श्रावणातली ब्रह्मगिरी फेरी

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताला श्रावण महिन्यातील सोमवारी अनेक भाविक मोठ्या संख्येने फेरी मारायला येतात. 'श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे' या कवितेच्या ओळीइतकच येथील आल्हाददायी वातावरण मनाला मोहून टाकत. तशी वर्षभर ब्रह्मगिरीची फेरी करता येते, पण श्रावणातल्या सोमवारच केल्या जाणाऱ्या फेरीला अधिक महत्व आहे. त्यातच गेल्या पंधरा वीस वर्षांपासून तिसऱ्या सोमवारी मारल्या जाणाऱ्या फेरीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा आनंददायी प्रवास आहे. सुमारे आठशे वर्षांपूर्वी श्री संत निवृत्त‌िनाथ महाराजांना याच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व भागवत धर्माची स्थापना झाली. अशा पुराणकाळापासून ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा प्रचलीत आहे. पुण्यप्राप्तीसाठी तर कधी पापक्षालणासाठी प्रदक्षिणा झाल्या आहेत. इतिहासात शिक्षा म्हणून प्रदक्षिणा करण्यास सांग‌ितले आहे. तथापि प्रदक्षिणा त‌िसऱ्या सोमवारीच करावी हा नवा पायंडा पायंडा पडल्यामुळे विविध प्रकारचे समजगैरसमज आहेत. जसे सलग पाच वर्ष तिसऱ्या सोमवारची प्रदक्षिणा केली तर लाभ होतो, असा प्रचार झाला आहे. वास्तव‌िक ब्रह्मगिरी प्रदक्षिणा वर्षभरात केव्हाही केली तरी सारखाच लाभ देणारी आहे. त्यात श्रावणात केली तर अधिक चांगले आहे. केवळ त‌िसऱ्या श्रावण सोमवारचा आग्रह धरल्याने ठराव‌िक वेळेत लाखो भाविक या साधारण वीस किलोमीटरच्या मार्गावर चालतात यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. यात लहानांपासून अगदी म्हाताऱ्या लोकांपर्यंत सर्वांचाच सहभाग असतो. यामुळे तिसरा सोमवार टाळून इतर सोमवारी ही फेरी मारल्यास सोयीस्कर ठरते.

ब्रह्मगिरी पर्वत हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे. पूर्वी फेरी मार्ग हा कच्चा होता. शेतातून, गौतम ऋषींच्या डोंगरावरुन चढून पलीकडे उतरत पुन्हा भातशेतातून या रस्त्याने मार्गक्रमण करावे लागायचे. शेतातून जाणारा रस्ता म्हणजे भाविकांच्या चालण्यावरून पडणारी पायवाट होती. मध्येच मोठे मोठे पाण्याचे ओढे लागत ते एकमेकांच्या हाताला धरुन पार करावे लागत. आता या फेरीमार्गाचे पूर्ण काँक्रीटीकरण झाले आहे.

बहुतांश भाविक हे रविवारी रात्री त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होतात. त्र्यंबकेश्वरला तीर्थराज कुशावर्त म्हणून पाण्याचे चौकोनी कुंड आहे. त्यात तीन वेळा डुबकी मारुन स्नान करुन फेरीला सुरुवात करतात. कुशावर्तावरून त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरून जाताना कळसाला नमस्कार करुन, मनोमन श्रीशंकराला साद घालत सरळ फेरीमार्ग पकडावा. पहिला टप्पा हा गौतम ऋषींचे डोंगरावरील मंदिर आल्यावर पार पडतो. तिथे गौतम ऋषींचे दर्शन घेऊन थोडाशी विश्रांती घेतली जाते. आणि पुढील टप्प्याला सुरुवात होते.

फेरी मार्गावरुन चालत जाताना आकाशात नजर टाकली की ब्रह्मगिरीच्या अंगाखांद्यावर खेळणारे ढग थकवा पळवून लावतात. यावेळी मार्गात भाविकांना अन्नदान करण्यासाठी अनेक लोकांनी स्टॉल लावलेले असतात. भाविकांना खिचडी, केळी, चहा असे पदार्थ दिले जातात. यावेळी अन्नदान करणारे देखील असंख्य भाविक या मार्गावर बघायला मिळतात. तर काही आदिवासी बांधव देखील पोटापाण्यासाठी ठिकठिकाणी चहा, फराळाचे स्टॉल लावतात. पुढे पुन्हा त्र्यंबकेश्वर कडे जाणार डांबरी रस्ता लागतो. तो पार करत आपण त्र्यंबकेश्वर मध्ये येऊन पोहोचतो. यावेळी त्र्यंबकेश्वराचे बाहेरुनच दर्शन घेत भाविक परतीच्या मार्गाला लागतात. त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी नाशिक येथील मध्यवर्ती बस स्थानकावरुन पूर्ण श्रावण महिनाभर जादा बसेस सोडल्या जातात. यामुळे भाविकांची गैरसोय होत नाही

पूर्वी दळणवळणाची साधने मर्यादित होती. तेव्हा उपासना करणारे भाविक त्र्यंबकेश्वर येथे महिना सव्वा महिना मुक्कामी असायचे. लॉज‌िंग संस्कृती इतकी विकसीत झालेली नव्हती. तेव्हा येथे धर्मशाळा हा भाविकांचा एकमेव निवाऱ्याचा आधार होता. सकाळसायंकाळ मंदिरात हजेरी लावणे, पोथ्यापुराणांची पारायणे करणे आणि प्रदक्षिणा करणे याकरिता भाविक येथे निवासी असायचे. शहरातील सर्वच मंदिर, मठ आणि आश्रमांमध्ये भल्या पहाटेपासून पुजाअर्चा सुरू झालेल्या आहेत. रात्री उश‌िरापर्यंत पोथी पुराणांचे वाचन सुरू असते. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा हा एक शिव उपासना करण्याचा भाग आहे.

प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ लागतात. प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागातीर्थ, रामतीर्थ, वैतरणाबाणगंगा निर्मल तीर्थ, बानगंगाधवलगंगा पद्मतीर्थ, नरसींह तीर्थ, बिल्वतीर्थ आदी तीर्थ आणि नद्या तसेच मंदिरे आपले लक्ष वेधून घेतात. काही तीर्थ आज दृष्टीत येत नाहीत. तसेच प्रदक्षिणेचा मार्गही बदलल्यामुळे काही तीर्थ आणि मंदिरे भाविकांच्या वाटेत लागतच नाहीत. प्रदक्षिणे दरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर नमस्काराचे ठिकाण लागते. येथे पंचमुखी शिवस्वरूप ब्रह्मगिरीस आपण पुर्वाभूमुख होऊन साष्टांग नमस्कार घालावा, अशी प्रथा आहे. सकाळच्या वेळेस प्रदक्षिणा सुरू केल्यानंतर येथे हा अर्धा प्रवास संपतो. येथून होणारे ब्रह्मगिरीचे विलोभनीय दर्शन अवघा शिणभाग घालवते. सुर्योदयाच्या वेळी स्वर्गीय दृष्याची अनुभती प्राप्त होते.

येथुन पुढे परतीचा प्रवास सुरू होतो. प्रदक्षिणा मार्ग सिमेंट काँक्रीटचा झाला आहे. पूर्वी आरण्यातून वाट सापडेल तशी होणारी प्रदक्षिणा आता केवळ रस्त्याने चालणे अशी झाली आहे. डोंगर माथ्यावरून वनस्पतींमधून खळाळात आलेले झरे पायाला सुखावह असायचे. चिखलातून चालतांना विविध वनस्पतींचा स्पर्श पायांना व्हायचा आणि सलग चारपाच तास चालणे ही एक योगसाधना पूर्ण व्हायची. ती आता त‌ितक्याच प्रमाणात आणि प्रभावाने होणार नसेल, तरी देखील श्रावणात पाऊस असताना प्रदक्षिणा करणे हा अनुभव खरोखरच अतुलनीय आणि अद्भुत असा आहे. म्हणून तो प्रत्येक श्रावणात घ्यावा घ्यावासा वाटतो.