Eco friendly bappa Competition
घर फिचर्स सारांश मराठा X कुणबी: उभी फूट पाडण्याचा डाव!

मराठा X कुणबी: उभी फूट पाडण्याचा डाव!

Subscribe

कुणबी हे मराठा आहेत का आणि सर्वच मराठा हे कुणबी आहेत का, असा वाद तयार करून लढवय्या मराठा समाजात उभी फूट पाडण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो निषेधार्ह आहेच; शिवाय मराठा समाजाविषयी असंख्य राजकारण्यांच्या मनात किती ठासून द्वेष भरला आहे हे ठळकपणे अधोरेखित करणारादेखील आहे. मराठा आणि कुणबी या एकच जाती नसत्या तर या दोघांमध्ये रोटीबेटी व्यवहार झालेच नसते. मराठा आणि कुणबी हे विभिन्न नाहीत याचे असंख्य पुरावे आज उपलब्ध आहेत. असे असतानाही मराठा समाजाचे दोन भाग पाडून एकमेकांमध्ये झुंज लावण्याचा संधीसाधूंचा प्रयत्न लपून राहू शकत नाही.

–हेमंत भोसले

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आरक्षणाच्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते. असे असतानाही आंदोलकांवर लाठीमार करणारे आणि हवेत गोळीबार करून आंदोलन चिरडून टाकणार्‍यांनी आता इतका गोंधळ माजवलाय, ज्याद्वारे त्यांनी केलेल्या मुस्कटदाबीने आंदोलन दबून जाईल असा त्यांचा समज झाला आहे. आरक्षणासंदर्भात आजवर झालेल्या मराठा आंदोलनांचे स्वरूप बघता त्यातील बहुतांश आंदोलने ही शांततेच्या मार्गानेच झाली आहेत. भूतो न भविष्यती अशा शिस्तीने लाखोंच्या समूहाचे मोर्चे या महाराष्ट्राने बघितले आहेत. हे मोर्चे बघून सर्वच जाती-धर्माच्या समाज बांधवांनी मराठा समाजाच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली, परंतु पोलिसांच्या माध्यमातून सरकारने मात्र याच मराठ्यांच्या पाठीवर काठ्यांनी प्रहार करून त्यांच्यातील लढवय्या वृत्तीला चिथावणी दिली आहे.

- Advertisement -

पोलीस लाठीमार करताना जखमी झालेत की त्यापूर्वीच जखमी झाले होते याची प्रथम चौकशी करण्याऐवजी वाचाळ राज्यकर्त्यांनी आपली राजकीय पोळी भाजण्याची संधीही सोडली नाही. लाठीमार सौम्यरीत्या करण्यात आला, असे निर्लज्जपणे सांगणार्‍यांनी फक्त डोकी फुटली, माता-भगिनी काही प्रमाणात रक्तबंबाळ झाल्या आणि तरुणांची थोडीफार हाडे मोडली, असेही सांगून टाकावे. आता तेवढेच ऐकायचे बाकी आहे. या लाठीमारानंतर मराठा समाजाचे रौद्र रूप बघून राज्यकर्त्यांना ‘आग लावण्याची वृत्ती’ काहीशी आवरती घ्यावी लागली. ही आग आता आपल्यालाच खाक करेल अशी जाणीव झाल्यावर या मंडळींनी जिभेवर लगाम घातलेला दिसतो, मात्र लांडग्यासारख्या लबाड वृत्तीला मात्र त्यांनी लगाम घातलेला दिसत नाही.

‘संकट हीच संधी’ हे तत्त्व अंगीकारून या नाठाळांनी मराठा आणि कुणबी असा वाद पेटवण्याचा जो प्रयत्न सुरू केला आहे, तो एका षङ्यंत्राचा भाग आहे हे न उमगण्याइतका मराठा समाज दूधखुळा नाही. आज कुणबींना आरक्षण देण्याच्या गप्पा करून उर्वरित मराठ्यांना त्यांच्यापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, मात्र यापूर्वीही कुणबी समाजाला आरक्षणाचा लाभ मिळतच होता. केवळ मराठवाड्यातील कुणबी समाजावर अन्याय होत असल्याने या अन्यायाच्या निवारणासाठी आंदोलनाचे अस्त्र उगारण्यात आले होते, परंतु या अस्त्राला बुमरँग करण्यासाठी काही मुखंडांची अभद्र युती झालेली दिसते. त्यातूनच हा वाद उकरून काढण्यात आला आहे. अर्थात केवळ वाद उकरला म्हणून त्याची चिकित्सा न करणे हे पळपुटेपणाचे लक्षण ठरेल.
या वादाच्या खोलात जाण्यापूर्वी मराठा समाजाचा उगम नक्की कोठून झाला हे बघणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी सातवाहनांच्या काळात डोकवावे लागेल.

- Advertisement -

त्या काळात जिल्ह्याला ‘रठ्ठ’ असे संबोधले जाई. आज जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जसे जिल्हाधिकारी असतात, तसे त्या काळात प्रांताच्या प्रमुखाला ‘महारठ्ठ’ म्हणून संबोधले जाई. हे पद पात्रतेवर ठरत असे, परंतु कालांतराने हे पद वंशपरंपरेने दिले जाऊ लागले. गंमत म्हणजे त्या काळी प्रशासकीय पदे असणार्‍या कुटुंबांत परस्परांची लग्न जुळत. या प्रतिष्ठेच्या संकल्पनेचे पुढे जातीच्या संकल्पनेत रूपांतर झाले. कालांतराने या पदांचे महत्त्व कमी होत गेले. अनेकांकडे जमिनी राहिल्या नाहीत. भाऊबंदकीच्या विभागणीत जमिनीचे तुकडे होत गेले. त्यामुळे कधीकाळचे ‘महारठ्ठ’ हे शेती करू लागले. पुढे हाच वर्ग शेतकरी किंवा कुणबी म्हणून नावारूपाला आला. मराठा आणि कुणबी एकच असल्याचे असंख्य पुरावे देता येतील. सन १८८१ पासून १९३१ पर्यंतच्या ५० वर्षांच्या गॅझेटमध्ये मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख केलेला दिसतो. तसेच १९८१च्या जनगणनेत मराठ्यांचा कुणब्यांमध्ये समावेश केला होता.

प्रा. रामकृष्ण कदम यांनी ‘मराठा ९६ कुले’ या पुस्तकात मराठा समाजातील ९६ कुळांचे विश्लेषण केले आहे. ते म्हणतात की, महाराष्ट्रात सातवाहन, वाकाटक, कुर, भोज, कलचुरी, राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, हैहय, गुर्जर, कदंब, मानांक, यादव हे सर्व क्षत्रिय राजवंश होऊन गेले. त्यांचे कुल-संबंधित आणि वंशज हेदेखील क्षत्रिय होते. याच वंशजांना महाराष्ट्रात महाराष्ट्रकूट, महारथी किंवा मराठा असे संबोधले गेले. याच वर्गाचे दोन प्रमुख वंश आहेत. चंद्रवंश आणि सूर्यवंश. या दोन वंशांत मराठ्यांची ९६ कुळांची (कुटुंबांची) विभागणी झाली आहे. त्याच कुळांना ९६ कुळी मराठे असे म्हटले गेले. सूर्यवंश आणि चंद्रवंशाच्या उगमाबाबत पुराणांमध्ये आख्यायिका आहेत. सूर्यवंश हा रामचंद्र तर चंद्रवंश हा ययाती यांच्याशी संबंधित असल्याचा संदर्भ या पुस्तकात देण्यात आला आहे.

इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात की, अकराव्या शतकापासून ९६ कुळे या संकल्पनेचं स्पष्ट स्वरूप लक्षात येण्यास सुरुवात झाली. सैन्यात नसलेले मराठे शेती करत किंवा सैन्यात भरती होणारा समाज कृषक समाजातून येत असे. याचाच अर्थ असा की मराठे हे आधी शेतकरी होते आणि नंतर ते क्षत्रिय होते. व्यवसायाच्या आधारावर त्यांचे मराठा क्षत्रिय आणि कुणबी असे वर्गीकरण झाले. ९६ कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या सरकार दरबारी ९६ कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. ९६ कुळी ही कागदोपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त ‘मराठा’ असा उल्लेख करतात. मराठ्यांमध्ये राव मराठा, नाईक मराठा, मराठा कुणबी अशा उपजाती आहेत.

इतिहासकालीन कागदपत्रे तपासली तर आपल्या लक्षात येते की महाराष्ट्रातील एकूणच १२ बलुतेदारांना मराठा म्हटले जायचे, पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचे वर्गीकरण झाले आणि त्यांच्या जाती निर्माण झाल्या. जे शेती करत होते त्यांना कुणबी म्हटले गेले, तर ज्यांच्याकडे जमीनदारी होती त्यांनी स्वतःला ‘मराठा’च म्हणवून घेणे पसंत केले. ९६ कुळी मराठे हेसुद्धा कुणबी असल्याचे मत व्यक्त करताना इतिहास अभ्यासक डॉ. सदानंद मोरे सांगतात की, जे शेती करतात ते कुणबी. ९६ कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही. पर्यायाने मराठा आणि कुणबी एकच आहेत. ब्राह्मणांमध्ये पोटजाती आहेत तरीदेखील ब्राह्मण हा जातीचा समूह नाही तर ब्राह्मण ही जात ठरते. त्याचप्रमाणे मराठा, कुणबी, मराठा-कुणबी, ९६ कुळी मराठे, देशमुख मराठा हे सर्व एकच म्हणजे मराठा आहेत, असं सदानंद मोरे सांगतात.

खरंतर विवाहसंस्था आणि जातीसंस्था यांचा परस्पर संबंध असतो. त्यामुळे एकाच जातीत लग्न करण्याची पद्धत रूढ झाली. मराठा समाज त्याला अपवाद नाही. मराठा आणि कुणबी हे दोन विभिन्न समाज असते तर या दोन्ही कथित समाजांमधील वधू-वरांचे एकमेकांशी विवाह झाले नसते. मराठा कुणबी ही एकच जात असल्यामुळेच विवाहसंबंध जुळवताना अडचणी निर्माण होत नाहीत. मराठा आणि कुणबी यांच्या परस्पर संबंधांचे अनेक दाखले आहेत. तत्कालीन ब्रिटिश सरकार आणि हैदराबाद संस्थानाने १९३१ मध्ये जातनिहाय जनगणना केली होती. सध्याच्या महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे १६.२९ टक्के आणि ७.३४ टक्के होते. १९३१ ते १९४५ या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वत:ला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली.

महात्मा फुले यांनी ‘शेतकर्‍यांचा असूड’, ‘इशारा’ या पुस्तकांमधून शेतकर्‍यांचे वर्णन करताना म्हटले आहे की, शेतकरी कुळवाडी म्हणजेच कुणबी आहे. महात्मा फुलेंनी ज्या शेतकर्‍यांच्या हलाखीचे वर्णन केलेले आहे तो मुख्यत्वे मराठा कुणबी शेतकरी आहे. संत तुकाराम महाराजांच्या ‘बरें देवा कुणबी केलों, नाही तरि दंभे असतो मेलो’ या अभंगाचा संदर्भ लक्षात घेता तुकोबा हे शेतकरी कुणबी होते हे स्पष्ट होते. छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले होते की, मराठ्यांचे धंदे दोन, शेतकी व शिपाईगिरी, कुणब्यांचा शेतकी एकच, असे आम्ही म्हणालो. यावरून मराठे हे कसब्यांत राहणारे आणि कुणबी गावखेड्यात राहणारे हे सिद्ध होते, पण या दोघांचा इतका एकजीव झाला आहे की धंद्याच्या दृष्टीने त्यांच्यात भिन्न कल्पिणे केवळ अशक्य झाले आहे.

शंभर वर्षांत म्हणजे तिसर्‍याच पिढीत मराठ्याचा कुणबी आणि कुणब्याचा मराठा, म्हणजे शेतकर्‍याचा राजा आणि राजाचा शेतकरी अशी उलटापालट निदान महाराष्ट्रात तरी गेल्या दोन हजार वर्षांत बेमालूम चालू आहे. अर्थात आपल्याला मराठी लोकांनी केलेल्या अभ्यासपूर्ण विवेचनावर विश्वास नसतो. त्यामुळे येथे ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट व्हेन रसेलचेही म्हणणे नमूद करावेसे वाटते. रसेल यांनी त्यांच्या ‘ट्राइब्स अँड कास्ट्स ऑफ द सेंट्रल प्रोव्हिन्सेस ऑफ इंडिया’ या पुस्तकात कुणबी हा समाजच मराठा असल्याचे म्हटले आहे. मराठा समाज हा लष्करी सेवेत होता, पण त्यांचा उदय हा श्रमिक कुणबी या वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे. नेमके कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे समजायला सुरुवात झाली हे अद्याप निश्चित समजले नाही, असे या पुस्तकात म्हटले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे की नाही याबाबत अभ्यास करण्यासाठी तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली २१ मार्च २०१३ ला एका समितीची स्थापना करण्यात आली होती. मराठा आणि कुणबी समाज एकच आहे आणि ज्याप्रमाणे कुणबी समाजाला आरक्षण आहे त्याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस या समितीच्या अहवालात करण्यात आली. मराठा समाजाचा भाग असलेल्या कुणबींना याआधीच ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत आहे, परंतु राणे समितीने आपल्या अहवालात म्हटले की, सगळेच मराठे कुणबी आहेत. त्यामुळे ते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टीने मागास आहेत. कारण कुणब्यांचे मागासलेपण याआधीच सिद्ध करण्यात आले आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रातील मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करीत असे, पण युद्धाच्या काळात हा तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता.

याच वर्गातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि नंतरचे साम्राज्य या काळातील कुणबी मराठ्यांचा लष्करी पेशा वाढत जाऊन त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडली. मोगलांच्या मुलखातून मिळणार्‍या चौथाईच्या हक्काने महाराष्ट्रात आर्थिक समृद्धी आली. १८१८ मध्ये इंग्रजांनी मराठ्यांचे राज्य बुडवले. त्यानंतर महसुलाच्या स्वरूपात मिळणारे उत्पन्न बंद झाल्यानंतर हा समाज पूर्णपणे शेतीवर विसंबून राहू लागला. समितीने केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या ३२.१४ टक्के असल्याचे म्हटले आहे. मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज इतर मागासवर्गीय आहे, त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी शिफारस समितीने केली आहे, परंतु मराठा आणि कुणबी वेगवेगळ्या जाती आहेत असे दर्शवून या मोठ्या समाजात फूट पाडण्याचे षड्यंत्र काही मंडळींकडून रचले जात आहे.

इतर समाजाचे आरक्षण कमी करून मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी आजवर मराठा समाजाच्या कोणत्याही व्यासपीठावर झालेली नाही. त्यामुळे संबंधित नेत्यांनी घाबरून जाण्याची गरजच नाही. अर्थात मराठा समाजाविषयी या मंडळींमध्ये इतका ठासून द्वेष भरलेला आहे की या समाजाला आरक्षणच काय अन्य कोणत्याही सुविधा मिळू नयेत, अशी यांची मनोमन इच्छा आहे. त्यातूनच मग समाजात गैरसमज निर्माण होतील अशी वक्तव्ये केली जात आहेत. अशा बाष्कळ बडबडीला उत्तरे देण्यापेक्षा समाजातील पोटजाती मराठा या एकाच जातीच्या भाग आहेत हे न्यायालयाला कसे पटवून देता येईल त्याकडे समाजधुरिणांनी लक्ष द्यावे इतकेच.

- Advertisment -