ही कंपनी हॉली डे पॅकेजेस देत होती. ह्यामध्ये इन्व्हेस्टरला अ‍ॅडवान्समध्ये रूम बूक करण्याची सेवा देत होती. तसेच ह्या स्कीमचे एक वैशिष्ठ्य होते, जर बूक केलेली रूम वापरली गेली नाही, तर त्याच्या बदल्यात तुम्हाला रिटर्न मिळेल. अर्थातच इन्व्हेस्ट केलेल्या पैशांवर इंट्रेस्ट मिळत राहील अशी सेवा होती. तीन वर्षांसाठी पन्नास टक्के, सहा वर्षांसाठी शंभर टक्के, ह्या पद्धतीने रिटर्न मिळत असे. बर्‍याच लोकांनी हयात इन्व्हेस्ट केले. सुरुवातीला त्यांना चांगला फायदा मिळाला. त्यामुळे ह्या कंपनीवर लोकांचा विश्वास बसला. मग कालांतराने ह्या कंपनीने एजेंट्सची नेमणूक सुरू केली. जे लोक ह्यात रक्कम गुंतवतात, टेक एजेंट म्हणून बाकी लोकांना हे पॅकेजेस विकू शकत होते. त्यांना ह्या कामाच्या बदल्यात कमिशन मिळत असे.

- Advertisement -

यानंतर कंपनीने मोठमोठ्या हॉटेल्समध्ये मीटिंग्ज् घ्यायला सुरुवात केली. त्यात लोकांना बंगले, गाड्या, अशी श्रीमंतीची मोठी स्वप्ने दाखवली जाऊ लागली. ह्या मीटिंग्ज्मध्ये काही लोकांची उदाहरणे देऊन, त्यांनी कसे कंपनीमध्ये पैसे गुंतवले व त्याद्वारे ते श्रीमंत झाले, अशा कहाण्या सांगून लोकांचा विश्वास संपादन केला जाऊ लागला. तसेच जोरदार जाहिरतबाजी करून, प्रसिद्ध सेलिब्रेटीज्ना बोलवून त्यांच्याकडून ह्या पॅकेजेसचा प्रचार करून ते अधिकाधिक लोकांचे लक्ष खेचून घेऊ लागले. कमी वेळात जास्त श्रीमंतीची स्वप्ने दाखवल्यामुळे लोक प्रभावित होऊन पैसे गुंतवू लागले. आणि आपल्या ओळखीच्या लोकांनाही ह्यात सामील करून घेऊ लागले. जेणेकरून त्यांना कमिशन मिळू शकेल. ह्या स्कीममध्ये एक हजार रुपयेसुद्धा गुंतवणूक करता येऊ शकत होते. त्यामुळे अगदी ग्रामीण भागातील गरीब लोकसुद्धा ह्यात पैसे गुंतवू लागले. लवकरच, एक्कावन्न लाख पंचावन्न हजार पाचशे सोळा ग्राहकांनी ह्यामध्ये गुंतवणूक केली. नंतर ज्या लोकांची तीन, सहा वर्षे पूर्ण झाली, ते पैसे ताब्यात घेण्यासाठी कंपनीत गेले असता, त्यांना आपली फसवणूक झाली आहे, हे लक्षात आले. मिळालेल्या पैशांमधून ह्या कंपनीने अनेक प्रॉपर्टीज् विकत घेतल्या. काही लोकांना चेक देण्यात आले, परंतु ते बाऊन्स झाले. मग लोकांकडून तक्रारी होऊ लागल्या. यामुळे सेबीने तपास केल्यावर कळले, की हा खूप मोठा फ्रॉड आहे. ह्या प्रकारात फसलेल्या लोकांना अजूनही त्यांचे पैसे मिळू शकलेले नाहीत.

एक अशीच भयानक घटना एका व्यक्ती सोबत घडली. त्या व्यक्तीचे पॅन कार्ड वापरुन ठगाने त्यास कोणतीही कल्पना नसताना गॅरेंटर बनवले. त्याच्या नावावर वीस कोटीपेक्षा जास्त व्यवहार केले गेले. याबाबत त्या व्यक्तीला काहीच माहीत नव्हते. काही काळाने आयकर विभागाची नोटिस आल्यावर त्या व्यक्तीच्या लक्षात आले की, त्याचे पॅन कार्ड चुकीच्या हातात पडले आहे, आणि तो फसवलो गेला आहे. तसेच आणखी एका व्यक्तीच्या नावावर कुणीतरी साठ हजार रुपयांचे कर्ज घेतले गेले. असेच जर तुमचे पॅन कार्ड कुणाच्या हातात पडले, तर ते खूप घातक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पॅन कार्डवर लक्ष देणे फार गरजेचे आहे. आपले पॅन कार्ड अथवा नंबर कुणी वापरत नाही ना, हे तुम्ही तपासत राहिले पाहिजे. ते कसे, जाणून घेऊयात.

- Advertisement -

सगळ्यात आधी, तुम्हाला पॅन कार्ड हिस्ट्री तपासून पहावी लागेल. ते बघण्यासाठी तुम्ही https://www.cibil.com/ या लिंक वर जाऊ शकता. तेथे तुम्हाला ‘ ‘Get Your CIBIL Score’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. येथे तुम्हाला अनेक सब्स्क्रिप्शन योजना दिसतील. त्यापैकी एक तुम्हाला निवडायची आहे. त्यात प्रवेश केल्यावर तुम्हाला तुमचे खासगी तपशील भरावे लागतील. जसे की, मोबाइल नंबर, जन्म दिनांक, इमेल आयडी, इत्यादी. हे सर्व व्यवस्थित भरून झाल्यावर एक क्लिष्ट, आणि शक्तिशाली पासवर्ड तयार करा. पासवर्ड तयार करण्यासाठी तुम्ही पासवर्ड जनरेटरची मदत घेऊ शकता. मग आयटी ह्या प्रकारात ‘इन्कम टॅक्स आयडी’ हा पर्याय निवडा. त्यात आता तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकावा लागेल, आणि ‘‘Verify Your Identity’ह्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला एक फॉर्म दिसू लागेल. तो भरून झाल्यावर तुम्हाला तुमच्या खात्यावर किती कर्ज आहे, ह्याची माहिती मिळेल. ह्यावरून तुमच्या लक्षात येईल की, तुमचे पॅन कार्ड सुरक्षित आहे की नाही.

जर तुमच्या पॅन कार्डचा चुकीचा वापर करण्यात आला असेल, तर तुम्ही https://incometax.intalenetglobal.com/pan/pan.asp ह्या आयटी विभागाच्या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तक्रार नोंदवू शकता. ह्याने तुम्हाला तुमचे पैसे परत मिळू शकतात.

वरील घटना पाहिल्यावर असे लक्षात येते की, काही प्रमाणात इतर सायबर गुन्ह्यांच्या तुलनेत पॅन कार्डच्या माध्यमातून होणारे घोटाळे जास्त घातक वाटत आहेत. हे आपल्यासोबत घडू नये म्हणून सायबर फॉरेन्सिक तज्ञ तन्मय दीक्षित हे नागरिकांना पॅन कार्डच्या बाबतीत दक्ष राहण्याचा सल्ला देतात. ते सांगतात, की चुकूनही आपले पॅन कार्ड डिटेल्स कुणासोबत शेअर करू नये. तसेच, आपले आडनाव आणि जन्म तारीख सोशल मीडियावर पोस्ट करू नये. कारण त्यावरून पॅन नंबर शोधला जाऊ शकतो. तुमचे पॅन कार्ड जर काही कारणाने हरवले, किंवा चोरीला गेले, तर तात्काळ पोलीस ठाण्याला कळवा. जेणेकरून चोराला ते वापरता येणार नाही. तसेच, वर दिलेल्या प्रक्रियेद्वारे आपले पॅन सुरक्षित आहे, की नाही ह्याची सतत खात्री करून घेत रहा.

लेखक – तन्मय दीक्षित 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -